निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून त्यांचे वाहन जळाल्यामुळे वाहनाच्या विमा क्लेमची रक्कम मिळावी या मागणीसाठी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी दि.०९-०३-२००९ रोजी मारुती ओमनी कार खरेदी केली होती. सदर वाहनाची फुल क्रॉम्प्रीहेन्सीव्ह विमा पॉलिसी सामनेवाले यांचेकडून काढली होती. सदर वाहन हे दुरुस्त करण्याकामी इंडियन गॅरेजमध्ये तक्रारदार यांनी दिले होते. त्या दरम्यान दि.२६-०५-२०११ रोजी पहाटे सदर गॅरेजला अचानक आग लागली व त्यामध्ये इतर वाहनांबरोबर तक्रारदारांचे वाहन हे पूर्णपणे जळून नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन वाहनाचा विमा मिळण्याकामी प्रस्ताव सादर केला. परंतु सामनेवाले यांनी दि.२४-०९-२०११ रोजी खोटी कारणे देवून क्लेम नामंजूर करण्याचे पत्र दिले. म्हणून नाईलाजाने तक्रारदारांना सदर तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे.
तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम रु.९०,०००/- व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रास व अर्जाचा खर्च म्हणून रु.१०,०००/- मिळावेत.
तक्रारदार यांनी सदर अर्जाचे पुष्टयर्थ नि.नं.३ वर शपथपत्र, नि.नं.५ सोबतचे दस्त ऐवज यादी सोबत नि.नं. १ ते ११ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. यात पोलीस स्टेशन मधील कागदपत्र, विमा पॉलिसीची प्रत, आर.सी.बुक व सामनेवाले यांचेसोबत केलेला पत्रव्यवहार, पुराव्याचे शपथपत्र इत्यादीचा समावेश आहे.
(३) सामनेवाले यांनी त्यांचा लेखी खुलासा नि.नं.१४ वर दाखल केला आहे. त्यात त्यांनी तक्रारदारांचा अर्ज नाकारुन असे नमूद केले आहे की, विमा पॉलिसी हा एक करार असून तो दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.७५,०००/- ची पॉलिसी दिलेली आहे. गाडी गॅरेजमध्ये गॅरेज मालकाचे ताब्यात असतांना, गाडीचे नुकसान गॅरेजमध्ये लागलेल्या आगीमुळे झाले आहे. त्यामुळे नुकसानीस गॅरेज मालक जबाबदार आहे. पॉलिसीच्या General Exceptions Clause पॅाईंट नं.२ अनुसार सामनेवालेंची कोणतीही जबाबदारी येत नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी सदरचा क्लेम नामंजूर केलेला असून, सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. त्यामुळे सामनेवाले हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार लागत नाहीत. सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
सामनेवाले यांनी. नि.नं.१५ वर शपथपत्र तसेच नि.नं.१७ वरील यादी सोबत पॉलिसीच्या अटी-शर्ती व सर्व्हे रिपोर्ट ही कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(४) तक्रारदार यांचा अर्ज, शपथपत्र, छायांकीत कागदपत्र, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र तसेच सामनेवालेंचा जबाब व शपथपत्र पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)तक्रारदार हे विमा क्लेमची रक्कम व्याजासह मिळण्यास मानसिक, शारीरिक त्रासाची रक्कम व अर्जाच्या खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय. |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी मारुती ओमनी वाहन क्रमांक एम.एच.१८-एच-०१४६ या वाहनाची सामनेवाले यांच्याकडून दि.२४-०८-२०१० ते दि.२३-०८-२०११ या कालावधी करिता क्रॉम्प्रीहेन्सीव्ह विमा पॉलिसी रक्कम रु.७५,०००/- ची घेतलेली आहे. त्या बाबतची पॉलिसीची छायांकीत प्रत नि.नं.५/४ वर दाखल आहे. सदर पॉलिसीबाबत उभयतात वाद नाही. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सदर वाहनाची दुरुस्ती करणे कामी इंडियन गॅरेज मध्ये दिले होते. त्यावेळी दि.२६-०५-२०११ रोजी पहाटे ०६.०० वाजता सदर गॅरेजला आग लागली व त्या घटनेमध्ये इतर वाहनांसह तक्रारदाराचे वाहन हे पूर्णपणे जळाले आहे. त्या बाबतचे गॅरेज मालकांनी संबंधित पोलीसस्टेशनला खबर दिलेली आहे. त्या बाबतचे कागदपत्र नि.नं.५/१ वर खबर, नि.नं.५/२ वर घटना स्थळाचा पंचनामा दाखल केलेला आहे. या पोलिसांकडील कागदपत्रांचा विचार होता सदर वाहन हे गॅरेजमध्ये आग लागून जळीत होऊन पूर्णपणे नुकसान झाले आहे हे स्पष्ट होते.
सदर वाहनाची नुकसान भरपाई मिळण्याकामी तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडे विमा क्लेम केला आहे. परंतु सामनेवाले यांनी दि.२४-०९-२०११ च्या पत्राने सदर क्लेम नाकारला आहे. सदरचे पत्र नि.नं.५/८ वर दाखल आहे. सदर पत्राचा विचार होता या पत्रामध्ये सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे वाहन हे एल.पी.जी. फयुएल किट हे डोमेस्टीक कारणा करिता बसविलेले असून त्या कामी पॉलिसी घेतांना सांगितलेले नसून, त्याच्या समावेशासह पॉलिसी दिलेली नाही. तसेच गाडी ही गॅरेजमध्ये लागलेल्या आगीमुळे गाडीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यास गॅरेज मालक हे जबाबदार असून सामनेवाले हे जबाबदार नाहीत. या कारणाने सदरचा क्लेम नाकारलेला दिसत आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडील कागदपत्रांचा विचार करता, तक्रारदार यांनी सदर वाहन हे ज्या गॅरेजमध्ये दिलेले होते त्या गॅरेजला पहाटेच्यावेळी आग लागली असून त्यामध्ये इतर वाहनासह सदरचे वाहन हे जळालेले आहे. सदरची घटना ही आकस्मीक रित्या घडलेली दिसत आहे. त्यामुळे गॅरेज मालक हे सदर घटनेस जबाबदार आहेत असे कुठेही स्पष्ट होत नाही. त्याचप्रमाणे सदर वाहन हे बंद व उभ्या स्थितीत असतांना घटना घडलेली आहे. त्यामुळे एल.पी.जी. गॅस किटमुळे घटना घडली असे कुठेही दिसत नाही. या सर्वांचा विचार होता, सदर घटना घडण्याकामी गॅरेज मालक तसेच एल.पी.जी.गॅस किट कारणीभूत आहे असे स्पष्ट होत नाही. सदर घटना ही आकस्मीक रित्या पहाटे घडलेली आहे. त्यामध्ये वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे हे कागदपत्रांवरुन स्पष्ट झालेले आहे. परंतु सामनेवालेंनी केवळ तांत्रीक कारणाचा आधार घेऊन क्लेम नाकारला आहे असे दिसते. त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘क’’ – सामनेवाले यांनी सदर वाहनाचा सर्व्हे केला असून त्याबाबतचा पर्सनल सर्व्हे रिपोर्ट नि.नं. १७/२ वर दाखल केला आहे. सदर कागदपत्रांचा विचार करता त्यामध्ये वाहनाची घसारासह इतर सर्व वजावट करुन नेट असेसमेंट रक्कम रु.५६,१३०/- ही तक्रारदारास मिळणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे. परंतु सदरची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळेत दिलेली नाही. त्यामुळे निश्चितच तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला असून सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागला आहे. याचा विचार होता, सर्व्हे रिपोर्ट प्रमाणे तक्रारदारास रक्कम रु.५६,१३०/- ही क्लेम नाकरलेल्या तारखे पासून म्हणजेच दि.२४-०९-२०११ पासून द.सा.द.शे.६ टक्के व्याजासह, तसेच मानसिक त्रास व अर्जाचा खर्च मिळणे योग्य व रास्त होईल असे आमचे मत आहे.
(८) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, तक्रारदारांची मागणी रास्त असल्याने, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारास जळीत झालेल्या वाहनाच्या विम्यापोटी, रक्कम ५६,१३०/- (अक्षरी रुपये छप्पन्न हजार एकशे तीस मात्र) दि.२४-०९-२०११ पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ % प्रमाणे व्याजासह द्यावेत.
(२) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांक : २२-०५-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.