निकालपत्र :- (दि. 20-07-2013)(द्वारा - श्री.संजय पी. बोरवाल, अध्यक्ष)
प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष ब्यू स्टार ऑटोमोबाईल्स यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केलेली आहे.
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.पक्ष यांना नोटीसीचा आदेश झाला. वि. पक्ष हे गैरहजर असलेमुळे त्यांचेविरुध्द दि. 4-03-2013 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. तक्रारदार तर्फे वकीलांचा हजर. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार तर्फे वकिलांचा युक्तीवाद ऐकला. व प्रस्तुतचे प्रकरण गुणदोषावंर निकाली करणेत येत आहे.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी,
तक्रारदार हया विधवा स्त्री असून त्या त्यांचे मुलांच्या उदरनिर्वाहाकरिता घरगुती गिरणीचा व्यवसाय करण्यासाठी वि.पक्ष यांचेकडून पिठाची गिरणी (चक्की)मशिन घेतली दि. 17-10-2011 रोजी रक्कम रु. 14,500/- इतक्या किंमतीची खरेदी केली होते. वि.पक्ष यांनी तक्रारदारांना रिससर खरेदीची तेजश्री इंडस्ट्रीजच्या पावती पुस्तकावर बिल नं. 854/2011 दिले. सदर पिठाची गिरणी (चक्की)मशिन खरेदी केले तारखेपासून एक महिन्यात पहिल्या सर्व्हिसिंगच्या वेळी वॉरंटी कार्ड देणेचे कबूल केले होते. तक्रारदारांनी पिठाची गिरणी (चक्की)मशिन वापरणेस सुरु केलेपासून एक महिना व्यवस्थित चालू होते व त्यानंतर पिठाची गिरणी (चक्की)मशिन नोंव्हेंबर 2011 पासून वारंवार बंद पडू लागले. व पिठाची गिरणी (चक्की)मशिनच्या मोटारीचा आवाज जास्त येत होता. सदरची बाब वि.पक्ष यांना कळवून त्यांनी दि. 21-12-2011 रोजी स्वत: मशिन घेवून गेले. व वि. पक्ष यांनी आठ दिवसात मशिन दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले. परंतु आजतागायत तक्रारदारांना पिठाची गिरणी (चक्की)मशिन ही वि.पक्ष यांचे ताब्यात आहे. तदनंतर तक्रारदारांनी वारंवार फोन करुन व प्रत्यक्ष वि.पक्ष यांची भेट घेऊन देखील वि. पक्ष यांनी तक्रारदारांचे मशिनबाबतच्या तक्रारीचे कोणतेही निवारण केले नाही. उलट वि. पक्ष यांनी तुम्हाला मशिन वापरता येत नाही असे उत्तर देवून तक्रारदारांना वॉरंटी असून नाहक त्रास दिला. तक्रारदारांनी खरेदी केलेल्या मशिन वॉरंटी कालावधीत असून वि.पक्ष यांचेकडे मशिन बदलून देण्याचा प्रस्ताव मांडला असता वि. पक्ष यांनी तो फेटाळून लावला. उलट मशिनही वि.पक्ष यांनी दुरुस्त करुन देली नाही. त्यामुळे वि.प. यांनी द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. वि.पक्ष यांच्या कृत्यामुळे तक्रारदारांना मानसिक,शारिरीक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी दि. 6-01-2012 रोजी रजि. ए.डी. ने नोटीस पाठवून सदोष मशिन बदलून द्यावे अथवा मशिनची रक्कम रु. 14,500/- परत द्यावी. सदरची नोटीस वि.पक्ष यांना मिळूनही त्यांनी तक्रारदारांना मशिन किंवा रक्कमही दिलेली नाही. सबब, तक्रारदारांनी पिठाची गिरणी (चक्की मशिन बदलून द्यावी अथवा मशिनची रक्कम परत मिळावी व मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 3,000/- मिळावेत अशी विनंती तक्रार अर्जात केली आहे.
(3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत वि.पक्ष यांनी तक्रारदार यांना पिठाची गिरणी (चक्की)मशिन खरेदी केलेली पावती दि. 17-10-2011, वि.प. यांनी दिलेली जाहिरात, व तक्रारदार यांनी वि.पक्ष यांना दि. 6-01-2012 रोजी अर्ज, वि.पक्ष यांनी अर्ज पोहचलेची पोस्टाची पोहोच पावती इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(4) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदारांचे वकिलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
मुद्दे
1. वि.पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? ---- होय.
2. तक्रारदार नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास
पात्र आहे काय ? -----होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
वि वे च न
मुद्दा क्र.1:
तक्रारदारांनी तक्रार अर्जात दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता वि.पक्ष यांनी तक्रारदारांना पिठाची गिरणी (चिक्की) मशिन खरेदी केल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांनी दि. 17-10-2011 रोजी वि. पक्ष यांचेकडून रक्कम रु. 14,500/- इतक्या किंमतीस पिठाची गिरणी (चिक्की) मशिन आपले कुटूंबाचे उदरनिर्वाहाकरिता खरेदी केलेली होती. वि.पक्ष यांनी सदर पिठाची गिरणी (चिक्की) मशिनची वि.पक्ष यांचे तेजश्री इंडस्ट्रीजच्या पावती पुस्तकावर बिल नं. 845/2011 चे बिल करुन दिले. तसेच मशिनला 1 वर्षाची वॉरंटी असलेचे वॉरंटी कार्ड पहिल्या सर्व्हिंसिंगच्या वेळी देणेचे कबूल केले होते. तक्रारदारांनी सदर पिठाची गिरणी (चिक्की) मशिन वापरण्यास सुरुवात केलेपासून एक महिना मशिन व्यवस्थित चालले व त्यानंतर मशिन सारखे बंद पडून मोटारीचा आवाज येऊ लागला. सदर मशिनचे बेअरींग तीन वेळा फुटले. त्यानंतर तक्रारदारांनी सदर मशिनबाबत वि. पक्ष यांचेकडे दि. 6-01-2012 रोजी तक्रार दिल्यानंतर वि.पक्ष यांनी स्वत: मशिन घेऊन गेले. व त्यानंतर अद्यापी मशिन परत दिलेले नाही. तक्रारदारांनी सदर मशिनबाबत चौकशी केली असता वि.पक्ष हे उत्तर देण्यास टाळाटाळ करुन उलट सदर मशिन वापरणेचे ज्ञान नसलेबाबत नाहक त्रास तक्रारदारांना देत आहेत. पिठाची गिरणी (चिक्की) मशिनची वॉरंटी अद्यापी असताना वि. पक्ष यांनी तक्रारदारांना त्रास होईल अशी कृत्ये केली आहे हे स्पष्ट होत आहे. वि.पक्ष यांनी तक्रारदारांना दिलेली पिठाची गिरण (चिक्की) मशिनमध्ये वारंवार बिघाड होऊन नादुरुस्त होत आहे. सध्या पिठाची गिरण (चिक्की) मशिन हे वि. पक्ष यांचे ताब्यात आहे. वॉरंटी कालावधीतील विक्रीपश्चात सेवा देणे ही वि.पक्ष यांची जबाबदारी आहे. वि.पक्ष त्यांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वि. पक्ष यांनी तक्रारदारांना पिठाची गिरणी (चिक्की) मशिनची वॉरंटी कालावधीतील विक्रीपश्चात सेवा न देणे अथवा टाळाटाळ करणे हे वि. पक्ष यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी वि. पक्ष यांचेकडून खरेदी केलेल्या पिठाची गिरणी (चक्की) मशिनमध्ये उत्पादित दोष असल्याने वि.पक्ष यांनी तक्रारदारांना नविन पिठाची गिरणी (चक्की) मशिन दिलेले नाही उलट तक्रारदारांची वि. पक्ष यांचेकडे दुरुस्तीसाठी दिलेली पिठाची गिरणी (चक्की) मशिन परत दिलेली नाही अथवा त्याची किंमतही परत केलेली नाही. याचा विचार करता वि.पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असा निष्कर्ष हे मंच काढीत आहे. तक्रारदार व उत्पादक कंपनी यांच्यामध्ये Privity of Contract नाही त्यामुळे विक्रीपश्चात सेवा देणे ही वि.पक्ष ब्यु स्टार ऑटोमोबाईल्स यांची जबाबदारी आहे. त्यामुळे तक्रारदारांना वि. पक्ष यांनी दोष विरहित पिठाची गिरण (चिक्की) मशिन बदलून द्यावे. अथवा ते शक्य नसल्यास तक्रारदारांना रक्कम रु.14,500/- दि. 17-10-2011 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह द्यावेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2:-
वि.पक्ष यांनी तक्रारदारांना पिठाची गिरणी (चिक्की) सदोष सेवा दिल्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला. व तक्रारदार यांना मे. मंचात सदरची तक्रार दाखल करण्यास खर्च करावा लागला. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 1,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 500/- इतके मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2. वि. पक्ष यांनी तक्रारदारांना पिठाची गिरणी (चक्की) मशिन सदर आदेशपासून 60 दिवसांत नवीन बदलून द्यावी.
किंवा
पिठाची गिरणी (चक्की) मशिनची किंमत रक्कम रु. 14,500/- (अक्षरी रुपये चौदा हजार पाचशे फक्त) दि. 17-10-2011 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह द्यावेत.
3. वि.पक्ष यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
4. वि.पक्ष यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्त) द्यावेत.
5. सदर निकालपत्राच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविणेत याव्यात.
6 . सदर आदेशांची पुर्तता वि.पक्ष यांनी न केलेले तक्रारदार ग्राहक सरंक्षण कायद्यातील तरतुदीखाली दाद मागू शकतील.