::: आ दे श :::
( पारित दिनांक : 30/09/2015 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश थोडक्यात खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्र. 1 यांचा खातेदार असून, तक्रारकर्त्याने कागदपत्रांची योग्य ती पुर्तता करुन अॅक्सिस बॅक, शाखा वाशिम येथे दिनांक 26/09/2012 रोजी बचत खाते क्र. 912010050590880 सुरु केले. वि. जिल्हाधिकारी, वाशिम यांचा घराच्या मोबदल्याचा पुर्नवसनाचा धनादेश दिनांक 28/09/2012 रोजी रक्कम रुपये 21,09,459/- चा तक्रारकर्त्याचे नमुद बचत खात्यामध्ये जमा केला. सदर बचत खात्यात जमा असलेल्या रक्कमेतून आवश्यकतेप्रमाणे तक्रारकर्त्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ए.टी.एम.व्दारे वेळोवेळी रक्कम काढली. त्याबाबतच्या नोंदीचा तपशील तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये आहे. परंतु दिनांक 28/09/2012 ते 18/10/2013 पर्यंत तक्रारकर्त्याचे खात्यातील मुळ रक्कम रुपये 21,09,459/- यातून रुपये 2,00,000/- ची तफावत आढळून आली व ती तक्रारकर्त्याला प्राप्त झाली नाही. सदरहू बाब तक्रारकर्त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी तफावत भरुन देण्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांना विनंती केली. परंतु विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी वेळोवेळी उडवाउडवीची ऊत्तरे दिली व खुलासा दिला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने खात्यातील रक्कमेच्या तफावती बाबत दिनांक 20/11/2014 रोजी वकिलामार्फत रजिष्टर पोष्टाने विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविली. त्याबाबत विरुध्द पक्षाने कोणतेही समाधानकारक ऊत्तर दिले नाही व रक्कमेची पुर्तता केली नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी सेवेत त्रुटी व हयगय केली.
म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल केली व मागणी केली की, तक्रारकर्त्याचे खात्यामध्ये आलेली तफावत दिनांक 28/09/2012 ते 18/10/2013 पर्यंतची रक्कम रुपये 2,00,000/- व त्यावरील नियमाप्रमाणे व्याजासह देण्याचा आदेश व्हावा, तक्रारकर्त्यास मानसिक, शारिरिक, आर्थिक नुकसान भरपाई रुपये 50,000/- विरुध्द पक्षाकडून वसुल करुन देण्याबाबतचा आदेश व्हावा, तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा, प्रकरणाच्या अवलोकनार्थ बँकेचे रेकॉर्ड बोलवावे तसेच अन्य ईष्ट व न्याय दाद तक्रारकर्त्याचे हितावह व विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द पारित करण्यात यावी. अशी विनंती, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 3 दस्त पुरावा म्हणून जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब -
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 ने त्यांचा लेखी जबाब निशाणी 07 प्रमाणे इंग्रजी भाषेत व निशाणी 08 प्रमाणे मराठी भाषेत मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाने नमुद केले की, विरुध्द पक्ष एक्सीस बँकेचे नोंदणीकृत कार्यालय अहमदाबाद येथे आहे व विरुध्द पक्ष क्र. 1 ही त्यांची वाशिम येथील शाखा आहे. विरुध्द पक्ष क्र. 2 यांना विभागीय शाखा प्रमुख म्हणून प्रकरणात संबोधण्यात आले आहे पण बँकेत असे कुठलेही पद नाही. संबंधीत तक्रार ही न्यायप्रक्रियेचा गैरवापर आहे. तक्रारकर्त्याने खोट्या व अन्यायी पध्दतीने, फायदा करुन घेण्याच्या दृष्टीने तक्रार दाखल केली असून ती खारीज करण्यांत यावी.
विरुध्द पक्षाने पुढे थोडक्यात नमुद केले की, तक्रारकर्त्याचे बचत खात्याचा क्र. 912010050590880 हा आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्यांच्या खात्यामध्ये दिनांक 28/09/2012 ते 18/10/2013 पर्यंत रक्कम रुपये 2,00,000/- ची कमतरता आहे. परंतु या विशिष्ट काळामध्ये तक्रारकर्त्याच्या खात्यातून रुपये 21,09,459/- काढण्यात आले. हे सर्व रुपये सही केलेल्या चेकने वा ए.टी.एम. व्दारा काढण्यात आले. तक्रारकर्ता याला यातील सर्व नोंदी मान्य आहेत, यातील कोणतीही एक नोंद मान्य नाही, यावर वाद नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या खात्यातील रक्कम हस्तांतरीत करण्याचा प्रश्नच येत नाही. बँकेचा ताळेबंद आजच्या घडीला बरोबरीत आहे. हे सर्व विरुध्द पक्षाने दिनांक 27/11/2014 च्या पत्राव्दारे तक्रारकर्त्यास कळविले आहे. तक्रारकर्त्याने खात्यातून रक्कम काढली हे मान्य केलेले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष हा तक्रारकर्त्याच्या खात्यामधून काढण्यात आलेल्या रक्कमेसाठी जबाबदार नाही. विरुध्द पक्षाने सेवेमध्ये न्युनता केलेली नाही, त्यामुळे नुकसान भरपाईसाठी जबाबदार नाही. अशा परिस्थितीत, विरुध्द पक्षाविरुध्द दाखल केलेले प्रस्तुत प्रकरण, ग्राहक संरक्षण कायदयानुसार रुपये 50,000/- खर्चासह खारिज करण्यात यावे.
3) कारणे व निष्कर्ष ::
सदर प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज, व विरुध्द पक्षाचा युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला.
सदर प्रकरणात उभय पक्षात वाद नसलेली बाब अशी आहे की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा बचत खातेधारक आहे व म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचाग्राहक आहे, यात वाद नाही. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, दिनांक 29/09/2012 ते 18/10/2013 पर्यंतच्या मधल्या काळात त्याच्या खात्यामध्ये काढलेल्या रकमेशिवाय शिल्लक राहिलेल्या रक्कमेत रुपये 2,00,000/- ची कमतरता आहे. परंतु विरुध्द पक्षाने संबंधीत तक्रारकर्त्याच्या सदर खात्याचे सर्व दस्तऐवज मंचात दाखल करुन, असा युक्तिवाद केला की, वरील नमुद कालावधीत तक्रारकर्त्याच्या खात्यातून रुपये 21,09,459/- इतकी रक्कम तक्रारकर्त्याने सही केलेल्या धनादेशाने व एटीएम व्दारा काढण्यात आले आहे व या सर्व नोंदी तक्रारकर्त्याला मान्य आहे. विरुध्द पक्षाजवळ तक्रारकर्त्याने त्याच्या बँकेतून वेळोवेळी काढलेल्या रक्कमेच्या नोंदीबद्दलचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहे, त्यानुसार तक्रारकर्त्याला कळविले आहे. म्हणून विरुध्द पक्षाची न्युनता नाही. विरुध्द पक्षाच्या, असे कथन असणा-या जबाबाला, तक्रारकर्ते यांनी नकारात्मक प्रतिऊत्तर दिलेले नाही, तसेच संधी देवुनही युक्तिवाद केला नाही व विरुध्द पक्षाने सदर प्रकरण खारिज करणेबाबत जो अर्ज दिला होता, त्यावर तक्रारकर्त्याने निवेदन देवून फक्त विरुध्द पक्षाची सेवेतील न्युनता लक्षात घेवून न्याय द्यावा, असे कथन केले. त्यामुळे अशा परिस्थितीत विरुध्द पक्षाची कोणती सेवा न्युनता आहे, हे तक्रारकर्त्याने अचूक पुरावा देवुन मंचासमोर मांडले नाही व तक्रारकर्ते यांनी विरुध्द पक्षाची सेवा न्युनता सिध्द केली नाही. म्हणून तक्रार खारिज करणे योग्य राहील, या निष्कर्षाप्रत, हे मंच आले आहे.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षांचा दोष सिध्द न केल्यामुळे, खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri