(घोषित दि. 31.07.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा जालना येथील रहिवाशी असून वकिली व्यवसाय करतो. अर्जदाराचा दिनांक 29.10.2009 रोजी मोती बागेजवळ जालना येथे अपघात झाला होता व त्याच्या पायाला गंभीर मार लागला होता. त्या संदर्भात गुन्हा नोंद क्रमांक 187/2009 अन्वये कदीम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. सदरच्या अपघातामुळे अर्जदाराच्या उजव्या पायाला प्लास्टर घातले व 15 टाके घातले. त्यामुळे त्याला पाच महिन्यापर्यंत काहीही काम करता आले नाही.
तक्रारदार अपघाताचे वेळी एम.एच.21 डब्ल्यू 5048 क्रमांकाची मोटार सायकल चालवत होता. तिचा विमा गैरअर्जदार कंपनी यांचेकडे उतरवलेला होता. विमा पॉलीसीचा क्रमांक 35070131086201341639 असा होता व वाहन धारकाची विमा रक्कम रुपये 1,00,000/- एवढी होती व पॉलीसीचा कालावधी दिनांक 04.02.2009 ते 03.02.2010 असा होता. तक्रारदाराचा अपघात दिनांक 29.10.2009 रोजी झाला. तक्रारदाराने क्लेम अर्ज भरुन दिला. गैरअर्जदारांनी केवळ गाडीची नुकसान भरपाई रक्कम दिली परंतु वैयक्तीक अपघात मोबदल्यासाठी लागणारा क्लेम फॉर्म तक्रारदाराला उपलब्ध करुन दिला नाही. तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे वारंवार संपर्क साधला तसेच दिनांक 31.05.2012 रोजी लेखी नोटीसही पाठवली. परंतू गैरअर्जदारांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा दावा मंजूरही केला नाही. तक्रारादारांना त्यांच्या उपचारासाठी 50,000/- रुपये खर्च झाला आहे तसेच सदर कालावधीत ते काम करु न शकल्याने त्यांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान झाले आहे. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे व त्या अंतर्गत नुकसान भरपाई पोटी रुपये 1,00,000/- एवढी मागणी केली आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत गैरअर्जदारांना पाठवलेल्या नोटीसांची प्रत, त्यांच्या आर.पी.ए.डी च्या पावत्या, घटनास्थळ पंचनामा, गुन्हा रजिस्टर क्रमांक 187/2009, 186/2009 ची प्रथम खबर व चार्जसीट ची कॉपी, इन्शुरन्स पॉलीसीची कव्हर नोट, आर.सी.बुक व वाहन परवाना, दीपक हॉस्पिटल ची उपचारासंबंधी कागदपत्रे व प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली.
त्याच प्रमाणे तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबासाठी विलंब माफीचा अर्ज ही दाखल केला त्यावर गैरअर्जदारांनी म्हणणे दिले तो मंचाने दिनांक 02.03.2013 रोजी मंजूर केला.
गैरअर्जदारांच्या लेखी जबाबानुसार तक्रारदारांची त्यांचेकडे वरील प्रमाणे पॉलीसी काढलेली होती व अपघाताच्या घटनेनंतर त्यांना वाहन अपघाताची रक्कम देण्यात आली आहे. अपघात प्रत्यक्षात दिनांक 27.10.2009 रोजी घडला आहे. परंतू तक्रारदारांनी अपघाताची तारीख 29.10.2009 अशी लिहिली आहे. प्रत्यक्षात अपघात दोन गाडयांनमध्ये झालेला आहे. तक्रारदाराने आवश्यक कागदत्रांसह 1 महिन्याच्या आत गैरअर्जदारांकडे क्लेम फॉर्म दाखल करावयास हवा होता. इन्शुरन्स पॉलीसीच्या क्रमांक TTT मध्ये तक्रारदाराची तक्रार बसत नाही. तक्रारदारांनी दिनांक 21.12.2009 रोजी कंपनीकडे विमा प्रस्ताव दाखल केल्या त्यानुसार त्यांना ओ.डी. दाव्याची रक्कम दिली आहे. त्यांनी स्वत: च्या दुखापतीसाठी विमा प्रस्ताव कंपनीकडे न पाठवता मंचात सदरची तक्रार दाखल केली आहे. कंपनीने त्यांचा ओ.डी.क्लेम आधीच त्यांचा मंजूर केला आहे. त्यावरुन कंपनीने सेवेत कोणतीही कमतरता केलेली नाही. तक्रारदाराने त्यांचे कायमचे अपंगत्व आल्या बद्दलचे प्रमाणपत्र दाखल केलेले नाही व अशा प्रमाणपत्रा अभावी त्याचा दावा मंजूर करता येत नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळून लावण्यात यावी.
त्यांनी त्यांच्या जबाबासोबत मोटार क्लेम फॉर्म व दुचाकी वाहन विमा पॉलीसी ही कागदपत्रे दाखल केली.
तक्रारदार अड.पोखरकर व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.एस.बी.किनगावकर यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला.
त्यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतात.
- तक्रारदारांची दुचाकी क्रमांक एम.एच.21 डब्ल्यू 5048 चा विमा गैरअर्जदारांकडे दिनांक 04.02.2009 ते 03.02.2010 या कालावधीसाठी रुपये 1,00,000/- ऐवढया रकमेसाठी काढलेला होता. त्याचा पॉलीसी क्रमांक 35070131086201341639 असा होता.
- तक्रारदाराचा अपघात दिनांक 27.10.2009 रोजी झाला. सदर अपघात दोन दुचाकींच्या दरम्यान झाला. संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक 186/2009 व 187/2009 अन्वये दोनही पक्षांकडून गुन्हे नोंदविले गेले.
- तक्रारदाराने वाहनाच्या नुकसानीसाठी गैरअर्जदारांकडे ओ.डी. क्लेम दाखल केला होता त्याची रक्कम त्यांना प्राप्त झालेली आहे.
- तक्रारदारांच्या कथनानुसार मागणी करुनही वैयक्तीक अपघाताचा क्लेम फॉर्म कंपनीने दिला नाही म्हणून त्यांनी थेट न्यायमंचात सदर तक्रार केली.
- तक्रारदारांनी त्यांनी घेतलेल्या उपचारासंबंधी दीपक हॉस्पिटलची कागदपत्रे व प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्या प्रमाणपत्रा नुसार “Mr. Mahendra Came as OPD patient on 27.10.2009 & was suffering from # 2nd metatarpal undisplaced.” या प्रमाणपत्रावरुन तक्रारदाराच्या पावलाच्या भागाला दुखापत झाली आहे असे दिसते सदरचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकीत्सक अथवा कोणत्याही शासकीय वैद्यकीय अधिका-याचे नसून डॉ.वैभव गोल्डे नावाच्या खाजगी अस्थिरोग तज्ञाचे आहे. त्याचप्रमाणे त्या प्रमाणपत्रावर कोठेही तक्रारदाराला कायमचे अपंगत्व आले आहे का ? असल्यास किती टक्के अपंगत्व आलेले आहे यांचा काहीही उल्लेख नाही. तक्रारदारांनी त्यांचे अपंगत्व सिध्द करण्यासाठी दुस-या कोणत्याही वैद्यकीय अधिका-याचा पुरावा अथवा शपथपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही.
- गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या विमा पॉलीसीच्या क TTT नुसार वाहनाच्या मालकाला अपघात झाला असेल तर तो खालील प्रमाणे नुकसान भरपाईस पात्र असेल.
01. | कोणतेही दोन अवयव अथवा दोन डोळे अथवा एक अवयव व एक डोळा निकामी झाल्यास | 100% |
02. | एक अवयव अथवा एक डोळा निकामी झाल्यास | 50% |
03. | या व्यतिरिक्त इतर जखमांमुळे कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यास | 100% |
तक्रारदारांनी दाखल केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रा वरुन तक्रारदारांचा अपघात व अपंगत्व वरील पैकी कोणत्याच नियमात बसत नाही. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत प्रार्थना केल्याप्रमाणे विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्यास ते पात्र नाहीत असा निष्कर्ष मंचा काढत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत हुकूम नाही.