जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 118/2008. प्रकरण दाखल तारीख - 15/03/2008 प्रकरण निकाल तारीख - 23/07/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. हनुमंत पि. संभाजी वाडीकर अर्जदार. वय वर्षे 37, धंदा शेती, रा. भास्कर नगर, बिलोली जि. नांदेड. विरुध्द. आय.सी.आय.सी. आय. लुम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. तर्फे शाखाधिकारी, नीखील हाईटस, कलामंदीर जवळ, बस स्टॅन्ड रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - श्री.सूभाष दागडीया. गैरअर्जदारा तर्फे वकील - श्री.अमीत डोईफोडे,श्री. अजय व्यास निकालपञ (द्वारा - मा.श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष ) तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, इंडिका वाहन क्रंमाक एमएच-26/एल-2239 यांचे ते मालक आहेत. त्यांनी दि.29.12.2005 ते 28.12.2006 या कालावधी करीता वाहनाचा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडे काढला. ती पॉलीसी कॉम्प्रेहेन्सीव्ह आहे. त्यांनी सदरचे वाहन स्वतःच्या उपयोगाकरिता घेतले. दि.21.12.2006 रोजी नांदेड येथे गणेश नगर रोडवर अपघात झाला. वाहनाचे ब्रेक न लागल्यामूळे वाहन खांबावर आदळले. त्यामुळे गाडीचे बरेच नूकसान झाले. वाहन दूरुस्त करुन त्यांचा विमा दावा गैरअर्जदार विमा कंपनीकडे सादर केला. विमा कंपनीने दि.28.02.2007 रोजीच्या पञाद्वारे वाहन वाणिज्य उपयोगाकरिता वापरले या कारणावरुन विम्याची रक्कम देण्याचे नाकारले. त्यांनी वाहनाच्या दूरुस्तीसाठी एकूण रु.61,633/- एवढा खर्च आला. वाहन खरेदीनंतर एक वर्षाचे आंत अपघात झाला त्यामुळे त्यांचेवर घसारा लागू होत नाही. गैरअर्जदारांनी खोटया कारणावरुन दावा नाकारला म्हणून त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ती बददल रु.61,633/- वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च 18% व्याजासह मिळावा, तसेच रु.25,000/- मानसिक ञासाबददल, रु.2,000/- दावा खर्चाबददल गैरअर्जदाराकडून मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली. त्यांनी हजर होऊन आपला लेखी जवाब दाखल केला. त्यांचे म्हणणे आहे की, तक्रार गैरकायदेशिर आहे. अर्जदार वाहनाचे मालक असल्याबददलची बाब त्यांनी नाकबूल केली आहे. अर्जदाराने प्रायव्हेट कार पॉलिसी घेतली होती. त्यांनी इतर सर्व वीधाने नाकबूल केली. त्यांचा उजर असा आहे की, तक्रार खोटी आहे. अर्जदार वाहनाचा उपयोग व्यावहारीक स्वरुपाचा करीत होते. म्हणून त्यांची मागणी दि.28.02.2007 रोजीच्या पञाद्वारे नाकारली. वाहन चालकाजवळ वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. त्यांच्या तपास करणा-या अधिका-याने या बाबत संपूर्ण तपासणी करुन त्यांचा अहवाल त्यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची ञूटी पूर्ण सेवा दिलेली नाही. यास्तव तक्रार खारीज करावी. अर्जदार यांनी पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ, तसेच वाहनाचे आर. सी. बूक, पॉलिसी, टॅक्स इन्व्हाईस, बाफना मोटार्सची पावती, दि.28.2.2007 रोजीचे गैरअर्जदाराचे पञ इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. गैरअर्जदारातर्फे श्री. निलेश रामचंदानी यांचे शपथपञ पूरावा म्हणून दाखल केले आहे, तसेच पॉलिसीबददल माहीती पञक, रिपोर्ट कॉन्फीडेन्शीयल, इत्यादी कागदपञ दाखल केली आहे. अर्जदारातर्फे अड.सूभाष दागडीया यांनी व गैरअर्जदारातर्फे अड.अमीत डोईफोडे यांनी यूक्तीवाद केला. सदर प्रकरणात गैरअर्जदाराचे मूख्य आक्षेप असा आहे की, अर्जदाराच्या चालकाजवळ वैध वाहन चालक परवाना नव्हता. हा त्यांचा आक्षेप सिध्द करण्यासाठी त्यांनी कोणताही पूरावा मंचात दिलेला नाही. किंवा त्यांनी आर.टी. ओ. कार्यालयाकडून कोणताही दस्ताऐवज आणलेला नाही. तपास अधिका-याने सूध्दा यासंबंधी अहवालात गंभीर आक्षेप घेतला नाही. तसेच दि.28.2.2007 रोजीचे पञात यासंबंधी आक्षेप घेतला नाही. या व्यतिरिक्त गैरअर्जदाराचे म्हणणे असे आहे की, सदर वाहन हे व्यावहारीक उपयोग करीता वापरले जात होते.जेव्हा की, त्यांची पॉलिसी ही व्यक्तीगत उपयोगाची होती. यामध्ये गैरअर्जदारांनी जो तपासणी अहवाल दाखल केलेला आहे त्यामध्ये वाहन हे व्यावहारीत उपयोगाकरिता चालविले जात होते याबददल कोणताही पूरावा दिलेला नाही. तपास अधिका-याचा प्रतिज्ञालेख दिला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराच्या या आक्षेपामध्ये देखील काही तथ्य नाही. अर्जदाराने वाहनाच्या दूरुस्तीसाठी केलेल्या खर्चाच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण रु.16,723/- खर्च दाखवला आहे. आणि बाफना मोटार्स यांनी दिलेले बिल हे रु.61,632/- चे आहे. सॅल्व्हेज आणि घसारा (काही पार्ट) हया बाबी लक्षात घेतल्या तर अर्जदार हे किमान रु.50,000/- एवढी नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे असे आमचे मत आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची नूकसान भरपाई नाकारलेली आहे ही त्यांच्या सेवेतील ञूटी आहे. यास्तव आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदाराना रु.50,000/- दावा नाकारल्याची तारीख दि.28.2.2007 रोजी पासून रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो 9% व्याजासह आदेश प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आंत दयावेत, न दिल्यास वरील रक्कमेवर रक्कम मिळेपर्यत द.सा.द.शे. 12% व्याज दयावे लागेल. 3. मानसिक ञासापोटी रु.5,000/- व दाव्याचा खर्च म्हणून रु.1,000/- दयावेत. 4. पक्षकाराना निकाल कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते श्री.विजयसिंह राणे सदस्या सदस्य अध्यक्ष जे. यु. पारवेकर लघूलेखक. |