ग्राहक तक्रार क्र. 118/2014
अर्ज दाखल तारीख : 04/06/2014
अर्ज निकाल तारीख: 30/05/2015
कालावधी: 0 वर्षे 11 महिने 27 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. अंबादास विठठलराव तपसाळे,
वय - 27 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.तुतोरी, ता. उमरगा, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. शाखा व्यवस्थापक,
बजाज अलायन्स जनरल इंन्सुरन्स कंपनी,
जे.ई. प्लॉजा एअरपोर्ट रोड,
येरवडा पुणे-411006 ..विरुध्द पक्षकार.
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.जी.के.गायकवाड.
विरुध्द पक्षकारतर्फे विधीज्ञ : श्री.पी.व्ही.सराफ.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
अ) 1. आपल्या ट्रकचा विरुध्द पक्षकार (विप) यांचेकडे अपघात विमा उतरला असतांना अपघातानंतर विमा रक्कम मिळण्यास नकार देऊन विप यांनी सेवेत त्रुटी केली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दिलेली आहे.
2. तक चे तक्रारी अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे...
तक हा ट्रक क्र. एम.एच.25 यु.0509 चा मालक व कब्जेदार आहे त्याने ट्रकचा विमा विप कडे दि.07/03/2013 ते 06/03/2014 या कालावधीसाठी उतरला होता. गोविंद बळीराम चव्हाण याला ड्रायव्हर म्हणून ठेवलेले होते. दि.01/07/2013 रोजी ट्रक हैद्राबाद येथे कांद्याच्या लोडसह चालला होता. कराळी शिवारात अचानक ब्रेक मारल्यामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला खड्यात जाऊन पल्टी झाला. तीन लहान मुले जी चालकाच्या ओळखीची होती तसेच गाडीचा क्लीनर हरीदास सुरवसे यांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. पो. स्टे. उमरगा येथे चालकाविरुध्द गु.क्र.143/13 ने गुन्हा नोंदविण्यात आला. दि.03/07/2013 रोजी पोलिसांनी पंचनामा केला व ट्रकचे नुकसान झाल्याचे नमूद केले. तक ने विप याला घटनेबद्दल कळवले त्यांचे सर्व्हेअरने ट्रकची पाहणी केली व नुकसान भरपाईचा अहवाल सादर केला. तक ला ट्रक दुरुस्तीसाठी रु.4,00,000/- खर्च आला. तक ने विप कडे भरपाई मिळण्यासाठी मागणी केली. दि.05/11/2013 व 23/11/2013 रोजी विप ने पत्र पाठवून ट्रकमध्ये पाच प्रवासी बेकायदेशीरपणे प्रवास करीत होते म्हणून क्लेम नामंजूर का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली. मात्र त्याचे उत्तर देण्याआधीच दि.01/12/2013 रोजी क्लेम नाकारला. ट्रकमधील प्रवासी यांनी मोटार अपघात दावे 89/13, 80/13, 81/13 उमरग्याच्या न्यायाधिकरणात दाखल केले होते तक ने स्वत: पैसे देऊन ते तडजोडीने मिटवले मात्र विप ने विमा रक्कम नाकारुन सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे विमा रक्कम मिळावी म्हणून ही तक्रार तक ने दाखल केलेली आहे. ही तक्रार दि.04/06/2014 रोजी दाखल केली आहे.
3. हया तक्रारीसोबत तक ने दोषारोप पत्र, फिर्यादी जबाब, घटनास्थळ पंचनामा, विप चे दि.01/07/2013 चे पत्र, इस्टीमेट ऑफ लेबर चार्जेस, डायव्हींग लायसेंन्स, इन्शूरंन्स कव्हर नोट, सर्ट्रीफिकेटस ऑफ फिटनेस, फॉर्म, एन.पी.जे.डी.सी.पी., अप्पा ट्रॉन्सपोर्टची पावती, टाटा फायनान्सचे ना हरकत प्रमाणपत्र, वाहन रजिष्ट्रेशन फॉर्म, एम.एस.सी.पी. 79/13, 80/13 व 81/13 मधील तडजोड हुकूम नामे, पॅनकार्ड, नॅशनल परमीटचे सट्रीफीकेटस इत्यादी कागदपत्रांच्या प्रती हजर केल्या आहेत.
