जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 484/2010. तक्रार दाखल दिनांक : 11/08/2010. तक्रार आदेश दिनांक : 27/04/2011. श्री. दिपक मनोहर वाघमारे, वय 36 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. विमुक्त भटके झोपडपट्टी, शहा नगर, लिमयेवाडी, ता. उ.सोलापूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. ब्रँच मॅनेजर, भारतीय स्टेट बँक, सोलापूर ट्रेझरी शाखा, सोलापूर. 2. ब्रँच मॅनेजर, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पटवर्धन चौक, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एन.बी. घोडमारे विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : आदेश सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. विरुध्द पक्ष क्र.1 बँकेमध्ये त्यांचे बचत खाते क्र.11325040647 आहे आणि त्यांचे मासिक वेतन सदर खात्यामध्ये जमा होते. तक्रारदार यांनी दि.11/2/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 बँकेच्या ए.टी.एम. बुथमधून रक्कम काढताना रक्कम प्राप्त न होता ‘अनेबल टू प्रोसेस’ शेरा असलेली पावती नं.2911 मिळाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केला असता ‘इनव्हॅलीड ट्रान्झंक्शन ऑर अकाऊंट’ शेरा मारुन पावती नं.2912 मिळाली. तसेच त्यांनी पुन्हा प्रयत्न केला असता पावती नं.2914 मिळाली आणि त्यामध्ये काढलेली रक्कम रु.4,700/- व शिल्लक रक्कम रु.9,304.35 पैसे दर्शविली. तक्रारदार यांना रक्कम प्राप्त न होताही तशी नोंद झालेली आहे. त्याबाबत तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 बँकेकडे तक्रारी अर्ज दिला असता, दि.30/7/2010 च्या पत्राद्वारे रक्कम जमा करता येत नसल्याचे उत्तर कळविले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन त्यांचे खात्यावर डेबीट पडलेली रक्कम रु.4,700/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रारदार यांची तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांची तक्रार प्राप्त होताच त्यांची तात्काळ विरुध्द पक्ष क्र.2 बँकेकडे पाठविली असता त्यांनी सदर व्यव्हार यशस्वी होऊन ए.टी.एम. मशीनद्वारे रु.4,700/- अदा केल्याचे कळविले. त्याप्रमाणे त्यांनी तक्रारदार यांना रक्कम क्रेडीट करता येत नसल्याचे कळविलेले आहे. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.2 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली आहे. त्यांना उचित संधी देऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांचे विरुध्द पक्ष क्र.1 बँकेमध्ये बचत खाते क्र.11325040647 असल्याविषयी विवाद नाही. तसेच तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.1 बँकेकडून प्राप्त पासबूक व ए.टी.एम. कार्डद्वारे बचत खात्याचा व्यवहार पाहत असतात, याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी ए.टी.एम. कार्डद्वारे दि.11/2/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 बँकेच्या ए.टी.एम. बुथमधून रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, ‘अनेबल टू प्रोसेस’ शेरा असलेली पावती नं.2911 व ‘इनव्हॅलीड ट्रान्झंक्शन ऑर अकाऊंट’ शेरा मारुन पावती नं.2912 मिळाल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी पुन्हा प्रयत्न केला असता पावती नं.2914 द्वारे रु.4,700/- काढल्याचे व शिल्लक रक्कम रु.9,304.35 पैसे दर्शविल्याविषयी विवाद नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष बँकेकडे तक्रार केल्याविषयी विवाद नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.30/7/2010 च्या पत्राद्वारे रक्कम जमा करता येत नसल्याचे उत्तर कळविल्याविषयी विवाद नाही. 6. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांची तक्रार प्राप्त होताच त्यांची तात्काळ विरुध्द पक्ष क्र.2 बँकेकडे पाठविली असता, सदर व्यव्हार-प्रक्रिया यशस्वी होऊन ए.टी.एम. मशीनद्वारे रु.4,700/- अदा केल्याचे कळविल्यानुसार तक्रारदार यांना रक्कम क्रेडीट करता येत नसल्याचे नमूद केले आहे. 7. प्रस्तुत तक्रार प्रलंबीत असताना विरुध्द पक्ष क्र.1 बँकेने तक्रारदार यांच्या खात्यामध्ये दि.17/2/2011 रोजी रु.4,700/- जमा केले आहेत. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी रक्कम जमा झाल्याची पुरसीस मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारदार यांच्या अभियोक्त्यांनी तक्रारदार यांना रक्कम प्राप्त झाल्याचे मान्य केले असले तरी रक्कम 4 महिने 25 दिवसानंतर प्राप्त झाल्यामुळे त्यांना खर्च व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे नमूद केले आहे. 8. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास झालेल्या विलंबाचा खुलासा केलेला नाही. निर्विवादपणे, ए.टी.एम. मशीनद्वारे तक्रारदार यांना रक्कम प्राप्त न होताच रक्कम अदा केल्याची नोंद पावतीमध्ये करण्यात आलेली आहे. तक्रारदार यांच्या खात्यातून रु.4,700/- कपात होण्याची प्रक्रिया तांत्रिक दोषामुळे झालेली आहे, हे स्पष्ट आहे. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 बँकेने तक्रारदार यांची रक्कम पुन्हा खात्यावर जमा केलेली आहे. बँकेने तक्रारदार यांना सर्वप्रथम रक्कम देण्याचे नाकारुन व टाळाटाळ करुन त्यानंतर रक्कम जमा करण्याची कार्यवाही केलेली आहे. तक्रारदार यांच्या वेतनाची रक्कम असल्यामुळे अचानक रु.4,700/- कपात झाल्यामुळे त्यांना निश्चितच मोठया त्रासास व खर्चास सामोरे जावे लागल्याचे मान्य करावे लागेल. विरुध्द पक्ष क्र.1 बँकेने तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य वेळेमध्ये दखल घेतली नाही आणि सदर कृत्य त्यांच्या सेवेतील त्रुटी ठरते, या मतास आम्ही आलो आहोत. त्यामुळे तक्रारदार हे प्रस्तुत तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र ठरतात. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 बँकेने तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/25411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |