नि. 14
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य : श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2302/2009
-----------------------------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 09/12/2009
तक्रार दाखल तारीख : 03/04/2010
निकाल तारीख : 16/05/2013
-----------------------------------------------------------------
श्री रविंद्र नारायण भोसले
वय वर्षे 46, धंदा– नोकरी
रा.गणपती मंदिराजवळ, बामणोली (संकल्पनगर)
पोस्ट कुपवाड एम.आय.डी.सी.
ता.मिरज जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक
स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा – ठाणे कलेक्टर कॅम्पस,
नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग,
कोर्ट नाक्याजवळ, ठाणे महाराष्ट्र - 400 601 ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री ए.बी.शेलार
जाबदार : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्य - श्री के.डी.कुबल
1. प्रस्तुत प्रकरणात जाबदार यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यामध्ये रक्कम असूनसुध्दा पैशांची अत्यंत गरज असताना तक्रारदाराचे खाते जाबदारने ब्लॉक केले, त्यामुळे पैसे मिळू शकले नाहीत. म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2. सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील असा –
तक्रारदार हे ठाणे पोलीस मुख्यालयात नाईक पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्यांचे महिन्याचे वेतन जाबदार बँक शाखेत जमा होते. तक्रारदार यांचा मुलगा गंभीर आजारी असलेने ते ऑगस्ट 2009 ते ऑक्टोबर 2009 या कालावधीत ते डयूटीवर हजर राहू शकले नव्हते. त्या कालावधीचे वेतन रु.60543.47 पैसे जाबदार बँकेत जमा होते. तक्रारदाराने कुटुंबाचे गरजेसाठी व मुलाचे औषधपाण्याचे खर्चासाठी सदरची रक्कम ए.टी.एम. मशिनमार्फत काढणेचा प्रयत्न केला असता ए.टी.एम. मशिनवर Block Positing (ब्लॉक पॉझिटींग) असा शेरा येवून पैसे निघाले नाहीत. त्याबाबत तातडीने तक्रारदार यांनी जाबदार यांचेशी फोनवर तसे प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता समर्पक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.11/11/2009 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली. त्या नोटीशीस जाबदार यांनी उत्तर देवून आर.पी.एस.ठाणे यांचे पत्रावरुन खाते ब्लॉक केले असे कळविले. तथापि याबाबत लेखी पुरावा कोणताही दिलेला नाही. जाबदार यांनी कळविलेला खुलासा हा पूर्णपणे धादांत खोटा असून आर.पी.एफ.ठाणे यांना जाबदार यांनी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. जाबदार यांनी जाणुनबुजून तक्रारदार यांचे खातेवरील रक्कम बेकायदा ब्लॉक केली. जाबदार यांचे कृत्यामुळे तक्रारदारावर उपासमारीची वेळ आली आणि शिवाय आजारी मुलास ते पैशाअभावी योग्य प्रकारे औषधपाणी करु शकले नाहीत. जाबदार यांचे या कृत्यामुळे तक्रारदारास मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदार यांना जाबदार यांनी दूषित सेवा दिल्याबद्दल दोषी धरणेत येवून जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना रु.10,000/- वसूल करुन मिळावेत तसेच तक्रारअर्जाचा खर्चसुध्दा जाबदार यांचेकडून मिळावा अशी मागणी तक्रारदार यांचेकडून करण्यात आली आहे.
3. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने स्वतःचे शपथपत्रासह नि.5 सोबत एकूण 5 कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार यांना नोटीस मिळूनसुध्दा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले नाही अथवा मंचात उपस्थिती दर्शविली नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द नि.2 वर एकतर्फा आदेश पारीत करणेत आला.
5. तक्रारदाराचे लेखी कथन, तक्रारीचे सोबत त्याने जोडलेली कागदपत्रे तसेच तक्रारदाराच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंच खालील निष्कर्षाप्रत येत आहे.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1 |
तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
अ. जाबदार यांना नोटीस मिळूनही त्यांनी मंचासमोर तक्रारदाराच्या तक्रारीला लेखी प्रत्युत्तर दिलेले नाही, तसेच उपस्थिती दर्शविलेली नाही. तक्रारदाराच्या नोटीशीला दिलेल्या उत्तर नि.क्र.5/2 वरुन असे दिसते की, आर.पी.एफ. चे निर्देशावर अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. म्हणजेच तक्रारदाराचे जाबदार बँकेत अकाऊंट होते हे सिध्द होते म्हणजेच पर्यायाने तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक सेवादार हे नाते होते. म्हणून तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक ठरतात.
ब. तक्रारदाराच्या अकाऊंटमध्ये पैसे असूनसुध्दा जाबदार यांनी आर.पी.एफ. ठाणे यांचे पत्रावरुन खाते ब्लॉक केले असे कळविले. मात्र याबाबत लेखी पुरावा म्हणून पत्र दाखल केलेले नाही. आर.पी.एफ. ठाणे यांचे पत्र दाखल करणे अत्यावश्यक होते. ते सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराला जाबदार यांनी पैसे देणेचे नाकारणे ही निश्चितपणे दूषित सेवा ठरते आणि मुख्यतः जाबदार यांनी मंचामध्ये उपस्थिती न दर्शविल्याने तक्रारदाराने तक्रारीत मांडलेले सर्व मुद्दे मान्य केल्यासारखेच आहे. त्यामुळे तक्रारदाराने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे जाबदार यांनी दूषित सेवा दिल्याबद्दल दोषी धरणेत येवून रक्कम रु.10,000/- वसूल करुन मिळावेत तसेच अर्जाचा खर्च जाबदारकडून मिळावा हया केलेल्या मागण्या मंजूर करणे क्रमप्राप्त आहे. सबब आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना दूषित सेवा दिल्याबद्दल रक्कम रु.10,000/- देण्याचे आदेश जाबदार यांना देण्यात येत आहेत.
3. जाबदार यांनी तक्रारदाराला प्रकरण खर्चापोटी रु.1,000/- देणेचे आदेश देण्यात येत आहेत.
4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदार यांनी 45 दिवसांत करावी. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 16/05/2013
(के.डी. कुबल ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष