(घोषित दि. 26.04.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया,सदस्या)
अर्जदाराच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी विमा रक्कम न दिल्यामुळे त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची आई भारतबाई देविदास चव्हाण यांचा दिनांक 23.05.2012 रोजी जळून मृत्यू झाला. अर्जदाराने सदरील घटनेची माहिती जालना पोलीस स्टेशन यांना दिली. त्यानंतर मरणोत्तर पंचनामा करण्यात आला. अर्जदारची आई शेतकरी असल्यामुळे अर्जदाराने शासनाच्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी योग्य त्या कागदपत्रांसह दिनांक 16.07.2012 रोजी विमा प्रस्ताव दाखल केला. गैरअर्जदार यांनी दिनांक 13.09.2012 रोजी व 24.08.2012 रोजी अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले. त्यानुसार अर्जदाराने दिनांक 30.08.2012 रोजी विमा दाव्याचा अर्ज, तलाठी प्रमाणपत्र, 7/12, 8 अ, 6 क, एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टम अहवाल इत्यादी कागदपत्रे पाठविली. परंतू गैरअर्जदार यांनी अद्यापही विमा रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत विमा कंपनीचे पत्र, दावा सूचना पत्र, वकीलाचे पत्र, क्लेम फॉर्म, 7/12 चा उतारा, 8 अ जमिनीचा दाखला, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, तलाठी प्रमाणपत्र, फोरफार नक्कल, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने पोस्ट मार्टम अहवाल, एन.ओ.सी, व्हिसेरा रिपोर्ट, 6 क, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, तालुका कृषी अधिका-याचे पत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केली नसल्यामुळे त्यांना विमा रक्कम देता येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. दिनांक 13.09.2012 रोजी अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्यासंबंधी पत्र पाठविले. परंतू अर्जदाराने त्याची पूर्तता केली नसल्यामुळे त्यांच्या विमा प्रस्तावावर निर्णय घेता येत नाही.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन अर्जदाराची आई भारतबाई देविदास चव्हाण यांचा दिनांक 22.05.2012 रोजी शेतात काम करीत असताना वीजेच्या तारांच्या घर्षणाने ठिणगी पडून पाचटाने पेट घेऊन जळून मृत्यू झाल्याचे पोलीस पंचनामा, घटनास्थळ पंचनामा इत्यादी कागदपत्रांवरुन दिसून येते. अर्जदाराने विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांच्याकडे पाठविला असताना गैरअर्जदार यांनी दिनांक 13.09.2012 रोजी पोस्ट मार्टम अहवाल, नव-याचे ना हरकत प्रमाणपत्र, व्हिसेरा रिपोर्ट, गाव नमुना 6 क मूळ पत्र, लाभ धारकाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, तालुका कृषी अधिका-याचे पत्र या कागदपत्रांची मागणी केली. अर्जदाराने पोस्ट मार्टम अहवाल, व्हिसेरा रिपोर्ट, गाव नमुना 6 क ही कागदपत्रे पाठविल्याचे दिसून येते. परंतू अर्जदाराने वडीलांचे ना हरकत प्रमाणपत्र पाठविल्याचे दिसून येत नाही.
मयत भारतबाई देविदास चव्हाण याचा अर्जदार हा मुलगा आहे. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव पत्नी/पति नंतर मुलगा अशा क्रमाने प्रतिज्ञापत्र दाखल करुन विमा प्रस्ताव पाठवू शकतात. परंतू अर्जदाराने प्रस्ताव पाठविताना वडीलांचे ना हरकत प्रमाणपत्र व स्वत:चे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले दिसून येत नाही.
आदेश
- अर्जदाराने वडिलांचे ना हरकत प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र गैरअर्जदार यांना पाठवावे.
- वरील कागदपत्रे मिळाल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा प्रस्ताव 30 दिवसात मंजूर करावा.