आदेश (पारीत दिनांक : 24 फेब्रुवारी, 2012 ) सौ.सुषमा प्र.जोशी, मा.सदस्या हयांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा,1986 चे कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. त.क.चे राहते ठिकाणी मूल, तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर येथे "अमित एजन्सी सचदेव टाईम हाऊस " या नावाचे घडयाळ व मोबाईल विक्रीचे दुकान आहे. आनंद भंडार या एकाच इमारतीत त.क. यांची फर्म तसेच त्यांचे मोठे भाऊ राजकुमार टेहलीयानी यांची टी.व्ही.पॅलेस नावाची फर्म आणि वडील किसनलाल टेहलीयानी यांची आनंद भंडार नावाची फर्म असून वरील तिघाचे तीन निरनिराळे फर्म असून, प्रत्येक फर्मचा विमा वि.प.विमा कंपनीकडे सतत चालू आहे. 2. दिनांक 16.01.2010 चे मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी त.क.चे फर्म असलेल्या दुकानाचे कुलूप तोडून चोरी केली. अज्ञात चोरटयांनी त.क.चे भाऊ यांच्या टि.व्ही.पॅलेस मधील मालाची चोरी केली होती. सदर बाब त.क.यांना लक्षात आल्या बरोबर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता, एफ.आय.आर.नोंदविण्यात आला. त.क.यांनी घटनेची माहिती वि.प.विमा कंपनीस फॅक्सद्वारे दिली. पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा नोंदविला आणि पुढील चौकशी सुरु आहे. 3. सदर पोलीस रिपोर्टमध्ये त.क. यांनी स्वतःचे व त्यांचे भाऊ राजकुमार यांचे फर्म मधील चोरी गेलेल्या मालाची माहिती दिली व त्याची किंमत रुपये-7,65,000/- नोंदविली. एकाच ठिकाणावर चोरीची घटना घडल्यामुळे पोलीसांनी सुध्दा एकच एफ.आय.आर. नोंदविण्यास सांगितले. दिनांक 18.01.2011 रोजी दोन्ही फर्म मधील चोरी बाबत अमीत व राजकुमार यांनी पोलीसांना स्वतंत्र अर्ज दिलेले आहेत.
4. वि.प.विमा कंपनी तर्फे श्री मनमोहन तिवारी यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त.क.चे चोरी गेलेल्या मालमत्तेची किंमत ही रुपये-5,55,000/- एवढी होती परंतु श्री तिवारी, सर्व्हेअर यांनी नुकसान भरपाई दाखल रुपये-2,66,500/- एवढया किंमतीचे संमतीपत्र त.क.कडून घेतले. त.क.चे
CC/97/2011 कर्ज प्रलंबित होते व कर्जाची रक्कम देणे होती आणि त्वरीत पुर्तता व्हावी म्हणून नाईलाजास्तव त.क.यांनी सदर रक्कम मान्य केली. 5. चोरीचे घटनेचे एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी उलटल्या नंतर, श्री तिवारी, निरिक्षक यांनी त.क.कडून संमतीपत्र घेतले व रुपये-2,03,550/- एवढयाच विमा रकमेस मान्यता दिली व इतर दस्तऐवजाची मागणी केली. पुन्हा दिनांक 27.04.2011 रोजी आवश्यक दस्तऐवजाची पुर्तता केली परंतु नुकसान भरपाई मिळाली नाही. आश्वासन मिळूनही दिनांक 31.03.2011 पर्यंत कोणतीही विमा रक्कम मिळाली नाही आणि वि.प.ने अशाप्रकारे दोषपूर्ण सेवा दिली आहे. 6. वि.प.विमा कंपनी तर्फे मार्च-2011 मध्ये श्री धनंजय एकरे यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती केली, त्यांनी केवळ रुपये-1,50,000/- एवढया रकमेचे डिसचॉर्ज व्हॉऊचर पाठविले, ते कोणत्या आधारावर पाठविले? या बद्यल कोणताही खुलासा नव्हता आणि म्हणून प्रत्यक्ष्य नुकसानीची रक्कम न देऊन वि.प.विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त.क.चे रुपये-5.00 लक्ष पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. त.क.ला आजतागायत रक्कम न देऊन वि.प.विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
7. त.क.ने दिनांक 02.09.2011 रोजी वि.प.ला नोटीस पाठविली व डिसचॉर्ज व्हाऊचर रद्य करावे, निरिक्षक श्री तिवारी यांचे म्हणण्या नुसार नुकसान भरपाईची रकम म्हणून रुपये-2,66,500/- वि.प.ने द्यावे. परंतु वि.प.ने सदर नोटीसचे उत्तर दिले नाही म्हणून शेवटी प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचात दाखल केली.
8. त.क.चा विमा दावा वेळेच्या आत म्हणजे तीन चार महिन्यात वि.प.ने निकाली काढला नाही म्हणून त.क., वि.प.विमा कंपनी कडून विमा दावा रक्कम व्याजासह तसेच नुकसान भरपाईसह वि.प.कडून मिळण्यास पात्र आहेत.
9. त.क.चा विमा फक्त रुपये-4,19,000/- एवढया किंमतीचा होता म्हणून तेवढीच रक्कम त.क.व्याजासह मागीत आहे. तक्रार प्रार्थने नुसार मंजूर करावी. त.क.ला विमा दावा रक्कम, व्याज, नुकसान भरपाई खर्च मिळावा अशी विनंती त.क.ने केली.
CC/97/2011 10. त.क.ने तक्रारी सोबत 17 दस्तऐवज दाखल केलेत, त्यामध्ये प्रामुख्याने विमा पॉलिसीची प्रत, घटने बद्यल सुचनापत्र, एफ.आय.आर. प्रत, रिपोर्ट, पोलीसांचा अहवाल, पोलीसांना दिलेले पत्र, घटनास्थळ पंचनामा, फायनल रिपोर्ट, वि.प.कडे दस्तऐवज दाखल केल्या बद्यल सुचना, ऑडीट रिपोर्ट, संमतीपत्राची प्रत, नोटीस, पोच पावत्या व इतर दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 11. वि.प.ने दिनांक 22.12.2011 रोजी आपला लेखी जबाब दाखल करुन त्यांनी त.क.चा व्यवसाय, त्याचा वि.प.विमा कंपनीकडे असलेला विमा, त्याचा कालावधी, झालेली घटना, सर्व्हेअरची नियुक्ती या गोष्ठी मान्य केल्या असून त्यांचे विरुध्दचे इतर सर्व आक्षेप फेटाळलेत. वि.प.ने नमुद केले की, त.क.ने स्वतः चोरीचा रिपोर्ट पोलीस स्टेशन येथे दिलेला नाही. रुपये-67,406/- ची संमती घेतल्या बद्यल आक्षेप नोंदविलेला आहे. नुकसान भरपाई कधी मिळेल या बद्यल कोणतेही आश्वासन दिलेले नव्हते. तक्रारकर्त्याचा विमा क्लेम कायदेशीर नसून, पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलेला नसल्याने, वि.प.ने कोणती दोषपूर्ण सेवा दिली असे कुठेही सिध्द होत नाही म्हणून तक्रार खारीज व्हावी. 12. विमाक्लेम संबधाने नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वि.प.विमा कंपनीची येत नाही आणि म्हणून दावा खारीज करण्यात आला. त.क.ची नोटीस मिळाली परंतु त्यातील मजकूर योग्य नाही. पॉलिसी दस्तऐवज, कंपनीने पाठविलेले पत्र, त.क.ने दिलेले उत्तर, सोडून इतर सर्व दस्तऐवज अमान्य केलेले आहेत. तक्रार सिध्द होत नसल्याने ती खारीज करावी, अशी विनंती वि.प.यांनी केली. 13. वि.प.यांनी त.क.चे सुचने वरुन सर्व्हेअर श्री तिवारी यांचा सर्व्हे अहवाल प्रकरणात दाखल केला नाही परंतु श्री एकरे यांचा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट प्रकरणात दाखल केला आहे. त्यानंतर त.क.ने केलेल्या मागणी नुसार वि.प.ने सर्व्हेअर श्री तिवारी यांचा अहवाल दाखल केला आहे.
14. त.क.ने दिनांक 10.02.2012 रोजी सर्व्हेअर अहवाल दाखल झाल्या नंतर आपला प्रतिज्ञालेख दाखल केला.
15. उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नाही अशी पुरसिस त.क. तर्फे दाखल करण्यात आली.
CC/97/2011 16. त.क.यांची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार, वि.प. विमा कंपनीचा प्रतिज्ञालेखावरील लेखी जबाब, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज याचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर मंचा समक्ष निर्णयान्वित होण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) त.क.यांना विमा दावा रक्कम न देऊन वि.प.यांनी दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय (2) जर होय, तर, त.क. काय दाद मिळण्यास पात्र आहेत? काय आदेश? अंतीम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 17. तक्रारदार यांनी, वि.प.विमा कंपनीकडे, त्यांचे दुकानामध्ये दिनांक 16.01.2010 चे मध्यरात्री चोरी गेलेल्या मालाचे नुकसान भरपाई संबधाने विमा दावा दाखल केला होता परंतु वि.प.विमा कंपनीने सदर दावा हा आजपावेतो योग्य त्या रकमेचा निश्चीत केला नाही व कोणतीही विमादाव्याची रक्कम त.क.यांना आजपावेतो दिलेली नाही अशाप्रकारे वि.प.यांनी त्यांचे सेवेमधे त्रृटी केलेली आहे, म्हणून त.क.यांनी प्रस्तुत तक्रार वि.न्यायमंचा समक्ष विमादाव्या संबधाने योग्य नुकसान भरपाई मिळण्या करीता दाखल केलेली आहे. 18. त.क.यांनी, वि.प.विमा कंपनी कडून त्यांचे दुकानामध्ये असलेल्या वस्तुंचा व फर्मचा विमा उतरविला होता, ही बाब वि.प.विमा कंपनीस सुध्दा मान्य आहे. त.क.यांचे दुकान हे मे.अमीत एजन्सीज व सचदेव टाईम हाऊस या नावाने आहे व तशी पॉलिसीची प्रत त.क.यांनी प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेली आहे. 19. त.क.यांचे दुकानामध्ये भ्रमणध्वनी हॅन्डसेटस व मनगटी व भिंतीवरील घडयाळे विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. सदर दुकानामध्ये चोरी झाल्या बद्यल त.क.यांनी पोलीस स्टेशन, मुल येथे रिपोर्ट दिलेला होता व त्यामध्ये चोरीस गेलेल्या सर्व मालाची माहिती दिली होती.
CC/97/2011 20. वि.प.विमा कंपनीने, सदर चोरी गेलेल्या मालापैकी, काही माल पोलीसांनी चोरा कडून हस्तगत गेल्याने, हस्तगत झालेल्या मालाची किंमत, विमा दावा निश्चीती करताना कमी केली होती व उर्वरीत रकमेचा विमा दावा त.क.यांना देण्याची तयारी दर्शविली होती असे त.क.यांचे म्हणणे आहे.
21. त.क.यांनी त्यांचे दुकानातील एकूण मालाची किंमत ही रुपये-7,65,000/- एवढी होती असे पोलीसांकडे नोंदविलेल्या तक्रारीमध्ये नमुद केले होते, त्यापैकी रुपये-5,55,000/- एवढया किंमतीचा माल चोरीस गेल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
22. वि.प.विमा कंपनीने सदर चोरीचे घटने नंतर चौकशी करीता सर्व्हेअर श्री मनमोहन तिवारी यांची नेमणूक केली व त्यांनी त.क.यांचे कडून रुपये-2,64,965/- चा विमा दावा स्विकृत करण्या बद्यल त.क.यांचे संमतीपत्र लिहून घेतले परंतु त.क.यांनी सदर संमतीपत्र देऊन सुध्दा आजतागायत विमा दाव्याची रक्कम वि.प.विमा कंपनीने दिलेली नाही. परंतु वर नमुद केल्या प्रमाणे सर्व्हेअर यांनी निश्चीत केलेल्या नुकसान भरपाई ऐवजी रुपये-2,03,550/- एवढीच विमा रक्कम, त.क.यांना विमादाव्यापोटी देण्यास वि.प.विमा कंपनीने मान्यता दिली होती परंतु सदर रक्कम सुध्दा त.क.यांनी सर्व दस्तऐवजाची पुर्तता करुन देखील वि.प.यांनी दिलेली नाही. अशाप्रकारे वि.प.विमा कंपनीने आपले सेवेत त्रृटी केल्याचे त.क.यांचे म्हणणे आहे. 23. वि.प.विमा कंपनीने वर नमुद केल्याप्रमाणे मान्यता दिलेली सदर नुकसान भरपाईची रक्कम रुपये-2,03,265/- मधून, पोलीसांनी हस्तगत केलेल्या चोरीचे मालाची किंमत रुपये-52,950/-वजावट करुन, उर्वरीत रुपये-1,50,000/- एवढया रकमेचे डिसचॉर्ज व्हाऊचर त.क.यांना पाठविले परंतु सदर डिसचॉर्ज व्हॉऊचर त.क.यांना मान्य नसल्याने त्यांनी ते सही करुन वि.प.विमा कंपनीस परत पाठविले नाही. 24. वि.प.विमा कंपनीने आपले युक्तीवादात नमुद केले की, ते आजही सदर रक्कम रुपये-1.50 लक्ष त.क.ला विमा दावा रक्कम म्हणून देण्यास तयार आहेत, म्हणून त्यांनी त्यांचे सेवेमध्ये कोणतीही त्रृटी केलेली नाही.
CC/97/2011 25. मंचाचे मते, त.क.यांनी त्यांचे दुकानातील चोरी झालेल्या मालाचा विमा वि.प.विमा कंपनी कडून उतरविला होता. त.क.यांनी दुकानामधील साठा केलेला माल दर्शविण्या करीता दुकानातील स्टॉक स्टेटमेंटस प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेले आहेत. त.क.यांनी विमा दाव्या संबधाने सर्व दस्तऐवजाची पुर्तता वि.प.विमा कंपनीकडे केलेली आहे परंतु वि.प.विमा कंपनीने, त्यांचेच सर्व्हेअर यांनी काढलेला नुकसान भरपाईचा आकडा, कोणत्या आधारावर कमी केला? या बद्यल कोणताही खुलासा केलेला नाही.
26. त.क.यांनी मंचास युक्तीवादा दरम्यान सांगितले की, सर्व्हेअर श्री तिवारी यांनी दाखल केलेल्या सर्व्हे अहवाला मधील नुकसान भरपाइचे विवरण हे चुकीचे असल्यामुळे त्यांनी स्टॉक स्टेटमेंट दाखल केलेले आहेत. 27. वि.प.विमा कंपनीने सर्व्हेअर श्री तिवारी यांनी दिलेल्या सर्व्हे अहवाला नुसार त.क.यांना विमा दावा रक्कम नुकसानी पोटी देणे गरजेचे होते परंतु कोणत्याही कारणा शिवाय परत श्री धनंजय एकरे यांना मार्च-2011 मध्ये चौकशी अधिकारी म्हणून नेमले. अशाप्रकारे त.क.यांचा विमा दावा देण्यास वि.प.विमा कंपनीने टाळाटाळ केलेली आहे, असे मंचाचे स्पष्ट मत झालेले आहे. 28. वि.प. यांनी, सर्व्हेअर श्री मनमोहन तिवारी यांचे अहवाला नंतर पोलीसांनी हस्तगत केलेल्या मालाची अंदाजित किंमत वजावट करुन येणारी रक्कम रुपये-2,03,550/- ही देखील त.क.यांना आजपावेतो देऊ केलेली नाही. अशाप्रकारे वि.प.विमा कंपनीने, त.क. यांचे सेवेमध्ये त्रृटी केलेली आहे. 29. त.क.यांना, पोलीसांनी चोरीस गेलेल्या मालापैकी काही माल हस्तगत केल्याची माहिती झाली होती व सदर मालाचे पडताळणी करीता त.क.पोलीस स्टेशनमध्ये सुध्दा गेले होते परंतु सदर्हू माल हा त्यांनी पोलीसांकडून परत घेतला नाही, अथवा हस्तगत केलेल्या मालाची अंदाजित किंमत व त्याची स्थिती या बाबत कोणतेही स्पष्टीकरण त.क.यांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये दिलेले नाही. त्यामुळे हस्तगत केलेल्या मालाची किंमत रुपये-52,950/- ही पोलीसांनी अंदाजित रक्कम काढलेली आहे. मंचाचे मते, वि.प.हे पोलीसांनी काढलेली अंदाजीत रक्कम पुरावा म्हणून घेऊ शकत नाही. कारण पोलीसांनी दिलेले स्टेटमेंटला Evidentiary Value
CC/97/2011 नसते व तो Admissible evidence होऊ शकत नाही, असे मा.राष्ट्रीय आयोग, न्यु दिल्ली यांनी "New India Assurance Co.Ltd.-Vs- M.S. Venkatesh Babu "या प्रकरणी पारीत केलेला निकाल, जो- IV (2011) CPJ 243 (N.C.) या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे, त्यामध्ये स्पष्ट केलेले आहे. 30. वि.प.विमा कंपनीने, त.क.चा विमा दावा निश्चीत करताना मालाचे किंमतीतून पोलीसांनी हस्तगत केलेंडर मालाची अंदाजित रक्कम व घसारा यासह वजावट करुन देय नुकसान भरपाईची रक्कम काढलेली आहे ही बाब मंचाचे निदर्शनास येते परंतु मंचाचे मते त.क.यांचे दुकानात नविन भ्रमणध्वनी सेटस, घडयाळे इत्यादी विक्री करीता असतात, त्यामुळे चोरीस गेलेल्या मालाचे किंमतीमधून त्याचा घसारा वजा करणे योग्य नाही. म्हणून सदर रक्कम ही देय नुकसान भरपाईचे रकमेतून वजा करणे मंचाचे मते कायदेशीर व न्यायोचित नाही. तसेच वि.प.विमा कंपनीने सदर रकमेतून चोरीस गेलेल्या मालाचे किंमती वरील वॅटची रक्कम सुध्दा वजावट केलेली आहे परंतु मंचाचे मते सदर वॅटची रक्कम वजा करण्याचा वि.प.विमा कंपनीस कोणताही अधिकार नाही.
31. कारण Vat हा Value Added Tax असतो व हा Tax वस्तुची विक्री करण्या आधीच सरकारला जमा करावा लागतो. तसेच Tax जर वस्तु चोरीला गेली तर परत होऊ शकतो, हे दर्शविण्यासाठी वि.प.यांनी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. म्हणून वि.प.सर्व्हेअरने निर्धारित केलेल्या रकमेतून Vat ची रक्कम कमी करु शकत नाही. 32. म्हणून मंचाचे मते, वि.प.यांनी तक्रारदार यांचे दुकानात झालेल्या चोरीचे मालाचे नुकसान भरपाईचे आकलन हे चुकीचे पध्दतीने केले व चुकीचे केलेल्या आकलना नुसारही विमादाव्यापोटी नुकसान भरपाईची रक्कम त.क.यांना आता पावेतो दिलेली नाही. अशाप्रकारे वि.प.विमा कंपनीने आपल्या सेवेमध्ये त्रृटी केलेली आहे असे मंचाचे स्पष्ट मत झालेले आहे. मुद्या क्रं-2 33. म्हणून त.क. हे वि.प.विमा कंपनी कडून, त्यांचे सर्व्हेअरचे अहवाला नुसार विमा दाव्यापोटी निश्चीत केलेली नुकसान भरपाईची रक्कम रुपये-2,64,965/- ही तक्रार दाखल दिनांका पासून ते रक्कम प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याजासह मिळण्यास पात्र आहेत. तसेच त.क. यांना सदर विमा दाव्या
CC/97/2011 संबधाने निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे आणि म्हणून त.क.हे मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-5000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- वि.प.कडून मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 34. वरील सर्व विवेचना वरुन, वि.जिल्हा न्यायमंच, प्रस्तुत प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) त.क.यांची तक्रार, वि.प.विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प. यांनी, त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते. 3) वि.प. विमा कंपनीने पॉलिसी क्रमांक- 182302/48/2010/52 अंतर्गत त.क.यांना नुकसान भरपाई पोटी रुपये-2,64,965/- (अक्षरी रुपये दोन लक्ष चौसष्ठ हजार नऊशे पासष्ठ फक्त) एवढी रक्कम आणि तीवर तक्रार दाखल दिनांक 03.10.2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के दराने व्याज यासह येणारी रक्कम त.क.यांना देय करावी. 4) त.क.यांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल रुपये-5000/ (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त) वि.प. विमा कंपनीने त.क.यांना देय करावे. 5) सदर निकालपत्रातील आदेशाचे अनुपालन, वि.प.यांनी आदेशाची प्रत मिळाल्या पासून तीस दिवसाचे आत करावे. अन्यथा आदेशित देय रक्कम रुपये-2,64,965/- आणि तीवर तक्रार दाखल दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.6 टक्के ऐवजी द.सा.द.शे.9टक्के दराने दंडनीय व्याजासह येणारी रक्कम त.क.यांना देय राहिल याची नोंद वि.प.विमा कंपनीने घ्यावी. 6) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी. 7) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब)व(क) फाईल्सच्या प्रती त.क.ने घेऊन जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | (सौ.सुषमा प्र.जोशी ) | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | सदस्या. | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT | |