निकालपत्र :- (दि.19/04/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांतर्फे लेखी युक्तीवाद दाखल केला. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
सामनेवाला बँकेने तक्रारदाराचे खातेवर पुरेशी शिल्लक असतानाही धनादेशाचा अनादर करुन सेवात्रुटी केलेने सदरची तक्रार दाखल करणेत आली आहे.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार यांनी ऑगस्ट-2011 मध्ये सामनेवाला बँकेमध्ये आपले बचत खाते उघडून सुरु केलेले होते व सदर तक्रारदार यांचा सामनेवाला बँकेमध्ये बचत खाते क्र.321402010111973 असा होता व त्याप्रमाणे सामनेवाला बँकेने तक्रारदार यांना सदर बचत खातेचे पासबुक अदा केलेले होते. सदरचे बचत खाते तक्रारदार हे आपले वैयक्तिक व व्यावसाईक कामाकरिता वापर करीत असून त्याकरिता धनादेश सुविधा मागणी केलेली होती व त्याप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारास धनादेश पुस्तिका अदा केलेली होती व आहे. तक्रारदार यांनी वर नमुद बचत खातेवरील धनादेश क्र.001009 दि.17/08/11 रोजीचा रक्कम रु.1,00,000/- व धनादेश क्र.001010 दि.18/08/11 रक्कम रु.1,00,000/- हा त्यांचे व्यावसाईक कामाकरिता श्री कमलेश पी. खीडबीडे यांना दिलेला होता. सदर धनादेश श्री खीडबीडे यांनी वटणेकरिता आला असता सदर तक्रारदार यांचे सामनेवाला बँकेमध्ये असलेल्या बचत खातेमध्ये दि.17/08/11 रोजी रक्कम रु.1,47,335/- इतकी पुरेशी रक्कम शिल्लक असता व दि.18/08/11 रोजी रक्कम रु.2,46,335/-इतकी रक्कम पुरेशी शिल्लक असतानासुध्दा दि.22/08/11 रोजी सामनेवाला बॅंकेने सदरचे दोन्ही धनादेश फंडस इनसफिशिएंट या शे-यानिशी न वठविता परत पाठविलेला होता व आहे. तसेच तक्रारदार यांचे बचत खाते पासबुकावर रक्कम रु.100/- चेक रिटर्न चार्जेस खर्ची टाकलेली दिसून आले. वस्तुत: सामनेवाला यांचे बेकायदेशीर कृत्यामुळे व त्यांचे संबंधीत अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे रक्कम शिल्लक असतानाही तक्रारदाराचे चेक वटलेले नसलेने तक्रारदाराचे नांवे रक्कम रु.100/- खर्ची टाकणेचा सामनेवाला यांना कोणताही व कसलाही कायदेशीर हक्क, अधिकारी नाही. याबाबत सामनेवाला यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही संयुक्तिक कारण दिलेले नाही अथवा तक्रारदाराचे तक्रारीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांचे वकीलांमार्फत सामनेवाला बॅंकेला नोटीस पाठवली. सदर नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी सदर नोटीसला उत्तरही दिलेले नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराचे बचत खातेमधून बेकायदेशीर वजा केलेली रक्कम रु.100/-, शारिरीक व मानसिक त्रासाचे व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.50,000/-, वकील नोटीसीचा खर्च रु.1,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.56,100/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
(03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, त्याची पोहोच पावती, पोष्टाची पावती, तक्रारदार यांचे बचत खातेचे पासबुक, तक्रारदार यांनी दिलेला चेक व सामनेवाला बॅंकेची डी.पी.सी.शीट(मेमो) इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार यांनी त्यांचे व्यावसाईक कामासाठी चेक दिले हा संपूर्ण व्यवहार व्यावसायिक कारणासाठीची असलेमुळे ग्राहक सरंक्षण कायदा 1986खाली तक्रारदारांना दाद मागणेचा कोणताही अधिकार नाही. तक्रारदार यांनी सामनेवालांकडे बचत खाते उघडले आहे सदर बचत खातेचे स्वरुप हे वैयक्तिक वापरासाठी असते. त्यामुळे त्यावरील सेवा शुल्क देखील व्यावसाईक अथवा चालूखातेपेक्षा कमी असते. त्याचप्रमाणे त्यावर व्याजदेखील अदा केले जाते. एखादया ग्राहकास व्यावसायिक कामाकरिता बॅंक खातेचा वापर करावयाचा असल्यास त्याने चालू खाते (करंट अकौन्ट) सुरु करुन त्यावरुन व्यवहार करणे अभिप्रेत असते. तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेले धनादेश हे सामनेवाला बँकेत वटणेसाठी दि.22/08/2011 रोजी आले होते व ते फंडस इनसफिशिएन्ट या शे-याने न वठविता परत गेलेले होते. वास्तविक सामनेवाला बँकेमध्ये चेक वटणेची प्रोसेसही संपूर्णपणे मायकर मशीन व्दारे होते. त्यामुळे सदरचे धनादेश मशिनचे तांत्रिक दोषामुळे वटलेले नाहीत. तथापि सदरचे चेक हे निव्वळ उपकरणामधील तांत्रिक दोषामुळे वटलेले नसलेमुळे सामनेवाला यांचा कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा नव्हता व नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
(06) सामनेवाला यांनी सदरचे म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
(07) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? ---होय.
2. काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे सामनेवाला बँकेमध्ये बचत खाते क्र. क्र.321402010111973 आहे. तक्रारदाराचे सदर खातेच्या उता-याचे अवलोकन केले असता सदर खातेवर दि.17/08/2011 व दि.18/08/2011 अखेर अनुक्रमे रु.1,47,335/- व रु.2,46,335/- इतकी शिल्लक रक्कम दिसून येते. तक्रारदाराने धनादेश क्र.001009 व 001010 अनुक्रमे दि.17/08/2011 व दि.18/08/2011 तारखेचे प्रत्येकी रक्कम रु.1,00,000/-चे सदर दोन धनादेश त्याचे व्यावसाईक कारणाकरिता श्री खीडबीडे यांना दिलेले होते. सदर धनादेश श्री खीडबीडे यांनी सामनेवाला बॅंकेत वटणेकरिता जमा केले असता खातेवर पुरेशी शिल्लक नाही या कारणास्तव न वटता परत पाठवलेले आहेत हे दाखल मेमोवरुन निर्विवाद आहे. तसेच युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला यांचे वकीलांनी सदरची बाब मान्य केलेली आहे. तसेच तक्रारदाराने प्रस्तुत चेक हा कमर्शिअल पर्पजसाठी वापरलेला आहे. वस्तुत: प्रस्तुत खाते हे बचत खाते असलेने व सदर खाते वैयक्तिक स्वरुपाचे असलेने त्यावर सेवाशुल्कदेखील व्यावसायिक अथवा चालू खातेपेक्षा कमी असते. वस्तुत: तक्रारदाराने चालू खाते सुरु करुन त्यावर व्यवहार करणे अपेक्षित असतानाही त्याने बचत खातेवरुन व्यावसायिक कामासाठी वापर केलेला आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार फेटाळणेत यावी असे प्रतिपादन केलेले आहे. तसेच प्रस्तुतचे चेक हे तांत्रिक दोषामुळे वटलेले नाहीत असे लेखी म्हणणेमध्येसुध्दा प्रतिपादन केलेले आहे. तसेच प्रस्तुत चेक न वटता परत गेलेमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही या मुद्दयाकडे या मंचाचे लक्ष वेधलेले आहे.
तक्रारदाराचे वकीलांनी बचत खातेवरही धनादेशाने व्यवहार करता येतात. तसेच सदरची सुविधा सामनेवाला यांनी दिलेली आहे. तसेच धनादेशाने व्यवहार करणेसाठी लागणारी किमान शिल्लक खातेवर ठेवलेली होती. तसेच धनादेशापोटी अदा केलेली रककमही सदर खातेवर शिल्लक होती. अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवाला यांनी फंडस इनसफिशिएंट या कारणास्तव प्रस्तुत चेक न वटता परत पाठवलेले आहेत. त्यामुळे तक्रारदाराच्या व्यावसायिक पतप्रतिष्ठेस धक्का बसलेला आहे या मुद्दयाकडे लक्ष वेधलेले आहे.
वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारास वर नमुद सुविधा दिलेली आहे व खातेवर पुरेशी शिल्लक असतानाही नमुद धनादेश न वटवता परत पाठवून सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार यांनी त्यांचे काय नुकसान झाले? याबाबत कोणताही काटेकोर पुरावा दिलेला नसला तरी तक्रारदार यांचे सामाजिक व व्यवसायिक प्रतिष्ठेस धक्का बसलेला आहे ही बाब नाकरता येत नाही. सबब सामनेवाला यांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार हे झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारीचा खर्च मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहेत.सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) अदा करावी.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(अक्षरी रु.एक हजार फक्त) अदा करावेत.