मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 23/02/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्याने सुझुकी एक्सेस 125 नोंदणी क्र. MH 31 DF 8859 हे वाहन दि.16.05.2010 रोजी खरेदी केले. त्यासाठी त्याने गैरअर्जदार यांचेकडून रु.23,350/- चे कर्ज घेतले. उभय पक्षांमध्ये ठरलेल्या करारानुसार सदर रकमेची परतफेड तक्रारकर्त्याने रु.1541/- प्रमाणे 18 हप्त्यामध्ये करावयाची होती व पहिला हप्ता तक्रारकर्त्याने कॅनरा बँकेतील खात्याचे धनादेशाद्वारे अदा केला. पुढील हप्त्यासाठी तक्रारकर्त्याने ECS (इलेक्ट्रॉनिक क्लीयरंस सर्व्हीस) चा उपयोग करण्याची संमती दिली. त्यानुसार सदर सुविधेद्वारे गैरअर्जदारांनी दि.14.07.2010 रोजी दुस-या हप्त्याची रक्कम रु.1541/- प्राप्त केली. परंतू तिस-या हप्त्याची रक्कम सदर सुविधेद्वारे काढली नाही. उलट तक्रारकर्त्यास त्यांच्या खात्यात पर्याप्त रक्कम नसल्यामुळे सुविधेप्रमाणे रक्कम प्राप्त झाली नाही असे फोनद्वारे कळवून सदर रक्कम घेण्यास माणसाला पाठवित आहे असे सांगितले. वास्तविक तक्रारकर्त्याच्या खात्यात पर्याप्त रक्कम जमा होती व त्या रकमेतून गैरअर्जदाराचा हप्ता सहज वसुल झाला असता. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदार यांनी प्रदान केलेल्या खाते उतारेप्रमाणे सप्टेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम गैरअर्जदाराचे ECS सुविधेद्वारे न घेता रोख स्वरुपात तक्रारकर्त्याकडून प्राप्त केली. फक्त ऑक्टोबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते गैरअर्जदार यांनी ECS सुविधेद्वारे काढले. तक्रारकर्त्याने सदर बाबीसंदर्भात गैरअर्जदारास वारंवार स्पष्टीकरणे मागितले असता त्यांनी खात्यात अपर्याप्त निधीचे कारण सांगून सदर सुविधेनुसार पैसे काढता आले नाही. त्यापत्रात त्यांनी चुकीचा खाते क्रमांक लिहिला होता. वास्तविक त्याआधी दुसरा हप्ता गैरअर्जदार यांनी बरोबर प्राप्त केला होता. तक्रारकर्तच्या खात्यात पर्याप्त निधी असतांना अपर्याप्त निधीचे कारण पुढे करुन ECS निर्देशाप्रमाणे हप्ता न घेणे ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे. वरील बाबीची माहिती, नोटीस गैरअर्जदार यांना देऊनसुध्दा त्यांनी त्यांची दखल घेतली नाही. उलट तक्रारकर्त्याच्या खात्यात रक्कम थकीत दाखविणे सुरु केले व दर महिन्यात वसुलीसाठी माणून पाठविणे बंद केले. दि.03.04.2011 रोजी गैरअर्जदाराने काही माणसांना तक्रारकर्त्याकडे पाठविले. त्यांनी आरडाओरड करुन तमाशा केला. तक्रारकर्ता सदर बाबीची तक्रार करण्यास पोलिस स्टेशनला गेला असता त्याची तक्रार नोंदविली नाही. या घटनेमुळे तक्रारकर्त्याला हायपरटेंशन त्रास झाला. तक्रारकर्त्याची 18 वर्ष अगोदर बायपास सर्जरी झाल्यामुळे रक्तचापावर लक्ष ठेवावे लागते. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याची चुक नसतांना अनावश्यक थकीत रक्कम कर्ज खात्यात दर्शवून वाहन जप्त करण्याचे प्रयत्न केले. गैरअर्जदारांची ही कृती अनैतिक व्यापार प्रथेत मोडते. म्हणून तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल करुन, गैरअर्जदारांनी रु.83,586/- प्रदान करावे, संपूर्ण कार्यवाहीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला पाठविण्यात आली. गैरअर्जदारांना वारंवार संधी देऊनही त्यांनी लेखी उत्तर दाखल न केल्याने मंचाने त्यांचेविरुध्द विना लेखी जवाब कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यावर मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार सतत गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी उपलब्ध दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याचे शपथपत्र व तक्रारकर्त्याने सादर केलेली कागदपत्रे यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून सुझूकी एक्सेस 125 हे दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी रु.23,350/- एवढया रकमेचे कर्ज घेतलेले होते व त्याची परतफेड तक्रारकर्त्याने रु.1541/- प्रति हप्त्याप्रमाणे 18 हप्त्यात करावयाचे असे उभय पक्षात ठरलेले होते. पहिला हप्ता तक्रारकर्त्याने धनादेशाद्वारे गैरअर्जदार यांना अदा केला होता व त्यानंतर कर्जाची परतफेड करण्याकरीता तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला ECS (इलेक्ट्रॉनिक क्लीयरंस सर्व्हीस) या माध्यमातून तक्रारकर्त्याचे कॅनरा बँकेतील खात्याचे क्र. 14881011053646 मधून कर्ज रकमेची कपात करण्याची सुचना दिलेली होती हे तक्रारकर्त्याच्या शपथपत्रावरुन दिसून येते. तसेच दाखल दस्तऐवजावरुन त्यास पुष्टी मिळते.
5. तक्रारकर्त्याचे शपथपत्र, तसेच गैरअर्जदारांनी दिलेले खाते उता-यावरुन गैरअर्जदार यांनी कर्ज परतफेडीचा दुसरा हप्ता ECS पध्दतीने कपात केल्याचे दिसून येते. परंतू त्यानंतरचे वरील हप्त्याची कपात ECS पध्दतीने केलेली दिसून येत नाही. सदर हप्ते तक्रारकर्त्याने रोख स्वरुपात अदा केल्याचे दिसून येते. दस्तऐवज क्र. 13 वरील दि.02.11.2010 च्या पत्रामध्ये गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याच्या बँक अकाऊंटचा चुकीचा नंबर दिल्याचे दिसून येते.
6. कुठल्याही बँकेने ग्राहकाचे खाते ऑपरेट करतांना व कर्जाच्या परतफेड रकमेची कपात करतांना ग्राहकांनी दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या प्रकरणात असे दिसते की, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे सुचनेनुसार ECS पध्दतीने तक्रारकर्त्याच्या कर्ज रकमेची कपात केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास सदर रकमेचा भुर्दंड रोख स्वरुपात परतफेड करतांना कमी अधिक वेळ झाल्यामुळे सहन करावा लागला. दाखल दस्तऐवजावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याच्या खात्यात पर्याप्त रक्कम होती. गैरअर्जदार यांनी सुचनांचे पालन न करुन सेवेत कमतरता दिली या निष्कर्षाप्रत हे मंच येते.
7. त्याचबरोबर हेही खरे की, ही गैरअर्जदाराची चुक आहे. याचा अर्थ तक्रारकर्ता थकीत रकमेची जबाबदारी टाळू शकत नाही. नियमाप्रमाणे थकीत हप्ते भरण्यास तक्रारकर्ता जबाबदार आहे.
8. परंतु गैरअर्जदारांच्या चुकीमुळे तक्रारकर्त्यास हप्ते भरण्यास विलंब झाला, त्याकरीता गैरअर्जदार जबाबदार राहील.
वरील वस्तूस्थिती पाहता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत असून, गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास रु.4,000/- नुकसान भरपाईकरीता द्यावे.
2) गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याला तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावे.
3) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराचे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.