(घोषित दि. 08.08.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती श्री.शिवाजी सखाराम पंडीत हे शेतकरी असून दिनांक 21.12.2010 रोजी झालेल्या अपघातात मृत्यू पावले. सदर अपघाताची माहिती पोलीस स्टेशन, जाफ्राबाद यांना मिळाल्यानंतर पोलीसांनी एफ.आय.आर ची नोंद घेवून मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा केला. तसेच मयत व्यक्तीचे प्रेत पोस्टमार्टमसाठी, औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव तहसील कार्यालय, जाफ्राबाद व वकीला मार्फत गैरअर्जदार विमा कंपनीकडे पाठवला. तक्रारदारांचा प्रस्ताव विलंबाच्या कारणास्तव विमा कंपनीने नाकारला. तक्रारदारांनी पूर्वी तक्रार क्रमांक 25/2012 न्याय मंचात दाखल केली असून तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्राच्या मूळ प्रतीसह विमा कंपनीकडे दाखल करण्याबाबत न्याय मंचाने निर्देश दिले होते. तक्रारदारांनी विमा प्रस्ताव मूळ कागदपत्रांसह दिनांक 05.10.2012 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला. परंतू तक्रारदारांचा प्रस्ताव विलंबाच्या कारणास्तव नाकारला आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांनी न्याय मंचाच्या आदेशानूसार दिनांक 18.09.2012 पासून 30 दिवसात विमा प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला नाही तसेच कागदपत्रांच्या मूळ प्रती दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे शक्य झाले नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने त्रूटीची सेवा दिलेली नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रार क्रमांक 25/2012 या प्रकरणात दिनांक 18.09.2012 रोजी दिलेल्या न्याय मंचाच्या आदेशानुसार दिनांक 05.10.2012 रोजी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव पाठविल्याचे दिसून येते. तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 21.01.2013 रोजी पाठविलेल्या पत्रानूसार तक्रारदारांचा प्रस्ताव दिनांक 15.10.2012 रोजी त्यांचेकडे प्राप्त झाल्याचे तसेच दिनांक 01.12.2012 रोजी कागदपत्रांच्या मूळ प्रती तसेच काही कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रती तक्रारदारांनी दाखल केल्याचे स्पष्ट होते. यावरुन तक्रारदारांनी गैरअर्जदार विमा कपंनीकडे विहीत मूदतीत न्याय मंचाच्या आदेशानूसार प्रस्ताव दाखल केल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनूसार तक्रारदारांचे पती दिनांक 21.12.2010 रोजी झालेल्या अपघातात मृत्यू पावल्याचे एफ.आय.आर, इनक्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टम अहवाल, मृत्यू प्रमाणपत्रनूसार दिसून येते.
तसेच फेरफार क्रमांक 1518 नूसार वाटणी पत्रक क्रमांक 460 दिनांक 13.07.2010 नूसार तक्रारदारांच्या पतीच्या नावाची नोंद दिनांक 02.12.2010 रोजी घेण्यात आल्याचे दिसून येते. फेरफार नोंदवही तसेच सात/बारा उता-याच्या मूळ प्रती गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत. त्याच प्रमाणे एफ.आय.आर, इनक्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टम अहवाल वगैरे कागदपत्राच्या साक्षांकीत प्रती दाखल केल्या आहेत, असे तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव यांनी युक्तीवादात नमूद केले आहे.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांचे पती श्री.शिवाजी पंडीत शेतकरी असून त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसून येते. त्यामूळे सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत देय असलेली विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात द्यावी.
- वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरासहीत द्यावी.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.