:: नि का ल प ञ :: (मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन. कांबळे ,मा.अध्यक्ष, प्रभारी) (पारीत दिनांक : 15 मार्च, 2012) 1. अर्जदार/तक्रारकर्ता याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे. अर्जदार / तक्रारकर्त्याचे नावाने श्री शरद यादवराव काटकर, राहणार वर्धा यांनी रुपये-3,00,000/- चा धनादेश दिलेला होता, त्या धनादेशाची रक्कम गैरअर्जदार बँकेनी त्याचे खात्यात जमा केली नाही व सेवा देण्यात न्युनता केली म्हणून धनादेशाची रक्कम मिळण्या करीता सदर तक्रार गैरअर्जदाराचे विरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे-
2. अर्जदार याचे नावे श्री शरद यादवराव काटकर यांनी रुपये-3,00,000/- एवढया रकमेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश अर्जदाराने त्याचे वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँक मर्यादित, शिवाजी शाखा, वर्धा येथे असलेल्या त्याचे खात्यात दिनांक-17.08.2011 रोजी जमा केला. परंतु सदर धनादेश अर्जदाराचे खात्यात जमा न होता, गैरअर्जदाराच्या बँकेने धनादेश सुचनापत्रासह आणि गैरअर्जदार संस्थेच्या पत्रासह परत केला.सदरचे छापील सूचनापत्रातील रकाना क्रमांक-12 प्रमाणे, अर्जदारास संकेत केले होते की, तारखे मध्ये ओव्हररायटींग असल्यामुळे , सदर चेक परत करण्यात येत आहे. 3. अर्जदार यांनी या संदर्भात पुढे असे नमुद केले की, सदर धनादेशाचे तारखेमध्ये खोडतोड होती आणि म्हणून श्री शरद काटकर यांनी त्या ठिकाणी स्वतःची सही केली होती, तरी सुध्दा, धनादेश न वटविता, "डेट ओव्हररायटींग" या खाली परत केलेला आहे. वस्तुतः धनादेशाचे तारखेमध्ये खोडतोड झाल्यामुळेच, धनादेश निर्गमित करणारे श्री शरद काटकर यांनी, धनादेशावर स्वाक्षरी केली होती परंतु, असे असतानाही , गैरअर्जदार यांनी "चेक डेट ओव्हररायटींग" या मथळयाखाली सदर धनादेश परत केला, जेंव्हा की, सदर धनादेश वटविल्या जाईल, एवढी पुरेशी रक्कम श्री शरद काटकर यांचे खात्यात होती. परिणामी अर्जदाराचे अतोनात नुकसान झाले व आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला, ही गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रृटी असल्याचे अर्जदार नमुद करतात. 4. अर्जदार यांनी असेही नमुद केले की, त्यांनी गैरअर्जदार यांना, वकिला मार्फतीने नोटीस पाठविला व नुकसान भरपाईची मागणी केली. गैरअर्जदार यांनी, सदर नोटीसला दिलेल्या उत्तरात, चेक मधील ओव्हररायटींग बद्यलचा मजकूर मान्य केला व त्या बाबत असलेल्या शंकेचे हस्ताक्षर तज्ञा कडून निराकरण करता येईल असे नमुद केले. तसेच पुढे असेही नमुद केले की, चुक दुरुस्तीसाठी तीक्ष्ण ब्लेडचा वापर केल्याचे कबुल केले.
5. म्हणून अर्जदार यांस, गैरअर्जदार यांनी सदोष सेवा दिल्यामुळे, धनादेशाची रक्कम रुपये-3,00,000/- तसेच रुपये-50,000/- आर्थिक व्यवहारातील उच्चावचन व अर्जदारास झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-20,000/- व तक्रारखर्च म्हणून रुपये-10,000/- गैरअर्जदार यांचेकडून देण्याचे आदेशित व्हावे अशी मागणी केलेली आहे. 6. गैरअर्जदार यांनी न्यायमंचा समक्ष उपस्थित होऊन निशाणी क्रमांक-11 वर आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले. गैरअर्जदार यांनी लेखी उत्तरामध्ये प्राथमिक आक्षेप घेतला की, अर्जदारास धनादेश निर्गमित करणा-या श्री शरद काटकर यांना सदर प्रकरणी अर्जदाराने प्रतिपक्ष न केल्यामुळे, तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
7. गैरअर्जदार यांनी पुढे असे नमुद केले की, श्री शरद काटकर यांनी दिनांक-06.02.2008 रोजी, अर्जदार तसेच गैरअर्जदार आणि पोलीसस्टेशन यांना पत्र देऊन नमुद केले की, गुडडू जैन यांच्या करीता दिलेला चेक क्रमांक-25573, चेक दिनांक-31.07.2007 रक्कम रुपये-3,00,000/- वर्धा अर्बन बँकेचा दिनांक-31.07.2007 रोजीचा चेक, अर्जदारा जवळ असलेला, अर्जदाराने अजून पर्यंत परत केलेला नसल्या बाबत कळविले. ते पत्र जुने असल्यामुळे, कागदपत्राच्या गठठयातून वेळेवर प्राप्त होऊ शकले नाही, अतिशय अथक प्रयत्ना नंतर सदर पत्र मिळाले, सदर पत्रावरुन पोलीस स्टेशनलाही प्रत दिल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारा वरुन, अर्जदार हा , त्याचे जवळ चुकीने राहिलेल्या चेकचे मदतीने, न्यायमंचास अंधारात ठेऊन, गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमुद केले. या सर्व प्रकरणाची सत्यता समोर येण्यासाठी, सदर प्रकरणात, शरद काटकर व गुडडू जैन यांना प्रतिपक्ष करणे आवश्यक असल्याचे नमुद केले. 8. गैरअर्जदार यांनी मूळ चेकवर असलेली तारीख ब्लेडने खोडून पुन्हा लिहिलेली आहे व त्या बाबत केलेली सही ही पूर्ण सही नसल्याचे दिसून येते असे नमुद केलेले आहे, त्यामुळे मूळ चेक अर्जदारास न्यायमंचा समोर निरिक्षणासाठी उपलब्ध करुन देण्या करीता अर्जदारास नोटीस देण्यात येत असल्याचे नमुद केले. 9. गैरअर्जदार यांनी, सदर चेक वर्धा नागरीक बँकेत जमा केल्याचे तसेच सदर चेक सुचनापत्रासह व मेमोसह तारखे मध्ये ओव्हर रायटींग असल्याचे कारणावरुन परत केल्याची बाब मान्य केली परंतु चेकमधील खोडतोड संबधाने शरद काटकर यांनी जी सही केलेली आहे, ती पूर्ण सही नसल्याचे आणि त्यामुळे चेक वटविल्या गेला नसल्याचे नमुद केले. श्री शदर काटकर यांनी अपूर्ण सही केल्याचे नमुद केले, अपूर्ण सही असल्याने चेक परत करण्यात आला व त्यामध्ये गैरअर्जदार यांची सेवेमधील कोणतीही त्रृटी नसल्याचे नमुद केले. अर्जदार यांचे नोटीसला, त्यांनी, दिनांक-08.09.2011 रोजी उत्तर दिलेले आहे व त्यामध्ये चेकवरील खोडतोड ब्लेडने केल्याचा उल्लेख केलेला आहे. वस्तुतः चेक मधील खोडतोड संबधाने पूर्ण सही असणे आवश्यक असल्याचे गैरअर्जदार यांनी नमुद केले व खोडतोड संबधाने केलेली सही अपूर्ण असल्याची बाब अर्जदार यांनी स्वतः आपल्या नोटीसमध्ये मान्य केलेली आहे. सबब अर्जदाराची तक्रार चुकीची असल्याने ती खारीज व्हावी, अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली. 10. अर्जदार यांनी निशाणी क्रमांक-04 वरील यादी नुसार एकूण 05 दस्तऐवजाच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये गैरअर्जदार यांना दिलेली नोटीस, पोच पावती, गैरअर्जदार यांचे उत्तर, चेकची प्रत, चेक रिर्टन मेमोची प्रत अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. गैरअर्जदार यांचे प्रारंभिक आक्षेपास उत्तर अर्जदाराने शपथपत्रावर निशाणी क्रमांक-13 प्रमाणे दाखल केले. अर्जदाराने निशाणी क्रमांक-15 वर मूळ धनादेश दाखल केला. तसेच निशाणी क्रमांक 23 वर आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. 11. गैरअर्जदार यांनी आपले लेखी उत्तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले. सोबत निशाणी क्रमांक-12 वरील यादी नुसार श्री शरद काटकर यांनी दिनांक-06.02.2008 रोजी दिलेल्या पत्राची प्रत दाखल केली. 12. अर्जदार यांनी निशाणी 23 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच गैरअर्जदार यांनी निशाणी 33 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज आणि सादर केलेल्या लेखी युक्तीवादा वरुन खालील मुद्ये न्यायमंचा समक्ष उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर 1) अर्जदाराची तक्रार योग्य प्रतिपक्ष न : नाही. केल्याचे कारणावरुन खारीज होण्यास पात्र आहे काय? 2) अर्जदार यास, गैरअर्जदार यांनी सेवा : होय देण्यात न्युनता केली आहे काय? 3) अर्जदार चेकची रक्कम रुपये-3,00,000/- : विवेचना नुसार मिळण्यास पात्र आहे काय? 4) या तक्रारीचा अंतिम निकाल काय? : अंतिम आदेशा नुसार ::कारण मिमांसा:: मुद्या क्रमांक-1 13. अर्जदाराने, गैरअर्जदार बॅकेत, दिनांक-17.08.2011 रोजी त्याचे खात्यात धनादेश जमा केला, त्या धनादेशाची रक्कम, अर्जदाराचे खात्यात जमा झालेली नाही आणि गैरअर्जदार बँकेने, तारखे मध्ये खोडातोड असल्याचे कारणावरुन रिर्टन मेमो पत्रासह धनादेश अर्जदारास परत दिला, त्यामुळे अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात धनादेशाच्या रकमे संदर्भात वाद निर्माण झालेला आहे. गैरअर्जदार यांनी, आपले लेखी उत्तरात, प्राथमिक
आक्षेप घेतला की, अर्जदाराने आवश्यक व्यक्तीस तक्रारीत प्रतिपक्ष केलेले नाही, धनादेशाचा व्यवहार हा श्री शरद काटकर यांचेशी झालेला आहे, धनादेशाचे संदर्भात सत्य समोर येण्या करीता श्री शरद काटकर व गुडडू जैन यांना तक्रारीमध्ये प्रतिपक्ष करणे आवश्यक आहे, असा आक्षेप घेतलेला आहे. परंतु तक्रारीतील वाद सेवे संदर्भात असल्यामुळे, गैरअर्जदार यांनी उपस्थित केलेला हा मुद्या संयुक्तिक नाही. 14. अर्जदाराने त्याचे खात्यात धनादेश जमा होण्या करीता सादर केला, तो धनादेश, गैरअर्जदार बँकेने जमा केला नाही, त्यामुळे सेवा देण्यात त्रृटी केली, असा वादाचा मुद्या आहे, त्यामुळे श्री शरद काटकर व गुडडू जैन यांना पार्टी न केल्याचे कारणामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र नाही. गैरअर्जदार बँकेला धनादेश कोणी दिला, कोठून आला, या बाबतच्या मुद्यामध्ये पडण्याचा प्रश्न येत नाही, तर, बँकेकडे जमा केलेला धनादेश, ज्या बँकेचा चेक आहे, त्यांचेकडे क्लिअरन्स करीता पाठविणे आणि धनादेश क्लिअर होऊन आल्यास किंवा न आल्यास,त्या बद्यलची माहिती चेक जमा करणा-या व्यक्तीस देणे, एवढेच काम गैरअर्जदार बँकेचे होते व आहे परंतु गैरअर्जदार बँकेने मुद्यामहून अवाजवी मुद्ये उपस्थित करुन चेक देणा-या श्री शरद काटकरच्या सांगण्या वरुन, अवाजवी मुद्या उपस्थित करुन धनादेश वटविला नाही, या करीता गुडडू जैन व शरद काटकर यांना पार्टी करण्याचा मुद्या येत नाही वा अर्जदाराच्या तक्रारीतील वाद हा चेक देणा-या व्यक्तीशी नाही, तर, चेक जमा केल्या नंतर, जी सेवा देणे होती, त्या बाबतचा आहे. तक्रारीतील वाद, हा दुस-याशी संबधित नसल्यामुळे, योग्य प्रतिपक्ष न केल्याचा गैरअर्जदार यांनी उपस्थित केलेला मुद्या न्यायसंगत नाही, त्यामुळे योग्य प्रतिपक्ष (Non-Joinder of Necessary Parties) न केल्याचे कारणा वरुन तक्रार खारीज होण्यास पात्र नाही. 15. प्रस्तुत तक्रारीतील रेकॉर्डचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार बँकेने हेतुपुरस्परपणे अवाजवी मुद्या उपस्थित केलेला आहे. निशाणी-19 नुसार शरद काटकर यांना प्रकरणात पार्टी बनविण्यात यावे, असा अर्ज केला, गैरअर्जदार यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यानंतर पुन्हा गैरअर्जदार यांनी, शरद काटकर यास, विरुध्दपक्ष क्रमांक-2 म्हणून करण्यात यावे, असा अर्ज त्याचे वतीने दाखल करवून घेण्यात आला, यावरुन गैरअर्जदार बँकेने स्वतःहून त्याला प्रोत्साहित केल्याचे सिध्द होते. वास्तविक याच आशयाचा मुद्या मंचाने यापूर्वीच निकाली काढलेला होता, तरी सुध्दा , गैरअर्जदार बँकेने परत त्यास गैरअर्जदार करण्याचा अर्ज दाखल करवून घेतला, असाच निष्कर्ष निघतो. दुसरी महत्वाची बाब अशी की, गैरअर्जदार यांनी निशाणी 25 नुसार "नोटीस टू प्रोडयूस डॉक्यूमेंटसचा" अर्ज दाखल केला. सदर अर्जात, शरद काटकर यांच्यामध्ये ज्या व्यवहारातून चेक दिल्या गेला, त्या व्यवहारा बद्यलचे कागदपत्र मंचात दाखल करण्या बाबतची नोटीस अर्जदारास दिली. गैरअर्जदार यांचा या व्यवहाराशी काहीही संबध नाही आणि कुठल्या व्यवहारातून धनादेश देण्यात आला, या मुद्यात त्यांना जाण्याचा काहीही अधिकार नसताना, अवाजवी मुद्या उपस्थित केला, असे दाखल दस्तऐवजा वरुन सिध्द होते. 16. गैरअर्जदार यांनी, गुडडू जैन याला सुध्दा पार्टी करण्याचा मुद्या घेतला आहे, परंतु त्याचा या प्रकरणाशी कसला संबध आहे, त्याचे विरुध्द अर्जदाराची काहीच मागणी नाही, त्यामुळे या वादात गैरअर्जदार बँकेला जाण्याची आवश्यकता नाही. अर्जदाराने शरद काटकर व गुडडू जैन यांना प्रतिपक्ष केले नाही या कारणावरुन तक्रार खारीज होण्यास पात्र नाही, या निर्णया प्रत हे न्यायमंच आलेले असल्याने, मुद्या क्रमांक-1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. मुद्या क्रमांक-2 व 3 17. अर्जदाराने तक्रारीत, गैरअर्जदार बँकेने धनादेशाची रककम तारखेत खोडतोड असल्यामुळे व ब्लेडने खोडातोड केले असल्याचे ठळकपणे दिसत असल्याने रिर्टन मेमोसह अर्जदारास पत्र दिले. सदर रिर्टन मेमोची प्रत व धनादेशाची झेरॉक्स प्रत पान क्रमांक-17 वर अर्जदाराने दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी मूळ धनादेश रेकॉर्डवर दाखल करावा, असा निर्देश अर्जदारास देण्यात यावा, अशी मागणी केल्या नंतर, अर्जदाराने निशाणी-15 चे यादी नुसार मूळ धनादेशाची प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी धनादेशा वरील तारखेत 31.07.2011 यात खोडातोड केल्याचे कारणावरुन व तारखेत ओव्हर रायटींग केल्याचे अ.क्रं 12 वर रिर्टन मेमो मध्ये नोंद करुन चेक परत पाठविला. गैरअर्जदार बँकेने धनादेशाचे तारखेत ओव्हर रायटींग झाली आहे व त्यावर धनादेश देणा-यानी पूर्ण सही केलेली नाही म्हणून धनादेश परत पाठविला आहे. गैरअर्जदार यांचा हा मुद्या संयुक्तिक नाही. तारखेमध्ये खोडातोड केली असली तरी त्यावर संक्षिप्त सही (Counter Signature) केलेली आहे, ती सही आणि धनादेशावर पूर्ण स्वरुपात केलेली सही ही जवळपास मिळतीजुळतीच आहे, त्यामुळे निव्वळ तारखे मध्ये खोडतोड आहे म्हणून धनादेशाची रक्कम अर्जदाराचे खात्यात जमा केली नाही, गैरअर्जदार यांनी धनादेशाच्या रकमेमध्ये खोडतोड असल्या बाबत किंवा रकमेत अक्षरी व आकडयात खोडतोड असल्याचे कारणावरुन रिर्टन केले असते, तर ते ग्राहय धरण्या सारखे असते, परंतु फक्त तारखेत खोडतोड आहे व त्यावर पूर्ण स्वरुपात सही केली नाही, या कारणा वरुन धनादेशाची रक्कम वटवून अर्जदाराचे खात्यात जमा केली नाही, ही बाब गैरअर्जदार बँकेची न्युनतापूर्ण सेवा देणारी आहे, असे सिध्द होतो. 18. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या लेखी उत्तरात तसेच लेखी युक्तीवादात असा मुद्या घेतला आहे की, खोडलेल्या तारखेच्या खाली पूर्ण सही करावी लागते, ती पूर्ण सही नसल्यामुळे चेक वटविला नाही म्हणून सेवेत त्रृटी झालेली नाही. गैरअर्जदार यांनी या बाबत असा कुठलाही पुरावा रेकॉर्डवर दाखल केलेला नाही की, खोडातोड केलेल्या ठिकाणी पूर्ण सही करावी लागते. वास्तविक सर्वसाधारणपणे खोडतोड झाल्यास, संक्षिप्त (Counter Signature) सही करण्याची प्रचलीत पध्दत आहे, त्या करीता पूर्ण सही केली पाहिजे, असा कुठलाही प्रघात नाही. यामुळे गैरअर्जदार यांचे म्हणणे ग्राहय धरण्यास पात्र नाही. 19. गैरअर्जदार यांनी लेखी युक्तीवादातील मुद्या क्रमांक 10 मध्ये असा मुद्या घेतला आहे की, खोडातोड झाल्या नंतर पूर्ण सही होत नाही, तो पर्यंत कायदयाने खोडातोड मान्य होणार नाही, तशा प्रकारचे नियम पराक्रम्य कायदया अंतर्गत आहे, त्यामुळे केस खारीज होण्यास पात्र आहे. गैरअर्जदाराचा हा युक्तीवाद ग्राहय धरण्यास पात्र नाही. गैरअर्जदार यांच्या मागणी वरुन मूळ धनादेशाची प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे, त्या धनादेशाचे अवलोकन केले असता, को-ऑपरेटीव्ह सोसायटी कायदया अंतर्गत स्थापन झालेल्या बँकांना पराक्रम्य अधिनियम लागू होत नाहीत. अर्जदाराने निशाणी 15 चे यादी नुसार दाखल केलेल्या धनादेशात खालील प्रमाणे नमुद केले आहे.
Use only for Co-op.Credit Society Negotiable Instrument Act 138 is not applicable यावरुन या धनादेशाला भारतीय पराक्रम्य कायदयाच्या तरतुदी लागू होत नाही, ही बाब स्पष्ट होते. गैरअर्जदार बँकेचा धनादेश असूनही त्यांचे निदर्शनास आले नाही आणि अवाजवीपणे तारखेत खोडातोड केल्याचे कारणावरुन धनादेशाची रक्कम अर्जदारास वटवून जमा केली नाही, ही गैरअर्जदार यांचे सेवेतील न्युनता आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 20. अर्जदाराने तक्रारीमध्ये धनादेशाची रक्कम रुपये-3,00,000/- गैरअर्जदार बँके कडून मागणी केली आहे. तसेच गैरअर्जदार यांनी धनादेशाची रक्कम, त्याचे खात्यात जमा न केल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानी पोटी व मानसिक, शारिरीक त्रासा बद्यल नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. गैरअर्जदार बँकेने दिनांक-31.07.2011 च्या धनादेशाची रक्कम खात्यात जमा केली नाही म्हणून त्या रकमेची प्रतिपूर्ती (Reimbursement) गैरअर्जदार करण्यास पात्र नाही परंतु गैरअर्जदाराच्या कृत्यामुळे व दिलेल्या न्युनतापूर्ण सेवेमुळे, धनादेशाचे रकमे पासून अर्जदारास वंचित राहावे लागले, तसेच मानसिक, शारिरीक त्रास सहन करावा लागला असल्याने त्याची नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- देण्यास गैरअर्जदार बँक जबाबदार आहे. मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, न्यु दिल्ली यांनी एका प्रकरणात आपले मत दिले आहे, त्यात दिलेला रेशो या प्रकरणाला लागू पडतो, त्यातील महत्वाचा भाग खालील प्रमाणे-
Consumer Protection Act,1986-Sections 2(1)(g), 14(1)(d)-Banking and Financial Services-Cheque lost in transit- Neither amount credited nor cheque returned-Deficiency in service proved-Bank liable to pay some amount of compensation and not entire amount of cheque-Order of State Commission directing O.P. to pay entire cheque amount not legally sustainable-O.P. liable to pay Rs.5,000/- compensation. CANARA BANK-VS-SUDHIR AHUJA I (2007) CPJ 1 (NC) 21. अर्जदाराने धनादेशाची रक्कम, गैरअर्जदारा कडून मागणी केलेली आहे परंतु पराक्रम्य अधिनियमच्या तरतुदी लागू नसल्यामुळे दिनांक-31.07.2011 चे धनादेशाचे रकमेची वसुली करीता, आता धनादेश वटविण्या करीता पाठविणे योग्य होणार नाही त्यामुळे अर्जदाराने योग्य त्या फोरम मधून रक्कम वसुली बाबत दाद मागावी. 22. गैरअर्जदार यांनी, मंचाने दिनांक-31 जानेवारी, 2012 ला पारीत केलेल्या आदेशाची अवहेलना केली आहे. निशाणी 22 वरील आदेशा अन्वये गैरअर्जदाराचा अर्ज रुपये-1000/- खर्च लादून नामंजूर करण्यात आला. परंतु सदर रक्कम ही गैरअर्जदार यांनी ग्राहक सहायता निधीत जमा केली नाही आणि मंचाचे आदेशाची अवहेलना केलेली आहे, त्यामुळे गैरअर्जदार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-25 व 27 नुसार दंडात्मक कारवाईस पात्र आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक-31 जानेवारी, 2012 रोजी पारीत केलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे आदेशातील खर्चाची रक्कम रुपये-1000/- आणि दंडात्मक कारवाई म्हणून रुपये-1000/- ग्राहक सहायता निधीत जमा करण्यास पात्र आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आलेले आहे. 23. गैरअर्जदार यांनी लेखी उत्तरा सोबत शरद काटकर यांनी दिलेल्या पत्राची प्रत रेकॉर्डवर दाखल केली आहे, त्या पत्राचे क्रमांक-25573, दिनांक-31.07.2007 अशा तारखेचा रुपये-3,00,000/- रकमेचा धनादेश गुडडू जैन यांचे कडून घेतलेल्या रकमे पोटी दिला होता, असे नमुद केले आहे. परंतु सदर पत्र हे दिनांक 06.02.2008 ला देण्यात आलेले असून त्या पत्राची प्रत गैरअर्जदार बँकेने व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवले आणि कागदपत्राच्या गठठयातून सदर पत्र खूप प्रयत्ना नंतर मिळाले या गैरअर्जदाराच्या म्हणण्यात तथ्य नाही, तर सदर पत्रात चेक मध्ये अक्षरी व अंकात रक्कम लिहून दिला होता हे मान्य केले आहे. परंतु रेकॉर्डवर दाखल केलेल्या मूळ धनादेशात 31.07.2007 चा उल्लेख केलेला दिसून येत नाही, तसेच त्यावर 2007 चे ठिकाणी खोडातोड करुन, 2011 केल्याचेही दिसून येत नाही. तर धनादेशावर 31.07.2011 हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी जाणूनबुजून, हेतुपुरस्परपणे शरद काटकर याचे सांगण्या वरुनच तारखेत खोडातोड केल्याचा मुद्या उपस्थित करुन धनादेशाची रक्कम अर्जदाराचे खात्यात जमा केली नाही ही गैरअर्जदाराचे सेवेतील न्युनता असल्याची बाब सिध्द होते, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्या क्रमांक-2 चे उत्तर होकारार्थी व मुद्या क्रमांक-3 चे उत्तर विवेचना नुसार देण्यात येत आहे. मुद्या क्रमांक-4 वरील मुद्या क्रमांक-1 ते 3 च्या विवेचना वरुन तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे, या निर्णयाप्रत आम्ही आलो असल्यामुळे, तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. 2) गैरअर्जदाराने, अर्जदारास झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/- आदेशाचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत द्यावे. 3) गैरअर्जदाराने, अर्जदारास तक्रारीचे खर्चापोटी रुपये-1000/- आदेशाचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत द्यावे. 4) गैरअर्जदार यांनी दिनांक-31 जानेवारी, 2012 चे आदेशातील खर्चाची रक्कम रुपये-1000/- आणि दंडात्मक कारवाई म्हणून रुपये-1000/- आदेशाचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत मंचात ग्राहक सहायता निधीमध्ये जमा करावे. 5) गैरअर्जदार यांनी अंतिम आदेशातील मुद्या क्रमांक-4 चे पालन न केल्यास, प्रबंधक यांनी, ग्राहक संरक्षण कायदयाचे तरतुदी नुसार वसुलीची कारवाई करावी. 6) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क देण्यात यावे.
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. ANIL N. KAMBLE] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |