मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष //- आदेश -// (पारित दिनांक – 14/10/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारकर्त्याचे खाते गैरअर्जदार क्र. 1 कडे असून त्याने गैरअर्जदार क्र. 2 कडून बॉबकार्ड घेतले होते. तक्रारकर्त्याने सदर बॉब कार्डवरील सर्व रकमा देय केल्यानंतर गैरअर्जदाराला सदर कार्ड परत करुन रद्द केले व नंतर सदर कार्डवरुन कोणताही व्यवहार केला नाही. तरीहीदेखील तक्रारकर्त्याच्या खात्यातून अचानकपणे रु.15,000/- कपात करण्यात आले. त्यासंबंधी त्याने वेळोवेळी गैरअर्जदाराकडे पाठपुरावा केला. पत्रेही दिली. परंतू उपयोग झाला नाही. शेवटी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस दिला. नोटीस प्राप्त होऊन देखील दखल घेतली नाही, म्हणून तक्रार दाखल करुन त्याद्वारे रु.15,000/- कपात करण्यात आलेली रक्कम व त्यावर 20 टक्के व्याज, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- एवढी नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च द्यावा अशा मागण्या केल्या. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांना पाठविला असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी उत्तर दाखल न केल्याने विना लेखी जवाब प्रकरण चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्र. 2 यांनी पुरसिस दाखल करुन नमूद केले की, प्रकरण जुने असल्यामुळे संबंधित दस्तऐवज हा नष्ट करण्यात आलेला आहे आणि ते तक्रारकर्त्याची रक्कम देण्यास तयार आहे. 3. मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन बॉब कार्डसंबंधीची संपूर्ण रक्कम भरलेली आहे ही बाब दस्तऐवज क्र. 2 वरुन दिसून येते. पुढे असे निदर्शनास येते की, गैरअर्जदाराने त्याचे बँकेतून 22.01.2008 रोजी रु.15,000/- एवढी रक्कम बॉब कार्ड अन्वये कपात केली. जेव्हा की, तक्रारकर्ता कोणतीही रक्कम देय नव्हती. पुढे तक्रारकर्त्याने वेळोवेळी संपर्क साधून ही चुक दुरुस्त करावी यासंबंधीची मागणी केली. पत्रे दिली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी स्मरणपत्र दिले व 24.05.2010 रोजी रजिस्टर्ड पोस्टाद्वारे नोटीस दिली. ती गैरअर्जदारांना प्राप्त झाली. मात्र त्याने उत्तर दिले नाही व कारवाई केली नाही. ही बाब लक्षात घेता तक्रारकर्त्याच्या खात्यातून देय नसतांना रु.15,000/- कपात करणे ही गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी आहे व ती रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. वरील परीस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला संयुक्तरीत्या व एकत्रितरीत्या, रु.15,000/- रक्कम दि.22.01.2008 पासून रक्कम प्रत्यक्ष मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह द्यावी. 3) मानसिक त्रासाबद्दल रु.2,000/- गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला द्यावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत रु.1,000/- गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला द्यावे. 5) उपरोक्त आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून संयुक्तरीत्या व एकत्रितरीत्या 30 दिवसाच्या आत करावे, अन्यथा गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे आदेशीत (आदेश क्र.2) रकमेवर द.सा.द.शे.9 टक्के व्याजाऐवज द.सा.द.शे.12 टक्के व्याज देण्यास बाध्य राहील. 6) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |