नि.23
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 269/2011
तक्रार नोंद तारीख : 26/09/2011
तक्रार दाखल तारीख : 30/10/2009
निकाल तारीख : 03/04/2013
----------------------------------------------
श्री आनंदराव दत्तात्रय शिंदे
वय 67 वर्षे, धंदा – शेती
रा.बोरगांव, ता.वाळवा, जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी
आय.सी.आय.सी.आय.बँक
शाखा बोरगांव ता.वाळवा जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एस.व्ही.माळी
जाबदारतर्फे : अॅड एस.पी.ताम्हणकर
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रारदार यांनी दाखल करुन जाबदार यांनी सदोष सेवा दिली या कारणाकरिता तक्रारदाराचे वडील मयत दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांचे नावावर असणा-या बचत खात्यावरील रकमेवर दि.8/8/95 पासून द.सा.द.शे. 10 टक्के दराने होणारी संपूर्ण रक्कम तक्रारदार यांचे कर्जखात्यात जमा करणेबाबत आदेश व्हावा अथवा ती रक्कम रोख स्वरुपात त्यांना देण्याचा आदेश व्हावा तसेच तक्रारदारास मानसिक त्रासासाठी म्हणून रक्कम रु.10,000/- जाबदारकडून मिळावेत आणि सदर तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.3,000/- जाबदारकडून वसूल करुन मिळावेत अशा मागण्यांसाठी दाखल केला आहे.
2. तक्रारअर्जातील थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराचे वडील मयत दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांचे नावे जाबदार बँकेत बचत खाते क्र.3109 असून सदर खात्यात दि.8/8/95 रोजी रक्कम रु.6,196/- जमा आहेत. सदर दत्तात्रय रामचंद्र शिंदे मयत झालेनंतर सदरची रक्कम रु.6,196/- व त्यावर होणारे आजअखेरचे व्याज यावर तक्रारदार आणि इतर कायदेशीर वारस यांचा हक्क व अधिकार आहे. कै.दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांच्या पत्नी चांगुणाबाई दत्तात्रय शिंदे या दि.27/3/11 रोजी मयत झाल्या आहेत. त्यांच्यानंतर तक्रारदार यांचे श्री भगवान दत्तात्रय शिंदे व श्री गणपत दत्तात्रय शिंदे हे दोन भाऊ तसेच श्रीमती शोभा शिवाजीराव पवार ही बहिण असे कायदेशीर वारस आहेत. सदर तक्रारदार हे जाबदार बँकेचे ग्राहक आहेत.
3. तक्रारदार यांचे जाबदार बँकेत कर्जखाते असून त्या खात्यावर रक्कम रु.16,273/- एवढी थकबाकी झालेली आहे. सदर रकमांचे वसूलीकरिता जाबदार बँकेने इस्लामपूर येथील दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा क्र. 28/11 चा दाखल केलेला आहे. सदर दावा प्रलंबित असताना तक्रारदार व त्यांचे भाऊ आणि बहिण यांनी जाबदार बँकेस त्यांच्या वडीलांचे नावे असणारी रक्कम तक्रारदार यांचे कर्जखात्यात वळती करुन घेण्याची वेळोवेळी विनंती केली होती व संमतीपत्र देखील दिलेले होते. तथापि जाबदार बँकेने सदरची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यास टाळाटाळ केली. दि.29/1/2008 रोजी तक्रारदार व त्यांचे भाऊ आणि बहिण यांनी नोटरीसमोर जाबदार बँकेचे सांगणेवरुन वडीलांच्या खात्यात येणे असलेली रक्कम व्याजासह तक्रारदाराच्या कर्ज खात्यात जमा करुन घेण्याबाबत संमतीपत्र लिहून दिले व ते बँकेत हजर केले. त्यामुळे जाबदार बँकेने तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे असणारी संपूर्ण रक्कम, त्यावरील व्याजासह तक्रारदार यांचे कर्ज खात्यात जमा करुन घेणे आवश्यक होते तथापि जाबदार बँकेने त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही तसेच तक्रारदाराचे विरुध्द दाखल केलेल्या दाव्यातून देखील सदर बचत खात्यावरील रक्कम वजा केली नाही आणि त्या दाव्यातील हुकूमनाम्याच्या आधारे दिवाणी कोर्टात दरखास्त दाखल केली आहे. जाबदार बँकेने जाणूनबुजून तक्रारदाराच्या वडीलांचे नावे असणारी बचत खात्यातील रक्कम कागदपत्रांची पूर्तता करुन देखील थकीत कर्जात जमा केली नाही किंवा सदरची रक्कम तक्रारदारास रोख दिलेली नाही व त्यायोगे जाबदार बँकेने सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान होवून त्यांना मानसिक त्रास, प्रवास, हेलपाटे सहन करावे लागले. करिता वर नमूद केलेल्या मागणीकरिता प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करावी लागलेली आहे. दाव्यास कारण दि.29/12/2008 रोजी कागदपत्रांची पूर्तता करुन देखील तक्रारदाराच्या थकीत कर्जात त्यांच्या वडीलांचे नावे असणा-या बचत खात्यावरील रक्कम जमा न केल्यामुळे घडले व त्यानंतर घडत आहे. अशा कथनावरुन तक्रारदाराने वर नमूद केल्याप्रमाणे मागणी केलेली आहे.
4. जाबदार बँकेने आपली लेखी कैफियत नि.10 ला दाखल करुन तक्रारदाराची संपूर्ण कथने व मागण्या स्पष्टपणे नाकारल्या आहेत. जाबदार बँकेचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हा ग्राहक होऊ शकत नाही व त्यांना तक्रार दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही. सदरची तक्रार ही दिशाभूल करणारी असून खरी वस्तुस्थिती लपवून ठेवून मुदतबाहय दाखल केलेली असल्याने ती रद्दबातल होण्यास पात्र आहे. तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे म्हणजे कै.दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांचे नावे जाबदार बँकेमध्ये बचत खाते असून त्यात रक्कम रु.6,196/- शिल्लक आहेत ही बाब जाबदार बँकेने मान्य केली आहे. तसेच तक्रारदाराचे कर्जखाते जाबदार बँकेत आहे व त्यावर देखील काही रक्कम येणे आहे ही बाब देखील बँकेने मान्य केली आहे. तथापि, तक्रारदाराच्या कर्जखात्यावर येणे रक्कम आणि त्यांच्या वडीलांचे बचत खात्यात जमा असणारी रक्कम या भिन्न गोष्टी असून त्यांची सरमिसळ करुन तक्रारदार वस्तुस्थितीशी गल्लत करु पहात आहेत. बँकेने दाखल केलेला तक्रारदारविरुध्दचा दावा प्रलंबित असताना तक्रारदार व त्यांचे भाऊ आणि बहिण यांनी जाबदार बँकेस त्यांच्या वडीलांच्या नावे असणारी रक्कम तक्रारदार यांच्या कर्ज खात्यात जमा करुन घेण्याबाबत वेळोवेळी विनंती केली व संमतीपत्र दिले ही बाब जाबदार यांनी स्पष्टपणे नाकबूल केलेली आहे. सदरची बाब/तक्रार ही तक्रारदाराने बँकेने त्यांच्या विरुध्द केलेल्या रेग्युलर दिवाणी मुकदमा क्र.58/2000 मध्ये देखील उपस्थित केलेली होती परंतु दिवाणी न्यायालयाने सदर बाबीची कोणतीही दखल दाव्याचा निकाल करताना घेतलेली नाही. त्यामुळे सदरची बाब ही निर्णीत झालेली असून त्याबाबत तक्रारदारास पुन्हा काही उजर करता येत नाही. संमतीपत्राच्या आधारे दत्तात्रय शिंदे यांचे नावे असणारी रक्कम तक्रारदाराच्या कर्जखात्यात जमा करुन मिळावी न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे हे तक्रारदाराचे म्हणणे मान्य व कबूल नाही. जाबदारने तक्रारदारास काही सेवेत त्रुटी दिली हे कथनदेखील जाबदारने स्पष्टपणे नाकबूल केले आहे. उलटपक्षी तक्रारदार आणि जाबदार बँक यांचेमध्ये ग्राहक/सेवा देणारे व घेणारे असे कोणतेही नाते निर्माण झालेले नाही. तक्रारदाराची कोणतीही मागणी जाबदारास मान्य नाही. तक्रारदार हा मंचापुढे स्वच्छ हाताने आलेला नाही. त्याने खरी वस्तुस्थिती लपवून ठेवून प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.
5. जाबदारचे म्हणण्याप्रमाणे तक्रारदाराचे वडील दत्तात्रय रामचंद्र शिंदे हे दि.26/7/95 रोजी मयत झाले. त्यांचे मृत्यूनंतर त्यांचे नावे असणारी बचत खात्यातील शिल्लक रक्कम रु.6,196/- एवढी होती. कै.दत्तात्रय शिंदे यांचे मृत्यूनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार आणि बँकेच्या नियमानुसार त्यांच्या खात्यावरील रक्कम ही deceased claim होती. कै.दत्तात्रय शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी जाबदार बँकेकडे संपर्क साधून कै.दत्तात्रय शिंदे यांच्या बचत खात्यात असणा-या रकमेबाबत बँकेच्या नियमाप्रमाणे मागणी केली व रक्कम देण्याची विनंती केली. कै.दत्तात्रय शिंदे यांच्या बचत खात्यात जमा असणारी रक्कम ही त्यांची पत्नी चांगुणाबाई दत्तात्रय शिंदे यांनी देणेविषयी कै.दत्तात्रय शिंदे यांच्या सर्व वारसांनी लेखी अधिकारपत्र देवून बँकेस विनंती केली व कै.दत्तात्रय शिंदे यांचे नावे बचत खात्यात जमा असणारी रक्कम ही त्यांची पत्नी व वारस सौ चांगुणाबाई शिंदे यांना देणेविषयी संमतीपत्र लिहून दिले. सदर संमतीपत्रावर दि.18/12/95 रोजी तक्रारदाराने स्वतः सही केली असून कै.दत्तात्रय शिंदे यांच्या बचत खात्यावरील रक्कम आपली आई चांगुणाबाई हीला देण्याविषयी संमती दिली. त्यामुळे दि.18/12/95 पासून सदर रकमेवर तक्रारदारास कोणताही हक्क व अधिकार राहिलेला नाही. सबब प्रस्तुतच्या तक्रारीस Estopple by conduct या तत्वाचा बाध येत आहे.
6. जाबदार यांचे पुढे म्हणणे असे की, तक्रारदार व इतर वारसांचे विनंतीनुसार जाबदार बँकेने कै.दत्तात्रय शिंदे यांच्या बचत खात्यात असणारी रक्कम श्रीमती चांगुणाबाई यांना देण्याची विनंती मान्य केली. तथापि बँकेच्या नियमाप्रमाणे सदरची रक्कम स्वीकारण्यासाठी इन्डेम्निीटी बॉंड लिहून देण्यास सांगितले. श्रीमती चांगुणबाई यांनी इन्डेम्निीटी बॉंड अद्याप लिहून दिलेला नसल्यामुळे जाबदार बँकेला सदर रक्कम श्रीमती चांगुणाबाई यांना देता आलेली नाही तथापि दि.27/2/96 पासून चांगुणाबाई शिंदे यांना वगळता कै.दत्तात्रय शिंदे यांच्या कोणताही वारसांचा हक्क दत्तात्रय शिंदे यांच्या बचत खात्यात जमा असणा-या रकमेवर राहिलेला नाही. केवळ जाबदार बँकेने तक्रारदाराविरुध्द दावा दाखल केल्याने आणि त्यांचेविरुध्द दरखास्त प्रलंबित असताना तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रार चिडून जावून आणि पश्चात बुध्दीने दाखल केलेली आहे. तक्रारदार व इतर दत्तात्रय शिंदे यांचे वारसांमध्ये आपसांत झालेले संमतीपत्र हे जाबदार बँकेवर बंधनकारक नाही कारण त्या संमतीपत्रास बँक पक्षकार नाही तसे ते संमतीपत्र पुराव्याचे दृष्टीने अनावश्यक आहे. चांगुणाबाई मयत झाल्याचे कथन तक्रारदारांनी केलेले आहे. याही कारणावरुन तक्रारीस कोणतेही कारण शिल्लक उरत नाही. तक्रारदाराची तक्रार मुदतीत नाही. या आणि अशा कारणांवरुन सदरची तक्रार नुकसान भरपाई दाखल रु.10,000/- खर्च बसवून खारिज करावी अशी विनंती जाबदारांनी सरतेशेवटी केलेली आहे.
7. आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.2 ला शपथपत्र दाखल करुन नि.4 ला एकूण 8 कागदपत्रे दाखल केलेली आहेत तर जाबदार तर्फे नि.11 ला एकूण 2 कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. तक्रारदाराने नि.14 सोबत जाबदार बँकेचे दि.29/12/08 रोजीचे पत्र (नि.15) दाखल केलेले आहे आणि आपले पुराव्यादाखल हजर केलेले शपथपत्र नि.16 ला दाखल केलेले आहे. नि.19 सोबत देखील तक्रारदारतर्फे एकूण 4 कागदपत्रे दाखल करण्यात आली असून नि.17 ला पुरावा संपल्याची पुरसिस दाखल करण्यात आली आहे. जाबदारतर्फे नि.21 ला रे.दि.मु.नं.58/2000 या दाव्यात दि.16/7/09 रोजी इस्लामपूर येथील चौथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी पारीत केलेल्या हुकूमनाम्याची प्रत दाखल करण्यात आली आहे. जाबदारतर्फे कोणताही मौखिक पुरावा देण्यात आलेला नाही.
8. प्रस्तुत कामी तक्रारदारातर्फे लेखी युक्तिवाद नि.22 ला दाखल असून त्यांचे विद्वान वकीलांनी व जाबदार बँकेतर्फे त्यांचे विद्वान वकीलांनी युक्तिवाद केलेला आहे.
सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक होतो काय ? होय.
2. जाबदार बँकेने दूषीत सेवा दिली हा आरोप तक्रारदाराने
सिध्द केला आहे काय ? नाही
3. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
आमच्या वरील निष्कर्षाची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
9. मुद्दा क्र.1 ते 3
जरी जाबदार बँकेने तक्रारदार हा त्यांचा ग्राहक होवू शकतो ही बाब अमान्य केली असली तरीही तक्रारदार हा त्यांचा कर्जदार आहे. त्याचे आई व वडील यांचे बचत खाते जाबदार बँकेत असून तक्रारदार हा वारसदार आहे ही बाब जाबदार बँकेने मान्य केली आहे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तक्रारदार हा त्यांचे वडीलांचे वारस म्हणून वडीलांचे बचत खात्यातील रक्कम मिळण्यास पात्र ठरला असता आणि त्याला जाबदार बॅंक ही सेवा देण्यास जबाबदार होती. याशिवाय देखील जाबदार बँक आणि तक्रारदार यांचेमध्ये धनको आणि ऋणको असे संबंध आहेत ही बाब देखील दोन्ही पक्षकारांना मान्य आहे. त्यामुळे तक्रारदार हा जाबदार बँकेचा ग्राहक होतो ही गोष्ट स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेत येतो या निष्कर्षास हे मंच आलेले आहे आणि म्हणून वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
10. या संपूर्ण प्रकरणातील बाबींचा सखोल विचार केला तर असे दिसते की, तक्रारदार यांचे संपूर्ण कथन हे अप्रस्तुत आणि कोणत्याही पुराव्यावर बेतलेले नाही. केवळ त्याने घेतलेल्या कर्जातून काही प्रमाणात सुटका मिळावी म्हणून वडीलांचे नावे देय असणारी रक्कम त्याचे कर्जखात्यातून वजा करावी या एकमेव उद्देशाने सदरची तक्रार तक्रारदाराने दाखल केलेली दिसते. नि.21 ला दाखल केलेल्या रे.दि.मु.नं.58/2000 च्या हुकूमनाम्याचे जर अवलोकन केले तर असे दिसते की, सदरच्या दाव्यात तक्रारदाराने जाबदार बँकेविरुध्द या तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे वडीलांचे बचत खात्यातील रक्कम त्यांच्याकडून येणे असलेल्या रकमेतून वजावट करुन मिळावी अशी मागणी केलेली नाही. सदरचा दावा दि.16/7/09 रोजी निकाली झालेला आहे. तक्रारदाराने या तक्रारीत नमूद केलेली आणि वडीलांचे बचत खात्यातील रकमेची वजावट आपल्याविरुध्द असलेल्या कर्जाच्या रकमेतून करुन मिळावी अशी मागणी दाव्यात करण्यास कोणताही कायदेशीर अडसर नव्हता. जाबदार बँकेने आपल्या लेखी कैफियतीत प्रस्तुत रे.दि.मु. नं.58/2000 मध्ये तक्रारदाराने सदरप्रमाणे मागणी केलेली होती असे विधान केलेले आहे. दुर्दैवाने सदर दाव्यात पारीत करण्यात आलेल्या न्यायनिर्णयाची प्रत किंवा प्रमाणीत प्रत या प्रकरणात दाखल करण्यात आलेली नाही. परंतु जाबदार बँकेचे वतीने त्यांचे विद्वान वकीलांनी तक्रारदाराचे हे कथन दिवाणी न्यायालयासमोर करण्यात आलेले होते आणि ते दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावले असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्या कथनास तक्रारदारतर्फे कोणताही उजर घेण्यात आलेला नाही. जर असे असे असेल तर प्रस्तुत तक्रारीमध्ये जी काही कथने तक्रारदाराने घेतलेली आहेत ती पूर्णतया पश्चातबुध्दीने घेतलेली आहे असेच म्हणावे लागेल.
11. जाबदार बँकेने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होते की, कै.दत्तात्रय शिंदे वारल्यानंतर त्यांचे सदर बँकेतील बचत खाते हे नॉन परफॉर्मिंग अकाऊंट झाले आणि त्यामुळे ते मुख्यालयास वर्ग करण्यात आले. तथापि सदर बचत खात्यात शिल्लक असणारी रक्कम खातेदाराच्या वारसास देण्याकरिता दि. 29/12/08 रोजीच्या नि.15 चे पत्रान्वये जाबदार बँकेने प्रस्तुत तक्रारदाराकडून मयताचे मृत्यूचा दाखला, वारस दाखला आणि शपथपत्र इ. कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले होते. त्या अगोदर दि.15/4/96 रोजी तक्रारदाराच्या आई चांगुणाबाई शिंदे हीने दत्तात्रय शिंदे यांचे बचत खात्यातील शिल्लक परत मिळण्यासाठी अर्ज केल्याचे दिसते. त्याकामी आवश्यक असणारा अर्ज हा विहीत नमुन्यामध्ये तक्रारदार स्वतः, त्यांच्या आई व त्यांचे इतर भाऊ आणि बहिण यांनी केल्याचे दिसते. त्यामध्ये सदर बचत खात्यातील रक्कम ही चांगुणाबाई दत्तात्रय शिंदे यांना द्यावी अशी विनंती दत्तात्रय शिंदे यांचे संपूर्ण वारसांनी केल्याचे दिसते. सदरचा अर्ज नि.11 सोबत जाबदार बँकेने दाखल केला आहे. सदरची विनंती जाबदार बँकेने मान्य करुन केवळ चांगुणाबाई शिंदे यांनी इन्डेम्निटी बॉंण्ड लिहून दयावा अशी अट घातल्याचे दिसते. जाबदार बँकेचे म्हणणे असे की, सदर अटीनुसार आजतागायत इन्डेम्निटी बॉंण्ड न लिहून दिल्यामुळे दत्तात्रय शिंदे यांचे बचत खात्यावरील शिल्लक रक्कम त्यांचे वारसदार म्हणजे चांगुणाबाई शिंदे यांचे बचत खात्यावर वर्ग करण्यात आलेली नाही. जाबदार बँकेने दि.4/8/99 रोजीचे तक्रारदारास पाठविलेल्या पत्राची प्रत देखील जाबदार बँकेने दाखल केलेली आहे. त्यात जाबदार बँकेने असे स्पष्टपणे नमूद केल्याचे दिसते की, तक्रारदाराचे वडील दत्तात्रय रामचंद्र शिंदे यांचे नावावरील सेव्हिंग्ज रकमेची deceased Claim संदर्भात तक्रारदारास सर्व माहिती ब-याचवेळा दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता तक्रारदाराकडून झालेली नाही व सदरची बाब केवळ तक्रारदाराच्या सहकार्याअभावी व निष्काळजीपणामुळे प्रलंबित राहिलेली आहे. सदर पत्रास तक्रारदाराने कोणतीही हरकत घेतल्याचे दिसून येत नाही. या सर्व बाबींवरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदारास जाबदार बँकेने काही सदोष सेवा दिली आहे असे म्हणता येत नाही. आपल्या युक्तिवादाचे दरम्यान तक्रारदाराचे विद्वान वकीलांनी असे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला की, तक्रारदाराची आई चांगुणाबाई हीस देय असणारी रक्कम तक्रारदार ही वारस म्हणून देण्याचा हुकूम व्हावा ही विनंती आणि हे विधान प्रस्तुत तक्रारीकरिता संपूर्णतया विसंगत आणि अप्रस्तुत आहे आणि तो या तक्रारीचा विषय होऊ शकत नाही आणि त्याकरिता तक्रारदाराने त्यांना उपलब्ध असलेल्या इतर कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा. मुळातच तक्रारदारास काय तक्रार मांडावयाची आहे याचे स्पष्ट आकलन झाल्याचे दिसत नाही. या संपूर्ण प्रकरणात जाबदार बँकेने कोणतीही दूषित सेवा दिल्याचे या मंचाला दिसत नाही. त्यामुळे आम्ही वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी दिलेले आहे.
12. वरील विवेचनावरुन हे स्पष्ट होते की, सदरच्या तक्रारअर्जात कोणतीही मागणी केलेली विनंती मान्य करण्यास तक्रारदार पात्र नाहीत आणि ही तक्रार खर्चासह खारिज करण्यास पात्र आहे, तसे आम्ही घोषीत करतो आणि खालील आदेश पारीत करतो.
- आ दे श -
प्रस्तुतची तक्रार ही रक्कम रु.1,000/- च्या खर्चासह नामंजूर करण्यात येत आहे, ती दफ्तरी दाखल करण्यात यावी.
सांगली
दि. 03/04/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष