जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 140/2012.
तक्रार दाखल दिनांक : 30/05/2012.
तक्रार आदेश दिनांक : 30/08/2013. निकाल कालावधी: 01 वर्षे 03 महिने 01 दिवस
श्री. कोरे सुरज रावसाहेब, वय 20 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण, रा. घर नं. 307, युनायटेड रेसिडन्सी,
8391/20/1, रेल्वे लाईन्स्, सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
(1) ब्रम्ह्देव दादा माने इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी,
बेलाटी, सोलापूर.
(2) प्राचार्य, ब्रम्ह्देव दादा माने इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी,
बेलाटी, सोलापूर. (विरुध्द पक्ष क्र.1 यांची नोटीस
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेवर बजावण्यात यावी.) विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : विनोद पी. सुरवसे
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : ए.एम. देवधर
आदेश
श्री. दिनेश रा. महाजन, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता रितसर प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतला असून दि.26/7/2011 रोजी मुळ कागदपत्रांसह अॅडमिशन फी रु.60,067/- व इतर फी रु.6,000/- असे एकूण रु.66,067/- जमा केले आहेत. तक्रारदार यांना त्यांचे वैयक्तिक व घरगुती अडचणीमुळे प्रवेश रद्द करावा लागणार असल्यामुळे त्याप्रमाणे दि.25/8/2011 रोजी मुळ कागदपत्रांसह भरणा केलेली फी रक्कम परत मिळण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडे अर्ज केला. परंतु विरुध्द पक्ष यांनी त्यांना फी परत मिळू शकत नाही, असे पत्र दिले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून त्यांनी भरणा केलेली फी रु.65,067/- परत मिळण्यासह मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व नुकसान भरपाई रु.20,000/- मिळावी, अशी विनंती केलेली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी म्हणणे दाखल केले असून तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार यांनी मेकॅनिकल इंजिनीअंरींग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला होता आणि दि.25/8/2011 रोजी प्रवेश रद्द करण्यासाठी फॉर्म नं. ‘ओ’ सादर केला. त्यांच्या महाविद्यालयास एकूण 126 सीट मंजूर असून त्यापैकी 6 आर्थिकदृष्टया दुर्बल घटकासाठी आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरींगकरिता सन 2011-2012 या शैक्षणिक वर्षामध्ये त्यापैकी केवळ 89 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि 31 सीट रिक्त राहिल्या. डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई यांच्या परिपत्रकाप्रमाणे तक्रारदार हे फी रक्कम परत मिळविण्यास पात्र नाहीत. शेवटी तक्रार रद्द करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार फी रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग अभ्यासक्रमाकरिता दि.26/7/2011 रोजी प्रवेश घेतल्याबाबत विवाद नाही. तसेच दि.25/8/2011 रोजी दिलेल्या अर्जाद्वारे तक्रारदार यांनी प्रवेश रद्द करण्यासाठी विनंती केल्याबाबत विवाद नाही. तक्रारदार यांनी त्यांचा प्रवेश रद्द होण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांनी भरणा केलेली फी परत मागणी केली असता, विरुध्द पक्ष यांनी त्यास नकार दिला आणि त्यानंतर प्रस्तुत विवादास कारण घडल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येते.
5. उभय पक्षकारांनी फी परत मिळण्यास तक्रारदार पात्र असू शकतात काय ? याबाबत डायरेक्टर ऑफ टेक्नीकल एज्युकेशन, मुंबई यांच्या परिपत्रकातील तरतुदींचा ऊहापोह केलेला आहे. परंतु उभय पक्षकारांनी त्या दिशानिर्देशक परिपत्रकाची प्रत अभिलेखावर दाखल केलेली नाही. असे असले तरी, विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यानंतर फी परत मिळण्याकरिता ज्या विशिष्ठ तरतुदी आहेत, त्या विरुध्द पक्ष यांनी आपल्या लेखी म्हणण्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्या तक्रारदार यांनीही अमान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे त्याचा आधार घेणे न्यायोचित ठरते.
6. तक्रारदार यांनी डायरेक्टर ऑफ टेक्नीकल एज्युकेशन, मुंबई यांच्या परिपत्रकातील क्लॉज नं.8.9 चे अ.क्र.1 चा आधार घेऊन फी परतावा मागितला आहे. उलटपक्षी विरुध्द पक्ष यांनी त्याच क्लॉज नं. 8.9 चे अ.क्र.3 प्रमाणे फी परतावा मिळण्यास तक्रारदार हक्कदार नसल्याचे नमूद केले आहे. दोन्ही तरतुदींचे सुक्ष्मपणे अवलोकन करता, प्रवेश रद्द करण्याची विनंती आल्यानंतर विद्यार्थ्यास फी परतावा मिळविण्याकरिता त्या शैक्षणिक वर्षामध्ये सीट भरणे आवश्यक असल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांच्या कथनानुसार एकूण 120 जागांपैकी 31 जागा रिक्त राहिल्यामुळे तक्रारदार हे फी परतावा मिळविण्यास पात्र नाहीत. तक्रारदार यांच्या युक्तिवादाप्रमाणे विरुध्द पक्ष यांच्याकडून जागा भरण्याकरिता कोणतेही प्रयत्न झाले नाहीत आणि त्याची जबाबदारी तक्रारदार यांच्यावर नसल्यामुळे फी परतावा देणे विरुध्द पक्ष यांच्यावर बंधनकारक आहे. परंतु अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्याची केंद्रीय पध्दत पाहता तक्रारदार यांचे प्रस्तुत युक्तिवाद मान्य करता येणार नाही. महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांची इच्छा व निवड ही वेगवेगळी असल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी त्यांच्या महाविद्यालयातील जागा भरण्याकरिता प्रयत्न केलेले नाहीत, हे कथन मान्य करता येऊ शकत नाही. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना क्लॉज नं.8.9 चे अ.क्र.3 प्रमाणे सिक्युरिटी डिपॉजीट परत केलेले आहे. वरील विवेचनावरुन तक्रारदार यांना फी रक्कम परत न करण्याचे विरुध्द पक्ष यांचे कृत्य सेवेतील त्रुटी ठरु शकत नाही आणि विरुध्द पक्ष यांच्या महाविद्यालयातील जागा रिक्त राहिल्यामुळे तक्रारदार हे क्लॉज नं.8.9 चे अ.क्र.1 चा आधार घेऊन फी रक्क परत मिळविण्यास पात्र ठरु शकत नाही, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी दिले आहे.
7. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. तक्रारदार व विरुदध पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री. दिनेश रा. महाजन÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/30813)