निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार व्यवसायाने डॉक्टर होते. पण त्यांना अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्या वतीने पत्नी मनिषा झोडगे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 विमा व्यावसायिक आहेत. गैरअर्जदार क्र.3 ही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांची बीड येथील शाखा आहे.
दि.01.03.2009 रोजी गैरअर्जदार यांचेकडून स्वतःचा विमा उतरवला. वरील विमा पॉलिसीत अर्जदाराच्या जीवन विम्या बरोबरच घराबाबतची चोरी, नुकसान यांचा विमा होता. जीवन विम्या मध्ये अपघाती मृत्यू, अपंगत्व, मेंदूस मार लागणे. यावरील उपचारांचा खर्चाचा समावेश होता. विमा हमीची रक्कम रु.9,45,000/- एवढी होती. तक्रारदारांनी अपघातापूर्वी गैरअर्जदार यांचे कडून घर कर्ज घेतले होते. त्यांची रक्कम रु.9,45,000/- आहे. त्यातील काही हप्त्यांची परतफेड तक्रारदारांनी केली आहे. तर काही हप्ते थकीत आहेत.
दि.01.05.2010 रोजी तक्रारदारांना मोटार सायकलचा अपघात पुणे येथे झाला व डोक्याला गंभीर मार लागल्याने “रुबी हॉस्पीटल ” पुणे येथे भरती केले. नंतर त्यांचे वर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. त्यांचा खर्च रु.7,00,000/- एवढा झाला आहे व तक्रारदार यांस कायमचे अपंगत्व आले आहे.
सबब, तक्रारदार या तक्रारीद्वारे गैरअर्जदारांकडून नुकसान भरपाईपोटी रु.9,45,000/- मंजूर करण्याची विनंती करत आहेत व त्यातून उचललेल्या गृहकर्जावरील रक्कम वजा करुन उर्वरित रक्कमेची मागणी करीत आहेत.
गैरअर्जदार क्र.1 व 2 हे नोटीस मिळूनही मंचासमोर गैरहजर राहिल्यामूळे त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्यात आली. गैरअर्जदार क्र.3 च्या लेखी म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्र.3 यांचे कार्यालय बीड येथे नाही. विमा कंपनीने दि.6 जून 2012 रोजीला तक्रारदारांना दावा नाकारल्याचे कळविले आहे. तक्रारदारांनी त्यांला कायमचे अपंगत्व आहे हे सिध्द केलेले नाही. सदरची तक्रार अधिकार क्षेत्र नसल्यामुळे बीड येथे चालू शकत नाही. सबब तक्रारदारांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री. महाजन व गैरअर्जदार क्र.3 चे विद्वान वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.त्यांनी विमा कंपनीने तक्रारदारांना पाठवलेले दावा नाकारल्याचे पत्र दाखल केले.
तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन त्यांची पॉलिसी मुंबई येथून घेतल्याचे दिसते. पॉलिसीच्या सर्व कागदपत्रांवर “Issuing office –Mumbai ” असा उल्लेख आहे. ज्या घराचा विमा उतरवला आहे ती मालमत्ता तळेगांव (जि.पुणे) येथे आहे. पत्रव्यवहाराचा पत्ता पुणे येथीलच आहे. तसेच तकारदारांचा अपघात पुणे येथे झाला आहे. त्यांच्यावरील सर्व उपचार पुणे येथेच केले गेले. गैरअर्जदारांच्या बीड येथील शाखा कार्यालयाशी तक्रारदारांशी कोणताही व्यवहार केल्याचा पुरावा मंचासमोर नाही. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.3 म्हणजेच गैरअर्जदारांची बीड येथील शाखा यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस तसेच मंचाने त्यांना पाठवलेली तक्रारीची नोटीस पत्ता सोडला म्हणून परत आलेल्या आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयाने Sonic surgical Vs National Insurance company IV 2009 CPJ 40 (SC) या निकालपत्रात
“ The expression branch office in the amended S 17 (2) would mean the branch office where the cause of action had arised ” असे मत व्यक्त केले आहे.
वरील विवेचनावरुन व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोक्त निकालाचा आधार घेऊन या मंचाला सदरची तक्रार चालवण्याचे अधिकार क्षेत्र नाही असा निष्कर्ष मंच काढत आंहे. तक्रारदारांना प्रकरण योग्य त्या न्यायालयात दाखल करण्याची मुभा आहे.
सबब, मंच, खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार खारिज करण्यात येत आहे.
2. खर्चाबाबत हूकूम नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड