::: नि का ल प त्र :::
(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,)
(पारीत दिनांक ०७/१०/२०२२)
१. प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केलेली असून तक्रारीचा आशय खालिलप्रमाणेः-
२. तक्रारकर्त्याचे वडील श्रीराम अन्जाराम मोदिनवार यांनी दिनांक १३ मार्च, २००७ रोजी विरुध्दपक्ष क्रमांक ३ यांचे मार्फत विरुध्दपक्ष क्रमांक १ यांची न्यु युनिटगेट पॉलिसी घेतली. त्या पॉलिसीचा नंबर ४२६८४४६० हा असून त्याचा वार्षीक प्रिमीयम रुपये १०,०००/- होता. दरवर्षी रुपये १०,०००/- प्रमाणे ३ वर्षात रुपये ३०,०००/- भरावे लागणार व त्यानंतर कोणत्याही प्रिमीयमच्या रक्कमेचा भरणा करावा लागणार नाही असे विरुध्दपक्ष क्रमांक ३ यांनी तक्राकर्त्याचे वडीलांना सांगितल्याने त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक ३ यांचे मार्फत रुपये ३०,०००/- चा भरणा विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे केला.
३. तक्रारकर्त्याचे वडील दिनांक २२/०२/२०१९ रोजी मरण पावले. त्यांचे मृत्यु नंतर तक्रारकर्त्यास उपरोक्त पॉलिसीचे कागदपत्र मिळाले व त्यावरुन तक्रारकर्त्यास पॉलिसीबाबत माहिती झाली व रुपये ३,००,०००/- ची पॉलिसीकरीता रुपये ३०,०००/- तक्ररकर्त्याचे वडीलांनी विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ कडे जमा केले परंतू तक्रारकर्त्याचे वडीलांचे मृत्युनंतर रुपये ३,००,०००/- न देता विरुध्दपक्षानी फक्त रुपये १०,०००/- तक्रारकर्त्यास दिले. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक १७/०२/२०२१ रोजी अधिवक्ता मेघा भाले यांचे मार्फत विरुध्दपक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटिस पाठवून त्यामध्ये रुपये ३,००,०००/- ची मागणी केली, परंतू त्याची पुर्तता विरुध्दपक्ष क्रमांक १ ते ३ यांनी केली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रमांक १ ते ३ विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये विरुध्दपक्ष क्रमांक १ ते ३ यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे विमा पॉलिसीची रक्कम रुपये ३,००,०००/- तसेच शारिरीक मानसिक त्रासाची नुकसानभरपाई रक्कम रुपय ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशीत व्हावे अशी प्रार्थना केली.
४. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस पाठविली असता विरुध्दपक्ष क्रमांक १ ते ३ आयोगासमोर हजर होवून त्यांनी आपले लेखी उत्तर सादर केले.
विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन नाकबूल करुन आपले विशेष कथनात असे नमूद केले की, तक्रारकर्त्याचे वडीलांनी दिनांक १३/०३/२००७ रोजी पॉलिसी काढली. सदर पॉलिसी ही युनिट लिंक पॉलिसी असून मार्केटवर अवलंबून असते. तक्रारकर्त्याने फक्त ३ वर्ष प्रिमीयम भरला असून पॉलिसीचा अवधी, प्रिमीयम भरुन पूर्ण न केल्याने पॉलिसी बंद पडली. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक १ यांनी दिनांक २३/०३/२०१२ रोजी श्रीराम मोदिनवार यांना पत्र पाठवून प्रिमीयम भरुन पॉलिसी चालू करण्यास सुचित केले. परंतू पॉलिसी होल्डरने पुढील प्रिमीयम भरुन पॉलिसी चालू केली नाही. तक्रारकर्त्याने जेव्हा रक्कमेची मागणी केली तेव्हा त्याला दिनांक १६/०१/२०१९ रोजी फोरक्लोझर रक्कम रुपये ९,९७७/- ही धनादेश क्रमांक ६९६४४५ व्दारे देण्यात आली. तक्रारकर्त्याची पॉलिसी ही बंद असल्यामुळे पॉलिसीमध्ये कोणतीही जोखीम कव्हर होत नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्रमांक ३ यांनी आपले लेखी जबाबामध्ये तक्रारकर्त्याचे कथन नाकबूल करुन आपले विशेष कथनामध्ये असे नमूद केले की, तक्रारकर्त्याचे वडीलांनी स्वइच्छेने विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांच्या कंपनीची पॉलिसी घेतली होती. त्या व्यवहारामध्ये विरुध्दपक्ष क्रमांक ३ यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष काहीही संबध नाही. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक ३ हे नातेवाईक असून अनुवंशिक संपत्तीबाबत त्यांच्यामध्ये वाद असल्याने तक्रारकर्त्याने त्रास देण्याच्या उद्देशाने विरुध्दपक्ष क्रमांक ३ यांना विनाकारण प्रस्तूत तक्रारीत पक्ष बनविले. पॉलिसी व त्याबाबतचे व्यवहाराविषयी इन्श्युरंन्स कंपनी व त्यांचेअभिकर्ता किंवा अधिकृत अधिकारी जबाबदार असतो तरी सुध्दा प्रस्तूत प्रकरणात विरुध्दपक्ष क्रमांक ३ याना पक्ष बनवून आयोगाची दिशाभुल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार खोटी, तथ्यहीन असल्याने खर्चासह खारीज करण्यात यावी.
५. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज , तक्रारकर्ता यांनी पुरावा शपथपत्र दाखल न केल्यामुळे आयोगाने दिनांक २९/०६/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर तक्रारकर्त्याचे पुराव्याशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारीत केला. विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचे संयुक्तीक लेखी कथन, दस्ताऐवज, त्यांचे लेखी कथनालाच विरुध्दपक्ष क्रमांक १ यांचे शपथपत्र समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केली. विरुध्दपक्ष क्रमांक ३ यांचे लेखी कथन तसेच तक्रारकर्ता व विरुध्दपक्षांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे
१. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक १ ते ३ त्या अनुषंगाने नोंदविला चा ग्राहक आहे काय ॽ
२. तक्रार विहीत मुदतीत आहे काय ॽ होय
३. विरुध्द पक्ष क्र. १ ते ३ यांनी तक्रारकर्त्याप्रति नाही
न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ॽ
४. आदेश काय ॽ अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक १ बाबतः-
६. तक्रारकर्त्याचे वडील श्रीराम अन्जाराम मोदिनवार यांनी दिनांक १३ मार्च, २००७ रोजी विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांची न्यु युनिटगेन क्रमांक ४२६८४४-६० असलेली पॉलिसी घेतली त्याचा वार्षिक हप्ता रुपये १०,०००/- होता ही बाब दस्त क्रमांक १ वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्त्याचे वडीलांचा दिनांक २२/०२/२०१९ रोजी मृत्यु झाला व तक्रारकर्ता हा मय्यत श्रीरामचा मुलगा असल्याने पॉलिसीचा लाभार्थी आहे त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचा ग्राहक आहे. विरुध्दपक्ष क्रमांक ३ हा विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचा अभीकर्ता होता व त्याच्या मार्फत पॉलिसी काढली आणि त्याचा उपरोक्त पॉलिसीच्या व्यवहाराबाबत संबध होता ही बाब तक्रारकर्त्याने दस्तावेज/ पुराव्यानिशी सिध्द केली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रमांक ३ यांचा ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रमांक १ त्या अनुषंगाने नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक २ बाबतः-
७. विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास वादातील पॉलिसीचे समर्पन मुल्य रुपये ९,९७७/- हे दिनांक १६/०१/२०१९ रोजी धनादेशाव्दारे दिले. त्यापुर्वी कोणतीही रक्कम दिलेली नव्हती त्यामुळे तक्रार दाखल करण्यास सततचे कारण घडत आहे. त्यामुळे प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-२०१९ चे कलम ६९ (१) अंतर्गत २ वर्षाच्या आत विहीत मुदतीत दाखल केली आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः-
८. प्रकरणात दाखल दस्ताऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याचे मयत वडील श्रीराम यांनी विरुध्दपक्ष क्रमांक २ यांची उपरोक्त पॉलिसी घेतली त्या पॉलिसीची आरंभ तारीख १३ मार्च,२००७ , व त्याचा प्रिमीयम भरण्याचा कालावधी हा १५ वर्षाचा असून रुपये १०,०००/- या प्रमाणे प्रिमीयमचा वार्षीक भरणा करावयाचा होता आणि परिपक्वता तिथी दिनांक १३ मार्च, २०२२ होती हे तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या दिनांक २०/०४/२००७ चे पॉलिसीबाबतचे दस्त क्रमांक १ वरुन स्पष्ट होते. परंतू तक्रारकर्त्याचे वडीलांनी सन २००९ पर्यंत उपरोक्त पॉलिसीच्या प्रिमीयमच्या रक्कमेचा भरणा केला व सन २००९ नंतर पुढील १३ मार्च, २०१० पासून देय प्रिमीयमचा भरणा केला नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी दिनांक २३ मार्च, २०१२ चे पत्रान्वये पॉलिसीधारक मय्यत श्रीराम यांना पॉलिसी चालू ठेवण्याकरीता पर्याय दिले व त्यामध्ये पॉलिसीच्या प्रिमीयमचा भरणा हा देय न केलेल्या पाहिल्या प्रिमीयमच्या तारखेपासून दोन वर्षाचे आत पॉलिसी पुनरुज्जीवित करण्याच्या मुदतीत राहिलेले देय प्रिमीयमचा भरणा करुन पॉलिसी पुनरुज्जीवित नाही केली तर पॉलिसी संपुष्टात येईल व सुचविलेल्या पर्यायापैकी पत्र मिळाल्यापासून ३० दिवसात पर्याय निवड करण्यास पॉलिसीधारकास सुचित केले होते हे विरुध्दपक्ष क्रमांक १ यांनी प्रकरणात निशानी क्रमांक १६ दस्त क्रमांक १ वर दाखल केलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते. परंतू पॉलिसीधारक मय्यत श्रीराम यांनी उपरोक्त पॉलिसीचा सन २००९ नंतर वार्षिक देय प्रिमीयमचा भरणा दिलेल्या कालावधीत विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ कडे करुन पॉलिसी पुनरुज्जीवित केली नाही त्यामूळे पॉलिसी संपूष्टात आली. तक्रारकर्त्याने वडिलांचे मृत्युनंतर विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांचेकडे पॉलिसीच्या (विमा रक्कम) सम एश्युअर्ड रक्कम रुपये ३,००,०००/-ची मागणी केली असता विरुध्दपक्ष क्रमांक २ यांनी वादातील पॉलिसी संपुष्टात आल्याने सम एश्युअर्ड रक्कम न देता पॉलिसीच्या नियमाप्रमाणे पॉलिसीचे समर्पन मुल्य (सरेंन्डर व्हॅल्यू) रुपये ९,९७७/- ही रक्कम दिनांक १६/०१/२०१९ चे धनादेश क्रमांक ६९६४४५ व्दारे तक्रारकर्त्यास दिले. तक्रारकर्त्याने सुध्दा विरुध्दपक्ष यांनी रुपये १०,०००/- दिल्याचे मान्य केले आहे. विरुध्दपक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास वादातील पॉलिसी संपुष्टात आल्याने पॉलिसीचे नियमाप्रमाणे तक्रारकर्त्यास समर्पन मुल्य देऊन तक्रारकर्त्याप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दर्शविलेली नाही हे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होते या निष्कर्शाप्रत आयोग आले आहे. सबब मुद्दा क्रमांक ३ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक ४ बाबतः-
९. मुद्दा क्रमांक १ ते ३ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्त्याची तक्रार क्र. ३९/२०२१ खारीज करण्यात येते.
२. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
३. उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
(किर्ती वैद्य (गाडगीळ)) (कल्पना जांगडे (कुटे)) (अतुल डी.आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष