(घोषित दि. 05.02.2014 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार दमयंती शिंदे यांचे पती शिवदास शिंदे रा.हातडी ता.घनसावंगी जि. जालना येथील रहिवासी होत्या. त्यांचा मृत्यू दिनांक 03.03.2008 रोजी वाहन अपघातात झाला. मयत शिवदास व इतर लोक दिनांक 03.03.2008 रोजी वाहन क्रमांक एम.एच.21 व्ही 0101 महिंद्रा बोलेरो या गाडीतून जात असताना ट्रक क्रमांक आर.जे.19 जी 8656 या गाडीने धडक दिल्यामुळे बीड-गेवराई रस्त्यावर अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर भा.द.वि. कलम 279 अन्वये पोलीस स्टेशन गेवराई येथे गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर शव-विच्छेदन, मरणोत्तर पंचनामा करण्यात आला. उपरोक्त बोलोरो महिंद्रा या गाडीचा विमा पॉलीसी क्रमांक 3001/52908486/00/000 अंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनी यांचेकडे काढलेला होता. तिचा वैधता कालावधी दिनांक 07.11.2007 ते 06.11.2008 असा होता. त्या पॉलीसीत “P A Cover for unnamed passenger Rs.1,00,000/- असे नमूद करुन त्यासाठी रुपये 100/- एवढी हप्त्याची रक्कम आकारलेली आहे.
वरील अपघातानंतर दिनांक 30.03.2012 रोजी तक्रारदारांनी विमा प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह गैरअर्जदारांकडे रजिष्टर्ड पोस्टाने व युपीसीने पाठवला. तक्रारदारांनी आपल्या मयत पत्नीचा विमा दावा मोटार अपघात न्यायिक प्राधिकरण जालना यांचेकडे दाखल केला होता त्यातील आदेशानुसार तक्रारदारांना विमा रक्कम प्राप्त झाली आहे.
तक्रारदारांना व्यक्तिगत अपघात विम्या विषयी माहिती नसल्यामुळे प्रस्तुत विमा दावा उशीराने दाखल करण्यात आला आहे. परंतु उपरोक्त मोटार दाव्यात विमा कंपनी प्रतिवादी होती. त्यामुळे विमा कंपनी घटनेची माहिती त्यांना नव्हती असा बचाव होवू शकत नाहीत. तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे विमा दावा दाखल करुन सुध्दा गैरअर्जदारांनी तो मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीसोबत त्यांनी पॉलीसीची प्रत, गुन्हयाची प्रथम खबर, तक्रारदारांनी गैरअर्जदारांना पाठवलेली नोटीस, क्लेम फॉर्म, शव-विच्छेदन अहवाल, वाहन चालकाचा परवाना, घटनास्थळ पंचनामा इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबानुसार प्रस्तुतची तक्रार ही मुदतबाहय आहे. कारण मोटार अपघात दावा निकाली झाला असून नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदारांना प्राप्त झाली आहे. घटना 03.03.2008 रोजी घडली आहे व तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार 2012 मध्ये दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दिनांक 30.03.2012 रोजी विमा कंपनीकडे विमा दावा पाठवलेला आहे. परंतु विमा कंपनीला विहीत मुदतीत विमा दावा प्राप्त झालेला नाही. तक्रारदारांच्याच म्हणण्यानुसार त्यांनी दिनांक 30.03.2012 रोजी म्हणजेच अपघातानंतर चार वर्षांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला. म्हणजेच त्यांचा दावा मुद्तबाहय आहे. तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गैरअर्जदारांना योग्य त्या कागदपत्रांसह पोहोचला नसतानाच तक्रारदांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ती Premature आहे. वरील सर्व कारणांमुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचाची नोटीस मिळूनही मंचासमोर हजर झाले नाहीत. म्हणून तक्रार त्यांचे विरुध्द एकतर्फा चालवण्यात आली.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव व गैरअर्जदार 1 यांचे तर्फे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
- तक्रारदारांच्या पत्नीचा मृत्यू दिनांक 03.03.2008 रोजी अपघातात झाला तर तक्रारदारांच्याच कथना प्रमाणे त्यांनी दिनांक 30.03.2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे विमा प्रस्ताव पाठवला तो त्यांनी निकाली काढला नाही. म्हणून दिनांक 03.08.2012 रोजी प्रस्तुत तक्रार दाखल केली ती मुदतीत आहे. तक्रारदारांच्या वकीलांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदार अशिक्षित असल्यामुळे तिला अशा व्यक्तिगत अपघात दाव्या विषयी माहिती नव्हती. परंतु तक्रारीतील गैरअर्जदार मोटार अपघात दाव्यात प्रतिवादी असल्यामुळे त्यांना घटनेबाबत माहिती होती. त्यामुळे अपघाताची सुचना उशिरा मिळाली असा बचाव गैरअर्जदार कंपनीला घेता येणार नाही.
- गैरअर्जदारांच्या वकीलांनी युक्तीवादात सांगितले की, तक्रारदारांनी अपघातानंतर 4 वर्षांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत नमुन्यात क्लेम फॉर्म गैरअर्जदार यांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तक्रारदारांचा विमा प्रस्ताव मंजूर करता येत नाही म्हणून तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
- सदर घटनेत अपघात दिनांक 03.03.2008 रोजी झाला आहे. त्यानंतर तक्रारदारांनी मोटार वाहन प्राधिकरणात दावा दाखल केला व त्यात तक्रारदारांना नुकसान भरपाई देखील मिळाली आहे. तक्रारदारांच्याच कथनानुसार त्यांनी दिनांक 30.03.2012 रोजी गैरअर्जदारांना विमा दावा पाठवला. या सुमारे 4 वर्षाच्या विलंबाचे कोणतेही कारण तक्रारदारांनी तक्रारीत अथवा शपथपत्रात नमूद केलेले नाही. Indian Motor Tariff Mannual मध्ये जरी वैयक्तिक अपघाताचा क्लेम फॉर्म दाखल करण्याचा कालावधी नमूद केलेला नसला तरी विमा काराराच्या शर्तीनुसार तक्रारदारांनी कंपनीला विनाविलंब घटनेची माहिती द्यावयास हवी होती. कालावधी नमूद केलेला नसताना योग्य त्या कालावधीत “Within reasonable time” अशी नोटीस देणे आवश्यक होते. विमा कंपनी मोटार वाहन अपघात प्राधिकरणातील दाव्यात प्रतिपक्ष होती म्हणजेच त्यांना घटनेची माहिती होती. त्यामुळे वेगळी माहिती देण्याची आवश्यकता नाही हे तक्रारदारांचे म्हणणे मंच ग्राहय धरत नाही. तक्रारदारांनी विहीत नमुन्यात विमा कंपनीकडे विमा दावा आवश्यक त्या कागदपत्रांसह योग्य वेळेवर दाखल करावयास हवा होता. तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे वेळेत घटनेची नोटीस दिली नाही. त्यामुळे तक्रारदार विमा दाव्यापोटी कोणतीही रक्कम मिळण्यास पात्र नाहीत असा निष्कर्ष मंच काढत आहे.
मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.