न्या य नि र्ण य
द्वारा – मा. श्रीमती रोहिणी बा. जाधव, सदस्य
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
सामनेवाला क्र.1 ही नामवंत विमा कंपनी असून सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 यांचे तपास अधिकारी आहेत. तक्रारदार हे सामान्य शेतकरी आहेत. तक्रारदारांच्या मालकीचे टोयोटा करोला अल्टीस हे वाहन आहे. त्याचा नोंदणी क्रमांक एमएच/42/एएफ/0027 असा आहे. सदर गाडीचा वापर तक्रारदार हे स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाच्या वैयक्तिक कारणासाठी करत होते. सदर वाहनाचा विमा तक्रारदारांनी सामनेवालेकडे दिनांक 19/07/2017 ते दिनांक 18/07/2018 या कालावधी करिता उतरविलेला होता. त्याचा विमा पॉलिसी क्रमांक OG-18-2015-1801-00000446 हा होता व आहे. दिनांक 03/08/2017 रोजी तक्रारदाराचे सदरचे वाहनास यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला व त्यामध्ये तक्रारदाराच्या वाहनाचे नुकसान झाले. तक्रारदारांनी सदर अपघाताची माहिती पोलीस स्टेशनला त्याचदिवशी लगेच कळवली. पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा दि. 04/08/2017 रोजी केल्यानंतर पोलिसांनी सदर गाडी स्वतःची ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवणेबाबत तक्रारदार यांना सूचित केले होते. त्यानुसार तक्रारदारांनी त्यांचे वाहन पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवले. तदनंतर सामनेवाले कंपनीचे सर्व्हेअर श्री हेमंत गरगटे यांनी गाडीचा सर्व्हे केला. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर गाडी टोयोटा शोरुम बारामती येथे दुरुस्ती करता सोडली. त्यानंतर देखील सर्व्हेअर श्री हेमंत गरगटे यांनी सदर गाडीचा सर्व्हे केला व तक्रारदारांना त्यांनी सदर वाहनाचे टोटल लॉस झाल्याचे तोंडी सांगितले होते. म्हणून तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे विमा रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला. तदनंतर सामनेवाले क्र.2 हे वाहनाची तपासणी करणेकरिता आले. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडे अपघाताबाबतची सर्व आवश्यक माहिती दिली तसेच कागदपत्रांची पूर्तताही केली. त्यावेळी सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांनी पोलीसांकडे नोंदविलेल्या सत्यजबाबाचे व परिस्थितीचे विसंगत कथन तयार करून त्यावर तक्रारदारांची सही घेतली. तक्रारदारांनी सामनेवालेवरील विश्वासापोटी सदर कागदपत्रांवर सही केली होती. तक्रारदारांची गाडी बारामती येथे शोरूममध्ये पडून असल्यामुळे तक्रारदार यांना सदर कंपनीला दररोज रु.100/- भाडे अदा करावे लागत आहे. तक्रारदार यांना सामनेवाला क्र.1 यांनी दि.22/12/2017 रोजी प्रश्नावली पाठवून सदर अपघाताबाबत उत्तर मागवले होते. तक्रारदारांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी जितेंद्र बनसोडे यांचेकडून इंग्रजी भाषेत उत्तर तयार करून सामनेवाले क्र.1 यांना पाठवले. परंतु सामनेवाले क्र.1 यांनी दिनांक 12/01/2018 रोजी तक्रारदार यांना विम्याची रक्कम अदा करण्यास नकार दिला आहे. अशा रीतीने सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना सेवा देण्यात त्रुटी केली आहे. म्हणून तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 07/02/2018 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवली. सदर नोटीस मिळालेनंतर सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना खोटया आशयाचे नोटीस उत्तर दिनांक 14/02/18 रोजी तक्रारदारांना पाठविले. अशाप्रकारे सामनेवाले यांनी सेवा देण्यात त्रुटी केल्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून रु.12,22,808/- विम्याची रक्कम मिळावी, सदर रकमेवर 18 टक्के दराने व्याज मिळावे, वाहनाचे भाड्यापोटी द्यावी लागलेली रक्कम रु.100/- दररोज या हिशोबाने सामनेवाले क्र.1 यांचेकडून मिळावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/- मिळावेत तसेच तक्रारअर्जाचा संपूर्ण खर्च जाबदार यांच्याकडून मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारअर्जासोबत शपथपत्र दाखल केले असून कागदयादी सोबत त्यांचे ड्राइव्हींग लायसेन्सची प्रत, वाहनाचे आर.सी.टी.सी.पुस्तक, विमा पॉलिसीची प्रत, खबरी जबाबाची प्रत, घटनास्थळ पंचनामा, शरयू टोयोटा यांनी तक्रारदारांना दिलेल्या पत्राची प्रत, सामनेवाले क्र.1 यांनी विमादावा नाकारले पत्राची प्रत, तक्रारदारांनी सामनेवाला यांना पाठवलेल्या नोटीसची प्रत व नोटीसची पोचपावती, सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना दिलेल्या नोटीस उत्तराची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र दाखल केले आहे.
4. सामनेवाला क्र.1 यांनी याकामी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराचे तक्रारीतील मजकूर परिच्छेदनिहाय नाकारला आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांचे वाहनाचा विमा यांनी उतरविल्याची बाब मान्य केली आहे. तक्रारदाराचे वाहनास अपघात झालेनंतर सामनेवाला क्र.1 यांनी सर्व्हेअरची नेमणूक करुन अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करुन घेतला. सदर सर्व्हेबाबतचा पुरावा योग्य वेळी प्रस्तुतकामी दाखल करण्याचा हक्क सामनेवाला राखून ठेवीत आहेत, तसेच सामनेवाला यांनी सदरकामी सामनेवाला क्र.2 यांची इनव्हेस्टीगेटर म्हणून नेमणूक करुन याबाबतचा योग्य तो तपास करुन घेतला आहे. सदर तपासाबाबतचा पुरावाही योग्य वेळी प्रस्तुत कामी दाखल करण्याचा हक्क सामनेवाला राखून ठेवीत आहेत असे सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यात कथन केले आहे. तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाला यांनी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना दि. 22/12/2017 रोजी पत्र पाठवून तक्रारदाराने नमूद केलेले वाहनाचे नुकसान हे अपघाताशी सुसंगत नसून तक्रारदाराने अनेक महत्वाच्या बाबी सामनेवाला यांचेपासून लपवून ठेवलेल्या आहेत असे कळविले आहे. तसेच तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे तक्रारदाराचा विमादावा दि. 12/01/2018 चे पत्राने नाकारलेबाबत तक्रारदारास कळविले आहे. अपघाताची माहिती सामनेवाला यांना देण्यास तक्रारदाराने 3 दिवसांचा उशिर केला होता. त्यामुळे तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अट क्र.1 चा भंग केला आहे. तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्याद्वारे विमा पॉलिसीच्या अट क्र.8 चा भंग केला आहे. तक्रारदाराने दिलेल्या नोटीसीस सामनेवाला यांनी उत्तर दिले आहे. तक्रारदार हा या आयोगासमोर स्वच्छ हाताने आलेला नाही. या सर्व कारणास्तव सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमादावा फेटाळला असून सामनेवाला यांनी योग्य त्या कारणासाठीच विमादावा फेटाळलेला आहे. तक्रारदाराचे वाहनावरील चालकाकडे अपघातसमयी वैध लायसेन्स नव्हते. त्यामुळे तक्रारदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. सबब, सामनेवाला क्र.1 यांनी सेवा देण्यात कोणतीही त्रुटी केली नसल्याने तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी सामनेवाला क्र.1 यांनी केली आहे.
5. सामनेवाला क्र.2 हे याकामी हजर झालेले नाहीत तसेच त्यांनी त्यांचे म्हणणेही दाखल केलेले नाही. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांना याकामी हजर करण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
6. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र, युक्तिवाद तसेच सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणे व कागदपत्रे यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे काय ? | होय. |
2 | सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार सामनेवाला क्र.1 विमा कंपनीकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.12,22,808/- मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे त्यांनी कथितरित्या बारामती येथील टोयोटा शोरुमला अदा केलेल्या वाहनाचे भाडयापोटीची रक्कम दररोज रु.100/- प्रमाणे परत मिळणेस पात्र आहेत काय ? | नाही. |
5 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1
7. तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, तक्रारदारांच्या मालकीचे टोयोटा करोला अल्टीस हे वाहन आहे. त्याचा नोंदणी क्रमांक एमएच/42/एएफ/0027 असा आहे. सदर गाडीचा वापर तक्रारदार हे स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाच्या वैयक्तिक कारणासाठी करत होते. सदर वाहनाचा विमा तक्रारदारांनी सामनेवालेकडे दिनांक 19/07/2017 ते दिनांक 18/07/2018 या कालावधीत करिता उतरविलेला होता. त्याचा विमा पॉलिसी क्रमांक OG-18-2015-1801-00000446 हा होता व आहे. सदर पॉलिसीमध्ये गाडीची IDV रु.12,22,808/- नमूद केलेली आहे. सदर विमा पॉलिसीची प्रत तक्रारदारांनी याकामी दाखल केली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी सदरची बाब त्यांचे म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. सबब, तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
8. सामनेवाला यांच्या दि. 12 जानेवारी 2018 च्या विमा क्लेम नाकारल्याच्या पत्रात सामनेवाला विमा कंपनीने वाहनाचे झालेले नुकसान हे अपघाताचे स्वरुपाशी मिळतेजुळते किंवा सुसंगत नाही तसेच तक्रारदाराने अपघाताचे स्वरुप व कारण तसेच नुकसानीबाबतची महत्वाची तथ्ये सामनेवाला विमा कंपनीपासून लपवून ठेवली आहेत व misrepresent केली आहेत. तसेच अपघाताबद्दल उशिरा कळविले. सबब, तक्रारदारांनी विमा पॉलिसीचे अट क्र.1 व 8 चे व इतर शर्तींचे उल्लंघन केले असल्याने तक्रारदार विमाक्लेम मिळण्यास पात्र नाहीत, असे कारण देवून सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचा विमादावा नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदारांनी पॉलिसीचे अटींचा भंग केला आहे की नाही हे पाहणे आयोगास न्यायोचित वाटते. त्यासाठी कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेल्या न्यू गणेश क्रेन सर्व्हीसच्या दि.11/08/2017 च्या पावतीचे अवलोकन करता, तक्रारदारांनी दि. 11/08/2017 रोजी तक्रारदाराचे वाहन शरयु टोयोटा, बारामती शोरुममध्ये सोडल्याचे दिसून येते. दि.21/09/2019 रोजी या आयोगाने तक्रारदारांनी सदरचे वाहन स्वतःच्या ताब्यात घ्यावे असे आदेश केले आहेत. दि. 03/08/2017 च्या तक्रारदारांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरी जबाबावरुन व तक्रारीवरुन तक्रारदाराचे वाहनास अपघात झाल्याचे दिसून येते. दि. 25/10/2017 चे शरयू टोयोटा यांचे पत्रावरुन तक्रारदाराचे वाहनाचे संपूर्ण नुकसान (Total Loss) झाल्याचे व ते वाहन सदरचे शोरुमचे पार्कींगला ठेवल्याचे दिसून येते. वाहनाच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकाचे अवलोकन करता, वादातील वाहनाची प्रचंड दुरुस्ती करावी लागणार आहे असे त्यावर नमूद केलेले आहे. यावरुन तसेच तक्रारदारांनी याकामी दाखल केलेल्या अपघातग्रस्त वाहनाच्या फोटोंचे अवलोकन करता सदरचे वाहनाचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून येते. या सर्व बाबींचा विचार करता तक्रारदाराचे वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले आहे ही बाब याकामी शाबीत होते. त्यामुळे तक्रारदारांनी पॉलिसीच्या अटींचा भंग केलेला नाही व वाहनाचे झालेले नुकसान हे अपघाताच्या स्वरुपाशी विसंगत नाही असे या आयोगाचे मत आहे. तसेच विमा कंपनीला कळविण्यात तीन दिवसांचा उशीर झाल्याने तक्रारदार विमा रक्कम मिळण्यास पात्रच ठरत नाहीत असेही ग्राहय धरता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. परंतु सदरची बाब विचारात न घेता सामनेवाला विमा कंपनीने पॉलिसीच्या अट क्र.1 व 8 व इतर शर्तींचे उल्लंघन केल्याबाबत चुकीची कारणे देवून तक्रारदाराचा विमादावा नाकारला आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदयादीतील अ.क्र.1 ला तक्रारदाराचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केला आहे. याचा विचार करता, तक्रारदाराकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना होता ही बाब शाबीत होते असे या आयोगाचे मत आहे.
10. सामनेवाला विमा कंपनीने त्यांचे म्हणण्यामध्ये, तक्रारदाराचे वाहनास अपघात झालेनंतर सामनेवाला क्र.1 यांनी सर्व्हेअरची नेमणूक करुन अपघातग्रस्त वाहनाचा सर्व्हे करुन घेतला. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांची सदरकामी इनव्हेस्टीगेटर म्हणून नेमणूक करुन याबाबतचा योग्य तो तपास करुन घेतला आहे. सदर सर्व्हे व तपासाबाबतचा पुरावा योग्य वेळी प्रस्तुत कामी दाखल करण्याचा हक्क सामनेवाला क्र.1 राखून ठेवीत आहेत असे कथन त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये केले आहे. तथापि सदरचे इन्व्हेस्टीगेटर सामनेवाला क्र.2 व सर्व्हेअर यांचा अहवाल व सदर अहवालाचे पुष्ठयर्थ शपथपत्र सामनेवाला विमा कंपनीने याकामी दाखल केलेले नाही. सबब, सामनेवाला विमा कंपनीने त्यांचे म्हणण्यामध्ये जो बचाव घेतलेला आहे, तो याकामी शाबीत केलेला नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब, सामनेवाला विमा कंपनीने चुकीच्या कारणास्तव तक्रारदाराचा विमादावा नाकारुन तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
11. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदयादीतील अ.क्र. 3 ला विमा पॉलिसी दाखल केली आहे. सदर पॉलिसीचे अवलोकन करता, तक्रारदारांनी दि. 19/07/2017 ते दि. 18/07/2018 या कालावधीसाठी सामनेवाला विमा कंपनीस रक्कम रु.47,162/- या रकमेचा प्रिमियम देवून वाहनाचा विमा उतरविल्याचे दिसून येते. सदरचा विमा उतरवितेवेळी वाहनाची आय.डी.व्ही.किंमत ही रु.12,22,808/- इतकी नमूद असल्याचे दिसून येते. प्रस्तुतकामी तक्रारदाराचे वाहनाचे संपूर्ण नुकसान (Total loss) झालेले आहे. सबब, तक्रारदार हे विमा पॉलिसीमध्ये नमूद केलेली वाहनाची आय.डी.व्ही.किंमत रक्कम रु.12,22,808/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा दावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदारास मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र.4
12. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात सामनेवाले क्र.1 यांनी वाहन ताब्यात न घेतलेमुळे तक्रारदारांना दररोज रक्कम रु.100/- भाडे टोयोटा कंपनीचे बारामतीचे शोरुमला अदा करावे लागले, सबब, सदरची रक्कम दि.11/08/2018 पासून ते वाहनाचा ताबा सामनेवाले क्र.1 यांनी घेईपर्यंत तक्रारदारांना देणेचा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे. अभिलेखाचे अवलोकन करता, तक्रारदाराने दि.4/09/2019 रोजी याकामी अर्ज दाखल केला असून तक्रारदाराचे वाहनाचा सांगाडा सामनेवाला क्र. 1 यांनी बारामती येथील टोयोटा कंपनीचे शोरुममधून ताब्यात घेणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती या आयोगाकडे केली होती. सदर अर्जावर तत्कालीन आयोगाने, सदरचे वाहन हे तक्रारदारांनी आपले ताब्यात घ्यावे, असा आदेश दि. 21/09/2019 रोजी पारीत केला आहे. सदर आदेशानुसार तक्रारदारांनी त्यांचे वाहन स्वतःचे ताब्यात घेतले किंवा नाही ? घेतले असल्यास त्यांनी सदर शोरुमला भाडे किती दिले ? याबाबत कोणतेही कथन अथवा योग्य तो पुरावा याकामी दाखल केलेला नाही. अशा प्रकारे तक्रारदारांनी वाहनाचे भाडयापोटी बारामतीचे शोरुमला रक्कम अदा केल्याबाबत कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. सबब, तक्रारदाराची सदरची मागणी मंजूर करता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र.4 चे उत्तर नकारार्थी दिले आहे.
13. तसेच सामनेवाले विमा कंपनीने विमादावा नाकारल्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच या आयोगात तक्रारअर्ज दाखल करावा लागला. या बाबींचा विचार करता तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सामनेवाले क्र.2 हे तपास अधिकारी असलेने तसेच त्यांना या आयोगात हजर ठेवणेकामी तक्रारदारांनी कोणतीही आवश्यक प्रक्रिया पार पाडलेली नसल्याने विमारक्कम अदा करणेशी त्यांचा कोणताही संबंध नाही. सबब, त्यांना याकामी जबाबदार धरता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब आदेश.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास विमाक्लेमपोटी रक्कम रु.12,22,808/- अदा करावी तसेच सदर रकमेवर विमादावा नाकारले तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज अदा करावे.
- सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- अदा करावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन सामनेवाला क्र.1 यांनी निकालाची प्रत मिळालेपासून 45 दिवसांचे आत करावे.
- सामनेवाला क्र.1 यांनी विहीत मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार योग्य ती दाद मागणेची मुभा राहील.
- सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.