ब) विप ने हजर होऊन दि.02/01/2015 रोजी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विप कडे ट्रकचा विमा उतरला होता याबद्दल वाद नाही. ट्रकला अपघात झाला याबद्दल वाद नाही. तक ने सहकार्य केले नाही तसेच योग्य ती कागदपत्रे दिली नाही तसेच विम्यातील अटींचा भंग केला त्यामुळे विप ने रास्तपणे तक चा क्लेम नाकरलेला आहे. ट्रक हा माल वाहतूकीसाठी होता त्यामध्ये ड्रायव्हरसह फक्त दोनच लोकांना जाण्याची परवानगी होती मात्र अधिक लोक नेऊन कायद्याचा भंग केला तसेच विम्याच्या अटींचा भंग केला, ट्रकमध्ये प्रवासी नेण्यात आले. अपघातापुर्वी तक ने संजय दगडू साठे याला ट्रक विकलेला होता त्यामुळे तक ला प्रस्तुतची तक्रार करण्याचा अधिकार नाही. विप तर्फे नेमलेल्या सर्व्हेअरने तक कडे कागदपत्रांची मागणी केली होती. पण तक ने कागदपत्रे दिली नाहीत त्यामुळे प्रस्तुतची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
क) तक ची तक्रार त्यानी दिलेली कागदपत्रे, विप चे म्हणणे यांचे अवलोकन केले असता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमीमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
1. विप चा पत्ता पुण्याचा आहे. तक ने विप कडे विमा कोठे उतरला याबद्दल काहीही म्हंटलले नाही. विप चा उस्मानाबाद जिल्हयात प्रतिनिधी असल्याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र अपघात उस्मानाबाद जिल्हयात झालेला आहे. विप ने क्लेम नाकारल्याचे पत्र तक ला उस्मानाबाद जिल्ह्यात दिलेले आहे. त्यामुळे तक्रारीस अंशत: कारण या मंचाचे कार्यक्षेत्रात घडल्याचे दिसते. ही तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार नाही असे विप ने कोठेही म्हंटलेले नाही त्यामुळे ही तक्रार चालविण्याचा या मंचास अधिकार आहे असे आमचे मत आहे.
2. तक चे म्हणण्याप्रमाणे त्याने ट्रकचा विमा दि.07/03/2013 ते 06/03/2014 या कालावधीसाठी उतरला होता. ट्रकचा दि.01/07/2013 रोजी अपघात झाला. विमा उतरल्याचे विप ने मान्य केलेले आहे. मात्र तक ने आवश्यक सहकार्य दिले नाही व आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत म्हणून विमा दावा नाकारला. अपघात समयी गाडीमध्ये पाच प्रवासी प्रवास करीत होते त्यामुळे पॉलिसीतील अटींचा भंग झाला असेपण म्हंटले आहे. तक ने इन्शूरंन्स कव्हर नोट हजर केली आहे. पॉलिसी डॉक्यूमेंट तक अथवा विप ने हजर केलेली नाही.
3. असे दिसते की हरीदास रामा सुरवसे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला. फिर्यादीप्रमाणे संजय साठे यांनी खरेदी केलेल्या ट्रकवर हरीदास दोन वर्षापासून क्लिनरचे काम करतो. ट्रकमध्ये कांदा भरुन हैद्राबादला नेत होते. केबीनमध्ये महेश चव्हाण, सनत चव्हाण व राम लोंढे रा. जगदळवाडी प्रवास करीत होते जी शालेय मुले होती. संजय राठोड बरोबर ट्रक विक्रीचा व्यवहार झाला असे फिर्यादीत नमूद आहे. महेश, सनत व राम या मुलांनी मोटार अपघात दावे, तक संजय राठोड व विप यांचे विरुध्द दाखल केले होते. विप यांचे विरुध्द दावे काढून घेण्यात आले. उर्वरित दोघांनी पैसे दिल्यामुळे तडजोड करण्यात आली व त्याच्या प्रती हजर करण्यात आलेल्या आहेत.
4. संजय साठे याचेशी तक ने काही व्यवहार केला असावा मात्र आर.टी.ओ. कडील रेकॉर्डप्रमाणे तक हाच ट्रकचा मालक आहे. ट्रक चे उत्पादन वर्ष 2010 आहे. दि.30/10/2013 रोजी तक ने आर.टी.ओ. कडून सर्ट्रीफिकेट घेतले त्यामध्ये तोच मालक असल्याचे नमूद आहे. विप ने तक च्या नावे इन्शूरंन्स पॉलिसी दिली. संजय राठोडकडे ट्रकची मालकी दिल्याचे कोणतेही रेकॉर्ड नाही. तसेच विप ने तक चे नावे पॉलिसी दिल्यामुळे आता तक ट्रकचा मालक नाही असे म्हणण्यास विप ला इस्टोपेल बाय कंडक्ट या तत्वाची हरकत येते. त्यामुळे तक मालक नसल्यामुळे तक ला तक्रार करता येणार नाही हे विप चे म्हणणे मान्य करता येणार नाही.
5. विप ने म्हंटले की ट्रकमध्ये तीन प्रवासी नेल्यामुळे विम्यातील अटींचा भंग झाला मात्र विमा पॉलिसी रेकॉर्डवर हजर करण्यात आलेली नाही, फक्त कव्हर नोट हजर करण्यात आलेली आहे. वापराबद्दल काय निर्बंध होते हे रेकॉर्डवर आलेले नाही. पॅसेंजरबद्दल काही प्रिमीयम घेतल्याचे दिसते. तक चे म्हणण्याप्रमाणे शाळेत जाणा-या तीन मुलांना ट्रक मध्ये घेण्यात आलेले होते. त्यामुळे विम्यातील शर्तीचा भंग झालेला नाही.
6. तक तर्फे पुढील निवाडयांचा आधार घेण्यात आलेला आहे.
बी.एम. राजशेखराईह विरुध्द ओरियंटल इन्शूरंन्स 2005 (1) टी.ए.सी. 267 नॅशनल कमिशन त्यामध्ये ट्रकमध्ये चार प्रवासी नेण्यात येत होते व अपघात झाला. प्रवासी नेणे हे अपघाताचे कारण होऊ शकत नाही म्हणून भरपाईची रक्कम मंजूर केलेली आहे. 2) नॅशनल इंन्शूरंन्स विरुध्द नवीनचंद्र 2005 (1) टी.ए.सी.304 हा निवाडा त्याच मुद्यावर आहे. याउलट विप तर्फे खालील निवाडयांवर भर दिला आहे. नरेश कुमार विरुध्द रिलायन्स जनरल रि.पी.2316/12 एन.सी. तेथे टॅंन्करमध्ये वीस प्रवासी नेण्यात येत होते. त्यामुळे क्लेम नाकारणे उचीत ठरविले आहे. 2) नॅशनल इन्शूरंन्स वि. सुरेशबाबू फस्ट अपील 166/2003 एन.सी. येथे वाहनात 19 प्रवासी नेण्याची परवानगी होती पण 35 ते 36 नेले होते त्यामुळे क्लेम नाकारणे उचीत ठरवले. 3) एस.जी. शिवमुरतप्पा वि. रिलायन्स जनरल रि.पी.3176/2011 एन.सी. 4) चंद्रप्रकाश वि. आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड 3122/2007 एन.सी. हे निवाडेपण त्याच मुद्यावर आहेत.
7. वर म्हंटल्याप्रमाणे पक्षकारांनी इन्शूरन्स पॉलिसी हजर केलेली नाही त्यामुळे प्रवाश्यांबद्दल काय अट होती हे समजून येत नाही. कव्हर नोटप्रमाणे ट्रकमध्ये प्रवास करणा-यांबदृल प्रिमियम घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्या अटींचा भंग झाला हे स्पष्ट होत नाही त्यामुळे या कारणावरुन विप ने क्लेम नाकारणे योग्य ठरत नाही.
8. आता प्रश्न उदभवतो की ट्रकचे अपघातात किती नुकसान झाले. तक चे म्हणण्याप्रमाणे 4,00,000/- चे नुकसान झाले पंचनाम्यामध्ये ट्रकचे नुकसान झाल्याचे म्हंटले आहे तक ने ट्रकचे फोटो हजर केले नाही. तक ने म्हंटले की विप तर्फे सर्व्हेअरने नुकसानीचा सर्व्हे केला तो रिपोर्ट हजर नाही. तक तर्फे एक इस्टीमेट हजर करण्यात आलेले आहे त्यावर नाव अगर सही नाही. जर त्याप्रमाणे खर्च केलेला असेल तर त्याबद्दलच्या पावत्या हजर केलेल्या नाहीत. ट्रक तीन वर्ष जूना होता त्यामुळे जास्तीत जास्त रु.1,00,000/- चे नुकसान झाले असावे म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खलीलप्रमणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार खालीलप्रमाणे अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप ने तक ला विमा भरपाई म्हणून रु.1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) द्यावे.
3) विप ने तक ला वरील रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे 9 दराने व्याज द्यावे.
4) विप ने तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावे.
-
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.