द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत // नि का ल प त्र // 1) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांना आपण ज्या उपचारासाठी पैसे दिलेले होते त्या उपचाराचा अपेक्षित परिणाम न झाल्यामुळे तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार श्रीमती. हरिना प्रताप वीचारे यांनी बॉडी अण्ड सोल हेल्थ अण्ड ब्युटी केअर (इं) प्रा लि यांचेकडे हेअर लेझर ट्रिटमेंटसाठी दिनांक 21/03/2010 रोजी रक्कम रु 14,000/- भरले होते. एकुण पाच ते सहा महीन्याच्या कालावधीतील साधारण सहा सेशन्स मध्ये या हेअर लेझर ट्रिटमेंटचा परिणाम दिसू लागेल असे आश्वासन जाबदारांनी तक्रारदारांना दिले होते. या नंतर तक्रारदारांनी तिन सेशन्स केल्यानंतर या उपचाराचा परिणाम होत नाही असे त्यांच्या लक्षात आले. या नंतर तक्रारदारांनी आपल्या रकमेची जाबदारांकडे मागणी केली असता संपूर्ण सेशन्स झाल्यानंतर उपचाराचा परिणाम दिसू लागेल असे आश्वासन त्यांनी तक्रारदारांना दिले. जाबदारांकडून हे उपचार घेत असताना त्यांच्या शाखेमधील मशिन सुरु नसल्यामुळे तक्रारदारांना त्यांच्याच अन्य शाखेत स्वत:चे पैसे खर्च करुन जावे लागत असे. एवढे पैसे खर्च करुन सुध्दा या उपचाराचा योग्य परिणाम न दिसल्यामुळे तक्रारदारांनी जाबदारांकडे आपण अदा केलेल्या रकमेची मागणी केली. यासाठी जाबदारांनी तक्रारदारांकडून फॉर्म भरुन घेतला. मात्र त्यांना कोणतीही रक्कम परत केली नाही म्हणून आपली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी – 5 अन्वये एकुण सहा कागदपत्रे मंचापुढे दाखल केले आहेत. 2) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांवरती मंचाच्या नोटिसीची बजावणी झाल्याची पोहच पावती निशाणी – 7 अन्वये या कामी दाखल आहे. मात्र जाबदार मंचापुढे हजर न झाल्यामुळे निशाणी – 1 वर त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारित करुन तक्रारदारांचे विनंती नुसार सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले. 3) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या तक्रारींच्या अनुषंगे त्यांनी दाखल केलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी लेझर हेअर ट्रिटमेंट - चीन यासाठी जाबदारांना एकुण रक्कम रु 14,000/- मात्र अदा केल्याचे सिध्द होते. तक्रारदारांनी जाबदारांच्या ज्या जाहिराती मंचामध्ये हजर केल्या आहेत त्यामधून ग्राहकांना आकर्षीत करण्याच्या हेतूने जाबदारांनी विविध योजना जाहीर केलेल्या आढळतात. जाबदारांनी दिलेल्या आश्वासनाच्या आधारे तक्रारदारांनी रककम रु 14,000/- भरुन हा उपचार घेण्याचे ठरविले. मात्र त्यांना अपेक्षित परिणाम मिळाला नाही. यासाठी तक्रारदारांनी वारंवार जाबदारांशी ई- मेल वर संपर्क साधल्याचे दाखल कागदपत्रांवरुन सिध्द होते. रक्कम परत मिळण्यासाठी जाबदारांनी तक्रारदारांकडून फॉर्म सुध्दा भरुन घेतला. मात्र त्यांनी तक्रारदारांना रक्कम अदा केलेली नाही. जाबदारांच्या एका शाखेतील उपकरण बंद असल्यामुळे आपल्याला स्वखर्चाने दुस-या शाखेत जावे लागत असे तसेच उपचारा नंतर सुध्दा जाबदारांनी आश्वासीत केलेला परिणाम साध्य झाला नाही हे तक्रारदारांनी वस्तुस्थिती बाबत प्रतिज्ञापत्रावर केलेले निवेदन जाबदारांनी मंचामध्ये हजर होऊन नाकारलेला नाही. सबब या अनुषंगे त्यांचे विरुध्द प्रतीकुल निष्कर्ष निघतो. ज्या उपचारासाठी जाबदारांनी तक्रारदारांकडून रक्कम रु 14,000/- एवढी रक्कम स्वीकारली त्याचे परिणाम साध्य झाले नाही तर ही रक्कम परत करण्यासाठी जाबदार जबाबदार ठरतात असा मंचाचा निष्कर्ष आहे. सबब तक्रारदारांनी अदा केलेली रक्कम तक्रारदारांच्या तक्रार अर्जाच्या खर्चासह परत करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. 4) वर नमूद सर्व निष्कर्ष व विवेंचनांच्या आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. सबब मंचाचा आदेश की, आदेश 1) तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. 2) यातील जाबदारांनी तक्रारदारांना रककम रु 14,000/- ( चौदा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु 2,000/- ( रु दोन हजार) निकालपत्राची प्रत मिळाले पासून तीस दिवसांचे आत अदा करोवत अन्यथा त्यांना या रकमेवर निकाल तारखे पासून प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यन्त 15 % दराने व्याजही दयावे लागेल. 3) वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतूदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील. 4) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |