जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/180 प्रकरण दाखल तारीख - 07/08/2009 प्रकरण निकाल तारीख – 25/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य माधव पि.गंगाराम वायवळ, वय वर्षे 59 धंदा पेन्शन, अर्जदार. रा.मु.पो.लहान ता.अर्धापुर जि.नांदेड. विरुध्द. शाखा व्यवस्थापक, गैरअर्जदार. स्टेट ट्रान्सपोर्ट को.ऑप बँक लि शाखा नांदेड (वर्कशॉप) अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.व्ही.चौधरी. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.एल.कापसे. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांनी गैरअर्जदाराकडे सदस्य या नात्याने नोंदणी करुन वर्गणी नियमाप्रमाणे आजपर्यंत जमा केली आहे. सदरील वर्गणी ही रुबी फंडामध्ये अर्जदार यांच्या पगारीतुन कपात होऊन जमा झालेली आहे. अर्जदार यांनी जमा झालेली वर्गणीच मागणी केली असता, गैरअर्जदार यांनी असे सांगितले की, अर्जदार यांचा राजीनामा दिल्या शिवाय बँकेचा आपल्याला सदस्य वर्गणी मिळु शकणार नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडुन कर्ज उचल केली होती. सदरील कर्ज अर्जदाराने अदा केलेली आहे तसेच जी काही रक्कम शिल्लक होती ती दिलेली आहे. अर्जदार यांनी वर्गणी मागणी केली असता, त्यांचा कर्ज बाकी कारणातुन सदरील सदस्य वर्गणी फिस जमा असलेली कपात करण्यात आली तसेच आपल्याला परत मिळणार नाही असा निर्वाळा केला ती मिळु शकणार नाही. अर्जदाराने सदरील प्रकार कशामुळे याबाबत माहितचे अधिकारात एक पत्र पाठविले परंतु गैरअर्जदार यांनी त्या पत्राचा कुठलाच, प्रतिसाद व प्रतिउत्तर दिले नाही आणि याबाबत कुठलीच माहीती देवु शकणार नाही असा खुलासा केला त्यामुळे अर्जदारास अत्यंत मानसिक त्रास झाला. अर्जदार यांच्याकडे जर काही रक्कम बेबाक असेल तर ती नियमाप्रमाणे मागणी करणे अथवा तसा पुरावा अर्जदार यांचा योग्य तो उहापोह करुन अर्जदार यांची संमती तसेच लेखी पत्र देवुन वरील व्यवहार कपात करण्या बाबत करायला पाहीजे होते परंतु गैरअर्जदार यांनी तसे न करता अर्जदार यांची दिशाभुल केली आहे. अर्जदार यांची रुबी फंडाची रक्कम ही त्यांच्या हक्काची आहे व सदरील रक्कम व कर्जाची रक्कम हे दोन वेगळे विषय असुन त्यांची सलगता दाखवुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराची फसवणुक केली आहे. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, रुबी फंडाची रक्कम रु.35,000/- व्याजासह व मानसिक व शारीरिक व आर्थीक त्रासापोटी रु.25,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत. गैरअर्जदा यांनी आपले म्हणणे वकीला मार्फत दाखल केलेले आहे, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार हे बँकचे सदस्य असल्यामुळे ते ग्राहक या संज्ञेत मोडत नाहीत. त्यांना दावा दाखलच करायचा असल्यास सहकारी न्यायालयात ते गैरअर्जदारा विरुध्द दाद मागु शकतात. म्हणुन विद्यमान मंचास सदर प्रकरण चालविण्याचे कार्यक्षेत्र नाही म्हणुन तक्रार खारीज करावी. अर्जदार हे दि.31/03/2009 रोजी सेवा निवृत्त झाले आहेत ते सेवेत असतांना गैरअर्जदार बँकेचे सदस्य होते. अर्जदार यांनी बँकेकडुन कर्ज घेतले होते व त्यांची परतफेड नियमीत केली हे म्हणणे खरे आहे. ज्यावेळी ते सेवानिवृत्त झाले त्यावेळी एस.टी.बँकेचे मध्यम मुदती कर्ज रु.56,823/- आणि तातडीचे उचल कर्ज रु.31,514/- येणे बाकी होती. तसेच एस.टी.बँकेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याशिवाय बँकेत जमा असलेली रक्कम भाग भांडवल आणि रुपया नीधी वर्गणी ती काही असेल ती अर्जदारास परत देता येऊ शकत नाही. अर्जदार ज्या वेळी सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांचेकडे एस.टी.बँकेचे खालील प्रमाणे कर्ज येणे बाकी होते. 1. मध्यम मुदती कर्ज रु.56,823/- 2. तातडीचे मुदती कर्ज रु.31,514/- 3. मध्यम मुदती कर्जावरील व्याज रु.562/- 4. तातडीचे उचल कर्जावरील व्याज रु.621/- एकुण येणे रु.89,520/- अर्जदारा यांची सेवानिवृत्तीच्या वेळेस रुपयानीधी वर्गणी रु.35,605/- जमा होती एस.टी.बँकेच्या नियमानुसार सदरील रुपयानीधी खालीलप्रमाणे अर्जदाराच्या कर्जापोटी वळती करण्यात आली आहे. 1. मध्यत मुदती कर्ज रु.2908/- 2. तातडीचे कर्ज रु.31514/- 3. मध्यम मुदती कर्जावरील व्याज रु.562/- 4. तातडीचे उचल कर्जावरील व्याज रु.621/- एकुण कपात रु.35605/- अर्जदाराचे तशा प्रकारचे संमतीपत्र दि.18/01/2005 रोजीच दिले आहे. अर्जदाराकडुन कीती येणे आहे व किती रक्कम जमा आहे याची माहीती अर्जदारास देण्यात आलेली आहे. बँकेस माहीतीचा अधिकार लागु नाही. एस.टी.बँक ही पगारदाराची बँक आहे. सभासद जेव्हा सेवानिवृत्त होते. त्यावेळेस त्याचे बँकचे सभासदत्व संपुष्टात येते त्यामुळे त्याच्याकडे एस.टी. बँकेचे कर्ज आणि कर्जावरील व्याज येणे बाकी असल्यास त्या सदस्याच्या रुपयानीधी वर्गणीतुन सदरील कर्जाची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम वसुल करण्याचा अधिकार नियमानुसार एस.टी.बँकेस आहे. अर्जदार मध्यम मुदत कर्जाची थकबाकी रु.56,823/- एवढी होती व तातडीचे कर्ज वसुल होत नसल्यामुळे तातडीचे कर्ज वसुल होत नसल्यामुळे तातडीचे कर्ज रु.31,514/- बाकी होते व व्याज बाकी होते म्हणुन कर्ज रु.35,605/- गैरअर्जदार यांनी वळती करुन घेतले आहेत व जे नियमानुसार केलेले आहे. अर्जदार हा बँकेचा सभासद असल्यामुळे व त्याच्या सभासदत्वाच्या शेअरचा फायदा देण्यात आलेला आहे. त्याचे भाग भांडवल फिरवले नसल्यामुळे 15 टक्के चा फायदा होता रुपयानीधी 8 टक्के नी जमा होत असल्यामुळे त्याला उलट 4 टक्के चा फायदाच झालेला आहे. अर्जदाराचा तक्रारअर्ज बिनबुडाचा असून कोर्टाची दिशाभुल करणारा आहे तो खोटा असुन अर्जदाराने विनकारण तान दिलेला म्हणुन अर्जदाराचा अर्ज रु.5,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र, गैरअर्जदार यांचे म्हणणे,शपथपत्र तसचे वकीला मार्फत केलेला युक्तीवाद, याचा विचार होता, खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे सेवेतील कमतरता सिध्द करतात काय? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. सदरची बाब गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेली कागदपञे व गैरअर्जदार यांनी दाखल केलेला खातेउतारा यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मूददा क्र.2 - अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून कर्ज घेतलेले आहे त्यांचा भरणा वेळोवेळी त्यांचे पगारातून कपात होऊन कर्ज खाती जमा झालेला आहे. अर्जदार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जमा असलेल्या रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडे लेखी पञ देऊन केलेली आहे. सदर पञामध्ये अर्जदार यांनी अर्जदार हे दि.21.03.2009 रोजी सेवानिवृत्त झाल्याचे व त्यांची सेवानिवृत्तीनंतर असलेली शिल्लक रक्कम यांची मागणी गैरअर्जदार यांचेकडे लेखी पञाद्वारे केल्याचे त्यांनी दाखल केलेल्या लेखी पञावरुन स्पष्ट होत आहे. परंतु गैरअर्जदार यांनी त्यांना कोणताही खूलासा न केल्याने अर्जदार हे प्रस्तूतची तक्रार घेऊन या न्यायमंचामध्ये आलेले आहेत. सदरच्या तक्रार अर्जाची नोटीस गैरअर्जदार यांना मिळालेली आहे. त्यानुसार गैरअर्जदार हे मे. मंचाने नेमलेल्या म्हणजेच दि.4.9.2009 रोजी मंचामध्ये वकिलामार्फत हजर झालेले आहेत. त्यानंतर नेमलेल्या दि.19.09.2009 या तारखेस गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे दिलेले आहे व त्यासोबत कागद यादीने कागदपञेही दाखल केलेली आहेत. सदरच्या कागदपञामध्ये अर्जदार यांचा दि.12.05.2009 रोजीचा राजीनामा मंजूर करण्या बाबतचा अर्ज गैरअर्जदार यांनी दाखल केलेला आहे. अर्जदार यांच्या राजीनाम्यास मंजूरी दि.14.05.2009 रोजी मिळालेली आहे. अर्जदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये रुबी फंडातील त्यांची रक्कम रु.35,000/- व्याजासह परत करावी अशी मागणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी दि.21.11.2009 रोजी पोट नियम दाखल केलेले आहेत. सदरच्या पोटनियमातील तरतूदीनुसार गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या रुबी फंडातील रक्कम कर्जात जमा केल्याचे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी कागद यादीसोबत गैरअर्जदार बँकेला दि.02.06.2009 रोजी आपल्या बँकेतील जमा असलेली रक्कम परत मिळणे बाबतचा अर्ज दिलेला आहे. गैरअर्जदार यांनी दि.21.11.2009 च्या कागदयादी सोबत गैरअर्जदार बँकेचे दि.27.08.2009 रोजी गैरअर्जदार बॅकेच्या मुंबई शाखेला दिलेले पञ दाखल केलेले आहे. सदर पञामध्ये अर्जदार यांच्या कर्ज खाती जमा केलेल्या रककमाचा तपशील व उर्वरित रक्कम अर्जदार यांच्या बचत खात्यामध्ये जमा केल्याचे नमूद केलेले आहे. अर्जदार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे प्रथम म्हणजे दि.16.05.2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडे त्यांचे जमा असणा-या रक्कमाच्या तपशीला बाबतची माहीती मिळणे बाबत अर्ज दिलेला आहे. सदरच्या पञास गैरअर्जदार यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यानंतर अर्जदार यांनी पून्हा दि.02.06.2009 रोजी माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 (अधिनियम क्र.22 सन 2005 प्रमाणे) कलम 6 (1) प्रमाणे करावयाचा विहीत नमून्यातील अर्ज गैरअर्जदार बँकेला दिलेला आहे सदर अर्जावर अर्ज प्राप्त झाल्याबाबत गैरअर्जदार यांची सही व शिक्का आहे. परंतु त्यानंतरही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे बाबत कोणताही लेखी खूलासा अर्जदार यांना दिलेला आहे असे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या अर्जाचे कामी दाखल नाही.