(घोषित दि. 28.02.2014 व्दारा श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे जानेफळ दाभाडे ता.भोकरदन जि.जालना येथील रहिवासी आहे. तिचे पती सोमीनाथ साळूबा मिसाळ यांचा मृत्यू दिनांक 09.01.2006 रोजी रस्ता अपघातात झालेला आहे. घटनेची नोंद गुन्हा रजिस्टर क्रमांक 02/06 अन्वये घेण्यात आली. मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा करण्यात आला व शव-विच्छेदन ही करण्यात आले. मयत सोमीनाथ् यांचे नावे गट नंबर 280 जानेफळ दाभाडे ता.भोकरदन येथे शेतजमीन होती. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना ही कल्याणकारी योजना राबवलेली आहे. त्या अंतर्गत 2005-2006 साला साठीचा विमा हप्ता त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे भरला होता. दिनांक 20.02.2006 रोजी तक्रारदारांनी तहसीलदार भोकरदन यांचेकडे विमा प्रस्ताव दाखल केला. परंतू गैरअर्जदार विमा कंपनी यांनी तक्रारदारांचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केलेला नाही म्हणून तक्रारदारांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्या अंतर्गत तक्रारदार पतीच्या मृत्यू बाबत विमा रक्कम रुपये 1,00,000/- एवढया रकमेची व्याजासह मागणी करत आहेत.
आपल्या तक्रारी सोबत त्यांनी क्लेम फॉर्म, 7/12 चा उतारा, फेरफार नक्कल वारसा प्रमाणपत्र, शव-विच्छेदन अहवाल, प्रथम खबर, घटनास्थळ पंचनामा अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार विमा कंपनीने मंचा समोर हजर होवून आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार प्रस्तुत तक्रार मुदतबाहय आहे व तक्रारदारांनी विमा दावा दाखल न करताच तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांना तक्रारदारांचा दावा प्राप्त झालेला नाही. मा. राष्ट्रीय अयोगात दाखल झालेल्या अपील क्रमांक 27/08 मधील कबाल इन्शुरन्सने दिलेल्या यादीत या तक्रारदारांच्या दाव्याचा उल्लेख नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी.
तक्रारदारांच्या वकीलांनी मा.राष्ट्रीय अयोगाच्या अपील क्रमांक 27/08 मधील अंतरिम आदेशाची प्रत तसेच या मंचाच्या तक्रार क्रमांक 40/2009 मधील आदेशाची प्रत, मा.राज्य आयोग मुंबई परिक्रमा खंडपीठ, औरंगाबाद यांच्या अपील क्रमांक 265/2009 मधील आदेशाची प्रत दाखल केली.
तक्रारदारांच्या वकीलांच्या युक्तीवादानुसार मा.राष्ट्रीय आयोगाच्या अपील क्रमांक 27/08 महाराष्ट्र शासन /वि/ आय.सी.आय.सी.आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स या अपीलात कबाल इन्शुरन्स कंपनीने गैरअर्जदार यांचेकडे प्रलंबित असलेल्या दाव्यांची जी यादी दिली आहे त्यात तक्रारदार यांच्या प्रस्तावाचा समावेश आहे. त्यांनी त्या यादीची झेरॉक्स प्रत मंचात दाखल केली. परंतू गैरअर्जदार यांच्या वकीलांच्या युक्तीवादानुसार तक्रारदारांच्या विमा प्रस्तावाचा वरील यादीत समावेश नाही व त्यांनी दाखल केलेली यादी चुकीची आहे. तक्रारदारांनी तक्रारी सोबत दाखल केलेल्या यादीत मयत सोमनाथ मिसाळ यांचा उल्लेख असल्याचे दिसत नाही.
तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार क्रमांक 40/2009 या मंचाने मुदतीनंतर दाखल केल्यामुळे नामंजूर केली आहे. त्याच प्रमाणे मा.राज्य आयोगाने देखील अपील क्रमांक 265/2009 तक्रार मुदतबाहय आहे असा मंचाचा आदेश योग्य आहे असे नमूद करुन फेटाळले आहे. अशा परिस्थितीत या मंचाला आता ही तक्रार चालवता येणार नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.