जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी. मा.सदस्या-श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १२१/२०१०
तक्रार दाखल दिनांक – ०६/०४/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २३/०५/२०१३
श्री.अरविंद हिरामण शिवदे. ----- तक्रारदार.
उ.व.५७,धंदा-नोकरी.
रा.रुम नं.४,जेल लाईन,
जेल रोड,धुळे.
विरुध्द
शाखा अधिकारी. ----- सामनेवाले.
भारतीय स्टेट बॅंक,
कोषागार शाखा,धुळे.
ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः श्रीमती.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.पी.कुलकर्णी.)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.एम.एस.पाटील.)
-------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा - श्रीमती.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, ए.टी.एम. मध्ये गहाळ झालेली रक्कम सामनेवाले यांच्याकडून मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे सामनेवाले यांच्या भारतीय स्टेट बॅंक धुळे येथे बचत खाते क्र.१११९५०००५४० असून त्यांनी सामनेवाले यांच्याकडून ए.टी.एम. सेवेचा लाभ घेतलेला आहे. त्यांचा ए.टी.एम. कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००१९१३९ असा आहे. दि.१०-०७-२००९ रोजी तक्रारदारांचे सदरचे ए.टी.एम. कार्ड हे प्रवासात हरविले. त्यामुळे त्यांनी नवीन ए.टी.एम. कार्डची मागणी सामनेवाले यांच्याकडे केली. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी नवीन नंबर असलेले ए.टी.एम. कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००७२४८४ हे तक्रारदारास पाठविले. त्यानंतर पुन्हा तक्रारदाराच्या पत्त्यावर आणखी एक नवीन ए.टी.एम. कार्ड नंबर ६२२०१८०८२५४०००७३८६२ पुन्हा पाठविले. या कार्डची मागणी केलेली नसतांना सामनेवालेंनी ते कार्ड पाठविले आहे. या कार्डचा आजपावेतो तक्रारदारांनी कधीही वापर केलेला नाही.
(३) नवीन ए.टी.एम. कार्ड वापरण्यासाठी तक्रारदार गेले असता त्यांचे असे लक्षात आले की, त्यांच्या खात्यामधून रक्कम रु.४,०००/- गहाळ झालेले आहेत. पासबुक मधील नोंदीमध्ये एकाच दिवशी दि.१०-०७-२००९ रोजी दोन वेळा रु.२,०००/- + २,०००/- असे एकूण रु.४,०००/- काढण्यात आले आहेत. या बाबत तक्रारदारांनी सामनेवाले यांना कळविले. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर खात्यातून दि.२१-०७-२००९ रोजी रु.५६,०००/- काढले व रु.१,६३५/- बाकी असतांना त्यानंतर पुन्हा रु.१००/- व रु.५००/- काढले. त्यानंतर उर्वरीत बाकी रक्कम रु.१,०३५/- काढण्यासाठी गेले असता, खात्यामध्ये केवळ रु.३५/- शिल्लक असल्याचे त्यांना समजले. सदर बचतखाते पुस्तकातील नोंदीवरुन असे दिसले की दि.०९-१०-२००९ रोजी पुन्हा रु.१,०००/- कधीही न वापरलेल्या जादा ए.टी.एम. कार्डचे नंबरचा उपयोग करुन तक्रारदारांचे नकळत काढले आहेत. या बाबत सामनेवाले यांचेकडे दि.२३-११-२००९ रोजी तक्रार अर्ज केला. परंतु सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या प्रमाणे तक्रारदारांच्या खात्यातून एकूण रु.५,०००/- परस्पर गहाळ झाले आहेत. हा प्रकार चोरीचा आहे. त्याकामी सामनेवाले यांना नोटिस दिली व सदर रक्कम कोणत्या केंद्रातून काढली या बाबत खुलासा मागितला. परंतु सामनेवाले यांनी तो दिलेला नाही. सामनेवाले यांनी सदर पैसे देण्यास साफ नकार दिला आहे. सामनेवाले यांनी निकृष्ट प्रतिची सेवा दिलेली आहे. त्यामुळे सदरची तक्रार दाखल केली आहे.
(४) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांचेकडून खात्यातुन गहाळ झालेली रक्कम रु.५,०००/-, गहाळ झालेल्या दिवसापासून दररोज रु.१००/- दंडा प्रमाणे मिळावेत तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.१५,०००/- व अर्जाचा खर्च रु.५,०००/- अशी सर्व रक्कम १३ टक्के व्याजासह मिळावी.
(५) सामनेवाले यांनी त्यांचा लेखी खुलासा नि.नं.९ वर व शपथपञ नि.नं १० वर दाखल केले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांना दोन नवीन ए.टी.एम. नंबर दिले हे मान्य आहे. परंतु दि.१०-०७-२००९ रोजी रु.४,०००/- गहाळ झाले व त्यानंतर दि.०९-१०-२००९ रोजी रु.१,०००/- गहाळ झाले हे मान्य नाही. या बाबत तक्रारदारांनी ए.टी.एम. कार्ड हरविल्याबाबतची कोणतीही तक्रार सामनेवालेंकडे दिलेली नाही. सदर रकमा या तक्रारदारांच्या खात्यामधून ए.टी.एम. कार्डचा वापर करुन परस्पर कोणीतरी काढल्या हे अशक्यप्राय आहे. त्यास सामनेवाले बॅंक जबाबदार नाही. ए.टी.एम. कार्डचा कोड नंबर हा गुप्त असल्याने तो फक्त संबंधीत खातेदारास माहिती असतो. त्यामुळे दुस-याने पैसे काढण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. तसे झाल्यास वैयक्तिकरित्या तक्रारदार हाच जबाबदार आहे. त्यामुळे या सामनेवालेंच्या विरुध्द सदर तक्रार चालू शकत नाही. सबब सामनेवालेंनी कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. त्यामुळे सदरचा अर्ज खर्चासह रद्द करावा.
(६) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.२, शपथपञ नि.नं.३, कागदपञ नि.नं.५ वर एकूण १ ते ५, तसेच सामनेवाले यांची कैफीयत नि.नं. ९, शपथपञ नि.नं.१० पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : नाही. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांचे सामनेवाले बॅंकेत बचत खाते आहे या बाबतची छायांकीत प्रत नि.नं.५/१ वर दाखल आहे. त्यासाठी तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडून ए.टी.एम. कार्डची सेवा घेतली असल्याचे सामनेवालेंनी मान्य केले आहे. यावरुन तक्रारदार हे या सामनेवालेंचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ –
(1) तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, दि.१०-०७-२००९ रोजी त्यांचे ए.टी.एम.कार्ड नंबर ६२२०१८०८२५४०००१९१३९ हरविले. त्यानंतर त्यांनी मागणी केल्याने, सामनेवाले तर्फे दोन नवीन ए.टी.एम. कार्ड अनुक्रमे नं.६२२०१८०८२५४०००७२४८४ व नं.६२२०१८०८२५४०००७३८६२ असे तक्रारदारास दिले गेले. त्यानंतर तक्रारदाराच्या खात्यावरुन दि.१०-०७-२००९ रोजी एकाच दिवशी रु.४,०००/- व दि.०९-१०-२००९ रोजी रु.१,०००/- असे एकूण रु.५,०००/- ए.टी.एम. कार्डद्वारे तक्रारदारांच्या नकळत काढले आहेत. या गहाळ झालेल्या रकमेची मागणी तक्रारदार सामनेवालेंकडून करीत आहेत.
याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे दि.२३-१०-२००९ रोजी अर्ज दिलेला आहे. सदर अर्ज नि.नं.५/२ वर दाखल आहे. सदर अर्ज पाहता त्यामध्ये असे नमूद आहे की, तक्रारदार यांचा जुना ए.टी.एम. नंबर नं.६२२०१८०८२५४०००१९१३९ हा होता. त्यानंतर नवीन ए.टी.एम. कार्ड नं.६२२०१८०८२५४०००७२४८४ हा त्यांना सामनेवाले यांनी दिला आहे. त्यानंतर परत एक नवीन ए.टी.एम. कार्ड दिले आहे. त्याचा वापर तक्रारदारांनी केलेला नाही. दि.१०-०७-२००९ रोजी रु.४,०००/- व त्या नंतर रु.१,०००/- गहाळ झाले आहेत. त्याकामी चौकशी करावी व आवश्यक पञव्यवहार हा माझा मुलगा नामे यशवंत अरविंद शिवदे यांचेशी करावा अशा आशयाचा मजकूर सदर अर्जात नमूद केलेला आहे.
यावरुन असे दिसते की, तक्रारदारांचे जुने ए.टी.एम. कार्ड हे हरविल्याबाबत तक्रारदारांनी तक्रार केलेली नाही. तसेच तक्रारदार हे दोन ए.टी.एम. कार्ड वापरतात व त्यांच्या सर्व खात्यावरील पञव्यवहार हा त्यांचा मुलगा यशवंत अरविंद शिवदे हा बघतो. यावरुन असे स्पष्ट होते की तक्रारदाराचा ए.टी.एम. नंबर व कोडनंबर हा गुप्त नसून त्या बाबत निश्चितच त्यांच्या मुलास किंवा ञयस्थ इसमास माहित असण्याची दाट शक्यता आहे.
(२) तक्रारदार यांनी त्यांचे खाते पुस्तक नि.नं.५/१ वर दाखल केले आहे. त्यामध्ये दि.१०-०७-२००९ रोजी ए.टी.एम. नं.६२२०१८०८२५४०००१९१३९ या नंबरचे कार्डद्वारे एकाच वेळी दोन वेळा प्रत्येकी रु.२,०००/- या प्रमाणे एकूण रु.४,०००/- काढलेले दिसत आहेत. यावरुन असे दिसते की, दि.१०-०७-२००९ रोजी एकाच ए.टी.एम. कार्डच्या नंबरवरुन रु.४,०००/- काढलेले आहेत व सदरचा ए.टी.एम.कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००१९१३९ हा जुना नंबर असून त्याच नंबरद्वारे पैसे काढले आहेत. हा जुना नंबर तक्रारदार यांच्याकडून हरविलेला आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. परंतु सदर नोंदीवरुन असे दिसते की, हे कार्ड हरविलेले नसून ए.टी.एम. कार्ड ज्या व्यक्तिकडे आहे त्या व्यक्तीने या कार्डचा वापर केलेला आहे व त्या व्यक्तिस त्याचा कोड नंबर माहिती असण्याची शक्यता आहे. परंतु तक्रारदार यांनी त्यांचे हे जुने ए.टी.एम. कार्ड हरविले असल्या बाबत पोलिस स्टेशनला तक्रार दिलेली नाही. तसेच बॅंकेला लेखी अर्जान्वये कळविलेले नाही. तशी त्यांची नि.नं.५/२ वरील विनंती अर्जामध्ये तक्रार नाही. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांचे सदरचे जूने ए.टी.एम. कार्ड हे हरविलेले नाही. त्याचा वापर हा अज्ञात व्यक्तीकडून होत आहे.
त्यानंतर सदर खाते पुस्तकावरुन असे दिसते की, दि.०९-१०-२००९ रोजी नवीन नंबरचे ए.टी.एम.कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००७३८६२ द्वारे रु.१,०००/- काढलेले आहेत, परंतु तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार हे कार्ड त्यांनी कधीही वापरलेले नाही. यावरुन असे लक्षात येते की, तक्रारदारांकडे एकूण तीन ए.टी.एम. कार्ड आहेत. त्यापैकी तक्रारदार हे एक कार्ड नं.६२२०१८०८२५४०००७२४८४ हे स्वत: वापरत आहेत. तसेच तक्रारदाराचे इतर दोन कार्ड म्हणजेच जून्या नंबरचे ए.टी.एम. कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००१९१३९ हे व नवीन मिळालेले ए.टी.एम. कार्ड नं. ६२२०१८०८२५४०००७३८६२ हे ञयस्थ व्यक्ती वापरत आहेत. कदाचित त्या बाबत तक्रारदार यांना वैयक्तीक माहिती नसावी असे दिसते. तक्रारदार यांनी त्यांचे ए.टी.एम. कार्ड हरविल्याबाबत तक्रार दिली नसल्याने, या दोन कार्डचा वापर परस्पर करुन ञयस्थ व्यक्ती खात्यावरुन पैसे काढत असल्याचे दिसत आहे.
तक्रारदाराने सदर ए.टी.एम. कार्ड व त्याचा कोड नंबर हा गुप्त ठेवणे आवश्यक असते. परंतु तक्रारदार यांनी ते नंबर गुप्त ठेवलेले दिसत नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा ञयस्थ इसम घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
(३) आमच्या मते ए.टी.एम. ही सुविधा बॅंकेने ग्राहकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर सहजतेने प्राप्त होणे कामी दिलेली सेवा आहे. या प्रक्रियेत बॅंकेच्या संगणक प्रणालीमध्ये खातेदारांचे नांव, त्यांचा खाते क्रमांक, त्यांना दिलेला ए.टी.एम.नंबर, व त्यास असलेला कोड नंबर व इतर सर्व अनुषंगीक माहिती संकलीत केलेली असते. या माहितीप्रमाणे संगणकीकृत माहिती असलेले ए.टी.एम. मशीन, त्यास पुरविलेल्या माहिती प्रमाणे म्हणजेच अधिकृत ए.टी.एम. कार्ड व त्याचा गुप्त कोड याची पडताळणी करुन काम करीत असते व त्या प्रमाणे त्यांचे पैसे ग्राहकांना देत असते. यामध्ये जर सर्व माहिती एकमेकांशी जुळली तरच पैसे ए.टी.एम. मशिनमूधून बाहेर येतात. यामध्ये थोडा बदल किंवा माहिती खोटी असेल तर पैसे मशिनद्वारे बाहेर येत नाहीत.
यावरुन असे दिसते की, ए.टी.एम. मधून पैसे काढतांना, ए.टी.एम मशीन केवळ कार्ड नंबर व माहिती बघते ती काढणारी व्यक्ती बघत नाही. त्यामुळे या प्रणालीमध्ये प्रत्येक खातेदाराने आपल्या खात्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले कार्ड व त्याचा कोड नंबर गुप्त ठेवणे आवश्यक आहे. जर हे नंबर इतर व्यक्तीस माहिती असल्यास व त्यांना सदर ए.टी.एम. कार्ड प्राप्त झाल्यास त्याचा कोणीही ञयस्थ व्यक्ती वापर करु शकते. त्यामुळे त्यास बॅंक जबाबदार असू शकत नाही.
सदर तक्रार अर्जामध्ये तक्रारदारांचे ए.टी.एम. कार्ड हरविले आहे अशी तक्रार केली आहे. त्यामुळे तक्रारदाराने तसे पोलिस स्टेशनला किंवा बॅंकेला कळविणे आवश्यक होते. किंवा सदर खात्यावरील पैसे काढण्यास प्रतिबंध करण्यास बॅंकेला कळविणे आवश्यक होते. परंतु तक्रारदाराने असे काहीही केलेले दिसत नाही. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांचे ए.टी.एम. कार्ड हे हरविलेले नसून त्याचा वापर होत आहे. खाते पुस्तकावरील नोंदी प्रमाणे ए.टी.एम. कार्डचा नंबर व कोड नंबर जुळल्यामुळे पैसे काढले गेले आहेत. त्यामुळे सदर परिस्थीतीस केवळ खातेदार हा स्वत: जबाबदार आहे असे स्पष्ट होत आहे. खात्यावरील रक्कम ही गहाळ किंवा चोरी झालेली नाही. त्यामुळे सामनेवाले हे जबाबदार होऊ शकत नाहीत व त्यांच्या सेवेत ञृटी नाही असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – वरील सर्व कारणांचा व कागदपञांचा विचार होता तक्रारदारांची मागणी योग्य व रास्त नाही. त्यामुळे तक्रार अर्ज नामंजूर करावा या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २३/०५/२०१३
(श्रीमती.एस.एस.जैन.) (श्रीमती.वी.वी.दाणी.)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.