(घोषित दि. 19.09.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदार संस्थेने सभासदांच्या उपयोगासाठी एम.एच.21 आर 7177 ही स्कॉर्पिओ कंपनीची जीप खरेदी केली असुन, गैरअर्जदार कंपनीकडे दिनांक 10.09.2010 ते 09.09.2011 या कालावधीकरीता विमा पॉलीसी घेतली आहे.
तक्रारदार संस्थेची जीप दिनांक 17.11.2010 रोजी तिरुपतीहून हैद्राबादकडे येत असताना, बसची व सदर गाडीची टक्कर होवून अपघात झाला. सदर अपघाताची माहीती बसचा चालक श्री.ए.शिलेश यांनी पोलीस स्टेशन इटीकॅला येथे दिल्यानंतर पोलीसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 141/2010 तक्रारदारांचे जीप ड्रायव्हर विश्वनाथ तारे यांचे विरुध्द दाखल केला.
तक्रारदारांनी अपघाताबाबतची माहीती गैरअर्जदार विमा कंपनीला दिल्यानंतर त्यांनी सर्व्हेअर श्री.एस.रमेश बाबू यांची नियुक्ती केली. सर्व्हेअर यांनी दिनांक 22.11.2010 रोजी सर्वे बील दाखल केले. त्यानंतर सदर जीप रत्नप्रभा मोटर्स यांचे शोरुममध्ये दूरुस्ती करीता आणली. तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांसह क्लेम फॉर्म दिनांक 09.12.2010 रोजी गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला. तक्रारदारांनी गाडी दूरुस्तीचे बील रक्कम रुपये 3,40,170/- रत्नप्रभा मोटर्स यांना दिले. परंतू गैरअर्जदार विमा कंपनीने विमा दावा वैध परवान्याचे उल्लघंन केले. तसेच कंपनीच्या कराराचा भंग केला या कारणावरुन नामंजूर केला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झाले असून, लेखी म्हणणे दिनांक 26.06.2012 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांनी अपघातानंतर दोन ते अडीच वर्षांनी एफ.आय.आर दाखल केला. गैरअर्जदार विमा कंपनीला अपघाताबाबतची माहीती उशीरा दिली. तसेच सदर गाडी चोरीला गेल्याबाबतचा विसंगत मजकूर नमूद केल्याचे दिसून येते.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. गैरअर्जदार यांचा लेखी युक्तीवाद, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.प्रदीप कुलकर्णी तसेच गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.एस.डी.देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदार संस्थेच्या सभासदांनी शेती प्रदर्शन व देवदर्शनासाठी स्कॉर्पिओ गाडी तिरुपती येथे नेली. तिरुपतीहून येताना सदर गाडीचा अपघात झाला. अपघात झालेल्या गाडीच्या नूकसान भरपाईची मागणी करण्याकरीता विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला. गैरअर्जदार यांना विमा पॉलीसी मान्य आहे. परंतू सदर गाडीचा उपयोग परमिट नूसार केलेला नसून विमा कंपनीच्या अटी व शर्तींचे उल्लघंन केले आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता गाडीचे वाहनचालकाचे लायसन्स दाखल केल्याचे दिसून येते. तसेच गाडीतील प्रवासी हे गैरअर्जदार संस्थेचे सभासद असल्याबाबत तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केले आहे. गैरअर्जदार विमा कंपनीच्या दिनांक 14.11.2011 रोजीच्या नामंजूरीच्या पत्रानूसार तक्रारदारांनी विमा कंपनीच्या कोणत्या अटी व शर्तींचे उल्लघंन केले या बाबत खूलासा होत नाही. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी गाडीचा उपयोग परमिट प्रमाणे केला नसल्याची बाब तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होत नाही. त्यामूळे गैरअर्जदार विमा कंपनीने अयोग्यरित्या तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर करुन त्रुटीची सेवा दिल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी स्कॉर्पिओ गाडीची दुरुस्ती रत्नप्रभा मोटर्स यांचेकडे केली असून, दुरुस्तीच्या बीलाची रक्कम भरणा केली आहे. तक्रारदारांनी दिनांक 22.11.2010 रोजीचे सर्व्हेअर यांचे बील रक्कम रुपये 1,738/- दाखल केले असून श्री.एस.रमेश बाबू यांनी तक्रारदारांच्या गाडीचा सर्व्हे केल्याचे दिसून येते. सर्व्हेअर रिपोर्ट गैरअर्जदार विमा कंपनीकडे असून सदर प्रकरणात दाखल नाही. अशा परिस्थितीत सर्व्हेअर एस.रमेश बाबू यांनी दिलेल्या सदर स्कॉर्पिओ गाडीच्या सर्व्हेअर अहवालात नमूद असलेली गाडी दुरुस्तीची रक्कम गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदारांना देणे न्यायोचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार दि न्यु इंडिया अशुरन्स कं.लि. जालना यांनी तक्रारदारांना सर्व्हेअर श्री.एम.रमेश बाबू यांनी दिलेल्या अहवाला नूसार गाडी दूरुस्तीची रक्कम आदेश मिळाल्या पासून 30 दिवसाचे आत द्यावी.
- वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दरासहीत द्यावी.
- खर्चा बाबत आदेश नाही.