(घोषित दि. 08.08.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे रुग्णालयात दिनांक 30.10.2009 रोजी कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली होती. सदरची शस्त्रक्रिया असफल झाली व त्यांना पुन्हा गर्भधारणा झाली. त्या केसची एम.टी.पी म्हणून नोंद घेण्यात आली व त्या बाबतचे प्रमाणपत्र दिनांक 30.06.2011 रोजी जिल्हा महिला रुग्णालय जालना यांनी दिले आहे. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 13.10.2011 रोजी शासनाच्या कुटूंब कल्याण विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला परंतू त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तक्रारदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना लेखी नोटीसही पाठवली. परंतू गैरअर्जदारांनी नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारी सोबतरुग्णालयाचे पत्र, शस्त्रक्रिया अहवाल, वैद्यकीय अधिकारी यांची प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार 1 व 3 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्यात आली. गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या लेखी युक्तीवादा नुसार त्यांना दिनांक 18.10.2011 रोजी तक्रारदारांचा अर्ज प्राप्त झाला. त्यानुसार वैद्यकीय अधिक्षक, भोकरदन यांचेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यांनी मान्यता दिल्यावर दिनांक 25.01.2012 रोजी प्रकरण आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठवले दिनांक 06 नोव्हेंबर 2012 रोजी तक्रारदारांच्या नावे 30,000/- रुपयांचा धनादेश त्यांना मिळाला. त्यांनी तो घेवून जाण्याबद्दल तक्रारदारास दूरध्वनीने कळवले तसेच दिनांक 12.11.2012 रोजी पत्र ही पाठवले ते त्यांना दिनांक 20.12.2012 ला मिळाले. परंतू तक्रारदारांनी धनादेश घेण्यास टाळाटाळ केली. आता धनादेशाची मुदत संपली आहे तरी तक्रारदार धनादेश घेण्यास तयार असल्यास सदर धनादेश विमा कंपनीकडे दिनांकाचे पुर्नजिवन करण्यासाठी पाठवण्यात येईल व तो धनादेश तक्रारदारास देण्यात येईल.
परंतू सदर गैरअर्जदारांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केलेली नाही. तक्रारदारांनीच धनादेश स्वीकारण्यात टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तिला व्याज मागण्याचा हक्क नाही. तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केली आहे ती फेटाळण्यात यावी. त्यांनी आपल्या लेखी जबाबासोबत त्यांचे कार्यालयाचे पत्र आर.पी.ए.डी ने तक्रारदाराला पाठवलेले पत्र, त्यांची पोहोच पावती, धनादेशाची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली.
गैरअर्जदार क्रमांक 1 च्या म्हणण्यानुसार त्यांनी दिनांक 27.10.2012 रोजी विमा प्रस्ताव मंजूर केला आणि धनादेश क्रमांक 861061 जालना येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठवला. त्यांनी तो तक्रारदाराकडे पाठवणे आवश्यक होते त्यामुळे या प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 यांची सेवेतील कमतरता नाही. सबब त्यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. जी.एन.ढवळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार व गैरअर्जदार क्रमांक 3 चे विद्वान वकील श्री. ए.डी.मते यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील मुद्दे स्पष्ट होतात.
- तक्रारदार हीची कुटूंब-नियोजन शस्त्रक्रिया दिनांक 30.10.2009 रोजी झाली होती. परंतू तक्रारदार यांना पुन्हा गर्भधारणा झाली व त्यांना एम.टी.पी करावी लागली. त्याचे जिल्हा महिला रुग्णालयाचे दिनांक 30.06.2011 चे प्रमाणपत्र दाखल आहे. या बाबत दोन्ही पक्षात दुमत नाही.
- गैरअर्जदार क्रमांक 3 यांना तक्रारदारांचा अर्ज दिनांक 18.10.2011 रोजी प्राप्त झाला तो त्यांनी दिनांक 25.01.2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठवला.
- तक्रारदारावरील शस्त्रक्रिया असफल झाली. म्हणून विमा रक्कम रुपये 30,000/- चा धनादेश दिनांक 27.10.2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांच्या नावे गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे पाठवला होता.
- गैरअर्जदार क्रमांक 3 यांना तो चेक प्राप्त झाल्यावर त्यांनी तक्रारदारांना दुरध्वनीने धनादेश घेवून जाण्यासंबंधी कळवले. दिनांक 15.12.2012 रोजी तक्रारदारांनी रजिस्टर्ड पोस्टाने पत्र पाठवले. त्याची पोहोच पावती गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी दाखल केलेली आहे. परंतू त्यावर सोमनाथ कडूबा काटकर या नावाने स्वाक्षरी केलेले दिसते आहे. तक्रारदार म्हणतात की, त्यांना गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडून धनादेश घेवून जाण्यासंबंधी काहीही कळवले गेले नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तक्रारदारांना धनादेश बाबत काही कळवले असल्याचा सबळ पुरावा मंचा समोर नाही.
वरील विवेचनावरुन गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांचेकडे प्रस्ताव आल्यानंतर त्यावर निर्णय घेऊन दिनांक 27.10.2012 रोजी तक्रारदारांच्या नावे रक्कम रुपये 30,000/- चा धनादेश क्रमांक 861061 गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे पाठवला होता. त्यामुळे त्यांनी सेवेत काहीही कमतरता केलेली नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे. यावरुन गैरअर्जदार क्रमांक 3 यांचेकडे धनादेश प्राप्त होवूनही त्यांनी तक्रारदारांना त्यासंबंधी योग्य प्रकारे सूचना दिली नाही असे दिसते. (गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी जी पोहोच पावती दाखल केली आहे त्यावर तक्रारदार अथवा त्यांचे तर्फे कोणाचीही स्वाक्षरी दिसत नाही.) त्यामुळे तक्रारदारांना विमा रकमेचा धनादेश मुदतीत मिळाला नाही. यावरुन गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे असा मंच निष्कर्ष काढत आहे. धनादेशाची वैधता आता संपली आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी धनादेश गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे परत पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांचे नावे नविन धनादेश देणे तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्यांनी दिलेल्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारांचे जे आर्थिक व शारिरीक नुकसान झाले त्यापोटी तक्रारदारांना 9 टक्के दराने व्याज देणे उचित ठरेल असे मंचाला वाटते.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- गैरअर्जदार क्रमांक 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी धनादेश क्रमांक 861061 आदेश प्राप्ती पासून आठ दिवसांचे आत गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे पाठवावा.
- गैरअर्जदार क्रमांक 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी धनादेश मिळाल्या पासून आठ दिवसांचे आत तक्रारदारांच्या नावाने रुपये 30,000/- (अक्षरी रुपये तिस हजार फक्त) चा नविन धनादेश पाठवावा.
- गैरअर्जदार क्रमांक 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना रुपये 30,000/- इतक्या रकमेवर दिनांक 27.10.2012 पासून तक्रारीच्या निकाल तारखेपर्यंत (दिनांक 08.08.2013) पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने व्याज द्यावे.
- गैरअर्जदार क्रमांक 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 1,500/- (अक्षरी रुपये एक हजार पाचशे फक्त) द्यावा.