निकालपत्र :- ( (मा. अध्यक्ष, श्री. संजय पी. बोरवाल) (दि. 18-05-2013)
(1) प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल दि. 22-02-2012 रोजी दाखल होऊन दि. 05-03-2012 रोजी स्विकृत करुन वि. पक्ष यांना नोटीसीचा आदेश झाला. वि. पक्ष क्र. 1 यांनी त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले आहे. वि. पक्ष क्र. 2 यांना दि. 3-03-2013 रोजीचे मे. मंचाचे आदेशान्वये दुरुस्ती करुन कमी केले आहे. तक्रारदाराचे वकील व वि. पक्ष क्र.1 यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-
तक्रारदार हिचे पती सैन्यदलात नोकरीस होते. ते सैन्यातून निवृत्त झालेनंतर नियमितपणे निवृत्ती वेतन (Pension ) वि.प. क्र. 1 मार्फतच घेत होते. तक्रारदार हिचे पतीचे दि. 20-04-1999 रोजी निधन झाले. त्यांनतर तक्रारदार हिने निवृत्ती वेतनासाठी वि.प. यांचेकडे प्रयत्न केले. तक्रारदार हिच्या सासूबाईची तक्रार फेटाळली आहे. तक्रारदाराकडून निवृत्ती वेतन अदा करणेसाठी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन घेतली. मे. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, गडहिंग्लज यांचे कोर्टातून दि. 12-10-2010 रोजी वारसा दाखला घेतला आहे. वि.प. क्र. 1 यांना निवृत्तीवेतन अदा करणेबाबतच्या दि. 28-04-2011 रोजीच्या वरिष्ठ कार्यालयाच्या सुचना असतानाही त्यांनी टाळाटाळ केली आहे. वि.प. नं. 1 यांनी दि. 12/12/2011 रोजीच्या पत्राने तक्रारदार हिस निवृत्ती वेतन देता येणार नसलेचे कळविले आहे. तक्रारदार हिस वेळेत निवृत्ती वेतन न मिळाल्याने आर्थिक व नुकसानीचे त्रासास सामोरे जावे लागत आहे. वि.प. यांनी तक्रारदार यांना निवृत्तीवेतन अदा न करुन सेवेत त्रुटी केली आहे. तक्रारदार यांनी निवृत्ती वेतन मागील फरकासह माहे फेब्रुवारी पर्यंत होणारी रक्कम रु. 8,49,414/- व त्यावर द.सा.द.शे. 10 टक्के व्याज दराने अदा करणेबाबत आदेश व्हावेत व नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 50,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदार हिने तक्रार अर्जात केली आहे.
(3) तक्रारदाराने तक्रारीसोबत तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 यांनी वि.प. नं. 1 ला तक्रारदार यांचे निवृत्ती वेतन मंजूर केलेल्याबाबत पत्राची प्रत दि. 22-11-2010, वि. पक्ष यांनी तक्रारदार याचे निवृत्तीवेतनाबाबत दिलेल्या पत्राची प्रत दि. 16-04-2013 , वरिष्ठ कार्यालय यांनी वि.प. नं. 1 यांना निवृत्ती वेतन अदा करणेबाबत दिलेल्या पत्राची प्रत दि. 28-04-2013 , वि.प. नं. 2 यांनी वि. प. नं. 1 यांना पाठविलेल्या पत्राची प्रत दि. 12-05-2011, वि.प. नं. 1 यांनी तक्रारदार याची निवृत्ती वेतन देणेस नकार दिलेल्या पत्राची प्रत, तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 कडे केलेल्या तक्रार अर्जाची प्रत दि. 20-01-2012, वि.प. नं. 1 यांना तक्रारदार यांचा अर्ज स्विकारलेची पोहच पावतीची प्रत यदि. 21-01-2012, तक्रारदार यांनी मे. दिवाणी न्यायालय, गडहिंग्लज यांचे कोर्टातून मिळवलेल्या वारस दाखल्याची प्रत दि. 12-10-2010, तक्रारदार यांचे माहिती दाखविणारा वि.प. नं. 2 यांनी दिलेल्या दाखल्याची प्रत, दि. 17-01-2012 , व तक्रारदार यांचे ओळखपत्राची प्रत दि. 9-01-2012 इत्यादी कागदपत्राची सत्यप्रती दाखल केल्या आहेत.
(4) वि.पक्ष बँकेने दाखल केलेले लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. वि. पक्षकार त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, दि. 12-12-2011 राजी संबंधीत वरिष्ठ प्राधिकरणाने यातील तक्रारदार यांचे कौटूंबिक निवृत्ती वेतन रद्बातल केले असलेचे वि. पक्ष बँक यांना कळविले आहे. सदर आदेशाची एक प्रत तक्रारदार यांना पाठविली आहे. त्यामुळे वि. पक्ष बँक यांनी तक्रारदार हीस निवृत्ती वेतन देता येणार नसलेचे कळविले आहे. तक्रारदारांनी त्यांचे तक्रार अर्जात दि. 12-12-2011 रोजीच्या आदेशाचा जाणूनबुजून उल्लेख केलेला नाही. वि. पक्ष यांनी परिच्छेद निहाय तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदारांनी वि. पक्ष बँक यांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु. 25,000/- देणेबाबत आदेश व्हावा.
वि. पक्ष त्यांचे म्हणण्यात वस्तुस्थिती पुढे सांगतात, तक्रारदार हिने निवृत्ती वेतन मिळणेकरिता संबंधीत वरिष्ठ कार्यालयाकडे ज्या कागदपत्रांची पुर्तता केली त्यामध्ये Descriptive Roll मध्ये जो फोटो होता त्या फोटोशी दावा करणा-या व्यक्तींचा म्हणजेच तक्रारदार हिचा फोटो जुळत नसले कारणास्तव Principal Controller of Defence Accounts Allahabad यांनी यातील तक्रारदाराचा निवृत्ती वेतनाचा दावा/क्लेम नांमजूर केला असून त्याप्रमाणे दि. 16-11-2011 रोजी वि. पक्ष बँकेस पत्राने कळविणेत आले आहे त्या पत्राची एक प्रत तक्रारदार हिस पाठविलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हिचे वि. पक्ष बँकेने निवृत्तीवेतन थांबविण्याचा अगर ते बंद करण्याचा किंवा तक्रारदार हिस निवृत्ती वेतन अदा न करण्याचा कोणताही प्रश्न उदभवत नाही. सबब, तक्रारदार हिचा तक्रार अर्ज नामंजूर करुन वि. पक्ष बँक हिस नुकसानभरपाई पोटी रक्कम रु. 25,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. वि. पक्ष बँक यांनी त्यांचे म्हणणेसोबत दि. 16-11-2011 रोजीच्या पत्राची प्रत जोडली आहे. तसेच दि. 23-04-2013 रोजी एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. यांना ता. 17-06-2011 रोजी लता उर्फ वसंत बुगडे यांनी पेन्शन वर्ग होऊन मिळणेसाठी दिले अर्जाची प्रत दि. 17-06-2011, वि.प. यांचेकडे अर्जासोबत दिलेला जॉंईंट फोटो व अस्सल फोटो लता उर्फ रेखा वसंत बुगडे, तक्रारदार हिचे आयकर ओळखपत्र, वि.प. यांचेकडे तक्रारदार हिचे पेन्शन अकौंट नं. 32109155207 चे खातेबाबत माहिती, तक्रारदार हिचे प्रतिज्ञापत्राची प्रत, रेशन कार्डातील दोन्ही नावाबाबतचे तहसिलदार आजरा यांचे समोरचे प्रतिज्ञापत्र दि. 6-07-2011, महाराष्ट्र शासन राजपत्र कोल्हापूर विभाग कडील तक्रारदार हिचे नावांबाबत दि. 25-08-2011 इत्यादीच्या प्रती जोडल्या आहेत.
(5) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, वि. पक्ष यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे , उभय पक्षकारांच्या वकिलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
मुद्दा निष्कर्ष
1. वि.प. यांनी तक्रारदार यांना निवृत्ती वेतन अदा
न करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? ---- होय.
2. तक्रारदार मानसिक त्रासापोटी कोणता अनुतोष मिळणेस
पात्र आहे काय ? ----होय.
3. आदेश काय ? ------अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र. 1 :-
प्रस्तुत तक्रारदार यांचे पती सैन्य दलात नोकरीस होते. ते निवृत्त झालेनंतर निवृत्ती वेतन ( पेन्शन) वि.प. बँकेमार्फत घेत होते. तक्रारदारांच्या पतीचे निधन दि. 20-04-1999 रोजी झाले. त्यानंतर त्यांनी वि.प. बँकेकडे निवृत्ती वेतन मिळणेसाठी अर्ज केला. त्यावेळी वि.प. यांनी तक्रारदार यांना फॅमिली पेन्शन नाकारल्याचे दि. 12-12-2011 रोजी कळविले. सदर कामी तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत एकूण 10 कागदपत्रे दाखल केली असून त्यापैकी अ.क्र. 1 चा दि. 22 नोंव्हेंबर 2010 चा कागद पाहता सदरचे पत्र सेना वायू रक्षा अभिलेख यांच्याकडून स्टेट बँक ऑफ इंडिया गडहिंग्लज शाखा यांना पाठविण्यात आले असून सदर पत्राच्या परिच्छेद 3 व 4 मध्ये तक्रारदार यांना फॅमिली पेन्शन दि. 21 एप्रिल 1999 पासून त्वरीत देण्यात यावी असे नमूद केल्याचे दिसून येते. तसेच अ.क्र. 8 वरील गडहिंग्लज जिल्हा न्यायालय यांनी मिस्लेनियस सिव्हील अॅप्लीकेशन नं. 75-2007 दि. 12 ऑक्टोंबर 2010 रोजी वारस दाखला दिला असून त्यानुसार तक्रारदार या वसंत कृष्णा बुगडे यांच्या वारस आहेत हे सिध्द होते. तसेच तक्रारदार यांनी अ.क्र. 10 कडे जिल्हा सैनिक वेल्फेअर ऑफीसर यांनी दिलेले ओळखपत्र दाखल असून ते या तक्रारदाराचे आहे.
सदर कामी वि.प. यांनी दि. 23-04-2013 यादीसोबत एकूण सात कागदपत्रे दाखल केली असून सदर कागदपत्राचे या मंचाने अवलोकन केले. सदरची सर्व कागदपत्रांवरती रेखा वसंत बुगडे यांच्याच नावाची नोंद दिसते. वि.प. यांचे म्हणण्यामध्ये परिच्छेद 11 मधील मजकूर पाहता तक्रारदार हे निवृत्ती वेतन मिळणेकरिता वरिष्ठ कार्यालयाकडे ज्या कागदपत्रांची पूर्तता केली त्यामध्ये जो फोटो होता त्या फोटोशी दावा करणा-या व्यक्तीचा म्हणजेच तक्रारदार हिचा फोटो जुळत नसले कारणास्तव Principal Controller of Defence Account Allahabad यांनी दि. 16-11-2011 रोजी तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केल्याचे बँकेला कळविले आहे. या ठिकाणी वादाचा मुद्दा उपस्थित होतो की, तक्रारदार हिचा फोटो जुळत नसल्या कारणास्तव वि.प. यांनी तक्रारदार यांना पेन्शनची रक्कम दिली नाही ते योग्य आहे का ? या बाबत सदर कामी तक्रारदारांनी यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता, प्रस्तुत कामी उपरोक्त दाखल सर्व कागदपत्रांनुसार विचार केला असता सदरचे कामी तक्रारदार यांनी मा. जिल्हा न्यायाधिश, गडहिंग्लज यांनी दिलेला वारसा दाखला, तसेच जिल्हा सैनिक वेल्फेअर ऑफीस, कोल्हापूर यांनी तक्रारदार हिस दिलेले ओळखपत्र, सेना वायू रक्षा अभिलेख यांनी दि. 22-11-2010, 28-02-2012 रोजी तक्रारदार यांना PPO No. S/020079/1991 ( Pension Payment Order) प्रमाणे पेन्शन बाबत दिलेले पत्र, सेना वायू व रक्षा अभिलेख यांनी ता. 21 जानेवारी 2011 रोजी मयत सैनिक ( वसंत कृष्णा बुगडे) यांचे वारसाबाबत दिलेला दाखला या सर्व बाबींचा विचार केला असता प्रस्तुत कामातील तक्रारदार मयत वसंत कृष्णा बुगडे यांच्या पत्नी आहेत हे निर्विवादपणे सिध्द होते. व त्यामुळे त्या निवृत्तीवेतनाची रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सबब, प्रस्तुत कामी वि.प. यांनी तक्रारदार यांना निवृत्ती वेतन अदा न करुन सेवेमधील त्रुटी केली आहे.
वरील सर्व विवेचनाचा विचार करता हे मंच मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2:-
तक्रारदार यांना सामनेवाला यांनी निवृत्तीवेतन न दिल्याने सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला. तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्यामुळे वि.प. यांनी शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा- गडहिंग्लज यांच्याकडून नुकसानभरपाई /मानसिक त्रासापोटी रु. 1,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 500/- वसूल होवून मिळणेस पात्र आहेत.
मुद्दा क्र. 3:-
सबब, मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. वि.प. शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा- गडहिंग्लज यांनी तक्रारदार यांना PPONo. S/020079/1991 (Pension Payment Order) प्रमाणे देय निवृती वेतन दि. 20-04-1999 पासून अदा करावेत. सदर रक्कमेवर संपूर्ण रक्कम हाती मिळोपावेतो द.सा. द.शे. 6 टक्के व्याजासह द्यावेत.
3. वि.प. शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया , शाखा- गडहिंग्लज यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- (अक्षरी रु. एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- (अक्षरी रु. पाचशे फक्त) अदा करावेत.
4 सदरच्या निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.