(घोषित दि. 25.01.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे
तक्रारदारांनी दिनांक 30.10.2009 रोजी शेतीकाम व इतरकामा करीता ट्रॅक्टर अंबरीश ट्रॅक्टर्स यांच्याकडून विकत घेतले. सदर ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांचेकडून वित्त सहाय्य घेतले. तसेच ट्रॅक्टरची विमा पॉलीसी दिनांक 20.11.2009 ते 19.11.2010 या कालावधीची गैरअर्जदार यांचेकडून घेतली आहे.
दिनांक 18.04.2010 रोजी ट्रॅक्टर जालना येथून मिक्सर/रोटोव्हेटर (जमीन भूसभूशीत करणारे यंत्र) दूसरीकडे नेण्यासाठी तक्रारदारांचा ड्रायव्हर सदर ट्रॅक्टर घेवून गेले. जालना रेल्वे स्टेशन येथे सदर मिक्सर, ट्रॅक्टरला जोडून रात्री उभे केले. सदरचे ट्रॅक्टर, मिक्सर सहीत ड्रायव्हरला झोप लागल्यामूळे चोरीला गेल्याचे सकाळी लक्षात आले. ड्रायव्हरने सदर ट्रॅक्टर शोधण्याचा बराच प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस स्टेशन कदीम येथे तक्रार नोंदवून दिनांक 24.04.2010 रोजी गुन्हा नोंदवला. पोलीसांनी आरोपीचा व ट्रॅक्टरचा शोध घेतला. परंतू सापडले नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 173 प्रमाणे अंतीम अहवाल संबंधित न्यायालयात दाखल केला.
तक्रारदारांनी ट्रॅक्टरची नूकसान भरपाई मिळण्याकरीता गैरअर्जदार यांचेकडे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासहीत दाखल केला. परंतू गैरअर्जदार यांनी वेगवेगळी कारणे देवून सदरचा प्रस्ताव नाकारल्यामूळे सदरची तक्रार दाखल केली आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 24.10.2011 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांना ट्रॅक्टरची “farmer package policy” दिनांक 20.11.2009 ते 19.11.2010 या कालावधीची दिल्याचे मान्य आहे. ट्रॅक्टर चोरी संदर्भातील पोलीस पेपर्स प्रमाणे तक्रारदारांनी सदर ट्रॅक्टर संजय कदम यांना भाडे तत्वावर दिल्याचे दिसून येते. त्यामूळे पॉलीसीतील अटी व शर्तींचा भंग झाल्यामूळे तक्रारदारांना नूकसान भरपाई रक्कम देता येत नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री. आर.पी.इंगोले व गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री.संदीप देशपांडे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडून ट्रॅक्टरची “farmer package Insurance”
दिनांक 20.11.2009 ते 19.11.2010 या कालावधीची घेतल्याची बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. सदर ट्रॅक्टरची चोरी दिनांक 18.04.2010 रोजी विमा कालावधीत झालेली आहे.
गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांचा ट्रॅक्टर जालना येथील रेल्वे स्टेशन वरुन चोरी झाला. त्यावेळी संजय कदम या व्यक्तीला भाडे तत्वावर दिलेला असल्याचे पोलीस पेपर्सवरुन दिसून येते. परंतू गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचा ट्रॅक्टर भाडे तत्वावर दिल्या बाबतचा कोणताही स्वतंत्र पूरावा न्याय मंचासमोर दाखल केला नाही. तसेच तक्रारदाराचे ट्रॅक्टर रेल्वे स्टेशन परिसरात उभे असतांना चोरीला गेलेले असल्यामुळे ट्रॅक्टर भाडयाने देण्याचा व चोरीचा संबंध जोडणे योग्य ठरत नाही. व त्यामुळे तक्रारदाराने वाहन भाडयाने देवून पॉलीसीतील अटीचे उल्लघंन केले हे विमा कंपनीचे म्हणणे योग्य ठरत नाही.
तक्रारदारांनी गैरअर्जदार यांच्याकडे ट्रॅक्टरची “farmer package policy”घेतलेली असून ट्रॅक्टरची चोरी विमा कालावधीत झालेली आहे. त्यामुळे पॉलीसीतील नियमानूसार तक्रारदारांना नूकसान भरपाईची रक्कम रुपये 4,65,000/- देणे गैरअर्जदार यांचेवर बंधनकारक आहे.
गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना पॉलीसीतील नियमानूसार नूकसान भरपाईची रक्कम दिली नाही. गैरअर्जदार यांची सदर कृती सेवेत कसूरीची असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अयोग्यरित्या तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नामंजूर केल्याचे स्पष्ट होते असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना ट्रॅक्टर चोरीची नूकसान भरपाईची रक्कम रुपये 4,65,000/- (रुपये चार लाख पासष्ठ हजार फक्त) आदेश मिळाल्या पासून एक महिन्याचे आत द्यावी.
- खर्चा बाबत आदेश नाही