(घोषित दि. 26.09.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती श्री संतराम तुळशीराम बहिरे हे व्यवसायाने शेतकरी असून गैरअर्जदार यांचेकडे जनता वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत दिनांक 17.01.2007 ते 16.01.2012 या कालावधीसाठी पॉलीसी क्रमांक 59510/173, 59510/174, 59510/175, 59510/176 प्रत्येकी 1,00,000/- एवढया रकमेच्या घेतल्या होत्या. दूदैवाने दिनांक 09.07.2008 रोजी संतराम तुळशीराम बहिरे यांचा विषारी साप चावल्यामूळे मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती घनसावंगी पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीसांनी फौजदारी प्रक्रीया संहीतेच्या कलम 174 नूसार मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा केला. मयत व्यक्तीचे प्रेत पोस्टमार्टमसाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर सदर योजने अंतर्गत विमा दावा आवश्यक कागदपत्रांसहीत गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 28.10.2009 रोजी दाखल केला. गैरअर्जदार यांनी दिनांक 01.01.2013 रोजी दिलेल्या पत्रानूसार अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केली. गैरअर्जदार यांनी अद्याप पर्यंत विमा प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर न करता प्रलंबित ठेवला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी विमा दाव्यासोबत अपूर्ण कागदपत्रे दाखल केली. गैरअर्जदार यांनी आवश्यक कागदपत्रांची म्हणजे SDM Report ची मागणी केली. तक्रारदारांनी SDM Report दाखल न केल्यामूळे विमा प्रस्तावावर कार्यवाही होवू शकली नाही. तक्रारदारांनी यापूर्वी तक्रार क्रमांक 25/2010 दाखल केलेली असून न्यायमंचाने नामंजूर केली आहे. त्यानंतर तीन वर्षांनी सदरची मूदतबाह्य तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.जे.सी.बडवे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री.संतराम तूळशीराम बहीरे यांनी गैरअर्जदार यांचेकडे जनता व्यक्तीगत विमा अपघात योजने अंतर्गत दिनांक 17.01.2007 ते 16.01.2012 या कालावधीसाठी 59510/173 त्यांचे करीता व इतर तीन विमा पॉलीसी त्यांचे पत्नी व मूलांकरीता प्रत्येकी रक्कम रुपये 1,00,000/- एवढया रकमेची घेतल्याचे दिसून येते.
तक्रारदारांचे पती श्री संतराम बहीरे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे पोस्ट मार्टम रिपोर्ट नूसार दिसून येते. त्याच प्रमाणे पोलीस स्टेशन घनसावंगी यांनी दिनांक 29.11.2008 रोजी मा.तालूका दंडाधिकारी तहसिल कार्यालय घनसावंगी यांचेकडे मंजूरीस्तव पाठवलेल्या फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 174 नूसार दिलेल्या रिपोर्ट नूसार तक्रारदारांचे पतीचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे स्पष्ट होते.
तक्रारीतील कागदपत्रे म्हणजेच गैरअर्जदार यांनी दिनांक 22.03.2013 रोजी तक्रारदारांना पाठवलेल्या पत्रानूसार SDM Report या कागदपत्रांची पुर्तता तक्रारदारांनी केलेली नसल्यामूळे प्रस्तावाची फाईल बंद केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दिनांक 10.01.2013 रोजी गैरअर्जदार यांचेकडे विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसहीत, पाठविल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी या संदर्भात पोहोच दिल्याचे सदर पत्रावरुन दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रानूसार दिनांक 29.11.2008 रोजी पोलीस ठाणे अंमलदार घनसावंगी यांनी तालुका दंडाधिकारी, घनसावंगी यांचेकडे कलम 174 सी.आर.पी.सी अन्वये रिपोर्ट मंजूरीस्तव पाठवल्याचे दिसून येते. तक्रारीत आलेल्या पुराव्यानूसार तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुनही प्रस्ताव प्रलंबित ठेवला, गुणवत्तेवर निकाली केला नाही हे दिसून येते. गैरअर्जदार यांची सदरची कृती सेवेतील त्रूटी असल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारीतील कागदपत्रांनूसार तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू सर्पदंशाने तसेच विमा कालावधीत झालेला असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत तक्रारदार सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी यापूर्वी दाखल केलेली तक्रार क्रमांक 25/2010 अपरिपक्व (Pre-Mature) या कारणास्तव नामंजूर झाल्याचे दिसून येते. तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीकडे प्राप्त झालेला नसल्यामूळे न्यायमंचाने सदरची तक्रार नामंजूर केली आहे. सदर प्रकरणात तक्रारदारांनी विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला आहे. अशा परिस्थितीत सदरची तक्रार चालविण्याचा न्यायमंचाला अधिकार आहे असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदार सदर योजने अंतर्गत विमा लाभ रक्कम मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होत असल्यामूळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- देणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी जनता वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) अर्जदार यांना 30 दिवसात देण्यात यावी.
- वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास 9 टक्के व्याज दारासहीत द्यावी.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.