द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्यक्ष
1) ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदार हया डायमण्डचा व्यवसाय करतात व व्यवसाय निमित्ताने त्यांना उच्भ्रू समाजामध्ये वावरावे लागते. तक्रारदारांना वेगवेगळया कार्यक्रमासाठी महागडी कपडे वापरावे लागतात. सामनेवाला क्र.1 यांचा लॉण्ड्रीचा व्यवसाय असून तक्रारदारांनी वेळोवेळी सामनेवाला यांच्याकडे ड्राय क्लिनिंगसाठी कपडे दिली होती.
2) दि.31/10/07 रोजी तक्रारदारांनी साडी व ब्लाऊज् इत्यादी नऊ महागडी कपडे ड्राय क्लिनिंगसाठी दिली. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे मालक आहेत. ज्यावेळी कपडे सामनेवाला यांना ड्राय क्लिनिंगसाठी दिली त्यावेळी सदरची कपडे महागडी असून ड्राय क्लिन करताना काळजी घ्यावी अशी सुचना तक्रारदारांनी दिली होती. वरील नऊ कपडयांच्या ड्राय क्लिनिंगसाठी तक्रारदारांनी सामनेवाला यांना रक्कम रु.750/- दिले.
3) तक्रारदारांनी ज्यावेळी सदर नऊ कपडे सामनेवाला यांचेकडे ड्राय क्लिनिंग केल्यानंतर परत घेतले त्यावेळी नऊ कपडयांपैकी एक साडी व एक ब्लाऊज् खराब झाल्याचे त्यांना दिसले. त्या साडी व ब्लाऊजवर पिपळया रंगाचे डाग पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सामनेवाला यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारांची महागडी साडी व ब्लाऊज्खराब झाले. तक्रारदारांनी सदरची साडी जून,2007मध्येरु.5,000/- ला खरेदी केली होती व ब्लाऊज् अंदाजे रु.1,500/- किंमतीचा होता. सदरचे खराब झालेले कपडे तक्रारदारांनी सामनेवाला यांना दाखविले तेंव्हा त्यांनी त्यांची चुकी झाल्याचे मान्य केले व चुक दुरुस्त करण्यासाठी त्यांना एक संधी द्यावी अशी विनंती केली. सामनेवाला यांनी व्यवस्थित ड्राय क्लिन करुन देतो असे आश्वासन दिल्यामुळे तक्रारदारांनी त्यांना साडी व ब्लाऊज् दि.03/11/07 रोजी दिले. सामनेवाला यांनी त्याची पावती तक्रारदारांनी दिली त्या पावतीची प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.'अ' ला दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या कर्मचा-यांनी अनेक वेळा सामनेवाला यांच्या लॉण्ड्रीत जावून सदर कपडयांची मागणी केली असता सामनेवाला यांनी कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सदरचे कपडे देण्याचे टाळले. सामनेवाला यांनी तक्रारदारांची साडी व ब्लाऊज् परत दिले नाहीत किंवा त्याची किंमत रक्कम रु.6,500/- तक्रारदारांना परत केली नाही म्हणून तक्रारदारांनी वकीलांच्या मार्फत सामनेवाला यांना नोटीस पाठविली. त्यास सामनेवाला यांनी उत्तर पाठवून त्यात खोटे नाटी कारणे नमूद केली. म्हणून तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल करणे भाग पडले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या खराब झालेल्या कपडयांची किंमत रक्कम रु.6,500/- द्यावेत असा सामनेवाला यांना आदेश करावा अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांचे महागडे कपडे खराब केल्यामुळे तक्रारदारांना जो मानसिक त्रास सहन करावा लागला व गैरसोय झाली त्यासाठी तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून नुकसानभरपाई म्हणून रु.15,000/- व या अर्जाच्या खर्चासाठी रु.2,000/- मागितले आहेत.
4) तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्र दाखल केली आहेत व स्वतःचे शपथपत्र दाखल केले आहे.
5) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्या कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्य केली. तक्रारअर्ज खोटा असून तो खर्चासहित रद्द करण्यात यावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(डी) प्रमाणे तक्रारदार 'ग्राहक' नाहीत म्हणून सदरचा तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे असे म्हटले आहे. तक्रारदारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. वास्तविक दि.23/10/07 च्या पावतीप्रमाणे जैन नांवाच्या एका इसमाने तक्रारदारांची सेवा घेतली होती असे दिसते. श्री.जैन व तक्रारदार यांच्यामध्ये काय संबंध आहे याबद्दल तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी सामनेवाला यांची सेवा कधीही घेतलेली नव्हती. तक्रारदारांनी त्यांचे कपडे सामनेवाला यांचेकडे ड्राय क्लिनिंगसाठी न देता सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्ज 'बेशरमपणे' दाखल करुन साडी व ब्लाऊजची नुकसानभरपाई म्हणून रु.6,500/-, मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/-, तसेच या सर्व रकमेवर 18 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे. तक्रारदारांनी मागितलेली नुकसानभरपाई अवास्तव जादा असून नुकसानभरपाई मिळण्यासाठी तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करुन सामनेवाला यांना रु.10,000/- खर्च तक्रारदारांकडून देण्यात यावा अशी सामनेवाला यांची विनंती आहे.
6) तक्रारदार व सामनेवाला यांच्यामध्ये कधीही करार झालेला नव्हता व नाही. तक्रारअर्जात सामनेवाला क्र.2 यांचे नांव चुकीने लिहिलेले आहे.इग्नाटस क्वाड्रोस हे सामनेवाला कंपनीचे मालक आहेत.
7) तक्रारदारांनी नऊ कपडे ड्राय क्लिनिंगसाठी दिले हे तक्रारदारांचे म्हणणे सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. दि.03/11/07 रोजी जैन नांवाच्या इसमाने साडी व ब्लाऊज् आणली होती व त्यावरील डाग काढून टाकावेत अशी विनंती केली म्हणून त्यांनी सदरचे कपडे त्यांच्याकडे ठेवून घेतले. त्यांच्या कर्मचा-यांनी प्रयत्न करुन सुध्दा वरील कपडयावरील डाग निघाले नाहीत. तक्रारदारांनी दिलेल्या नोटीसीला त्यांनी वकीलामार्फत उत्तर पाठविले आहे व त्यात खरी वस्तुस्थिती नमूद केली आहे. नोटीसमध्ये तक्रारदारांनी फक्त रु.6,500/- ची मागणी केली परंतु या तक्रारअर्जामध्ये तक्रारदारांनी रु.1,500/- मानसिक त्रासापोटी व गैरसायीपोटी, तसेच झालेल्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मागणी केली आहे. तक्रारअर्जातील मजकूर खोटा असल्यामुळे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करावा असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे.
8) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल केल्यानंतर तक्रारदारांनी तक्रार दुरुस्ती अर्ज दाखल करुन सामनेवाला क्र.2 Mr.Valevian Quadras यांच्या जागी Ignatius Quadros लिहावे अशी विनंती केली. तक्रारदारांचा तक्रार दुरुस्तीअर्ज या मंचाने दि.11/07/08 रोजी मंजूर केला. त्याप्रमाणे तक्रारदारांनी तक्रारअर्जात दुरुस्ती केली. तक्रारदारांच्या वतीने वकील श्रीमती.नंदा कुंभट व सामनेवालातर्फे वकील श्रीमती.अश्विनी गाडगीळ यांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला व सदर तक्रारअर्ज निकालासाठी ठेवण्यात आला.
9) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्द करतात काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना सामनेवाला यांचेकडून तक्रारअर्जात मागितल्याप्रमाणे खराब झालेल्या कपडयांची किंमत, तसेच नुकसानभरपाई मागता
येईल काय ?
उत्तर - अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा -
मुद्दा क्र.1 - तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हया डायमण्डचा व्यवसाय करतात व व्यवसायानिमित्ताने त्यांना उच्चभ्रू लोकांच्याकडे वावरावे लागते. सामनेवाला क्र.2 Ignatius Quadrosहे सामनेवाला क्र.1 चे मालक आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दि.31/10/07 रोजी त्यांचे नऊ महागडी कपडे ड्राय क्लिनिंगसाठी सामनेवाला यांना दिली. ड्राय क्लिनिंग करुन परत आलेल्या कपडयामध्ये एक साडी व एक ब्लाऊज् खराब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर कपडयांवर पिवळया रंगाचे डाग पडल्याचे निदर्शनास आले. तक्रारदारांनी खराब झालेली साडी जून, 2007 मध्ये रक्कम रु.5,000/- ला खरेदी केली असे सिध्द करणेसाठी काणताही लेखी अगर विश्वासार्ह पुरावा दाखल केलेला नाही, तसेच त्यांच्या ब्लाऊजची किंमत रु.1,500/- होती असा विश्वासार्ह पुरावा सादर केलेला नाही.
सामनेवाला यांनी त्यांच्या कैफीयतीमध्ये तक्रारदारांचा व त्यांचा व्यवसायाचे निमित्ताने कधीही प्रत्यक्ष संबंध आला नाही. तक्रारदारांनी त्यांच्याकडे स्वतः ड्राय क्लिनिंगसाठी कधीही कपडे दिले नव्हते त्यामुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदयाखाली 'ग्राहक' नाहीत असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. दि.31/10/07 रोजी जैन नांवाच्या इसमाने रंगाने खराब झालेली साडी व ब्लाऊज् ड्राय क्लिनिंगसाठी त्यांच्याकडे दिले. जैन व तक्रारदार यांचा काय संबंध आहे याबाबत तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल न केल्यामुळे तक्रारअर्ज रद्द करावा असे म्हटले आहे. या कामी तक्रारदारांनी दिनांक 31/12/07 रोजी सामनेवाला यांनी त्यांच्या नोटीसलापाठविलेले उत्तर तक्रारअर्जासोबत नि.'सी' दाखल केले आहे. वरील उत्तरामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदार श्रीमती.सुमा एस्. हेब्बाल्ली यांनी त्यांचे प्रतिनिधीमार्फत सात कपडयांबरोबर साडी व ब्लाऊज् ड्राय क्लिनिंगसाठी त्यांच्याकडे दिले होते हे मान्य केले आहे. तथापि, स्वतः तक्रारदारांनी वरील कपडे सामनेवाला यांच्या लॉन्ड्रीमध्ये स्वतः दिले नव्हते त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला यांना सुचना देण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे म्हटले आहे. वरील नऊ कपडयांपैकी एक साडी व एक ब्लाऊजवर पिवळया रंगाचे डाग पडले होते ही बाब सुध्दा सदर नोटीस उत्तरामध्ये सामनेवाला यांनी मान्य करुन सामनेवाला यांच्या कर्मचा-यांनी प्रयत्न करुन सुध्दा डाग निघाले नाहीत असे म्हटले आहे. सदरचे दोन्ही कपडे सामनेवाला यांनी तक्रारदारांना देण्यासाठी त्यांचे इसमाबरोबर पाठविले होते परंतु तक्रारदारांनी कपडे न स्वीकारता त्याचे इसमाला शिव्या घालून परत पाठविले. सामनेवाला यांच्या वरील नोटीसीतील मजकूर पाहता तक्रारदारांच्या वतीने नऊ कपडे ड्राय क्लिनिंगसाठी सामनेवाला यांच्या लॉण्ड्रीत पाठविण्यात आली होती त्यापैकी एक साडी व एक ब्लाऊजवर पिवळया रंगाचे डाग ड्राय क्लिन केल्यानंतर दिसून आले व सदरचे डाग सामनेवाला यांच्या कर्मचा-यांनी प्रयत्न करुनही निघाले नाहीत असे दिसते. वरील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांचे सेवेतील कमतरतेमुळे तक्रारदारांची साडी व ब्लाऊज खराब झाले असे दिसते. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता सिध्द केली आहे असे म्हणावे लागते.
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडे त्याचे खराब झालेल्या साडी व ब्लाऊजची किंमत वसुल करुन मागितली आहे. तक्रारदार हया डायमण्डचा व्यावसाय करतात ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी तक्रारअर्जात म्हटल्याप्रमाणे तक्रारदारांनी जून,2007 मध्ये रु.5,000/- ला साडी विकत घेतली या संबंधी लेखी अगर अन्य विश्वासहार्य पुरावा दाखल केला नाही, तसेच ब्लाऊजची किंमत रु.1,500/-चे दरम्यान होती हे दाखविणारा सुध्दा पुरावा दाखल केला नाही. परंतु तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याकडे ड्राय क्लिनिंगसाठी दिलेल्या नऊ कपडयांसाठी सामनेवाला यांनी रु.750/- आकारले असे उपलब्ध कागदपत्रावरुन दिसून येते. म्हणजेच तक्रारदारांची साडी व ब्लाऊज् वापरलेले पण महागडे असावेत असे वाटते. वरील दोन्ही कपडयांवर पडलेले डाग सामनेवाला यांच्या कर्मचा-यांनी प्रयत्न करुन सुध्दा निघाले नाहीत म्हणून तक्रारदारांना सदरचे कपडे वापरता आले नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना खराब झालेल्या साडी व ब्जाऊजच्या किंमतीपोटी रक्कम रु.2,500/-द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी वरील रकमेवर 18 टक्के दराने व्याजाची मागणी केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना वरील रक्कम रु.2,500/- यावर दि.21/12/07 पासून 9 टक्के दराने व्याज द्यावे असा आदेश करणे योग्य होईल.
तक्रारदारांनी मानसिक त्रास व गैरसोयीपोटी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.15,000/- ची मागणी केली आहे. ड्राय क्लिनिंगला दिलेले कपडे खराब झाल्यामुळे तक्रारदारांना मनस्ताप झाला असेल हे निश्चित, परंतु तक्रारदारांनी त्यापोटी मागितलेली नुकसानभरपाई अवास्तव जादा आहे. त्याचे समर्थनार्थ तक्रारदारांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.500/- व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्य होईल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते.
वर नमूद कारणास्तव तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात करुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
अं ति म आ दे श
1.तक्रार क्रमांक 31/2008 अंशतः मंजूर करणेत येतो.
2. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अगर संयुक्तरित्या तक्रारदारांना खराब झालेल्या कपडयांची नुकसानभरपाई म्हणून रक्कम
रु.2,500/-(रु.दोन हजार पाचशे मात्र) द्यावेत व सदर रकमेवर दि.21/12/2007 पासून द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम
तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावी.
3. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या अगर संयुक्तरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.500/-
(रु.पाचशे मात्र) व या अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार मात्र) द्यावेत.
4. सामनेवाला यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी प्रस्तुत आदेशाची प्रत त्यांना मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत करावी.
5. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.