निकालपत्र :- (दि.23/12/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराचा न्यायिक विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारलेमुळे दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदारचे मालकीची मारुती 800 MH-02-NA-7539 होती. सदर गाडीचा विमा सामनेवाला कंपनीकडे सन 2007 मध्ये उतरविलेला होता. सदर गाडी ही दि.23/09/2007 रोजी तक्रारदारचे भाऊ पांडूरंग व त्यांचे मित्र दयानंद देवर्डेकर हे गारगोटी-कोल्हापूर रोडने कोल्हापूरकडे जात असताना माजगांव फाटा येथे आलेनंतर सदर गाडीचे बॉनेट मधून अचानकपणे शॉर्ट सर्कीट होऊन धुर येत होता. त्यावेळी सदर गाडीचे बरेच नुकसान झालेले होते. सदर घटनेबाबत यातील तक्रारदार यांचे भाऊ यांनी राधानगरी पोलीस स्टेशनकडे वर्दी दिलेली होती. त्या अनुषंगाने राधानगरी पोलीस स्टेशन यांचेडे अकस्मिक, जळीत 02/2007 नोंद झालेली होती व त्याचा पूर्ण तपास राधानगरी पोलीसांनी केलेला आहे. सदर घटनेमुळे तक्रारदार यांचे गाडीचे अंदाजे रक्कम रु.36,508/- इतक्या रक्कमेचे नुकसान झालेले होते. तक्रारदार यांनी सामनेवालांकडून क्लेम फॉर्मची मागणी करुन क्लेम फॉर्म भरुन देणेपूर्वीच सामनेवाला यांनी क्लेम नाकारला होता. म्हणून यातील तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीविरुध्द ग्राहक तक्रार क्र.531/2009 दाखल केलेला होता. सदर कामी आदेश होऊन तक्रारदार योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन परत क्लेम दाखल करु शकतात असा आदेश दिलेला होता. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीकडे दि.24/01/2011 रोजी आर.पी.ए.डी.ने योग्य त्या सर्व कागदपत्रांसह सदर गाडीचे क्लेम रक्कमेची मागणी केली होती. सदरचे कागद सामनेवाला कंपनीला मिळालेले आहेत. तक्रारदाराचा क्लेम सामनेवाला कंपनीकडून मिळणेस तक्रारदार हे पात्र आहेत.परंतु सामनेवाला कंपनीने तक्रारदारास सदर विमा रक्कमेबाबत आजअखेर काहीही कळवलेले नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होऊन तक्रारदाराचे गाडीचे नुकसानीबाबत रक्कम रु.36,508/- दि.24/01/2011 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेला अर्ज, ग्राहक तक्रार क्र.531/09 मधील निकालाची प्रत, वर्दी जबाब, पंचनामा, जबाब, विजय अॅटोमोबाईलचे इस्टीमेंट पत्र, सामनेवाला यांची पत्रे, इस्टीमेटद्व बीले इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला हे दि.05/11/2011 रोजी मे. मंचासमोर उपस्थित झाले. त्यांचा म्हणणे देणेचा मुदत अर्ज मंजूर करणेत आला. तदनंतर दि.15/11/2011 रोजी दिलेला मुदत अर्ज नामंजूर केला. तदनंतरही दि.28/11/2011 रोजी मुदत अर्ज नामंजूर केला आहे. सामनेवाला यांना संधी देऊनही त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. (05) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदारचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रानुसार दि.06/12/2007 रोजी तसेच दि.15/11/2007 चे सामनेवालांनी तक्रारदारास पाठवलेल्या पत्रानुसार तक्रारदाराचे वाहन क्र. MH-02-NA-7539 चा विमा सामनेवालांकडे उतरविलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तसेच तक्रारदाराचे गाडीचे बॉनेट मधून अचानकपणे शॉर्ट सर्कीट होऊन धुर येत होता. त्यावेळी सदर गाडीचे बरेच नुकसान झालेचे दाखल पोलीस पेपरवरुन निर्विवाद आहे. दि.24/09/2007 रोजी अपघात झालेची सुचना तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेली आहे. दि.08/12/2007 चे पत्रान्वये नो क्लेम बाबत कळवलेचे दिसून येते. सदर पत्रानुसार क्लेम नं.2071061125 आहे. सदर नो क्लेम चा विचार करता तक्रारदाराने सदर सामनेवालांना आवश्यक कागदपत्रे दिलेचे दिसून आलेने दि.07/04/2010 रोजी ग्राहक तक्रार क्र.531/09 मध्ये आदेश पारीत करुन योग्य आवश्यक कागदपत्रांची तक्रारदाराने सामनेवालांना पाठवलेचे दाखल दि.24/01/2011 चे सामनेवालांना गाडीचे नुकसानीची क्लेम मागणी केलेचे पत्रावरुन दिसून येते. तसेच सदर पत्रात सोबत जोउली कागदपत्रांची नोंद केली आहे. सदर कागदपत्रे दि.27/01/2011 रोजी सामनेवालांना मिळालेचे दाखल आरपीएडी पोहोचवरुन दिसून येते. सहीशिक्क्यानिशी पोहोच आहे. सदर कागदपत्रे मिळूनही सामनेवालांनी तक्रारदाराचा प्रस्तुत तक्रार दाखल करणेपूर्वी अथवा तदनंतरही कोणताही निर्णय दिलेला नाही ही सामनेवालांची गंभीर सेवात्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. ग्राहक तक्रार क्र.531/09 मध्ये पारीत केले आदेशाचे ज्ञान सामनेवालांना आहे. तसेच सामनेवालांना संधी देऊनही त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. यावरुन तक्रारदाराची तक्रार त्यांना मान्य आहे असाच निष्कर्ष काढणे चुकीचे होणार नाही. नमुद अपघातामध्ये वाहनाचे नुकसानीचे तक्रारदाराने रु.36,508/- मागणी केली आहे. दाखल सोनी ऑटो इलेक्ट्रीकल वर्क्स यांचे दि.26/09/2007 चे इस्टीमेट अंदाजे रु.33,785/- नुकसानीची दुरुस्ती खर्च वर्तविला आहे. दाखल श्रीकांत ऑटोमोबाईल यांचे दि.10/10/07 चे रु.14,350/-, दि.14/10/07 चे रु.1,200/-, दि.11/10/07 चे रु.7,350/- व दि.13/10/07 चे रु.1,885/- व प्रसाद ग्लास सेंटरचे दि.06/10/07 चे रु.2,225/- नागवेकर आटोमोबाईलचे दि.10/10/07 चे बील रु.100/-तसेच वेंकटेश्वरा ऑटो गॅस यांचे दि.14/10/07 चे रु.4,500/- व यशवंत आर्टसचे रु.4,300/- चे दि.24/11/07 चे बील तसेच चौगुले इंडस्ट्रिज प्रा.लि. यांचे बीलाची रक्कम रु.913/- व मिनाक्षी ऑटो स्पेअर्सचे दि.11/10/07 चे रु.85/- चे बील असा एकूण रक्कम रु.36,908/-इतका खर्च दिसून येतो. सामनेवाला यांनी पॉलीसी दाखल केलेली नाही. तसेच तक्रारदाराने इन्टीमेशन देऊनही सामनेवाला यांनी सर्व्हे केलेला नाही. त्यामुळे सदर बीलाप्रमाणे गाडी दुरस्तीसाठी खर्ची पडलेली रक्कम व्याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास झालेल्या मानिकस त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (01) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (02) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई रक्कम रु.36,508/-(रु.छत्तीस हजार पाचशे आठ फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.27/01/2011 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. (03) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |