(घोषित दि. 10.12.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून बजाज डिस्कव्हर हे वाहन दिनांक 31.10.2011 रोजी खरेदी केले. त्याचा क्रमांक एम.एच. 21 – ए.एफ - 2161 असा होता. तक्रारदारांनी वरील वाहनाचा विमा गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनी यांचेकडे काढला. त्याचा पॉलीसी क्रमांक 1708412312007887 असा होता व वैधता कालावधी दिनांक 31.10.2011 ते 30.10.2012 असा होता.
दिनांक 30.05.2012 रोजी वरील गाडीला अपघात झाला व त्यामध्ये गाडीचे 100 टक्के नुकसान होऊन संजय नागोराव तेरकर यांचा मृत्यू झाला. वरील अपघात झाल्यावर तक्रारदारांनी विमा कंपनी यांना सुचना दिली व विमा प्रस्ताव दिला. त्यांचा प्रस्ताव क्रमांक 2121093720 असा होता. घटनेच्या दिवशी तक्रारदाराचे वडील वाहन चालवित होते. त्यांचे जवळ वाहन परवाना होता त्याचा क्रमांक एम.एच.23/1988/2011 असा होता. वरील वाहन दुरुस्तीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे देण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना वकीला मार्फत वाहनाच्या नुकसान भरपाईसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्र दिले. तरी देखील गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी वाहन दुरुस्ती करुन दिले नाही म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी आपल्या तक्रारी सोबत विमा प्रस्ताव, प्रथम खबर, विमा पॉलीसीची झेरॉक्स प्रत, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, वाहन परवाना क्रमांक एम.एच.23/1988/2011 यांची प्रत अशी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार त्यांना तक्रारदारांची विमा पॉलीसी व त्याचा कालावधी मान्य आहे. परंतू ते सांगतात की, तक्रारदाराचे वडील संजय नागोराव तेरकर यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. म्हणून कंपनीने दिनांक 23.03.2013 रोजी श्रीयुत संजय तेरकर यांच्या एम.डी.एल नंबर एम.एच.23/1988/2011 हा खोटा आहे व त्याच्या इनव्हेस्टीगेटरच्या अहवालानुसार वरील क्रमांकाचा वाहन परवाना श्रीयुत नामदेव सावंत यांच्या नावाने बीड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेला आहे. त्यामुळे दावा देवू शकत नाही असे पत्र दिले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्या जबाबा सोबत वाहना बाबतचा सर्वेक्षण अहवाल दाखल केला आहे. वैध वाहन परवाना नाही या कारणाने तक्रारदारांचा प्रस्ताव कंपनीने नाकारला आहे. यात गैरअर्जदार यांची कोणत्याही प्रकारे सेवेतील त्रुटी नाही. वरील प्रस्ताव नाकारल्या बाबत तक्रारदारांना दिनांक 23.03.2013 रोजी कळविण्यात आले. म्हणून तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 नोटीस मिळूनही मंचा समोर हजर झाले नाहीत. म्हणून त्यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
गैरअर्जदार यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बीड यांना साक्षीसाठी समन्स काढले. त्या अनुषंगाने त्यांचेकडून श्रीयुत चंद्रकांत मरीबा ताकतोडे यांची शपथेवर साक्ष घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार एम.एच.23/1988/2011 हा वाहन परवाना गर्जे शामनाथ तुळशीराम यांच्या नावावर आहे व त्यांच्या नोंदीनुसार तो दिनांक 26.08.2011 रोजी देण्यात आला. त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या अभिलेखानुसार श्रीयुत गर्जे यांच्या परवान्याचे विवरणपत्र सोबत दाखल केले ते नि.30 वर आहे.
तक्रारदारांतर्फे विव्दान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे विव्दान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रे व मंचापुढील युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारांना
द्यावयाच्या सेवेत काही त्रुटी केली आहे का ? नाही
2.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – दोनही पक्षाचा युक्तीवाद, दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. गाडी क्रमांक एम.एच. 21 – ए.एफ – 2161 ची पॉलीसी व तिचा कालावधी दोनही पक्षाना मान्य आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी केवळ ड्रायव्हरकडे वैध वाहन चालविण्याचा परवाना नव्हता या एकाच मुद्यावर तक्रारदारांचा प्रस्ताव नाकारला आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 म्हणतात की, तक्रारदारांनी दाखल केलेला संजय नागोराव तेरकर यांचा वाहन चालविण्याचा परवाना बनावट व खोटा आहे. आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ त्यांनी संबंधित अधिका-याची शपथेवर साक्षही घेतली. त्यात त्यांनी एम.एच.23/1988/2011 हा वाहन चालविण्याचा परवाना दिनांक 26.08.2011 रोजी दिलेला असुन तो गर्जे सोमनाथ तुळशीराम यांच्या नावे आहे असे सांगितले व तशा अर्थाचे विवरणपत्र मंचात दाखल केले. (नि.30) तक्रारदारांनी मयत संजय नागोराव तेरकर यांचा वाहन परवाना व त्याचे विवरणपत्र दाखल केले त्यावरील दिनांक 18.10.2011 अशी आहे. साक्षीदारांनी साक्षीत एम.एच.23/1988/2011 या क्रमांकानी त्यांचेच कार्यालयातून दोन परवाने कसे दिले गेले हे सांगण्यास असमर्थतता दर्शविली आहे. साक्षीदाराच्या तपासासाठी तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर होते. अशा परिस्थितीत अपघाता समयी वाहन चालविणारे श्रीयुत संजय नागोराव तेरकर यांच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना होता ही बाब मंचा समोर पुराव्यानिशी सिध्द होवू शकली नाही. त्यामुळे वाहन चालविण्या-याकडे वैध परवाना नव्हता या कारणाने तक्रारदाराचा दावा नामंजूर करुन गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी कोणतीही सेवेत कमतरता केलेली नाही असे मंचाला वाटते.
तक्रारीत केवळ वाहन गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे दुरुस्तीसाठी जमा केल्याचा उल्लेख आहे. परंतु त्याच्या दुरुस्तीसाठीची रक्कम गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे जमा केलेली होती अथवा नाही, वाहन दुरुस्त होण्याच्या परिस्थितीत आहे अथवा नाही याबाबतचा उलगडा दाखल कागदपत्रांवरुन होत नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रमांक 2 यांना देखील सेवेतील त्रुटीबाबत जबाबदार धरता येणार नाही असे मंचाला वाटते.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.