(घोषित दि. 09.10.2013 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांचे पती श्री.शंकरराव आनंदराव दुनगहू व्यवसायाने शेतकरी असून दूदैवाने दिनांक 30.12.2005 रोजी झालेल्या अपघातात मृत्यू पावले. सदर अपघाताची माहीती मिळाल्यानंतर घटनास्थळ पंचनामा केला, आरोपी विरुध्द भा.द.वि. कलम 279, 304अ, 338, 427 नुसार गुन्हयाची नोंद केली, मयत व्यक्तीचा मरणोत्तर पंचनामा करुन प्रेत पोस्ट मार्टमसाठी पाठविले.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव तालुका तहसिलदार जाफ्राबाद यांचे मार्फत गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 13.02.2007 रोजी आवश्यक कागदपत्रांसहीत दाखल केला. अद्याप पर्यंत प्रस्तावा बाबत कोणतीही माहीती प्राप्त झाली नाही अथवा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही.
गैरअर्जदार 1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या विमा पॉलीसीचा कालावधी दिनांक 10.04.2005 ते 09.04.2006 असून तक्रारदारांनी विमा प्रस्ताव दिनांक 13.02.2007 रोजी तहसिलदार यांचेकडे पॉलीसीचा कालावधी संपल्यानंतर दाखल केला आहे. तसेच सदरची तक्रार मुदतबाह्य दाखल केली आहे अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत दाखल केलेला विमा प्रस्ताव कागदपत्रांसहीत आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीकडे दाखल केला आहे. सदरील दावा विमा कंपनीच्या स्तरावर प्रलंबित आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार क्रमांक 1 चे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचे पती श्री.शंकरराव आनंदराव दुनगहू हे शेतकरी असून त्यांचा दिनांक 30.12.2005 रोजी अपघाती मृत्यू झाला आहे.
गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत त्यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला असून गैरअर्जदार 2 यांनी सदरील प्रस्ताव गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे कागदपत्रांसहीत पाठवला आहे.
गैरअर्जदार 1 विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू दिनांक 30.12.2005 रोजी झाला आहे. सदर पॉलीसीचा कालावधी दिनांक 10.04.2005 ते 09.04.2006 आहे. तक्रारदारांनी पॉलीसीचा कालावधी संपूष्टात आल्यानंतर दिनांक 13.02.2007 रोजी मुदतबाह्य विमा प्रस्ताव दाखल केला आहे. तसेच सदरची तक्रार मुदतबाह्य दाखल केली आहे.
महाराष्ट्र शासनाने सदरची योजना शेतक-यांकरीता कल्याणकारी योजन राबवलेली आहे. त्यामुळे विलंबाच्या तांत्रिक कारणास्तव निकाली करणे उचित होणार नाही. गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रादारांचा प्रस्ताव गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे प्रलंबित आहे.
तक्रारदारांनी सदर प्रकरणात दिनांक 05.10.2013 रोजी दिलेल्या अर्जात नमूद केल्या प्रमाणे तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार 1 विमा कंपनीकडे प्रलंबित असून त्याचा विमा दावा क्रमांक MUM/-000/-3628असा आहे. तक्रारदारांनी सदर प्रकरणात अर्जा सोबत 7/12 उतारा, फेरफार, एफ.आय.आर, चार्जशिट, घटनास्थळ पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, इनक्वेस्ट पंचनामा वगैरे कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार 1 विमा कंपनीने विलंबाचा तांत्रिक मुद्दा वगळून गुणवत्तेवर निकाली करणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव विलंबाचा तांत्रिक मुद्दा वगळून आदेश मिळाल्या पासून 60 दिवसात गुणवत्तेवर निकाली करावा.
- खर्चा बाबत आदेश नाही.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.