जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 182/2011 तक्रार दाखल तारीख – 13/12/2011
तक्रार निकाल तारीख– 10/05/2013
मनिषा भ्र.अविनाश गंडले
वय 40 वर्षे, धंदा नौकरी,
रा.नगर रोड,बीड ता.जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
1. शाखाधिकारी
स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, कृषी शाखा,
नगर रोड,बीड. ...गैरअर्जदार
2. शाखाधिकार,
बँक ऑफ इंडिया, महावीर पेट्रोल पंपा समोर,
जालना रोड,बीड ता.जि.बीड.
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.एन.एम.कुलकर्णी
गैरअर्जदार क.1 व 2 तर्फे – अँड.डी.बी.कुलकर्णी
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांचे गैरअर्जदार क्र.1 या बँकेत खाते असून सदरील खात्यामधील व्यवहार करण्यासाठी त्यांना एटीएम सुविधा देण्यात आली आहे. त्यांचा क्रमांक 5044352002700021913 असा आहे. तक्रारदारांनी दि.25.5.2011 रोजी बँक ऑफ इंडियाच्या जालना रोड एटीएम मधून रक्कम रु.40,000/- काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रत्येकी रु.10,000/- प्रमाणे रु.30,000/- एटीएम द्वारे मिळाले परंतु चौथ्या वेळी एटीएम मधून पैसे आले नाही मात्र रक्कम रु.40,000/- काढल्याचे दिसले.
तक्रारदारांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चौकशी केली असता त्यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद येथे चौकशी करण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदारांनीदि.26.5.2011 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे लेखी तक्रार दिली. ती तक्रार संबंधीत कर्मचा-यांनी सर्विस डिपार्टमेंटला पाठवली परंतु रक्कम मिळाली नाही. म्हणून दि.13.7.2011 रोजी पुन्हा चौकशी केली असता समजे की, तक्रार सर्विस डिपार्टमेंटला पाठवत असताना चुकीचा नंबर टाकला गेला. नंतर तक्रारदारांनी पुन्हा दि.13..7.2011 रोजी गैरअर्जदार यांचेकडे लेखी अर्ज दिला. परंतु बँकेने अर्जदाराला रक्कम दिलेली नाही. म्हणून तक्रारदारांची तक्रार आहे त्या अंतर्गत ते चुकीची रु.10,000/- ची नोंद दुरुस्त व्हावी, तसेच अर्जदारास त्यांला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार खर्च रु.2,000/- देण्याचा आदेश व्हावा तसेच बँकेचया एटीएम च्या नियमांनुसार दंड आकारण्यात यावा अशी मागणी करत आहेत.
गैरअर्जदार क्र.1 व 2 मंचासमोर हजर झाले. गैरअर्जदार क्र.1 यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार गैरअर्जदार क्र.1 यांच्या ग्राहक आहेत परंतु तक्रारीत त्यांनी एटीएम क्रमांक चुकीचा दर्शवला आहे. त्यांचा एटीएम क्रमांक 5044352002700001913 आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जालना रोड शाखेतून रु.30,000/- प्रत्येकी रु.10,000/- प्रमाणे काढले. चौथ्या वेळी देखील रु.10,000/- एटीएम मशीन बाहेर आले पण तक्रारदाराने ते तात्काळ काढून न घेतल्याने ते मशीनमध्ये परत गेले. तक्रारदाराने दि.26.5.2011 रोजीला तक्रार अर्ज दिला परंतु त्यात कोठेही एटीएम क्रमांक नव्हता. म्हणून संबंधीत कर्मचा-याने त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी चुकीचा क्रमांक सांगितला त्याप्रमाणे कर्मचा-याने तक्रार सर्विस डिपाटेमेंटला पाठवली ती त्यांनी नामंजूर केली. तक्रारदाराने पुन्हा दि.13.7.2011 रोजी योग्य एटीएम क्रमांक देऊन तक्रार दिली. त्याप्रमाणे तक्रारीची दखल घेऊन दि.7.9.2011 रोजी रक्कम रु.10,000/- तक्रारदाराच्या खात्यात जमा झाली आहे. दि.26.5.2011 रोजीच्या अर्जात जर एटीएम क्रमांक आला असता तर अशी चुक झाली नसती. सबब यात गैरअर्जदार क्र.1 ची काहीही सेवेतील त्रुटी नसून तक्रारदाराच्या चुकीमुळे सदरचा प्रकार घडला आहे. सबब तक्रार नामंजूर करावी.
गैरअर्जदार क्र.2 च्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे. गैरअर्जदार क्र.2 च्या एटीएम मशीनचा उपयोग फक्त पैसे काढण्यासाठी झालेला आहे. सबब, त्यांचे विरुध्दची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
तक्रारदारातर्फे विद्वान वकील श्री.एन.एम.कुलकर्णी व गैरअर्जदारातर्फे विद्वान वकील श्री.डी.बी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रात दि.26.5.2011 रोजीचा तक्रारदाराचा अर्ज आहे. त्यावर एटीएम क्रमांकाचा उल्लेख दिसत नाही. दि.13.7.2011 रोजीच्या अर्जात मात्र एटीएम क्रमांकाचा उल्लेख आहे. दाखल कागदपत्रात एटीएम च्या पावत्या व सर्विस डिपार्टमेंटने नामंजूर केलेली तक्रार ही आहे.
तक्रारदाराच्या वकिलांनी युक्तीवादात सांगितले की, एटीएम मशीन मधून पैसे आले परंतु तात्काळ काढून न घेतल्याने परत मशीनमध्ये गेले हे गैरअर्जदारांचे विधान चुकीचे आहे. त्यांनी एटीएम क्रमांक तोंडी चुकीचा सांगितला हे देखील त्यांनी अमान्य केले. गैरअर्जदारांच्या कर्मचा-यांनीच चुकीचा एटीएम नंबर पाठवला व ही सेवेतील त्रुटी आहे. सबब त्यांची तक्रार पुर्णतः मंजूर करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केली.
गैरअर्जदारांच्या वकिलांनी युक्तीवादा दरम्यान तक्रारदाराच्या खाते उता-याची प्रत दाखल केली. त्यात दि.7.9.2011 रोजी तक्रारदाराच्या खात्यावर रु.10,000/- जमा झालेली दिसत आहे. त्यांनी सांगितले की, दि.26.5.2011 रोजीच्या अर्जातच जर तक्रारदाराने एटीएम क्रमांक लिहीला असता तर तात्काळ पैसे जमा झाले असते. तक्रारदारांनी दि.26.5.2011 रोजीच्या अर्जात क्रमांक लिहीला नाही व तोंडी चुकीचा क्रमांक सांगितला म्हणून पैसे मिळण्यास उशिर झाला. ही तक्रारदाराचीच चुक आहे. त्यासाठी बँकेला सेवेतील कमतरता म्हणून जबाबदार धरता येणार नाही. सबब त्यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
वरील विवेचनावरुन असे दिसते की, तक्रारदाराने दि.25.5.2011 रोजीच्या वर्षात एटीएम क्रमांक लिहीला नाही. सबब तक्रार नामंजूर झाली. तक्रारदाराने योग्य एटीएम क्रमांकासह अर्ज दि.13.7.2011 रोजी दिला त्यानंतर दि.7.9.2011 रोजी रु.10,000/- बँकेने तक्रारदारांच्या खात्यात जमा दाखवले आहेत. त्यामुळे पैसे जमा होण्यास झालेल्या विलंबास तक्रारदार देखील कारणीभूत आहेत. दि.13.7.2011 रोजीला तक्रारदाराने योग्य प्रकारे तक्रार गैरअर्जदाराकडे दाखल केली व दि.7.9.2011 रोजी गैरअर्जदाराने पैसे खात्यात भरले. तेव्हा केवळ दि.13.7.2011 ते 07.09.2011 या कालावधीतील विलंबास केवळ बँक जबाबदार आहे. रक्कम रु.10,000/- गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या खात्यात जमा केलेलीच आहे.
सबब, आता गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारदाराला दि.13.07.2011 ते 07.09.2011 या कालावधीसाठी एटीएम च्या नियमानुसार होणारी देय रक्कम देणे न्यायोचित होईल असे मंचाला वाटते.
सबब, मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार क्र.1 स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांनी तक्रारदाराला दि.13.07.2011 ते
07.09.2011 या कालावधीसाठी एटीएम च्या नियमानुसार होणारी देय रक्कम
आदेश प्राप्तीपासून तिस दिवसांत द्यावी.
3. सदरची रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास रक्कम देय दिवसापासून
तक्रारदाराला रक्कम मिळेपर्यत 9 टक्के व्याज दराने रक्कम द्यावी.
4. गैरअर्जदाराने तक्रारदाराला तक्रारीचा खर्च रु.1000/- द्यावा.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड