(घोषित दि. 18.12.2012 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, प्र.अध्यक्ष)
अर्जदाराचे पती शेतकरी होते. त्यांचे अपघातात निधन झाल्यानंतर त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणा-या विमा रकमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती लाला सोनटक्के हे शेतकरी होते. दिनांक 03.12.2006 रोजी त्यांचे बडोदा, गुजरात राज्य येथे वाहन अपघातात निधन झाले. या अपघाताची नोंद मकरपूरा पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली आहे. त्याच प्रमाणे पोस्ट मार्टम अहवाल व पंचनामा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी दिनांक 26.02.2007 रोजी मंचामध्ये तक्रार दाखल केली होती. मंचाने दिलेल्या आदेशा विरुध्द त्यांनी मा.राज्य आयोगाकडे अपील दाखल केले होते. अपीलचा क्रमांक 413/2010 असा आहे. मा.राज्य आयोगाने, गैरअर्जदार यांनी मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारास संधी देण्यात यावी व दावा 30 दिवसात निकाली काढावा असा आदेश दिला. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार कागदपत्रे दाखल केल्यानंतही गैरअर्जदार यांनी दिनांक 08.04.2012 पर्यंत विमा रक्कम दिली नसल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी व्याजासह विमा रक्कम व नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांच्याकडे दाखल केलेली कागदपत्रे मा.राज्य आयोगाच्या निकालाची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी दिनांक 19.11.2012 रोजी मंचात जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार लाला अश्रूबा सोनटक्के हे शेतकरी असल्याचा पुरावा अर्जदाराने दिलेला नाही. त्याच प्रमाणे अपघातानंतर करण्यात आलेला पंचनामा व पोस्ट मार्टम अहवालात मयताचे नाव लालाभाई अशाबा तेली असे लिहीलेले आहे. दोन्ही व्यक्ती एकच आहेत याबाबत अर्जदाराने कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. अनेक वेळेस मागणी करुन देखील त्यांनी योग्य ती कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. सदरील प्रकरण गुंतागुतीचे असल्यामुळे मंचाच्या कार्यक्षेत्रात बाहेर असल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबासोबत अर्जदारास लिहीलेले पत्र जोडले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराचे पती लाला अश्रूबा सोनटक्के हे शेतकरी होते व त्यांच्या नावे गट क्रमांक 173 मुहेगाव ता.घनसावंगी जि.जालना येथे शेतजमिन आहे. अर्जदाराच्या पतीचे बडोदा, गुजरात येथे दिनांक दिनांक 03.12.2006 रोजी वाहन अपघातात निधन झाले. मकरपूरा पोलीस स्टेशन, बडोदा येथे या अपघाताची नोंद घेण्यात आलेली दिसून येते. या अपघाताचा अहवाल पंचनामा तसेच पोस्ट मार्टम अहवाल यामध्ये अर्जदाराच्या पतीचे नाव लाला अशबा तेली असे नमूद केलेले आहे. यावरुन अर्जदाराचे पती व मृत पावलेला व्यक्ती हे वेगवेगळे आहेत असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदाराने या प्रकरणी मोटार अपघात न्यायालयात यांनी दिलेल्या निकालाची प्रत (दावा क्रमांक 502/2008) तसेच अंबड तालूका औद्योगिक बहुउद्देशिय ग्रामिण सहकारी संस्था यांचे दिनांक 03.10.1996 रोजी मयत लाला अश्रुबा सोनटक्के यांचे नावे आलेल्या नोटीसची प्रत सोबत जोडली आहे. मा.मोटार अपघात न्यायालयाने दिलेल्या निकालाचे अवलोकन केल्यावर लाला अश्रुबा सोनटक्के व अपघातात मृत पावलेले लाला अश्रुबा तेली हे दोन्ही एकच असल्याचे स्पष्ट होते. अंबड औद्योगिक बहुउद्देशिय ग्रामिण सहकारी संस्थेकडून मयत लाला अश्रुबा सोनटक्के यांना देण्यात आलेल्या दिनांक 03.10.1996 रोजीच्या नोटीसमध्ये तेल व्यवसायासाठी कर्ज घेण्यात आले असल्याचे दिसून येते. या व्यवसायावरुन पंचनामा व पोस्टमार्टम अहवालात आडनाव सोनटक्के ऐवजी तेल व्यवसाय करणारे तेली असे लिहीण्यात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील सर्व निरीक्षणावरुन लाला अश्रुबा सोनटक्के हेच लाला अश्रुबा तेली असल्याचे मंचाचे मत आहे. अर्जदाराने तक्रारी सोबत योग्य ती कागदपत्रे म्हणजेच क्लेम फॉर्म, 7/12 चा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, पोस्ट मार्टम अहवाल, तलाठयाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामुळे अर्जदाराने योग्य ती कागदपत्रे दाखल केली नाहीत म्हणून अर्जदाराचा प्रस्ताव नाकारण्यात आला हे गैरअर्जदार यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही.
अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येते.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) रुपये दिनांक 18.02.2009 पासून 9 टक्के व्याज दराने 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चा बद्दल रुपये 1,500/- 30 दिवसात द्यावे.