नि. २२
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २०१/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २७/०४/२०१०
तक्रार दाखल तारीख : १७/०६/२०१०
निकाल तारीख : १७/११/२०११
----------------------------------------------------------------
लियाकत बादशाह बागणीकर
वय वर्षे ५४, धंदा – व्यापार
रा.घर नं.२३, हडको कॉलनी,
लक्ष्मी देवळाजवळ, कुपवाड रोड, सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
शाखाधिकारी,
दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि.
विभागीय ऑफिस कार्यालय, २०४/३,
नवीन शाहुपूरी, स्टेशन रोड, कोल्हापूर .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷. कु.वैशाली एस.पवार
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री बी.बी.खेमलापुरे
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपले वाहनाच्या अपघात विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांचे मालकीचे टाटा ९०९ हे वाहन असून सदर वाहनाद्वारे तक्रारदार हे मालाची ने-आण करतात. सदर वाहनाचा विमा तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे उतरविला आहे. दि.१६/१०/२००९ रोजी तक्रारदार यांचा ड्रायव्हर रावसाहेब वाघमोडे हा सदरचे वाहन घेवून सांगलीकडे येत असताना ड्रायव्हर वाघमोडे व क्लिनर अब्दुल रज्जाक हे रात्री ११.०० चे सुमारास जेवण करण्यासाठी शिरढोण येथे वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करुन थांबले. तक्रारदार यांचा ड्रायव्हर व क्लिनर जेवण करीत असतानाच रस्त्याने भरधाव वेगाने जाणा-या लक्झरी बसने सदर वाहनास जोरदार धडक दिली. त्यामध्ये वाहनाची उजवी बाजू पूर्णपणे खराब झाली. तसेच वाहनाची चासीस पूर्णपणे मोडली होती. सदर अपघाताची वर्दी तात्काळ पोलिस स्टेशनला दिली. तक्रारदार यांनी वाहनाची संपूर्ण दुरुस्ती करुन विमा कंपनीकडे नुकसान मिळावे यासाठी विनंती केली. परंतु विमा कंपनीने दि.२२/२/१० चे पत्राने ड्रायव्हरचे लायसेन्स रिन्यू केले नसल्याने विमादावा नाकारला. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने १९ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी नि.१३ वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी पॉलिसीबद्दलचा मजकूर मान्य केला आहे. अपघाताचेवेळी वाहन चालविणा-या ड्रायव्हरकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता त्यामुळे पॉलिसीमधील महत्वाच्या शर्ती व अटीचा भंग झाला आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर होणेस पात्र नाही. अपघाताचे वेळेस ड्रायव्हर, क्लिनर जेवण करण्यासाठी थांबले होते ही बाब जाबदार यांनी अमान्य केली आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत वाहनाची विमा पॉलिसी दाखल केली नाही. तक्रारदार यांनी पॉलिसीमधील महत्वाच्या अटी व शर्तीचा भंग केला असल्यामुळे तक्रारदार हे विमारक्कम मिळण्यास पात्र नाहीत. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा.
४. तक्रारदार यांनी नि.१५ वर शपथपत्राच्या स्वरुपात प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.१६ ला पुरावा संपला अशी पुरशिस दाखल केली आहे तसेच १७ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.२० ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे, तक्रारदारांचे प्रतिउत्तर व दोन्ही बाजूंचा दाखल करण्यात आलेला लेखी युक्तिवाद व ऐकण्यात आलेला तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार यांचा विमा दावा नाकारुन जाबदार यांनी
तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे का ? होय.
२. तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र आहेत का ? होय.
३. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१ –
तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे त्यांचे वाहनाबाबत विमा उतरविला होता ही बाब जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये मान्य केली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी ज्या कारणास्तव फेटाळला, ते विमा दावा फेटाळलेचे दि.२२/२/२०१० चे पत्र तक्रारदार यांनी नि.५/१९ वर दाखल केलेले आहे. सदर पत्रामध्ये वाहन चालक रावसाहेब वाघमोडे यांच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता. या एकाच कारणास्तव विमादावा फेटाळणेत आला आहे. वाहन चालक रावसाहेब वाघमोडे यांच्या वाहन चालविण्याच्या परवान्याची झेरॉक्सप्रत याकामी नि.५/५ वर दाखल आहे. सदर प्रतीवरुन सदरचा परवाना हा एल.एम.व्ही. (एन.टी.) या स्वरुपाचा असल्याचे दिसून येते. वाहनाच्या आर.सी.बुकची प्रत नि.५/१६ वर दाखल आहे. सदर आर.सी.बुकवरुन वाहनाचे ग्रॉस व्हेईकल वेट हे ९६०० किलोग्रॅम इतके असल्याचे दिसून येते. सदरचे वाहन हे ट्रान्स्पोर्ट व्हेईकल या प्रकारातील आहे. त्यामुळे वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता ही बाब स्पष्ट होते. परंतु वाहन चालविणाराकडे वैध परवाना नव्हता केवळ एवढेच कारण प्रस्तुतचा विमा दावा नाकारण्यास पुरेसे आहे का ? हे प्रस्तुत प्रकरणी ठरविणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी सदर वाहनाचा अपघात हा वाहन पार्कींगला लावले असलेनंतर व ड्रायव्हर व क्लिनर जेवत असताना झाला असल्याचे नमूद केले आहे. अपघात दि.१६/१०/२००९ रोजी रात्री ११.०० चे सुमारास झाला आहे. सदर अपघाताची वर्दी कवठेमहांकाळ पोलिस स्टेशनला दि.१७/१०/२००९ रोजी रात्री ००.४५ वा. दिली असल्याचे नि.५/२ वरुन दिसून येते. यावरुन अपघाताची वर्दी ड्रायव्हर रावसाहेब वाघमोडे यांनी तात्काळ पोलिस स्टेशनला दिली आहे. सदर वर्दी जबाबामध्ये ड्रायव्हर व क्लिनर हे जेवण करण्याकरिता टेम्पो पार्कींगला लावून गेले असता सदर टेम्पोस लक्झरी बसने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचे नमूद आहे. यावरुन अपघातसमयी सदर टेम्पोमध्ये ड्रायव्हर व क्लिनर नव्हते ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी सदरचे ड्रायव्हर टेम्पो चालवित असताना अपघात झाला असे दर्शविणारा कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे सदरचा अपघात हा वाहन पार्कींगला लावल्यानंतर झाला असल्याची बाब प्रामुख्याने स्पष्ट होते. वाहन पार्कींगला लावल्यानंतर अपघात झाला असेल व सदर अपघातामध्ये ड्रायव्हरची कोणतीही चूक नसेल तर ड्रायव्हरचा केवळ वाहन चालविणेचा परवाना वैध नाही या कारणास्तव विमादावा नाकारता येईल का ? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार व जाबदार यांनी याकामी अनेक निवाडे दाखल केलेले आहेत. जाबदार यांनी दाखल केलेले निवाडे हे वैध परवाना नसताना वाहन चालवून अपघात झाला असेल तर त्याबाबत ऊहापोह करणारे आहेत. तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेल्या सन्मा.सर्वोच्च न्यायालयाचा 2003 (6) Supreme Court cases Page No.420 हा जितेंद्रकुमार विरुध्द ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी मध्ये पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढला आहे. Section 149(2)(a)(ii) of the Motor Vehicles Act empowers the insurance company to repudiate a claim wherein the vehicle in question is damaged due to an accident to which driver of the vehicle who does not hold the valid driving license is responsible in any manner. It does not empower the insurance company to repudiate a claim for damages which has occurred due to acts to which the driver has not, in any manner, contributed that is damages incurred due to reasons other than the act of the driver. सदर निष्कर्षाचे अवलोकन केले असता सदरचा अपघात हा तक्रारदार यांच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला आहे ही बाब स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्या कारणास्तव विमादावा नाकारणे समर्थनीय ठरत नाही त्यामुळे तक्रारदार यांचा विमादावा नाकारुन जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
७. मुद्दा क्र.२
तक्रारदार यांनी वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेला खर्च रु.२,०५,०३९/- इतक्या रकमेची व्याजासह मागणी केली आहे. तसेच शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारअर्जाच्या खर्चाची मागणी केली आहे. जाबदार यांनी सदर खर्चाबाबत आक्षेप घेतला आहे. तथापि जाबदार यांनी प्रस्तुत प्रकरणामध्ये कोणताही सर्व्हेअरचा अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी पार्ट बदलण्यासाठी आलेला खर्च रक्कम रु.१,४७,९८९/- ची मागणी तक्रारअर्जात केली आहे व त्याच्या पुष्ठयर्थ पंडीत ऑटोमोटीव्ह लि. यांचे बिल नि.५/६ वर दाखल केले आहे. सदरच्या बिलाचे अवलोकन केले असता सदरचे बिल हे एकूण रु.१,४७,८८९/- असल्याचे दिसून येते. तसेच मजुरीसाठी रु.५४,३५०/- ची मागणी केली आहे. त्याबाबतचे अशोक ऑटोमोटीव्ह सेल्स ऍण्ड सर्व्हिसेस यांचे बिल नि.५/७ वर दाखल आहे. सदरचे बिल रु.५४,३५०/- इतक्या रकमेचे आहे व वाहन सांगलीस आणण्याच्या खर्चाबाबत रक्कम रु.२,८००/- ची मागणी केली आहे व त्याबाबत साई क्रेन सर्व्हिसेस यांचेकडील पावतीची प्रत नि.५/५ वर दाखल केली आहे. यावरुन तक्रारदार यांच्या वाहन दुरुस्तीसाठी रु.२,०४,९३९/- इतका खर्च आला असल्याचे सदर पावतीवरुन दिसून येते. त्यामुळे सदरची रक्कम अपघात तारखेपासून द.सा.द.शे.९ टक्के व्याजासह मंजूर करणेत येत आहे.
८. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी अयोग्य कारणास्तव नाकारलेने तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार यांना त्यांच्या वाहनाच्या नुकसानीपोटी रक्कम रु.२,०४,९३९/- (रुपये दोन लाख
चार हजार नऊशे एकोणचाळीस फक्त) व सदर रकमेवर दि.१६/१०/२००९ पासून
द.सा.द.शे.९ टक्के दराने व्याज अदा करावे असा असा जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये ५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) अदा करावेत.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी दिनांक २/१/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक
संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: १७/११/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११