(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 5 जानेवारी 2017)
1. सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अन्वये ही तक्रार विमा कंपनी विरुध्द विमा दावा मंजूर न केल्या प्रकरणी दाखल केली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता मे.बालाजी मोटर्स नावाने बेसा, बेलतरोडी रोड, नागपूर येथे मोटार गॅरेज चालवीतो. त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीकडून गॅरेज मधील मशिनरी व इतर सामानाकरीता दिनांक 7.8.2014 ला अनुक्रमे रुपये 11,00,000/- व 2,00,000/- ची विमा पॉलिसी काढली होती. विमा पॉलिसी अस्तित्वात असतांना दिनांक 11.10.2014 च्या राञी गॅरेजला आग लागून संपूर्ण मशिनरी जळून खाक झाली. सदर घटनेची सुचना ताबडतोब विरुध्दपक्षाला देण्यात आली. विरुध्दपक्षाने सर्व्हेअरची नेमणूक करुन संपूर्ण घटनेचे विवरण मागवीले, परंतु सर्व्हेअरने विरुध्दपक्षाला आवश्यक ती माहिती दिली नाही त्यामुळे विरुध्दपक्षाने केवळ रुपये 6,47,000/- चा विमा अंतर्गत मोबदला देण्याचे मान्य केले. परंतु, झालेले नुकसान आणि मशिनरीची किंमत रुपये 9,75,000/- होती त्यामुळे विरुध्दपक्षाने दिलेला मोबदला फारच कमी होता. तक्रारकर्त्याने त्याच्या व्यवसायाकरीता बँकेतून कर्ज घेतले होते आणि त्यामुळे व्यवसायातून होणा-या उत्पन्नावर त्याची व कुंटूंबाची उपजिवीका करीत होता. तक्रारकर्ता बँकेच्या कर्जाची परतफेड नियमीत करीत आहे. परंतु, मशिनरी आगीत जळाल्यामुळे त्याचे फारच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारकर्त्याने मागीतलेला संपूर्ण मोबदला विरुध्दपक्ष देण्यास तयार नसल्याने त्याने या तक्रारीव्दारे विम्याची उर्वरीत रक्कम 3,28,000/- रुपये 24 टक्के व्याजदराने द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच, झालेल्या आर्थिक व शारिरीक ञासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,00,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- मागितला आहे.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्षाला मंचाची नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्षाने आपला लेखी जबाब निशाणी क्र.8 वर दाखल केला आहे. विरुध्दपक्षाने हे मान्य केले आहे की, त्याचेकडून तक्रारकर्त्याने गॅरेजमधील मशिनरीसाठी रुपये 11,00,000/- आणि स्टॉकसाठी रुपये 2,00,000/- चा विमा काढला होता. त्याने हे सुध्दा मान्य केले की, आगीमध्ये मशिनरी जळाली होती आणि घटनेची सुचना त्यांना देण्यात आली होती. त्यानंतर सर्व्हेअरची नेमणूक करुन झालेल्या नुकसानीचा अंदाज काढण्यात आला व संपूर्ण चौकशीअंती व पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार रुपये 6,47,515/- एवढ्या रकमेचा विमा दावा मंजूर करण्यात आला. घटनेच्यावेळी गॅरेजमध्ये मशिनरी आणि इतर वस्तु याची एकूण किंमत रुपये 14,75,000/- होती, परंतु विमा हा कमी रकमेचा घेण्यात आला होता व अशाप्रकारे विमा 25.42 टक्के Under Value होते आणि म्हणून काढलेल्या विमा अंतर्गत रुपये 6,47,515/- एवढी रक्कम देय होत होती, जी तक्रारकर्त्याला देण्यात आली आणि त्याप्रमाणे त्याने त्याच्या दाव्याचा Full and final Settlement म्हणून डिसचार्ज व्हाऊचरवर स्वाक्षरी करुन दिली. तक्रारीतील इतर मजकूर नामंजूर करुन खारीज करण्याची विनंती केली आहे.
4. दोन्ही पक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. याप्रकरणामध्ये विरुध्दपक्षाने हे नाकबूल केलेले नाही की, तक्रारकर्त्याने मशिनरी आणि साठ्याकरीता विमा पॉलिसी काढली होती. तसेच, हे सुध्दा नाकबूल केले नाही की, आगीमध्ये मशिनरी जळाली होती ज्यासाठी विमा दावा करण्यात आला होता. विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, विमा उतरवितांना त्याने गॅरेजमध्ये असलेल्या मशिनरी आणि साठ्याची किंमत 25 टक्के कमी सांगीतली होती. परंतु, तो पूर्ण किंमतीवर विम्याचा मोबदला मागत आहे जे कायद्यानुसार मंजूर होऊ शकत नाही.
6. सर्व्हेअरने दिलेला रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे. त्यात असे लिहिले आहे की, तक्रारकर्त्याने गॅरेजमध्ये असलेल्या सर्व मशिनरी आणि साठा विमा काढतांना दाखविलेला नाही. त्यामध्ये बॅटरी चार्जर, वॉटर पंप, अर्थ फॉल्ट रिले, फ्युज बॉक्स, मॅन्युअल जॅक, हॅन्ड ड्रीलींग मशीन इत्यादी मशिनरी होत्या व त्या सर्वाची एकूण किंमत रुपये 14,75,000/- पर्यंत होती, परंतु विमा केवळ रुपये 11,00,000/- किंमतीच्या मशिनरीवर काढण्यात आले व अशाप्रकारे मशिनरीची किंमत 25.42 टक्के कमी दाखविण्यात आली. तसेच सर्व्हेअरने रुपये 6,49,000/- इतके लॉस अॅडजेसमेंट दाखविली आहे. तक्रारकर्त्याने मागीतलेली रक्कम रुपये 9,75,000/- इतकी आहे.
7. तक्रारकर्त्याने सर्व्हेअरने जे असेसमेंट केले आहे त्याला विरोध किंवा आव्हान दिलेले नाही, त्याशिवाय तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून रुपये 6,49,000/- स्विकारलेले आहे. त्याबद्दलचा दस्ताऐवज क्रमांक 1 विरुध्दपक्षाने दाखल केले आहे तो दस्ताऐवज डिसचार्ज व्हाऊचर असून त्याव्दारे तक्रारकर्त्याने त्याला झालेल्या नुकसानीबद्दल त्याने मागीतलेल्या विमा दावा अंतर्गंत रुपये 6,49,000/- Full and final Settlement म्हणून मिळाल्याचे स्विकृत केले आहे. तक्रारकर्त्याने ही रक्कम कुठलिही हरकत किंवा आक्षेप किंवा अटीवीना स्विकारली आहे. “Ankur Surana –Vs.- United India Insurance Co. Ltd. And Ors., I(2013) CPJ 440 (NC)” याप्रकरणामध्ये असे म्हटले आहे की, विमा कंपनीने नेमलेल्या सर्व्हेअरचा अहवाल हा महत्वाचा दस्ताऐवज असतो आणि तो मंचाने सक्षम कारणाशिवाय दुर्लक्षीत करु नये. त्याचप्रमाणे असे सुध्दा म्हटले आहे की, डिसचार्ज हाऊचरवर तक्रारकर्त्याने स्वाक्षरी केली असेल तर ती अशी दर्शवीते की, त्याने त्याच्या दाव्याचा Full and final Settlement म्हणून ती रक्कम स्विकारली आहे. जर तक्रारकर्त्याची अशी तक्रार नसेल की, डिसचार्ज हाऊचरवर स्वाक्षरी करण्यास त्याला भाग पाडले किंवा त्याचेवर जबरदस्ती करण्यात आली तर त्याला ग्राहक मंचामध्ये मिळालेली रक्कम ही दाव्याचा पार्ट पेमेंट आहे म्हणून उर्वरीत रक्कम मागण्यासाठी जाता येत नाही. “Jiwan Spinners Pvt. Ltd. –Vs.- New India Assurance Co. Ltd., I(2013) CPJ 418 (NC)” यामध्ये असे म्हटले आहे की, जर एकदा डिसचार्ज हाऊचरवर सही केली आणि रकमेचा धनादेश कुठल्याही आक्षेपावीना स्विकारला तर पुन्हा नव्याने त्याच कारणासाठी विमा दावा करता येत नाही. “ Vijay Stationers –Vs.- United India Insurance Co. Ltd., I(2013) CPJ 637 (NC)” यामध्ये असे म्हटले आहे की, एकदा विमा कंपनीकडून मिळालेली रक्कम कोणत्याही अटीवीना स्विकारली तर ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत विमाधारक ग्राहक राहात नाही, कारण दोंघामधील Privity of contract संपुष्टात येतो.
8. सदरहू प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याचे असे म्हणणे नाही की, डिसचार्ज हाऊचरवर त्यांचेकडून जबरदस्तीने किंवा फसवेगिरीने स्वाक्षरी करुन घेण्यात आली किंवा त्यांनी कमी रकमेचा दावा स्विकारावा यासाठी विरुध्दपक्षाकडून कुठल्याही प्रकारे जबरदस्ती करण्यात आली. त्याने स्वखुशीने डिसचार्ज हाऊचरवर स्वाक्षरी केलेली दिसते आणि विरुध्दपक्षाने दिलेला विमा दाव्याचा धनादेश कोणत्याही अटीवीना किंवा आक्षेपावीना स्विकारलेला दिसून येतो.
9. “Jyothi Agencies –Vs.- New India Assurance Company Limited, IV (2006) CPJ 30 (KARNATAKA)” याप्रकरणामध्ये आगीमध्ये साठा जळाला होता, त्यानंतर जेवढा साठा कमी दाखविला होता त्याची किंमत वगळून नुकसान भरपाई ठरविण्यात आली होती ती रक्कम तक्रारकर्त्याने कुठलीही हरकत न घेता स्विकारली होती. त्यात असे म्हटले आहे की, पॉलिसी क्लॉजचे अटीनुसार जेवढा साठा विमा काढतांना दाखविण्यात आला नव्हता, तेवढ्या साठ्याची किंमत वगळणे न्यायोचीत होती. याप्रकारे “United India Insurance Co. Ltd. –Vs.- Cavincare Pvt. Ltd., I (2016) CPJ 309 (NC)” याप्रकरणात सुध्दा विमा काढतांना न दाखविलेल्या साठ्याची किंमत कमी करण्याची विमा कंपनीची कृती योग्य ठरविण्यात आली होती.
10. वर उल्लेखीत निवाड्याचे वस्तुस्थितीवरुन हे दिसून येते की, हातातील प्रकरणामधील वस्तुस्थिती सुध्दा समान आहे. त्यामुळे आणखी भाष्य करण्याची गरज नाही. केवळ इतके म्हणणे पुरेसे ठरेल की, ही तक्रार मंजूर होण्यालायक नाही, कारण तक्रारकर्त्याने झालेल्या नुकसानीबद्दल विरुध्दपक्षाने देऊ केलेली रक्कम धनादेशाव्दारे कुठलीही हरकत न घेता स्विकारलेली आहे. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 5/1/2017