न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे वि.प.क्र.1 बँकेचे प्रॉव्हिडंड फंड पेन्शनर आहेत. वि.प. क्र.1, 2 व 3 यांनी संयुक्तपणे वि.प. क्र.1 यांच्या बँकेतील खातेदारांसाठी बी.ओ.आय. नॅशनल स्वास्थ्य पॉलिसी ही योजना चालू केली असून तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी उतरविल्याने ते वि.प. क्र.3 यांचे ग्राहक झालेले आहेत. तक्रारदारांनी सदरची पॉलिसी ही सन 2014 सालाकरिता घेतली होती. तदनंतर तक्रारदारांनी सदरची पॉलिसी ही दि. 21/3/2015 ते 20/3/2016 या कालावधीकरिता नूतनीकरण करुन घेतली. तदनंतर पुन्हा सदरची पॉलिसी ही दि. 21/3/2016 ते 20/3/2017 व तदनंतर दि. 21/3/2018 ते 20/3/2019 या कालावधीसाठी नूतनीकरण करुन घेतली. तदनंतर तक्रारदारांना त्यांचे मित्राकडून वि.प.क्र.2 हे सदरची पॉलिसी ही कोणतीही सूचना न देता नूतनीकरण करुन देणे रद्द करीत असलेचे समजल्याने तक्रारदाराने याबाबत वि.प.क्र.1 यांचेकडे चौकशी केली असता वि.प.क्र.1 यांनी सदरची पॉलिसी नूतनीकरण करावयाची असल्यास वि.प.क्र.3 यांचेकडे जावून नूतनीकरण करुन घ्यावी असे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी वि.प. क्र.3 यांचेशी संपर्क साधला असता वि.प. क्र.3 यांनी सदरची पॉलिसी नूतनीकरण करावयाची झालेस तक्रारदारांना रक्कम रु.38,405/- इतका हप्ता भरावा लागेल असे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी पॉलिसी नूतनीकरण करुन देणेबाबत वि.प. क्र.1, 2 व 3 यांना दि. 21/1/2019 रोजी लेखी कळविले तसेच दि. 11/2/2019 रोजी वकीलामार्फत वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीसही पाठविली परंतु वि.प. यांनी क्र.1 व 2 यांनी त्यास कोणतेही उत्तर दिले नाही. वि.प.क्र.3 यांनी वकीलामार्फत सदर नोटीसीस उत्तर दिले असून त्यामध्ये त्यांनी वादातील पॉलिसी बंद पडून दुस-या दोन पॉलिसी सुरु असून त्यामध्ये आपली पॉलिसी वर्ग करता येईल असे सांगितले. परंतु त्यासाठी लागणा-या विमा हप्त्याची रक्कम कळविण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी दिलेने तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प.क्र.1 व 3 यांचेकडून तक्रारदार यांची हेल्थ पॉलिसी वाजवी व योग्य किंमतीवर नूतनीकरण करुन द्यावी, मानसिक, शारिरिक व आर्थिक नुकसानीपोटी रु.75,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.25,000/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 18 कडे अनुक्रमे तक्रारदारांचे पासबुक, वि.प. यांनी सुरु केलेल्या पॉलिसीचे माहितीपत्रक, तक्रारदारांनी घेतलेल्या विमा पॉलिसींच्या प्रती, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेले पत्र, नोटीस, नोटीसची पावती, नोटीसची पोचपावती, वि.प.क्र.3 यांनी दिलेले नोटीस उत्तर वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 व 2 यांनी सदरकामी म्हणणे/कैफियत व अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत नोटीस डिस्प्ले तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. वि.प. क्र.1 2 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प.क्र.1 व 2 यांचे वि.प. क्र.3 यांचेसोबतचे टायअप रद्द झालेने वि.प. क्र.3 यांचे पॉलिसी धारक यांना पॉलिसीचे नूतनीकरण करावयाचे असेल तर त्यांनी वि.प. क्र.3 यांचेकडे जावून नूतनीकरण करुन घ्यावे असे स्पष्टपणे तक्रारदार सांगितले होते. वि.प.क्र.3 यांनी वि.प. क्र.1 व 2 यांना असे कळविले होते की BIO National Swasthya Bima policy is being withdrawn by National Insurance Co.Ltd. and this products have become unsustainable. वि.प.क्र.1 व 2 यांनी तसेच बँकेत नोटीस बोर्डवर डिस्प्ले केले होते कारण वि.प. क्र.3 यांनी सदरचे पॉलिसी प्रॉडक्ट विथड्रॉ केले होते. असे असून देखील तक्रारदाराने खोडसाळपणे प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
iii) तक्रारदाराने हजर केलेल्या कागद क्र.5 मधील वि.प. यांच्या पॉलिसीचे नियमावलीची प्रत मधील क्लॉज क्र.5.20 समजून चौकशी करुन सदरची पॉलिसीची नियमावली मान्य केली होती. सदरचा क्लॉज पुढीलप्रमाणे -
5.20 - Withdrawal of product –
In case the policy is withdrawn in future, the company will provide the option to the insured person to switch over to a similar policy at terms and premium applicable to the new policy.
iv) वि.प.क्र.3 बरोबर वि.प. क्र.1 व 2 यांचा झालेला करार रद्द झाला व त्याबाबत तक्रारदार यांना सर्व माहिती दिली असून तक्रारदार यांना दिलेल्या पॉलिसीतील त्याचे फायदे-तोटेसह अन्य दोन पॉलिसी सुरु केल्या असून त्या खालीलप्रमाणे आहेत. 1) National Parivar Mediclaim policy – Family floater policy (2) National Mediclaim policy – for single insured यापैकी कोणतीही एक पॉलिसी तक्रारदार यांची इच्छा असलेस नूतनीकरन करुन चालू ठेवू शकतात. अशी परिस्थिती असताना वि.प. क्र.1 व 2 यांना त्रास देणेच्या उद्देशाने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.1 व 2 यांनी केली आहे. अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.1 व 2 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
5. वि.प.क्र.3 यांनी याकामी लेखी म्हणणे, शपथपत्र, कागदयादीसोबत कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला असून तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. वि.प. क्र.3 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.
i) तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्यातील सर्व मजकूर मान्य व कबूल नाही.
ii) वि.प.क्र.3 यांनी सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही.
iii) वि.प.क्र.3 यांनी वादातील पॉलिसी प्रॉडक्ट हे नियमानुसार व कंपनीला असलेल्या अधिकारानुसार दि.3/10/2018 पासून बंद केलेले आहे. सदरचे प्रॉडक्ट चालू करुन देणेबाबतचे आदेश करणेचे अधिकारक्षेत्र या आयोगास येत नाहीत.
iv) विमा पॉलिसीचे क्लॉज क्र.5.20 नुसार वि.प क्र.3 यांनी सदरचे पॉलिसी प्रॉडक्ट विथड्रॉ केले आहे. तक्रारदारांना सदरची पॉलिसी मायग्रेट करणेचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता परंतु तक्रारदारांनी तो स्वीकारलेला नाही. यात वि.प.क्र.3 यांची कोणतीही चूक नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प.क्र.3 यांनी केली आहे.
अशा स्वरुपाचे आक्षेप वि.प. क्र.3 यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.
6. वर नमूद तक्रारदार व वि.प. क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | नाही. |
3 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
7. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार हे वि.प.क्र.1 बँकेचे प्रॉव्हिडंड फंड पेन्शनर आहेत. वि.प. क्र.1, 2 व 3 यांनी संयुक्तपणे वि.प. क्र.1 यांच्या बँकेतील खातेदारांसाठी बी.ओ.आय. नॅशनल स्वास्थ्य पॉलिसी ही योजना चालू केली असून तक्रारदार यांनी सदरची पॉलिसी उतरविल्याने तक्रारदार हे वि.प. क्र.1 ते 3 यांचे ग्राहक आहेत असे या आयोगाचे मत आहे. वि.प.क्र.1 ते 3 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये सदरची बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प.क्र.1 ते 3 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे कारण कोणत्याही विमा पॉलिसीसाठी किती हप्ता ठरवायचा व घ्यायचा हे सर्वस्वी विमा कंपनीचे अधिकार आहेत. तसेच एखादा विमा पॉलिसीचा प्लॅन हा विमा कंपनीस फायदेशीर नसेल तर तो पॉलिसी प्लॅन/विमा पॉलिसी बंद करणेचा अधिकार विमा कंपनीस असतो. वि.प यांनी पॉलिसी बंद करताना तक्रारदाराला नोटीस पाठविली होती व सदरची नोटीस नोटीसबोर्डवरही लावली होती. तसेच याबाबत वि.प. क्र.1 व 2 बँकेलाही कळविलेले होते. सबब, बंद केलेल्या विमा पॉलिसीबाबत वि.प.क्र.3 यांनी तक्रारदारास कळविले होते ही बाब याकामी शाबीत होते.
9. वि.प.ने दाखल केले विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती तसेच विमा पॉलिसी Withdrawal बाबतचे Circular प्रमाणे –
5.20 - Withdrawal of Product
In case of the policy is withdrawn in future, the company shall provide the option to the insured person to switch over to similar policy and premium, applicable to the new policy.
असे अटी व शर्तीमध्ये नमूद असतानाही तक्रारदाराने पॉलिसी switch over करणेचा किंवा migrate करणेचा पयार्य निवडलेला नाही ही बाब उभय पक्षांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते. सबब, वि.प. यांनी तक्रारदारास सेवात्रुटी दिली ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार नामंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिले आहे.
सबब, प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
3) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.