नि.31
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 299/2011
तक्रार नोंद तारीख : 01/11/2011
तक्रार दाखल तारीख : 19/11/2011
निकाल तारीख : 21/05/2013
---------------------------------------------------
श्री यशवंत रामचंद्र पाटील
वय 40 वर्षे, धंदा – शेती व वाहतुकदार
रा.तांबवे, ता.वाळवा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. शाखाधिकारी,
नगर अर्बन को.ऑप. बँक लि.
शाखा पाथर्डी ता.पाथर्डी जि.अहमदनगर
2. शाखाधिकारी
राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ
शाखा कासेगांव, ता.वाळवा जि.सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एस.व्ही.माळी
जाबदार क्र.1 व 2 तर्फे : अॅड एस.जे.काकडे
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली दाखल केली असून जाबदार क्र.1 आणि 2 यांनी त्यास सदोष सेवा दिली असल्याचे कथन करुन जाबदार क्र.1 आणि 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या रक्कम रु.3 लाख नुकसान भरपाईपोटी व त्यावर दि.17/1/11 पासून रक्कम वसूल होईतो 15 टक्के दराने व्याज व त्यास झालेल्या मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.50,000/- व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- ची मागणी केली आहे.
2. प्रस्तुत प्रकरण वर वर पाहता साधे सोपे दिसत असले तरी त्यात अत्यंत गुंतागुंत आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे की, तो ऊस वाहतूकदार असून त्यांची स्वतःची ट्रॅक्टर व ट्रॉली अशी वाहने आहेत. सन 2010-11 च्या ऊस गळीत हंगामाकरिता ऊसाची वाहतूक करण्याकरिता त्यांनी क्रांती सहकारी साखर कारखाना लि.कुंडल ता.पलूस जि. सांगली या कारखान्याशी करार केला होता. त्या संपूर्ण हंगामात ऊस तोडणी, भरणीचे काम करण्याकरिता तक्रारदाराने चिंचपूर (इजदे) ता.पाथर्डी जि.अहमदनगर येथील श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे या मजूर मुकादमाशी करार केलेला होता. सदर करार करतेवेळी तक्रारदाराने त्यास रक्कम रु.3 लाख रोखीने उचल म्हणून दिलेली होती. तथापि 2010-11 या गळीत हंगामात सदरचा मुकादम ऊस तोड मजूर घेवून तक्रारदाराकडे आला नाही. त्यावरुन तक्रारदार सदर मुकादमाच्या गावी गेला व त्यास टोळी घेवून न येण्याचे कारण विचारले असता त्यास मजूर मिळाले नसल्याने तो टोळी घेवून येऊ शकला नाही असे सदर श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे याने तक्रारदारास सांगितले व उचल म्हणून घेतलेली रक्कम रु.3 लाख दोन महिन्यांचे आत परत करतो असे वचन दिले. तथापि वचनाप्रमाणे सदर श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळेने तक्रारदारास रक्कम परत केली नाही. तक्रारदाराने सतत तगादा लावल्याने सरतेशेवटी सदर श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे याने जाबदार क्र.1 या बँकेतील त्याचे खात्यावरील क्र.0845039 दि.17/1/11 चा धनादेश, रक्कम रु.3 लाखाचा; तक्रारदारास दिला.
3. सदरचा धनादेश तक्रारदाराने आपल्या जाबदार क्र.2 या बँकेत असलेल्या खात्यात भरला असता जाबदार क्र.2 बँकेने सदरचा धनादेश जाबदार क्र.1 बॅंकेकडे वटविण्याकरिता दिला. सतत सहा महिनेपर्यंत तक्रारदाराने जाबदार क्र.2 बँकेत जाऊन सदरचा धनादेश वटला आहे किंवा नाही याची चौकशी केली. तथापि जाबदार क्र.2 बँकेने सदरचा धनादेश अजून वटला नाही असे सांगितले. सरतेशेवटी दि.8/6/11 रोजी तक्रारदाराने जाबदार क्र.1 या बँकेत अर्ज देवून माहिती मागितली असता त्या बँकेने दि.21/6/11 रोजी सदरचा धनादेश त्या बँकेतून गहाळ झाल्याचे कळविले. श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे हा मुकादम अहमदनगर जिल्हयातील असल्यामुळे पुन्हा त्याचा शोध घेवून त्याचेकडून उचलपोटी दिलेली रक्कम वसूल करणे अशक्य आहे. त्यामुळे तक्रारदारास मोठा मानसिक धक्का बसला. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे सदरचा धनादेश गहाळ झाला नसता तर त्याला सदर धनादेशाच्या आधारे श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे यांचेविरुध्द परक्राम्य विलेख कायदा कलम 138 खाली कारवाई करुन सदरची रक्कम वसूल करता आली असती. तथापि तो धनादेश गहाळ झाल्याने तक्रारदारास सदर रकमेच्या वसूलीकरिता कोणतीही कारवाई करणे अशक्य झाले आहे व त्यामुळे त्यांची रक्कम रु.3 लाख इतके आर्थिक नुकसान झाले आहे, त्यास सर्वस्वी जाबदार क्र.1 व 2 यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. तक्रारदाराने वटविण्याकरिता जमा केलेला धनादेश वटल्यासंबंधी किंवा न वटल्यासंबंधीच्या रिटर्नमेमोसह तो धनादेश परत करणे ही जाबदार क्र.1 व 2 बँकेची जबाबदारी होती. सदरचे चेक गहाळ करणे ही जाबदार क्र.1 यांनी केलेली सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे जाबदार क्र.1 आणि 2 यांची वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आहे. सबब तक्रारदारास ही तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कारणांवरुन तक्रारदाराने वर नमूद केलेल्या मागण्या या तक्रारअर्जात केलेल्या आहेत.
4. तक्रारीत केलेल्या कथनाचे पुष्ठयर्थ तक्रारदाराने आपले शपथपत्र नि.2 ला दाखल करुन तक्रारअर्जातील संपूर्ण कथन शपथेवर पुनरुच्चारीत केले आहे.
5. जाबदार क्र.1 यांनी आपली कैफियत नि.16 ला दाखल करुन तक्रारदाराचे संपूर्ण कथन अमान्य केले आहे. जाबदार क्र.1 च्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराने सत्य परिस्थिती लपवून ठेवलेली आहे. श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे यांस प्रस्तुत प्रकरणी जाबदार म्हणून सामील केलेले नाही. त्याचेतील आणि तक्रारदारातील व्यवहार आणि त्यावरुन उद्भवलेला वाद हा दिवाणी स्वरुपात मोडत असून तो वाद दिवाणी न्यायालयात चालविणे न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे. सबब प्रस्तुत तक्रार या मंचासमोर कायद्याने चालू शकत नाही. सबब तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदार क्र.1 ने केली आहे. तथापि सदर श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे हा जाबदार क्र.1 बँकेचा ग्राहक असून त्यांचे जाबदार क्र.1 बँकेमध्ये खाते आहे ही बाब जाबदार क्र.1 बँकेने मान्य केली आहे. तक्रारअर्जात नमूद केलेला धनादेश क्र.0845039 हा जाबदार बँकेने सदर श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे यांना दिलेला नाही. तक्रारदार हा जाबदार क्र.1 बँकेचा ग्राहक होऊ शकत नाही त्यामुळे त्यास कोणतीही सेवा अगर दूषित सेवा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारदार आणि श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे यांचेतील कथित व्यवहार याची माहिती जाबदार क्र.1 बँकेस नसल्याने त्याबद्दलचे सर्व कथन जाबदार बँकेने नाकारलेले आहे. त्यांचे म्हणणेप्रमाणे तक्रारदाराची तक्रार ही सदर श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे यांचेविरुध्द आहे. त्यास या प्रकरणात पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. सदर प्रकरणात गुंतागुंतीचे मुद्दे आहेत त्यावर हे मंच निर्णय देवू शकत नाही आणि याही कारणावरुन सदरची तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे. जाबदार क्र.1 यांचे स्पष्ट कथन असे आहे की, वादातील धनादेश हा सदर बँकेने श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे या खातेदारास कधीही दिलेला नव्हता. प्रस्तुत प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर जाबदार क्र.1 बँकेस असे आढळून आले की, तक्रारदार यांनी सदर श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे सापडत नाही म्हणून इतरांच्या मदतीने दुस-या खातेदाराचा चेक श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे या इसमाचा आहे असे भासवून काहीतरी पुरावा तयार करुन रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बँकीग व्यवसायाप्रमाणे खातेदारास धनादेशपुस्तिका देत असताना प्रथमतः इश्यू रजिस्टरला खातेदाराच्या नावाची, त्याच्या खाते नंबरची व धनादेश क्रमांकांची नोंद होते. तसेच जाबदार क्र.1 बँकेकडे कोणत्याही खातेदाराचा धनादेश वटण्याकरिता आला असता प्रथमतः सदर धनादेशाची नोंद आवक रजिस्टरला होते, त्यानंतर सदरचा धनादेश संबंधीत खातेदाराचा आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते. त्यानंतर संबंधीत खात्यावर रक्कम शिल्ल्क आहे किंवा नाही व असल्यास त्या धनादेशाची शहानिशा करुन, खात्री करुन घेवून पोस्टींग केले जाते आणि नंतर सदर रकमेबाबतचा अॅडव्हाईस पाठवून धनादेशाची रक्कम वर्ग केली जाते. तक्रारदार नमूद करतो तो धनादेश जाबदार क्र.2 बँकेकडून जाबदार क्र.1 बॅंकेकडे कधीही आलेला नव्हता. सदरच्या धनादेशाची जाबदार क्र.1 बँकेत आवक रजिस्टरला नोंद नाही. सदर धनादेशाबाबत जो काही पत्रव्यवहार जाबदर क्र.1 बँकेने जाबदार क्र.2 बँकेसोबत केला आहे, तो पत्रव्यवहार केवळ जाबदार क्र.2 सहव्यवसायी असलेने सहकार्याची भावना म्हणून पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्रव्यवहारात जाबदार क्र.1 यांचेकडून जर धनादेश गहाळ झाला असेल तर तक्रारदाराकडून पुन्हा डयुप्लीकेट धनादेश घ्यावा व तो जाबदार क्र.1 बँकेकडे पाठवावा असे जाबदार क्र.2 बॅंकेला कळविलेले होते. त्याचा गैरफायदा घेवून तक्रारदार सदर मंचापुढे आल्याचे दिसतात. जाबदार क्र.1 बँकेने कोणतीही सदोष सेवा किंवा सेवेतील त्रुटी केलेली नाही. जाबदार क्र.1 आणि 2 या बँकेमधील पत्रव्यवहार हा गोपनीय स्वरुपाचा असताना त्या पत्रव्यवहाराचा उपयोग तक्रारदारास जाबदार क्र.1 विरुध्द करता येत नाही. तक्रारदाराने जाबदार क्र.1 बँकेस विनाकारण प्रस्तुत प्रकरणात सामील करुन खर्चात पाडले आहे व त्या बँकेस त्रास दिलेला आहे, सबब जाबदार क्र.1 बँकेस मानसिक त्रासापोटी भरपाई व खर्च मिळणे आवश्यक आहे.
6. जाबदार क्र.1 बँकेचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर बँकेमध्ये श्री अनिल सिताराम कुंटे या खातेदाराचे खाते क्र. 14/3654 या नंबरचे खाते आहे. त्या खातेदारास जाबदार क्र.1 बँकेने 845031 ते 845060 या क्रमांकाचे धनादेश असणारे चेकबुक दिले होते व त्या खातेदाराचे नावे सदरचे चेकबुक इश्यू करण्यात आलेले आहे. ज्या लखोटयातून वादातील धनादेश जाबदार क्र.1 बँकेस पाठविल्याचे जाबदार क्र.2 म्हणते, त्यात धनादेश आहे किंवा नाही याची खात्री जाबदार क्र.1 बँकेने केलेली नव्हती. यदाकदाचित अशा प्रकारचा लिफाफा जाबदार क्र.1 बँकेने घेतलेला असल्यास व त्याची पोहोच जाबदार क्र.2 बँकेकडे असल्यास त्याचा गैरअर्थ लावून तक्रारदार जाबदार क्र.1 बँकेवर जबाबदारी टाकू पहात आहे. जाबदार क्र.2 बँकेने वादातील धनादेश जाबदार क्र.1 बँकेला किंवा इतर कोणत्याही बँकेला कधीही पाठविलेला नव्हता. सदर क्रमांकाच्या धनादेशाची नोंद जाबदार क्र.1 च्या आवक रजिस्टरला नाही. जाबदार क्र.1 बँकेने आपले खातेदार श्री अनिल फुंदे यांचेशी संपर्क साधला असता तो तक्रारदार यांना ओळखत नाही. तक्रारदार आणि श्री विष्णू ज्ञानदेव कंठाळे यांचेशी झालेल्या व्यवहाराशी त्यांचा संबंध नाही किंवा अनिल फुंदे यांनी स्वतः कोणताही व्यवहार केलेला नसून कोणताही धनादेश दिलेला नाही असे सांगितलेले आहे. एवढेच नव्हेतर खातेदार श्री अनिल फुंदे यांनी त्याचे चेकबुक गहाळ झाले असल्याचे जाबदार क्र.1 बँकेकडे दि.18/9/2010 रोजी लेखी कळविलेले असून सदर चेक बुकवरील चेकचे स्टॉप पेमेंट करण्यात यावे असा अर्जही दिलेला आहे. जाबदार क्र.1 बँकेने आपले रेकॉर्ड तपासले असता सदर अनिल फुंदे यांनी दि.18/9/10 रोजी त्यांचे चेक क्र. 845031 ते 845060 असे गहाळ झालेले असून, त्यांचे पेमेंट स्टॉप करणेबाबत बँकेचे नियमाप्रमाणे रक्कम रु.1,000/- स्टॉप पेमेंट चार्जेस बँकेत जमा करुन, त्याचे पेमेंट स्टॉप करण्याचे लेखी पत्र दिलेले आहे. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे वादातील चेक हा त्यापैकी एक चेक असल्याचे दिसते. सदरची बाब अतिशय गंभीर असून योग्य तो पुरावा घेवून साक्षी जबाब घेणे व आवश्यक त्या पक्षकारांना दाव्यात सामील करुन घेवून त्याचा गुणावगुणांवर योग्य त्या न्यायालयामध्ये निकाल होणे आवश्यक आहे. तथापि तक्रारदार हा जाबदार क्र.1 बँकेने दिलेल्या पत्राचा गैरअर्थ लावून जाबदार क्र.1 बँकेकडून सेवेतील त्रुटी या शिर्षकाखाली काही रकमा उकळण्याच्या हेतूने प्रेरीत असून त्याने ही तक्रार दाखल केली आहे. जाबदार क्र.1 बँकेने त्यांच्या कर्तव्यात कुठलीही कसूर केलेली नाही, उलट जाबदार क्र.2 यांना वेळोवेळी सहकार्यच केलेले आहे. याची जाणीव असतानाही तक्रारदार यांनी स्वतःची व जाबदार क्र.2 बँक यांची दुष्कृत्ये झाकण्याकरिता जाबदार क्र.1 बँकेविरुध्द निराधार तक्रार दाखल केलेली आहे. या आणि अशा कथनांवरुन जाबदार बँकेने तक्रारदाराची संपूर्ण तक्रार नाकारली असून ती खर्चासह फेटाळून लावावी अशी मागणी केली आहे.
7. सदर कैफियतीचे पुष्ठयर्थ जाबदार क्र.1 ने नि.17 ला आपले शाखा अधिकारी साईनाथ निवृत्ती पाचारणे यांचे शपथपत्र नि.17 ला दाखल करुन नि.18 सोबत एकूण 7 कागदपत्रांच्या प्रती तसेच त्या प्रतींची मूळ कागदपत्रे सदरकामी नि. 23/2 ला दाखल केली आहेत.
8. जाबदार क्र.2 राजारामबापू सहकारी बँक लि. यांनी आपली लेखी कैफियत नि.13 ला दाखल करुन तक्रारदाराची मागणी व तक्रारीतील मजकूर त्यांनी अमान्य केला आहे. तक्रारदार आणि श्री विष्णू ज्ञानदेव कंटाळे यांचेमधील कथित व्यवहार माहितीअभावी जाबदार क्र.2 ने अमान्य केला आहे. तथापि तक्रारदार यांनी दि.17/1/11 रोजीचे जाबदार क्र.1 या बॅंकेवरील धनादेश क्र.0845039 रक्कम रु.3 लाखाचा, त्यांचे बँकेत भरला होता व सदर धनादेश वटण्याकरिता जाबदार क्र.2 बँकेने जाबदार क्र.1 नगर अर्बन को.ऑप.बँक या बँकेकडे वसूलीकरिता पाठविला ही बाब जाबदार क्र.2 बॅंकेने मान्य केली आहे. सदरचा धनादेश जाबदार क्र.2 बँकेने तेज कुरियर्समार्फत जाबदार क्र.1 बँकेला पाठविला व जाबदार क्र.1 बँकेने तो स्वीकारला याबद्दलच्या कुरीयरची पावती जाबदार क्र.2 बँकेस प्राप्त झाली असून ती पावती सदरकामी जाबदार क्र.2 बँकेने दाखल केली आहे. जाबदार क्र.2 चे म्हणणे असे की, सदर धनादेशाची वसूली न झाल्याने जाबदार क्र.2 बँकेने जाबदार क्र.1 बँकेस वेळोवेळी पत्र लिहून कळविलेले होते तथापि जाबदार क्र.1 बॅंकेने त्या धनादेशाची रक्कम वसूल केलेली नाही आणि तो मूळ धनादेश देखील जाबदार क्र.2 बँकेस परत पाठविलेला नाही. जाबदार क्र.1 बॅंकेने सुरुवातीला सदरचा चेक जाबदार क्र.2 बॅंकेकडून प्राप्तच झाला नाही असे कथन केले तथापि नंतर सदरचे चेक जाबदार क्र.1 बँकेकडून गहाळ झाल्याचे जाबदार क्र.2 बँकेस कळविलेले आहे. तक्रारदाराने देखील संपूर्ण चौकशी केल्यानंतर सदरचा धनादेश जाबदार क्र.1 बँकेकडून गहाळ झाल्याची खात्री झाल्यानंतर दि.21/3/11 रोजी जाबदार क्र.2 बँकेस तसे लेखी लिहून देवून जाबदार क्र.2 बँकेची यामध्ये काहीही चूक नाही हे स्पष्ट मान्य व कबूल करुन त्याची जाबदार क्र.2 विरुध्द कोणतीही तक्रार नाही असेही लिहून दिलेले आहे. तथापि आता पश्चात बुध्दीने आणि स्वार्थापोटी तक्रारदाराने जाबदार क्र.2 बँकेला या कामी पक्षकार म्हणून सामील करुन विनाकारण त्यांचेविरुध्द दाद मागितली आहे. जाबदार क्र.2 बँकेने जाबदार क्र.1 बँकेस त्यांचे वकील अॅड व्ही.बी.पवार, रा.इस्लामपूर यांचेमार्फत दि.15/7/11 रोजी नोटीस देवून सदरचे धनादेशाची जबाबदारी जाबदार क्र.1 यांची असल्याचे स्पष्टपणे कळविलेले आहे. परंतु सदर नोटीसीस जाबदार क्र.1 बँकेने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. जाबदार क्र.2 बँकेने तक्रारदाराला सेवा देण्यात कोणतीही कसूर, त्रुटी अथवा हयगय केली नाही. सदर चेक गहाळ होण्यात जाबदार क्र.2 बॅंकेचा कोणताही व कसल्याही प्रकारे संबंध नाही. सदरचा धनादेश जाबदार क्र.1 यांचे बँकेतून गहाळ झाला असल्याने त्याची संपूर्ण जबाबदारी जाबदार क्र.1 बँकेची आहे. याची सर्व वस्तुस्थिती व माहिती तक्रारदारास माहिती असून देखील जाणुनबुजून तक्रारदाराने जाबदार क्र.2 विरुध्द तक्रार केली आहे. जाबदार क्र.2 बँकेने त्यांचे कर्तव्य योग्यपणे व प्रामाणिकपणे पार पाडलेले आहे. जाबदार क्र.2 विरुध्द केलेली रक्कम रु.3 लाख व त्यावर 15 टक्के दराने व्याज देणेची मागणी ही संपूर्णतया चुकीची व बेकायदेशीर आहे तसेच इतर मागण्यादेखील बेकायदेशीर व चुकीच्या आहेत. जाबदार क्र.2 बँकेची तक्रारदारास कोणतीही रक्कम देण्याची जबाबदारी नाही. अशा कथनांवरुन जाबदार क्र.2 बँकेने सदरची तक्रार त्यांचेविरुध्द खारीज करावी अशी विनंती केली आहे.
9. आपल्या लेखी कैफियतीतील कथनाचे पुष्ठयर्थ जाबदार क्र.2 बँकेने आपले शाखाधिकारी श्री दत्तात्रय निवृत्ती पाटील यांचे शपथपत्र नि.14 ला दाखल करुन नि.15 या फेरिस्तसोबत एकूण 23 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
10. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराने आपले पुराव्याचे शपथपत्र नि.20 ला दाखल करुन नि.21 या पुरसिसने त्यास जादा तोंडी पुरावा द्यावयाचा नाही असे कळविलेले आहे. जाबदार क्र.1 तर्फे त्यांचे साक्षीदार शाखाधिकारी श्री साईनाथ निवृत्ती पाचारणे यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.23 ला दाखल करण्यात आले आहे आणि त्यासोबत सदर साक्षीदाराने मूळ कागदपत्रे दाखल केली आहेत.
11. जाबदार क्र.2 बॅंकेतर्फे त्यांचे शाखाधिकारी श्री सुर्यकांत वसंतराव जाधव यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.22 ला दाखल करण्यात आले असून हे जाबदार क्र.2 चे एकमेव साक्षीदार आहेत. या प्रकरणात दोन्ही जाबदारांनी अधिक पुरावा दिलेला नाही.
12. दोन्ही पक्षांचा पुरावा नोंदविल्यानंतर आम्ही पक्षकारांचे विद्वान वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे.
13. सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षास उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा जाबदार क्र.1 व 2 यांचा ग्राहक होतो काय ? होय.
2. जाबदार क्र.1 व 2 यांनी दूषीत सेवा दिली ही बाब तक्रारदाराने
शाबीत केली आहे काय ? नाही.
3. तक्रारदारास मागितल्याप्रमाणे रकमा मिळण्याचा अधिकार आहे काय ? नाही.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
-: कारणे -:
मुद्दा क्र.1
14. तक्रारदाराचे खाते जाबदार क्र.2 या बँकेत आहे याबद्दल कोणाचाही उजर नाही. तक्रारदाराचे एकूण कथन पाहता, त्याचे सार असे की, त्याने श्री विष्णू ज्ञानदेव कंटाळे कडून मिळालेला रक्कम रु.3 लाख रकमेचा धनादेश वटविण्याकरिता जाबदार क्र.2 बॅंकेत असलेल्या त्यांचे खात्यात भरला व तो धनादेश त्याची रक्कम वसूल होवून मिळण्याकरिता जाबदार क्र.2 यांनी जाबदार क्र.1 बँकेकडे पाठविला, ही बाब पुराव्यावरुन सिध्द होते. सदरचा धनादेश क्र. 0845039 हा जाबदार क्र.1 बँकेचा होता ही बाब जाबदार क्र.1 बँकेने अमान्य केलेली नाही. तथापि तो धनादेश सदर श्री विष्णू ज्ञानदेव कंटाळे यांचा नव्हता व तो त्या बँकेचे दुसरे खातेदार श्री अनिल सिताराम फुंदे यांचा होता असे जाबदार क्र.1 यांचे म्हणणे आहे. यावरुन स्पष्ट दिसते की, सदर धनादेशाच्या वटणावळीकरिता तो धनादेश जाबदार क्र.1 या बँकेकडेच जावयाचा होता व जाबदार क्र.1 हीच बँक सदर धनादेशाची रक्कम अदा करणारी बॅंक होती. या प्रकरणातील पक्षकारांचे पक्षकथन आणि त्यांचा बचाव जर बाजूला ठेवला तर या प्रकरणातील साध्या Facts वरुन हे दिसते की, सदर धनादेशाची रक्कम अदा करण्याची जबाबदारी ही जाबदार क्र.1 बँकेची होती आणि त्या दृष्टीने पाहिल्यास तक्रारदार हा जाबदार क्र.1 बँकेचा देखील ग्राहक आहे. जाबदार क्र.2 या बँकेमध्ये तक्रारदाराचे खाते आहे आणि तो जाबदार क्र.2 चा खातेदार आहे ही बाब सर्वमान्य आहे. त्यामुळे जाबदार क्र.2 चा देखील तक्रारदार ग्राहक होतो आणि म्हणून वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे.
मुद्दा क्र.2
15. प्रस्तुत प्रकरणातील मूळ मुद्याकरिता आवश्यक असणारे पक्षकथन आम्ही विस्तृतरित्या वर नमूद केलेले आहे. त्यामुळे त्याचा पुनरुच्चार करणे विस्तारभयापोटी टाळले आहे. या ठिकाणी आम्ही नम्रपणे नमूद करु इच्छितो की, जाबदार क्र.2 यांचे कथनाप्रमाणे तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र.2 बॅंकेचा काहीही दोष नाही व त्याबद्दल त्यांची जाबदार क्र.2 बँकेविरुध्द तक्रार नाही असे लिहून दिलेले आहे. जाबदार क्र.2 चे साक्षीदार श्री दत्तात्रय निवृत्ती पाटील यांनी आपले शपथपत्र नि.14 मध्ये याबद्दल शपथेवर कथन केलेले असून तक्रारदाराने दि.21/3/11 रोजी जाबदार क्र.2 बॅंकेच्या विरुध्द त्यांची कोणतीही तक्रार नाही व प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र.2 यांनी काहीही कसूर केल्याचे दिसत नाही असे लिहून दिल्याचे पत्र याकामी हजर केलेले आहे. जाबदार क्र.1 आणि जाबदार क्र.2 या दोन बँकांमध्ये जो पत्रव्यवहार वादातील धनादेशाबद्दल झाला, त्याची देखील प्रत प्रस्तुत प्रकरणात हजर केलेली आहे. त्या प्रती दोन्ही बॅंकांना मान्य आहेत. जाबदार क्र.2 चे साक्षीदार व जाबदार क्र.1 व 2 यांचेमध्ये झालेला पत्रव्यवहार आणि जाबदार क्र.1 बँकेचे साक्षीदार यांचे पुराव्यातून देखील हे स्पष्ट होते की, वादातील धनादेश तक्रारदाराने जाबदार क्र.1 मध्ये असलेल्या आपल्या खात्यात रक्कम वसूल होऊन मिळण्याकरिता भरला आणि तो धनादेश जाबदार क्र.2 बॅंकेने क्लिरिंगकरिता जाबदार क्र.1 बँकेकडे पाठविला. जाबदार क्र.1 बँक सुरुवातीस अशी केस घेवून आली की, सदरचा धनादेश त्या बँकेला मिळालेलाच नाही, जे काही त्या बँकेला मिळाले तो केवळ कुरिअरचा लिफाफा होता व त्यात धनादेश नव्हता व त्या धनादेशाची त्यांच्या आवक रजिस्टरमध्ये कुठलीही नोंद नाही. त्यामुळे तो धनादेश जाबदार क्र.1 बँकेला मिळालेलाच नाही. नंतर जाबदार क्र.1 बँकेने असे कथन केले आहे की, सदरचा धनादेश जाबदार क्र.1 बँकेकडून गहाळ झाला. त्यानंतर जाबदार क्र.1 बॅंकेने तिसरीच केस प्रस्तुत प्रकरणात मांडली आहे, ती आम्ही विस्तारपूर्वक वर नमूद केलेली आहे. पण या गोष्टीतून एक बाब स्पष्ट होते की, जाबदार क्र.1 बँक हे मान्य करते की, वादातील धनादेश हा जाबदार क्र.2 बँकेकडून त्यांचेकडे वसूलीकरिता आलेला होता. या दृष्टीने बघीतल्यास प्रस्तुतचे प्रकरणात जाबदार क्र.2 बँकेचा कुठलाही कसूर आढळून येत नाही आणि त्यांनी त्यांचे खातेदाराने आपल्या खात्यात जमा केलेली धनादेशाची रक्कम वसूल करुन मिळण्याकरिता अदा करणा-या बँकेकडे योग्य तो पत्रव्यवहार करुन व योग्य ती कारवाई करुन सदर धनादेशाची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जाबदार क्र.2 बँकेची या प्रकरणात कुठलीही त्रुटी या मंचास आढळून येत नाही. एवढेच नव्हे तर वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदाराने देखील दि.21/3/11 या पत्रामध्ये ही बाब मान्य केली आहे.
16. मुख्य मुद्दा हा की, प्रस्तुत प्रकरणामध्ये जाबदार क्र.1 बँकेचे काही चूक आहे किंवा त्यांनी काही त्रुटी केली आहे किंवा नाही. सकृतदर्शनी वटविण्याकरिता आलेला धनादेश जाबदार क्र.1 बॅंकेकडून गहाळ झाला ही गोष्ट सेवेतील त्रुटी या सदराखाली मोडू शकते. कारण आलेल्या सर्व धनादेशांची योग्य ती कारवाई करणे, धनादेश सांभाळून ठेवणे इत्यादींची जबाबदारी जाबदार क्र.1 ची होती व ती जबाबदारी जाबदार क्र.1 नाकारु शकत नाहीत. जर जाबदार क्र.1 बँकेला त्यांचे खातेदाराने, त्या बँकेवर काढलेल्या धनादेशाची रक्कम जर सामान्य परिस्थितीत देण्याचे नाकारले असते तर ती सेवेतील त्रुटी ठरू शकली असती. तथापि, प्रस्तुत प्रकरणामध्ये एक वेगळेच वळण दिसते. जाबदार क्र.1 बँकेच्या म्हणण्याप्रमाणे सदरचा धनादेश, जो त्यांचे खातेदार अनिल फुंदे या खातेदाराचा होता, त्या चेकसह इतर 29 धनादेश ज्या चेकबुकात होते, ते चेक बुक 2010 साली गहाळ झालेबद्दल, श्री अनिल फुंदे यांनी जाबदार क्र.1 बँकेस कळविलेले होते व त्या चेकची स्टॉप पेमेंट करण्याची सूचना, त्याकरिता देय असणारी रक्कम रु.1,000/- बँकेत भरुन लेखी लिहून दिलेली होती आणि त्यायोगे सदरचा धनादेश हा तक्रारदार म्हणतो तो विष्णू ज्ञानदेव कंटाळे या खातेदाराचा नव्हता आणि पयार्याने सदर धनादेशाचा दुरुपयोग प्रस्तुत प्रकरणात करण्यात आला आणि जाबदार क्र.1 बँकेने याबाबत यथोचित पुरावा दाखल केलेला आहे. जाबदार क्र.1 चे साक्षीदार श्री साईनाथ निवृत्ती पाचारणे यांनी आपल्या शपथपत्र नि.17 मध्ये शपथेवर याबाबत कथन केलेले आहे. त्या साक्षीदाराचा तक्रारदार किंवा जाबदार क्र.2 यांनी उलटतपास घेतलेला नाही. ज्याअर्थी तक्रारदार आणि जाबदार क्र.2 यांनी त्यांचा उलटतपास घेतलेला नाही, त्याअर्थी सदर साक्षीदाराचा पुरावा जाबदार क्र.2 आणि तक्रारदार यांना मान्य आहे. त्यामुळे सदर साक्षीदाराचा पुरावा हा ग्राहय मानावा लागेल. सदर साक्षीदाराने आपल्या पुराव्यात हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, धनादेश क्र.845031 ते 845060 या क्रमांकाचे धनादेश त्या बँकेचे खातेदार श्री अनिल फुंदे सेव्हिंग्ज खाते क्र. 14/3654 या खातेदाराला दिलेले होते. सदर खातेदार श्री अनिल फुंदे यांनी त्यांचे चेकबुक गहाळ झाल्याचे जाबदार क्र.1 बँकेस दि.18/9/10 रोजी लेखी कळविलेले असून सदर चेक बुकाचे पेमेंट स्टॉप करण्यात यावे असा लेखी अर्जही दिलेला आहे. सदर साक्षीदाराने आपल्या शपथपत्रासोबत सदर अनिल फुंदे यांनी दि. 9 नोव्हेंबर 2006 रोजी सदर बँकेत बचत खाते उघडण्याकरिता दिलेला त्यांचे फोटोसह अर्ज, तसेच त्यांस दिलेले 3654 नंबरचा खाते क्रमांक, तसेच सदर बँकेने दि.29 सप्टेंबर 2008 रोजी 845031 ते 845060 या क्रमांकाचे धनादेश असणारे तीन चेकबुक, सदर खाते क्र.3654 चे खातेदार अनिल फुंदे यांना दिल्याचे दर्शविणारे चेक बुक इश्यू रजिस्टरचा उतारा, त्यावर फुंदे यांची सही प्रस्तुत प्रकरणात हजर केलेले आहे. तसेच दि.18/9/2010 रोजी सदर खातेदार अनिल फुंदे यांना बँकेने दिलेले चेक नं.845031 ते 845060 हे त्यांचेकडून गहाळ झालेचे व त्या चेकचे पेमेंट स्टॉप करण्याबाबत दिलेले पत्र प्रकरणात हजर केलेले आहे. सदर स्टॉप पेमेंट चार्जेस रक्कम रु.1,000/- सदर अनिल फुंदे यांचेकडून वसूल केलेबद्दलचा संबंधीत खात्याचा उतारा देखील जाबदार क्र.1 बँकेने हजर केला आहे. या कागदपत्राच्या मूळ प्रती देखील जाबदार क्र.1 ने याकामी हजर केल्या आहेत. या पुराव्याला किंवा कागदपत्रांना जाबदार क्र.2 बँक किंवा तक्रारदारांनी कोणताही आक्षेप नोंदविलेला नाही व या पुराव्यावरुन ही गोष्ट निर्विवादपणे सिध्द होते की, जाबदार क्र.1 या बँकेचे खातेदार अनिल फुंदे यांस दाव्यातील नमूद केलेला धनादेश जाबदार क्र.1 या बँकेने दिलेला होता आणि त्या धनादेशाशी श्री विष्णू ज्ञानदेव कंटाळे यांचा काहीही संबंध नव्हता. सदरचा धनादेश 2010 साली गहाळ झाल्याची तक्रार सदर अनिल फुंदे यांनी जाबदार क्र.1 बँकेकडे केली होती. मग प्रश्न असा निर्माण होतो की, सदर विष्णू ज्ञानदेव कंटाळे यांचे ताब्यात सदरचा धनादेश कसा आला ? याकरिता तक्रारदाराने सदर विष्णू ज्ञानदेव कंटाळे यांना प्रस्तुत प्रकरणामध्ये जाबदार म्हणून सामील करणे अत्यावश्यक होते. ज्याअर्थी दाव्यातील धनादेश हा अनिल फुंदे यांचेकडून गहाळ झालेला होता आणि तो सदर विष्णू कंटाळे यांचेकडून तक्रारदारास देण्यात आला, त्याअर्थी त्या धनादेशाचा गैरवापर झाला हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. विष्णू कंटाळे हा देखील जाबदार क्र.1 बँकेचा खातेदार होता ही बाब जाबदार क्र.1 यांनी आपल्या कैफियतीत स्पष्टपणे कबूल केलेली आहे. या बाबी जाबदार क्र.3 व तक्रारदारांनी अमान्य केल्या नाहीत. सदर विष्णू कंटाळे याचा खाते क्रमांक वेगळा आहे. त्यास जर जाबदार क्र.1 ने धनादेश दिलेले असतील तर हे स्पष्ट होते की, त्या धनादेशांचे क्रमांक हे वेगळेच असले पाहिजेत. परंतु ज्याअर्थी वादातील धनादेशाचा नंबर अनिल फुंदे यांस दिलेल्या धनादेशाची देण्यासाठी मिळाला त्याअर्थी काहीतरी गैरमार्गाने सदरचा धनादेश हा सदर विष्णू कंटाळे किंवा तक्रारदार यांच्या ताब्यात आला आणि त्याचा गैरवापर करण्यात आला. अशा परिस्थितीत सदरचे धनादेश जर जाबदार क्र.1 बँकेकडे असता तरीही जाबदार क्र.1 बँकेला कायदेशीररित्या सदर धनादेशाची रक्कम नाकारण्याचा हक्क होता आणि जर त्या स्थितीत जाबदार क्र.1 ने रक्कम देण्यास नकार दिला असता तर त्यास तक्रारदार यास देण्याच्या सेवेतील त्रुटी म्हणता आली नसती. प्रस्तुत प्रकरणामध्ये काही गैरव्यवहार झाला आहे याची अत्यंत दाट शक्यता निर्माण होते. तक्रारदाराचे म्हणणे जर आपण नीटपणे व सखोलपणे अवलोकीले तर तक्रारदाराची तक्रारच अशी आहे की, जाबदार क्र.1 बँकेने सदर धनादेशाविषयी न कळविलेने त्याला सदर विष्णू कंटाळे याचेविरुध्द परक्राम्य विलेख कायदा कलम 138 अन्वये कारवाई करता आली नाही. सदर धनादेश हा वटविला जाणार नाही याची खात्री त्यास कशी होती याचे स्पष्टीकरण तक्रारदाराकडून आलेले नाही. परक्राम्य विलेख कायदयाच्या कलम 138 खाली जर धनादेशाची रक्कम वटविण्यात आली नाही तर त्याबद्दल शिक्षा करण्याची तरतूद त्या कायदयामध्ये आहे. सदर धनादेश वटणार नाही, त्याची रक्कम आपणास मिळणार नाही आणि त्यायोगे सदर विष्णू कंटाळे याचेविरुध्द फौजदारी केस दाखल करावी लागेल याची खात्री तक्रारदार कशी काय देवू शकतो हे स्पष्ट होत नाही. तक्रारदाराचे हे म्हणणे नाही की, त्याला या कारणाकरिता सदर विष्णू कंटाळे विरुध्द दिवाणी दावा दाखल करुन रक्कम वसूल करुन मागता आलेली नाही. त्याचा मुख्य मुद्दा हाच की, त्याला विष्णू कंटाळे विरुध्द फौजदारी केस दाखल करता आलेली नाही. याचा अर्थ तक्रारदाराला सदर धनादेश वटणार नाही व त्याची रक्कम मिळणार नाही याची खात्री होती. ही बाब अत्यंत संशयास्पद या मंचाला वाटते. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणात जी वस्तुस्थिती मांडलेली आहे, तशी ती नसावी अशी दाट शंका निर्माण होण्यास वाव आहे. त्यायोगे जाबदार क्र.1 बँकेने तक्रारदारास कोणती सदोष सेवा दिलेली आहे असे म्हणता येत नाही. तक्रारदारास विष्णू कंटाळे यांचेविरुध्द अजूनही रक्कम वसूल करुन मिळणेकरिता दिवाणी दावा दाखल करता येऊ शकेल. तसा तो त्याने अद्यापही दाखल केलेला नाही. का दाखल केला नाही याचे स्पष्टीकरण तक्रारदाराकडून येत नाही. सदर विष्णू कंटाळे याचा आढळ होत नाही किंवा तो मिळून येत नाही हे तक्रारदाराचे म्हणणे आहे, ते त्याचेविरुध्द दिवाणी दावा दाखल न करण्याकरिता पर्याप्त आहे असे म्हणता येत नाही. जर तक्रारदार व विष्णु कंटाळे यांचेमध्ये खरोखरच तक्रारदार म्हणतो तसा तसा व्यवहार झाला असता तर तक्रारदाराला सदर विष्णु कंटाळे विरुध्द दिवाणी दावा दाखल करुन आपली रक्कम वसूल करुन मिळण्याचा हक्क आहे. तो हक्क न बजावता तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल करावयाचा सोयीस्कर मार्ग अवलंबिला हे संशयास्पद वाटते. तसेही पाहता ज्यावेळेला वादातील धनादेश हा विष्णू कंटाळे यांचे खात्यावर दिलेला नसून तो अनिल फुंदे याचे खात्यावरील दिलेला होता आणि हा धनादेश विष्णू कंटाळे याने तक्रारदाराला दिलेला होता, त्याअर्थी या सर्व प्रकरणामध्ये काहीतरी गैरप्रकार झालेला आहे हे स्पष्ट आहे आणि अशा गैरप्रकारात समाविष्ट असणारा धनादेश वटविण्याची कोणतीही जबाबदारी जाबदार क्र.1 बँकेची नव्हती आणि त्याकरिता जर तो धनादेश बँकेकडे जरी असता आणि जरी बँकेने त्याची रक्कम अदा करणेचे टाळले असते, तरी ती सदोष सेवा मानली जाऊ शकली नसती. या अनुषंगाने विचार करता जाबदार बँकेने तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही असे म्हणावे लागेल. करिता आम्ही वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी दिलेले आहे.
मुद्दा क्र.3
17. हे स्पष्ट आहे की, तक्रारदारास या प्रकरणामध्ये कोणतीही मागणी देता येत नाही. त्यास जाबदार क्र.1 व 3 तर्फे कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. त्यामुळे त्याने तक्रारअर्जात मागितलेली कोणतीही मागणी मिळण्याचा हक्क नाही. सदर रकमेच्या वसुलीकरिता तक्रारदारास दिवाणी न्यायालयात रितसर दावा दाखल करुन आपली रक्कम वसूल करुन मागण्याचा अधिकार होता. सदर खातेदार श्री अनिल फुंदे यांना देण्यात आलेले चेकबुक व ते चेकबुक गहाळ होवून त्यातील एक धनादेश प्रस्तुत प्रकरणात वापरल्यामुळे झालेल्या गैरव्यवहाराकरिता जाबदार क्र.1 बँकेला योग्य त्या विभागाकडे तक्रार करुन सदर प्रकरणाचा तपास करुन मागून योग्य ती कारवाई करुन मागण्याचा अधिकार आहे. जाबदार क्र.1 बँकेस योग्य वाटले तर प्रस्तुतच्या प्रकरणात सदर विष्णु कंटाळे याचेविरुध्द फिर्याद देवून त्यांचेविरुध्द योग्य ती कारवाई करावी असे निर्देश जाबदार क्र.1 बँकेला देणे संयुक्तीक राहील असे या मंचास वाटते. सबब वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिलेले आहे. सबब आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1. प्रस्तुतची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. प्रस्तुत तक्रारीचा खर्च दोन्ही पक्षकारांनी आपापला सोसणेचा आहे.
सांगली
दि. 21/05/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष