आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी
तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्याने महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 50,000/- चा अपघात विमा काढला होता. प्रवास करीत असतांना तक्रारकर्त्याला अपघात होऊन अपंगत्व आले. त्याबाबतचा विमा दावा त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे सादर केला. परंतु विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला विम्याचे पैसे न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरची तक्रार विद्यमान न्याय मंचात दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ता हा मौजा कवलेवाडा, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथील रहिवासी असून त्याच्या मालकीची शेती मौजा मुंडीपार, ता. तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 441, क्षेत्रफळ 1.55 हे.आर. अशी आहे. विरूध्द पक्ष 1 व 2 हे विमा कंपनी असून विरूध्द पक्ष 3 तर्फे विमा दाव्याचा प्रस्ताव विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे पाठविल्या जातो.
3. तक्रारकर्ता हा दिनांक 05/11/2005 रोजी मिनीडोअर क्रमांक MH-36/482 या प्रवासी वाहनातून प्रवास करीत असतांना नवरगांव येथे सायंकाळी 6.30 वाजता पोलीस पाटील श्री. कटरे यांच्या घराजवळ सदर मिनीडोअर उलटल्यामुळे अपघातग्रस्त होऊन तक्रारकर्ता हा 55% अपंग झाला. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 3 तर्फे MUM/0002580 या क्रमांकाद्वारे विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे विमा दावा सादर केला. तसेच विमा दावा अर्जासोबत संपूर्ण कागदपत्र व वेळोवेळी मागितलेली कागदपत्रे सुध्दा दाखल केली.
4. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना वारंवार विनंती करून सुध्दा विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर केला नाही अथवा विमा दाव्याबद्दल कुठलीही माहिती तक्रारकर्त्याला दिली नाही. त्याचप्रमाणे त्याचा विमा दावा फेटाळल्याबद्दल अजूनपर्यंत कुठलेही पत्र विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याला न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने वकिलामार्फत नोटीस पाठविली. त्याचेही उत्तर तक्रारकर्त्याला न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने रू. 50,000/- नुकसानभरपाई व्याजासह मिळण्यासाठी तसेच मानसिक त्रासापोटी रू. 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू. 10,000/- मिळण्यासाठी सदरहू प्रकरण न्याय मंचात दाखल केले आहे.
5. तक्रारकर्त्याचे प्रकरण दिनांक 20/06/2012 रोजी न्याय मंचाने दाखल करून घेतल्यानंतर मंचामार्फत विरूध्द पक्ष यांना दिनांक 21/06/2012 रोजी नोटीसेस बजावण्यात आल्या. विरूध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्यांनी हजर होऊन त्यांचे लेखी जबाब दाखल केले आहेत.
विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांचा जबाब दिनांक 17/10/2012 रोजी मंचात दाखल केला. विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या जबाबामध्ये तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून सदरहू तक्रार ही विद्यमान मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे म्हटले आहे. तसेच तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली नसून Governor of Maharashtra यांनी विम्याचा हप्ता भरला असल्यामुळे त्यांना सदरहू तक्रारीमध्ये पार्टी करण्यात यावे असे म्हटले आहे. तक्रारकर्त्याचा दावा हा खोटा असून तो मुदतीत दाखल न केल्यामुळे खारीज करण्यात यावा असेही विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी त्यांच्या जबाबामध्ये म्हटले आहे.
विरूध्द पक्ष 3 यांनी दिनांक 27/07/2012 रोजी त्यांचा जबाब दाखल केला असून त्यांनी आपल्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याची शेतजमीन ही मौजे कवलेवाडा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदीया येथे असून दिनांक 21/01/2006 रोजी त्यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा प्रस्ताव विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे पाठविला होता. विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या जबाबातील परिच्छेद क्र. 4 मध्ये असे म्हटले आहे की, तक्रारकर्ता हा सदर योजनेचा लाभ मिळण्यास पात्र आहे.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत महाराष्ट्र शासनाचे दिनांक 31/05/2005 रोजीचे परिपत्रक पृष्ठ क्र. 11 वर दाखल केले आहे. तसेच एफ.आय.आर. पृष्ठ क्र. 21 वर, Final Report पृष्ठ क्र. 25 वर, डिसचार्ज सर्टिफिकेट पृष्ठ क्र. 45 वर, गांव नमुना 7/12 पृष्ठ क्र. 46 वर तसेच विरूध्द पक्ष यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पृष्ठ क्र. 48 वर याप्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
7. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता प्रवास करीत असलेले मिनीडोअर हे वाहन दिनांक 05/11/2005 रोजी उलटल्यामुळे त्यात तक्रारकर्ता जखमी झाला व त्यास 55% कायमस्वरूपी अपंगत्व आले हे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या अपंगत्व प्रमाणपत्रावरून दिसून येते. तसेच विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे दिनांक 21/01/2006 रोजी विमा दावा सादर केल्यानंतर अजूनपर्यंत तक्रारकर्त्यास त्याचा विमा दावा हा मंजूर अथवा नामंजूर झाला याबद्दल कुठलेही पत्र मिळाले नाही. तक्रारकर्त्याने बरेचदा विचारपूस केल्यानंतर देखील त्याला कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शेवटी तक्रारकर्त्याने दिनांक 01/06/2012 रोजी विरूध्द पक्ष यांना कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु त्याचेही कुठलेच उत्तर तक्रारकर्त्याला मिळाले नाही. सदरहू घटना ही सेवेतील त्रुटी असून तक्रारकर्त्याची Cause of action ही Continuous स्वरूपाची असल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करून ज्या तारखेला तकार दाखल केली आहे त्या तारखेपासून व्याजासह त्याला नुकसानभरपाई देण्यात यावी असा युक्तिवाद केला.
8. विरूध्द पक्ष 1 व 2 चे वकील ऍड. सचिन जैस्वाल यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याचा अपघात हा दिनांक 05/11/2005 रोजी झाल्यामुळे सदरहू तक्रार ही मुदतीत नाही. ही तक्रार दिनांक 04/06/2012 रोजी दाखल केल्यामुळे Law of Limitation नुसार ती 2 वर्षाच्या आंत नसल्यामुळे खारीज करण्यात यावी. तसेच सदरहू तक्रारीमध्ये विलंब माफीचा अर्ज दाखल न केल्यामुळे सदरहू तक्रार कायद्याने चालू शकत नाही. तक्रारकर्ता हा Bed-ridden नसल्यामुळे त्याला सदरहू तक्रार दाखल करण्यास एवढा विलंब कां लागला याबद्दल कुठलेही संयुक्तिक pleading तक्रारीमध्ये नसल्यामुळे तक्रारकर्ता हा न्याय मंचात स्वच्छ हाताने (Clean Hands) आला नसून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच सदरहू विमा काढतांना विमा दावा देण्यामधील कुठलाही वाद उपस्थित झाल्यास सदरहू वाद हा विभागीय कृषि सहसंचालक यांच्याद्वारे सोडवावा असे योजनेत अंतर्भूत असल्यामुळे सदरहू न्याय मंचास हे प्रकरण चालविण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद केला.
9. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज, विरूध्द पक्ष यांचे जबाब तसेच तक्रारीमध्ये दाखल केलेली कागदपत्रे व दोन्ही पक्षाच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याला अपघाती अपंगत्व आल्याची बाब सिध्द होते काय? | होय |
2. | तक्रारकर्ता शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्यापोटी नुकसानभरपाई मिळण्यास पात्र आहे काय? | होय |
3. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्त्याने पृष्ठ क्र. 21 वर दाखल केलेली एफ.आय.आर. ची प्रत तसेच पृष्ठ क्र. 25 वर दाखल केलेली पोलीस स्टेशन गोंदीया यांच्या Final Report ची प्रत यावरून असे सिध्द होते की, मिनीडोअर क्रमांक MH-36/482 उलटल्यामुळे तक्रारकर्त्याचा अपघात झाला व त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या Hope Multispeciality Hospital यांच्या Discharge Summery वरून असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याच्या डाव्या हाताला अपघातामुळे कुठलीही संवेदना नसल्यामुळे व सदरहू दुखापत ही Vascular Injury & Gangrene असल्यामुळे तक्रारकर्त्याचा डावा हात Ampute करावा लागला असे डॉ. मुरली या सर्जन असलेल्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावरून दिसून येते. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेले मेडिकल बोर्ड यांचे अपंगत्व प्रमाणपत्र जे सिव्हील सर्जन गोंदीया यांनी दिनांक 29/12/2005 रोजी दिलेले आहे, त्यानुसार तक्रारकर्त्याच्या डाव्या हाताचा काही भाग कापण्यात आल्यामुळे तक्रारकर्त्यास 55% अपंगत्व आल्याचे सदरहू प्रमाणपत्रावरून सिध्द होते. तक्रारीसोबत जोडण्यात आलेल्या एफ.आय.आर., Final Report, डॉक्टरांचे समरी कार्ड तसेच अपंगत्व प्रमाणपत्र यावरून असे सिध्द होते की, तक्रारकर्त्याचा अपघात हा मोटर वाहनाने झालेला अपघात असून त्यात त्याला अपंगत्व आले ही बाब सिध्द होते. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 होकारार्थी आहे.
11. तक्रारकर्त्याने दाखल केलेला 7/12 चा उतारा तसेच गाव नमुना 8-अ यावरून तक्रारकर्ता हा शेतकरी असून तो शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा मिळण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना कागदपत्रे देऊन सुध्दा तसेच दाव्यासंबंधी वेळोवेळी विचारणा करूनही विरूध्द पक्ष 1 यांच्याकडून त्याला कुठलेही संयुक्तिक उत्तर मिळाले नाही. विरूध्द पक्ष 1 व 2 यांच्या वकिलांना युक्तिवादाच्या वेळेस तक्रारकर्त्याचा विमा दावा खारीज केल्याबद्दल आतापर्यंत तक्रारकर्त्यास कुठलेही पत्र पाठविले काय? अशी मंचातर्फे विचारणा केली असता त्यावर त्यांनी अजूनपर्यंत तक्रारकर्त्याचा विमा दावा खारीज झाल्याबद्दल कुठलेही पत्र पाठविले नाही असे सांगितले. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा दावा मंजूर अथवा नामंजूर केला याबद्दल तक्रारकर्त्यास कुठलेही पत्र न पाठविल्यामुळे किंवा पाठविल्याबद्दलचा कुठलाही पुरावा सदर तक्रारीत दाखल न केल्यामुळे विरूध्द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचा विमा दावा हा अजूनपर्यंत प्रलंबित ठेवलेला आहे ही बाब सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीची Cause of action ही Continuous स्वरूपाची असल्यामुळे तक्रारकर्ता विमा दावा मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्रमांक 2 होकारार्थी आहे.
12. तक्रारकर्त्याचा अपघात हा दिनांक 05/11/2005 रोजी झाला. तसेच विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की, तक्रारकर्त्याचा दावा अर्ज हा विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे दिनांक 21/01/2006 रोजी पाठविण्यात आला. त्याचप्रमाणे विरूध्द पक्ष 3 यांनी त्यांच्या जबाबातील परिच्छेद क्र. 4 मध्ये असे मान्य केले की, तक्रारकर्ता हा महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अपघात विमा मिळण्याच्या योजनेस पात्र आहे. तक्रारकर्त्याने विमा अर्ज विरूध्द पक्ष यांच्याकडे 90 दिवसांच्या मुदतीत देऊन सुध्दा विरूध्द पक्ष 1 यांनी तो दावा प्रलंबित ठेवल्यामुळे Cause of action ही Continuous स्वरूपाची असून तक्रारकर्ता हा अपघात विम्याचे पैसे मिळण्याकरिता पात्र ठरतो. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या माननीय राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांच्या III (2011) CPJ 507 (NC) – Lakshmi Bai & Ors. v/s ICICI Lombard General Insurance Co. Ltd. & Ors. या प्रकरणामध्ये असे म्हटले आहे की, “Once the Complainant inform to Nodal Officer about incident of death or incapacitation and until its payment of sum assured, it remains a case of continuous cause of action and remedy under Act cannot be barred on ground of jurisdiction and cause of action”. त्यामुळे तक्रारकर्त्याची Cause of action ही Continuous स्वरूपाची असल्यामुळे तक्रारकर्ता अपघात विमा योजनेचे रू. 50,000/- व्याजासह तसेच नुकसानभरपाईसह मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला 55% कायमस्वरूपी अपंगत्व आल्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत रू. 50,000/- द्यावे. या रकमेवर तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 20/06/2012 पासून ते संपूर्ण पैसे वसूल होईपर्यंत द. सा. द. शे. 10% दराने व्याज द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 5,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्याला रू. 3,000/- द्यावे.
5. विरूध्द पक्ष 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.
6. विरूध्द पक्ष 3 च्या विरोधात कुठलाही आदेश नाही.