अर्जदार हे सेवानिवृत्तीनंतर गैरअर्जदार यांचेकडे वेळोवेळी त्यांचे जमा असणा-या रक्कमा कर्ज खाती जमा असणारी रक्कम या बाबत लेखी खूलासा मागत असतील तर तो देणे गैरअर्जदार यांचेवर बंधनकारक असे असताना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणताही खूलासा कळविलेला नाही. अशा प्रकारे गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे वेळोवेळी लेखी अर्ज देऊन रक्कमाच्या तपशीला बाबत मागणी केलेली आहे परंतू गैरअर्जदार यांनी त्याबाबत कोणताही खूलासा केलेला नाही. सदर मंचाची नोटीस गैरअर्जदार यांना मिळाल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना आवश्यक असलेली कागदपञे या अर्जाचे कामी दाखल केलेली आहेत. अर्जदार यांचे कर्ज खाती रुबी फंडातील रक्कम जमा करुन उर्वरित रक्कम रु.4000/- बचत खात्यामध्ये जमा केल्याची बाब दि.27.0.8.2009 च्या पञावरुन स्पष्ट होत आहे परंतु गैरअर्जदार यांनी सदरची बाब दि.21.11.2009 रोजी दाखल केलेल्या कागदयादी सोबतच्या या पञावरुन पहिल्यांदाच निर्दशनास आलेली आहे. गैरअर्जदारांनी दाखल केलेला सभासदाचे अंतिम प्रदान प्रमाणपञ यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांच्या राजीनाम्यास दि.14.05.2009 रोजी मंजूरी मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. यूक्तीवादाचे वेळेला गैरअर्जदार यांनी कोर्टासमोर अर्जदार यांची रक्कम रु.9578/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांचेकडे आजअखेर जमा आहे व ती देय आहे असे कबूल केलेले आहे. अर्जदार हे वेळोवेळी गैरअर्जदार यांचेकडे रक्कमेची मागणी करीत असतील अशा परिस्थितीमध्ये गैरअर्जदार यांनी आजअखेर अर्जदार यांची रक्कम रु.9578/- बेकायदेशीरपणे जमा करुन ठेवलेली आहे ती अर्जदार यांना त्यांच्या राजीनामा मंजूरीनंतर तात्काळ देणे योग्य व कायदेशीर असे होते परंतु ती रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना आजअखेर का दिली नाही या बाबतचा कोणताही खूलासा गैरअर्जदार यांनी दिलेला नाही. याचां विचार होता अर्जदार हे सदर रक्कम रु.9578/- वर 9 टक्के दराने व्याज गैरअर्जदार यांचेकडून वसूल करुन घेण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांची रक्कम गैरअर्जदार यांचेकडे जमा असताना कोणतेही योग्य व संयूक्तीक कारण नसताना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची रक्कम स्वतःकडे ठेवलेली आहे तसेच अर्जदार यांची रक्कम रु.4000/- त्यांचे बचत खात्यामध्ये जमा केल्याची बाब मे. मंचाच्या दि.21.11.2009 च्या कागदयादी सोबत दाखल केलेल्या गैरअर्जदार यांच्या पञावरुन पहिल्यांदाच निदर्शनास आलेली आहे. अर्जदार यांना गैरअर्जदार यांचेंकडून त्यांची जमा असलेली रक्कम मिळणेसाठी व त्याबाबतचे हीशोबाची माहीती मिळण्यासाठी या मंचामध्ये अर्ज करावा लागलेला आहे व त्याअनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. यांचा विचार होता अर्जदार हे मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व त्यांनी दाखल केलेले शपथपत्र व दोन्ही पक्षाचा युक्तीवाद यांचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. अर्जदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. सदर निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात. 3. रक्कम रु.9578/- दयावेत सदर रक्कमेवर दि.15.05.2009 पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजासह रक्कम दयावी. 4. मानसिक ञासापोटी रक्कम रु.4000/- व अर्जाचा खर्च रु.1000/- दयावेत. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |