जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.181/2008. प्रकरण दाखल दिनांक – 16/05/2008. प्रकरण निकाल दिनांक – 30/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते. सदस्य. श्री.देवराव यादवराव तावडे, अर्जदार. वय वर्षे 68, व्यवसाय शेती, रा.तळणी ता.हदगांव जि. नांदेड. विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, शाखा तळणी, सध्या शाखा निवघा, ता.हदगांव जि.नांदेड. 2. मुख्य व्यवस्थापक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, शिवजी पुतळय जवळ,नांदेड. 3. एस.डी.चौधरी, शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, शाखा तळणी,रा.निवघा ता.हदगांव जि.नांदेड.. अर्जदारा तर्फे. - अड.बी.एस.शहाणे. गैरअर्जदारा तर्फे - अड.एस.डी.भोसले. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार देवराव तावडे यांची थोडक्यात अशी आहे की, त्यांचे जिल्हा मध्यवती बँकेकडे खाते क्र.1256 हे खाते आहे. गैरअर्जदार क्र. 2 बॅक मुख्य कार्यालय आहे, गैरअर्जदार क्र. 3 बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्या खात्यात दि.26/05/2004 रोजी रु.1,30,370.39 जमा होती. त्यांनी दि.12/06/2004 रोजी रु.50,000/- काढुन घेतले त्यानंतर खात्यात शिल्लक रु.80,370.39 एवढे होते व त्यांना दि.19/06/06 व दि.24/06/2004 रोजी रु.4,000/- व रु.3,000/- ची गरज पडली ते त्यांनी काढले. (यातील वर्ष हे 2004 असतांना ते चुकीने तक्रारीत 2006 असा नोंद केली असावी असे दिसते) त्यांनी वेळावेळी बॅकेत व्यवहार केला आहे त्यांच्या पासबुकात यासंबंधीची नोंद सुध्दा आहे. त्यांना गरज पडली म्हणुन खात्यातील उर्वरित रक्कम मिळण्यासाठी दि.05/09/2006 रोजी अर्ज केला आहे मात्र त्यांना रक्कम देण्यात आले नाही. त्यांनी सतत पाठपुरावा केला, पत्र व्यवहार चालु ठेवला. पुढे लेखा परीक्षक खात्यातील लोकांनी बोलावून सांगितले की, तुमच्या बचत खात्यात रक्कमेचा गैरव्यवहार झालेला आहे. त्यामुळे तुमचे बचत खाते पुस्तीका जमा करा, त्यांनी खाते पुस्तीकेची छाया प्रत दाखल केली. त्यांनी खाते उता-याची नक्कल प्राप्त केली तेव्हा असे आढळुन आले की, दि.15/06/2004 रोजी त्यांच्या खात्यातील रु.50,000/- गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी उचलले. त्यांनी दि.05/07/2007 रोजी तक्रार केली. गैरअर्जदार क्र.3 व इतर यांच्या विरुध्द फौजदारी प्रकरणे दाखल करण्यात आली. गैरअर्जदार क्र.3 व इतर यांनी त्यांच्या खात्यातुन परस्पर रु.50,000/- ची रक्कम हडप केली. त्यांनी गैरअर्जदार बँक व कर्मचारी जबाबदार आहे म्हणुन ही तक्रार दाखल करुन तीद्वारे त्यांची रु.50,000/- रक्कम व्याजासह परत मिळावी त्यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.20,000/- नुकसानी मिळावी आणि तक्रारीचा खर्चापोटी रु.5,000/- मिळावी अशा मागण्या केल्या आहेत. यात गैरअर्जदार हजर झाले. यातील गैरअर्जदार क्र.4 ला अर्जदारांनी नोटीस बजावली नाही म्हणुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपला लेखी जबाब दिला आणि तक्रार ही खोटी गैरकायदेशिर आहे. त्यांनी सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदार यांच्या खात्यातुन जी रक्क्म काढण्यात आली त्याबाबतची पेस्लिपवरची सही तंतोतंत अर्जदाराच्या म्हणण्याच्या सहीशी मिळते आणि त्यामुळे त्यांनी पेस्लिप स्वतः सही करुन दिलेली असल्यामुळे रक्कम त्यांना मिळाली आहे. त्यामुळे रक्कमेचा अपहार केल्याचे आरोप खोटे आहे म्हणुन तक्रार खारीज व्हावी. गैरअर्जदार क्र. 3 व4 यांच्यावर कार्यवाही अन्य न्यायालयात करणे गरजेचे आहे असा उजर त्यांनी घेतला. गैरअर्जदार क्र. 3 ने आपला जबाब दाखल करुन सर्व विपरी विधाने नाकबुल केली. त्यांचे म्हणणे असे की, संबंधीत व्यक्ति हा पैसे उचल करण्यासाठी बँकेत आल्यानंतर पेस्लिप दिल्यानंतर कारकुन खात्यात रक्कम जमा असल्याची खात्री करुन व्यवस्थापकाकडे पाठवुन देतो. व्यवस्थापकाने सही तपासुन कॅशिअरकड पाठविले जाते व पुढे रक्कम दिली जाते. शाखा व्यवस्थापक याबाबतची खात्री करतो. सदर तक्रार ही मुदतीत नाही. सदरचे गैरअर्जदार हे शाखा व्यवस्थापक होता, याबाबतची त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी येत नाही. थोडक्यात अर्जदाराची तक्रार ही चुकीची आहे. पेस्लिपवर त्यांचीचसही आहे आणि म्हणुन तक्रार खारीज करण्यात यावी असा उजर घेतला. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जासोबत शपथपत्र, रक्कम मिळण्या बाबतचा दि.05/09/06 चा अर्ज, चौकशी करण्या बाबत दिलेला अर्ज दि.05/07/2007, सहनिबंधक यांचे पत्राची पत्र दि.07/03/2008, बँकेने अर्जदारास दिलेले पत्र दि.13/07/2007, खात्याचा उतारा दि.22/07/2007, खाते पुस्तीकेचा उतारा , बॅकेने अर्जदारास दिलेले पत्र दि.09/04/08 इतर कागदपत्र दाखल केले. गैरअर्जदार यांनी आपल्या जाबाबसोबत शपथपत्र, दि.20/05/2008 चा चौकशी अहवाल दाखल केलेले आहेत. अर्जदारा तर्फे वकीलांनी आणि गैरअर्जदार यांचे तर्फे वकील श्री.एस.डी.भोसले यांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरणांत अर्जदाराची मुळ पासबुक दाखल आहे. त्याचे अवलोकन केले असता, असे दिसुन येते की, दि.12/06/2004 रोजी त्यांच्या खात्यात शेवट शील्लक रु.80,370.39 एवढी रक्कम जमा होत. दि.12/06/2004 रोजी त्यांनी रु.50,000/- काढले होते, त्यांच्या पासबुकावर पुढील नोंदी या दि.19/06/2004 व 24/06/2004 या तारखेची असुन त्याद्वारे रु.4,000/- व रु.3,000/- एवढया रक्कमेची उचल झालेली आहे आणि दि.24/06/2004 रोजी शेवटची जमा रु.73,370.39 पासबुकामध्ये नोंद आहे. याउलट बँकेने अर्जदारास जे खाते उतारा दिलेले आहे त्यामध्ये दि.12/06/2004 ची शेवटची शिल्लकेची नोंद रु.80,370/- ची आहे ती बरोबर आहे. खाते उता-यात मात्र दि.15/06/2004 रोजी रु.50,000/- ची उचल केल्याची एक नोंद आहे ती त्यांच्या पासबुकात नाही. थोडक्यात त्यांचे पासबुकात वेगळया नोंदी आणि खाते उता-यात वेगळया नोंदी घेण्यात आलेल्या आहेत हे स्पष्ट होते. बॅंकेच्या खाते उता-यावरच या भागावर बोगस नोंदी असा शेरा मारलेला आहे. अर्जदारास नंतर महीत झाले की, त्यांच्या खात्यातुन रक्कम दि.15/06/2004 रोजी काढुन घेण्यात आलेली आहे. पासबुकात नोंदी वेगळया आहेत त्या बँक अधिका-यांनी केल्या आहेत. पासबुकात या सर्व नोंदीत तफावत येण्याचे कारण म्हणजे त्यांची रक्कम ही अफरातफर करण्यात आलेली आहे हे उघड आहे. या संबंधात बँकेने संबंधीत कर्मचा-याची खाते निहाय चौकशी केली व त्यामध्ये त्यांनी खातेदाराच्या रक्कमेची अपहार केल्याचे निष्पन्न झालेले आहे. या संबंधीचा चौकशी अहवाल रेकॉर्डवर दाखल आहे. ही बाब लक्षात घेतल्यानंतर अर्जदाराची तक्रार ही खरी आहे हे स्पष्ट होते. बँकेच्य कर्मचा-यांनी खातेदाराच्या रक्कमेचा अपहार केल्याचे निष्कर्ष स्वतः बँकेने काढलेले आहे त्यामध्ये गैरअर्जदार क्र. 3 ला अर्जदाराच्या व्यतिरिक्त अन्यही रक्कमेच्या अपहारासंबंधी दोषी ठरविलेले आहे. बँकेच्या कर्मचा-यांनी अपकृत्य अन्य मार्गाने फसवणुक करुन खातेदरांचे नुकसान केले असले तरी व्हिकॅरीअस लायबीलीटी म्हणजे नौकराने केलेल्या अपकृत्याबद्यल मालकाची जबाबदारी या तत्वावर माकाची जबाबदारी येते. याचा अर्थ संबंधीत खातेदाराला अयोग्य सेवा पुरविल्याबद्यल बँकेची सुध्दा तेवढीच जबाबदारी येते. या संदर्भात युनियन ऑफ इंडिया विरुध्द लिलाबेग यातील प्रकरणांत मा.राष्ट्रीय आयोगाने दिलेला निकाल जो 2006 (II) सी.पी.आर. 12 या ठिकाणी प्रकाशीत झालेला आहे. यात स्पष्टपणे निर्वाळा देण्यात आलेला आहे की, पोष्टाचे कर्मचा-याने त्यांच्या ग्राहकाचे रक्कमेचा अपहार केला त्याची जबाबदारी मालक, म्हणुन पोष्टाची ठरते. ही बाब लक्षात घेता त्याप्रमाणे या प्रकरणांत बँकेने सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, अशा स्पष्ट निर्णयाप्रत येत आहोत. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी अर्जदारास त्यांची अपहार झालेली रक्कम रु.50,000/- तीवर दि.15/04/06 पासुन ते रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह मिळुन येणारी रक्कम द्यावी. 3. अर्जदारास झालेल्या मानिकस व शारिरीक त्रासापोटी रु.10,000/- सर्व गैरअर्जदार यानी संयुक्तीकरित्या व एकत्रितरित्या द्यावे. 4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावा. 5. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 6. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह राणे) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |