जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ०८/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २४/०१/२०१२ तक्रार निकाली दिनांक – २७/०८/२०१४
- श्रीमती शोभा माधवराव पाटील
उ.व.४४, धंदा – घरकाम,
२) कुमार महेंद्र माधवराव पाटील
उ.व.२३, धंदा – शिक्षण
दोन्ही रा.भाटपुरा ता.शिरपुर जि. धुळे - तक्रारदार
विरुध्द
- बिरला सन लाईफ इंश्युरंस कंपनी लि.,
क्लेम्स डिपार्टमेंट, जी कार्पोरेशन,
टेक पार्ट, ६ वा माळा, कासार वडावली,
पोलिस स्टेशन जवळ, घोडबंदर रोड,
ठाणे पश्चिम – ४००६०१.
२) धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची
सहकारी बॅंक लि., गरूड बाग, धुळे – ४२४००१ - सामनेवाले
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.श्री.डी.वाय. खैरनार)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – अॅड.श्री.ए.ए. लाली)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – अॅड.श्री.एस.आर. पाटील)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
१. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या विमा दाव्याची रक्कम मिळावी यासाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदार क्र.१ यांचे पती व तक्रारदार क्र.२ यांचे वडील माधवराव नारायण पाटील हे सामनेवाले क्र.२ यांचे सभासद होते. सामनेवाले क्र.२ यांच्यामार्फतच त्यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून विमा पॉलिसी स्विकारली होती. तिचा क्रमांक ००३९५२००४ असा होता. माधवराव नारायण पाटील यांचा दिनांक १९/०४/२०१० रोजी मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदार यांनी दिनांक ०८/०८/२०१० रोजी सामनेवाले यांच्याकडे विमा दाव्याची रक्कम मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. सामनेवाले क्र.१ यांनी त्यांचा अर्ज नामंजूर केला. माधवराव नारायण पाटील यांच्या पॉलिसीमध्ये ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात ते चालक म्हणून नोकरीस होते. त्यामुळे त्यांच्या विमा दाव्याची रक्कम देता येत नाही असे सामनेवाले क्र. १ यांनी तक्रारदार यांना कळविले. सामनेवाले क्र.१ यांची ही कृती सेवेत त्रुटी असून त्यांच्याकडून विमा दाव्याची रक्कम रूपये ३,००,०००/-, मानसिक त्रासापोटी रूपये ५०,०००/-, तक्रारीचा खर्च रूपये ५,०००/- आणि या रकमेवर दिनांक १९/०४/२०१० पासून १२% प्रमाणे व्याज मिळावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
३. तक्रारीसोबत त्यांनी सामनेवाले क्र.१ यांनी दावा नाकारल्याबाबत पाठविलेले पत्र, माधवराव पाटील यांच्या मृत्यूनंतर भरण्यात आलेला दावा अर्ज, सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदार यांना विमा पॉलिसी रक्कम कपातीबाबत दिलेले पत्र व विम्याचे विवरण, सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराकडून रक्कम रूपये ८०,०००/- घेवून दिलेली पावती, माधवराव पाटील यांचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस दाखला आदी कागदपत्रांच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहेत.
४. सामनेवाले क्र.१ यांनी हजर होवून खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार यांनी विमा पॉलिसीतील अटींचा भंग केल्यामुळे त्यांचा विमा दावा विमा कायदा १९३८ च्या कलम ४५ नुसार रदद करण्यात आला आहे. तक्रारदार हे मंचाची दिशाभूल करीत आहे. विमाधारक हे चालक म्हणून नोकरीस होते. मात्र त्यांनी विमा पॉलिसीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांनी विमा पॉलिसीतील अटींचा भंग केला आहे. याच कारणावरून त्यांचा दावा नाकारण्यात आला असून विमा रक्कम देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.१ यांची होत नाही.
५. सामनेवाले क्र.१ यांनी खुलाशासोबत अधिकारपत्र, विमा पॉलिसी, विमा दावा अर्ज, नोकरीबाबतचे प्रमाणपत्र, विमा धारकाचे ओळखपत्र, विमा दावा नाकारल्याबाबत सामनेवाले क्र.२ यांना पाठविलेले पत्र आदी कागदपत्रे दाखल केली आहेत.
६. सामनेवाले क्र.२ यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, माधवराव नारायण पाटील हे आमच्या बॅंकेत खातेधारक होते. ते पाटबंधारे विभागात वाहन चालक म्हणून नोकरीस होते. सामनेवाले क्र.१ यांच्याकडून त्यांचा विमा उतरविण्यात आला होता. सदर विम्याबाबत सामनेवाले क्र.१ यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्यांनी योग्य माहिती दिली नाही. विमा धारक माधवराव पाटील यांचा विमा दावा मंजूर करण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.१ यांचीच होती. त्यामुळे सामनेवाले क्र.२ यांच्यावर कोणतीही जबाबदारी येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
७. तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ यांचा खुलासा त्यासोबत दाखल कागदपत्रे, सामनेवाले क्र.२ यांचा खुलासा, तक्रारदार व सामनेवाले क्र.१ यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
- सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? नाही
- तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून विमा दाव्याची
रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? नाही
क. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
८. मुद्दा ‘अ’ – तक्रारदार क्र.१ यांचे पती आणि तक्रारदार क्र.२ यांचे वडील विमाधारक माधवराव नारायण पाटील यांनी सामनेवाले क्र.२ यांच्यामार्फत सामनेवाले क्र.१ यांच्याकडून विमा पॉलिसी घेतली होती. तिचा क्रमांक ००३९५२००४ असा आहे. ही बाब तक्रारदार, सामनेवाले क्र.१ व सामनेवाले क्र.२ यांना मान्य आहे. तक्रारदार यांनी संबंधित पॉलिसीची छायांकित प्रत तर सामनेवाले क्र.१ यांनी संबंधित पॉलिसीची मूळ प्रत तक्रारीसोबत दाखल केली आहे. या मुद्ययावरून उभय पक्षात कोणताही वाद नाही.
विमाधारक माधवराव नारायण पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विमा दाव्यावी रक्कम रूपये ३,००,०००/- सामनेवाले क्र.१ यांनी देण्याचे नाकारले अशी तक्रारदार यांची मूळ तक्रार आहे. तर विमाधारक माधवराव नारायण पाटील यांनी पॉलिसी घेतांना खोटी माहिती नमूद केली त्यामुळे विमा पॉलिसीच्या नियम व अटींचा भंग झाला आहे. याच कारणावरून त्यांचा विमा दावा नाकारण्यात आला असे सामनेवाले क्र.१ यांचे म्हणणे आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दावा मागणी अर्जाची प्रत दाखल केली आहे. त्यातील प्रश्न क्र.१ असा आहे – What was the cause of death ? – Accident.
प्रश्न क्र.२ असा आहे – What was the occupation of the deceased ? – Driver
यावरून विमाधारक माधवराव नारायण पाटील हे चालक म्हणून नोकरीस होते आणि त्यांचा मृत्यू अपघाताने झाला होता असे दिसते.
सामनेवाले क्र.१ यांनी विमा धारक माधवराव पाटील यांच्या पॉलिसीची छायांकित प्रत दाखल केली होती. तक्रारदार यांच्या मागणीवरून सदर पॉलिसीची मूळ प्रतही त्यांनी मंचासमोर हजर केली. या पॉलिसीत कलम I – Life to be insured यातील Name of Employer या रकान्यात विमाधारकाच्या नोकरीविषयीची माहिती दिली आहे. त्यात माधवराव पाटील हे झेड.पी. स्कूलमध्ये शिक्षक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सामनेवाले क्र.१ यांनी विमाधारक माधवराव पाटील यांच्या ओळखपत्राची प्रतही दाखल केली आहे. त्यात ते पाटबंधारे विभागात वाहन चालक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विमाधारक माधवराव पाटील हे पाटबंधारे विभागात वाहन चालक म्हणून नोकरीस होते. मात्र त्यांनी विमा पॉलिसी घेतांना त्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याचे नमूद केले. ते वाहन चालक असल्याचे विमा कंपनीच्या चौकशीतून उघडकीस आले. याचाच अर्थ विमाधारकाने पॉलिसी घेतांना चुकीची आणि खोटी माहिती दिली म्हणूनच विमा कायदा १९३८ च्या कलम ४५ नुसार त्यांचा विमा दावा नाकारण्याचा अधिकार विमा कंपनीचा आहे, असा युक्तिवाद सामनेवाले क्र.१ यांच्या विद्वान वकिलांनी केला. या वकिलांनी विमा पॉलिसीतील कलम - XIII Declaration by the life to be insured (and proposer if not the life to be insured) कडेही मंचाचे लक्ष वेधले. या कलमानुसार विमाधारक याने पॉलिसीतील नियम व अटींचा भंग केला आहे. कोणतीही विमा पॉलिसी व्यक्ती आणि संबंधित कंपनीतील करार असतो. त्यातील अटी आणि शर्ती दोन्ही पक्षांवर बंधनकार असतात. विमा पॉलिसी घेतांना दोन्ही पक्षांनी परस्परांवर विश्वास ठेवून खरी माहिती देणे अपेक्षित असते, असा युक्तिवाद सामनेवाले क्र.१ यांच्या वकिलांनी केला.
तक्रारदार यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात विमा पॉलिसीत नमूद मजकूर तक्रारदार यांनी स्वतः भरलेला नाही. तो सामनेवाले क्र.२ यांनी भरला असावा असा मुददा उपस्थित केला. मात्र विमा पॉलिसीवर विमा धारकाचीच स्वाक्षरी असल्याने पॉलिसीतील मजकूर विमा धारकानेच भरलेला आहे किंवा त्याला तो मान्य आहे असे गृहीत धरले जाते या तत्वाचा आम्ही येथे आधार घेत आहोत.
तक्रारदार व सामनेवाले यांनी उपस्थित केलेले मुददे आणि दाखल केलेली कागदपत्रे पाहता विमाधारक माधवराव नारायण पाटील यांनी विमा पॉलिसीत ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असल्याचे नमूद केले. प्रत्यक्षात माधवराव पाटील हे पाटबंधारे विभागात चालक म्हणून नोकरीस होते. याचाच अर्थ माधवराव पाटील यांनी विमा पॉलिसीत सत्य माहिती नमूद केली नाही हे दिसून येते. असे करणे म्हणजे विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग झाला आहे हे सामनेवाले क्र.१ यांचे म्हणणे योग्य आहे असे आम्हाला वाटते. याच कारणावरून सामनेवाले क्र.१ यांनी तक्ररदार यांचा विमा दावा नाकारला आहे. यांची ही कृती सेवेतील कसूर किंव त्रुटी ठरत नाही असे आमचे मत आहे. म्हणूनच मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘ब ’- वरील मुददा ‘अ’ मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत सामनेवाले क्र.१ यांनी कसूर किंवा त्रुटी केलेली नाही हे स्पष्ट होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची विमा दाव्याची रक्कम देण्याचे नाकारलेले नाही. विमाधारक माधवराव पाटील विमा पॉलिसी घेतांना खोटी माहिती नमूद केली आणि त्यामुळे उभय पक्षातील कराराचा आणि विश्वासार्ह व्यवहाराचा भंग झाला या कारणामुळे तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम देता येणार नाही असे सामनेवाले क्र.१ यांचे म्हणणे आहे. विमाधारक माधवराव पाटील यांनी विमा पॉलिसी घेतांना नमूद केलेली माहिती योग्य आहे हे तक्रारदार सिध्द करू शकलेले नाही. याउलट सामनेवाले क्र.१ यांनी विमाधारक माधवराव पाटील पाटबंधारे विभागात वाहन चालक म्हणून नोकरीस होते याबाबत त्यांचे ओळखपत्र दाखल केले आहे. यावरून माधवराव पाटील यांनी विमा पॉलिसीत नमूद केलेली माहिती सत्य होती हे सिध्द होत नाही असे आम्हाला वाटते. त्याचबरोबर विमाधारकाने विमा पॉलिसीतील कलम - XIII Declaration by the life to be insured (and proposer if not the life to be insured) चा भंग केला आहे असेही आमचे मत आहे. यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडे विमा दाव्याची रक्कम मागण्याचा अधिकार गमावला आहे असे आमचे मत बनले आहे. याच कारणावरून तक्रारदार हे त्यांच्या मागणीनुसार विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र ठरत नाही. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘क ’- वरील सर्व मुद्यांचा आणि विवेचनाचा विचार करता सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत कसूर किंवा त्रुटी केलेली नाही हे स्पष्ट होते. त्याचबरोबर तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ यांच्याकडून विमा दाव्यावी रक्कम मिळण्यास पात्र ठरत नाहीत हेही स्पष्ट होते. याचा विचार करता आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
-
-
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.