निकालपत्र :- (दि.23/07/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की - यातील सामनेवाला हे मोठे शॉपिंग सेंटर आहे व त्याच्या देशभर अनेक शहरात शाखा आहेत. खरेदीवर 25 टक्के सुट देण्याची एक योजना त्यांनी मार्च-2008 मध्ये जाहीर केली होती. 31 मार्च-2008 हा त्या योजनेचा अखेरचा दिवस असल्यामुळे तक्रारदार यांनी त्या संधीचा लाभ उठवण्यासाठी 31 मार्च-2002 रोजी सामनेवालाच्या कोल्हापूर येथील शाखेतून रात्री उशिरा एक मोठी अल्फा एअरबॅग व एक लहान बॅग खरेदी केली. सदर खरेदीचे बील चुकते करुन एक लहान बॅग घेऊन घरी गेल्यावर व दुस-या दिवशी मोठी बॅग सामनेवालाकडून आल्यावर मोठी बॅग सदोष असल्याचे (त्याचे कव्हरींग, चेन इलॅस्टीक इ.) आढळले. तसेच त्या बॅगेचे गॅरंटी कार्ड कुलूप इत्यादी नसल्याचेही तक्रारदारांना आढळले. तक्रारदाराने लगेच सामनेवालांशी संपर्क साधुन तक्रारदाराने ती बॅग त्यांना दाखवली व दि.23/04/2008 रोजी बॅग त्यांच्याकडे पोचवून पोच घेतली व त्यांनी दुरुस्त करुन देतो असे सांगितले. दुरुस्ती करुन बॅग दिल्यावरही दुरुस्ती व्यवस्थित झाली नसल्याचे तसेच कुलूप किल्लीही दिली नसल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आल्यावर त्यांनी सामनेवालाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर सामनेवालाने बॅज बदलून देतो किंवा पैसे परत देतो असे आश्वासन दिले. परंतु ते अदयापही पुरे केले नाही. तक्रारदाराने दि.31/03/2008 रोजीच सामनेवालांकडून मलेशियन फर्निचरचे दोन नगही रु.10,000/- ला खरेदी केले. सदर फर्निचर तक्रारदार यांच्या घरी जिन्यावरुन वर घेत असताना सामनेवालाच्या माणसांच्या हातूनच थोडे डॅमेज झाले असल्याचेही तक्रारदाराने आपल्या कथनात म्हटले आहे. एप्रिल-2008 नंतर तक्रारदार अनेक वेळा सामनेवालांना त्यांच्या शोरुम मध्ये जाऊन भेटल्या व त्यांनी फर्निचर जोडून देण्याविषयी तसेच बॅग बदलून देण्याखेरीज काहीही केले नाही. म्हणून अखेर तक्रारदाराने प्रस्तुत मंचाचा दरवाजा ठोठावला आहे. आपल्याला सामनेवालाने कबूल केल्याप्रमाणे बॅग बदलून दयावी अथवा त्याचे पैसे परत करावेत व फर्निचर जोडून दयावे अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत बॅग दुरुस्तीसाठी सौ.अंबर्डेकर यांनी ताब्यात घेतलेची दि.23/04/2008 ची पोच, अल्फा बॅगचे गॅरंटी कार्ड इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.21/06/2010 रोजी दि.31/03/2010 रोजीचे बिग बझारमध्ये खरेदी केलेल्या फर्निचर व बॅगची पावती दाखल केली आहे. (3) सामनेवाला यांनी आपल्या लेखी कथनात तक्रारदाराने आपल्याकडून दोन बॅगा व फर्निचर खरेदी केल्याचे मान्य केले आहे. परंतु इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराने बॅग खरेदी केल्यावर तीन आठवडयांनी सामनेवालांकडे त्याबद्दल तक्रार केली यावरुन बॅग खरेदी केली तेव्हा त्यात कोणतीही त्रुटी नव्हती हे स्पष्ट होत आहे. सामनेवालाच्या शोरुममध्ये नामांकित कंपनीच्या व उत्तम दर्जाच्याच वस्तु विक्रीस ठेवलेल्या असतात. तक्रारदाराची फर्निचरबद्दल कोणतीही तक्रार नाही. ते जोडून देण्याविषयी सांगायला तक्रारदार एकदाच सामनेवालांकडे आल्या होत्या. सामनेवालाने जी बॅग तक्रारदारांना विकली तीचा निर्माता वेगळीच अल्फा कंपनी आहे. सदर कंपनीला तक्रारदाराने पार्टी केले नाही. या कारणानेही तक्रारदाराची तक्रार (Non Joinder of necessary Parties) काढून टाकण्यास पात्र आह. तसेच तक्रार लिमिटेशन कालावधीनंतरही केली आहे. यावरुन सदरची तक्रार खोटी व पश्चात बुध्दीने केली आहे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मे. मंचाने प्रस्तुत तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी व तक्रारदाराकडून रु.10,000/- इतका दंड घेण्यात यावा असेही सामनेवाला यांनी आपल्या कथनात म्हटले आहे. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (5) दि.21/06/2010 रोजी तक्रारदाराने सामनेवालाकडून खरेदी केलेल्या दोन अल्फा कंपनीच्या बॅगा व फर्निचरचे दोन नग यांच्या सद्यस्थितीबद्दल शहानिशा करण्यासाठी कोर्ट कमिशनर नेमण्यात यावे असा अर्ज दिला होता. तो मंजूर करुन मंचाने त्याच दिवशी अॅडव्होकेट कु.शितल एम. पोतदार यांची कमिशनर म्हणून नेमणूक केली व उपरोक्त सामानाची तपासणी करुन दि.26/06/2010 पर्यंत त्यांना आपला अहवाल दाखल करणेचा आदेश दिला. त्याप्रमाणे अॅड.शितल एम.पोतदार यांनी सामनेवालांचे वकील व प्रतिनिधी आणि तक्रारदार यांच्या समक्ष सदर सामानाची पाहणी करुन आपला अहवाल दाखल केला. त्यातील महत्वाची नोंद पुढीलप्रमाणे आहे. 1) अल्फा कंपनीच्या मोठया बॅगेत छोटी बॅग असून त्यावर 24/6/T-9/65183 असा नंबर नमुद असून त्या वापरलेल्या नाहीत तसेच स्थलांतरित केलेल्या नाहीत असे आढळून आले. सदर मोठया बॅगेस एका ठिकाणी रिबेट मारलेचे दिसून आले तसेच आतील लहान बॅग तपासुन पाहिली असता त्यामध्ये आतील बाजूस असणारी प्लास्टीक पट्टी तुटल्याचे दिसून आले आहे. 2) स्टडी डेस्क- कलर हनी नं.600050281 फर्निचर बझार अशी माहिती नमुद असणारा नग भिंतीला टेकवून ठेवलेला दिसून आला. त्यावरील पॅकींग टेप सुस्थितीत आढळून आले आहे. 3) स्टडी डेस्क- कलम हनी, मेड इन मलेशिया फर्निचर बझार अशी माहिती नमुद असणारा नग(मोठे लांबट पार्सल) भिंतीस आडव्या स्थितीत टेकवून ठेवलेला असून सदर वस्तुचे पॅकींग बाबत एका ठिकाणी कोप-यात सदर सेलो टेप पॅकींग एक वित एवढे दाब पडून फाटल्यासारखे आढळलेले आहे. बाकी पॅकींग टेप व्यवस्थित असल्याचे आढळून आले. तक्रारदार व सामनेवाला यांचे वकील यांनी केलेले युक्तीवाद तसेच त्यांच्या कैफियती व कोर्ट कमिशनरचा अहवाल इत्यादी सर्वांचे अवलोकन करुन हे मंच पुढीलप्रमाणे निष्कर्ष काढले आहेत. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असल्याचे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. तक्रारदाराने दि.31/03/2008 रोजी दोन बॅगा(खरेदीची किंमत रु.12,000/-) व दोन नग लाकडी फर्निचर (खरेदीची किंमत रु.10,000/-) सामनेवालाच्या सवलत योजनेच्या शेवटच्या दिवशी खरेदी केली. कारण 25 टक्के सवलतीचा तो शेवटचा दिवस होता. सायंकाळी उशिरा खरेदी केल्यामुळे बॅगा व्यवस्थित चेक करता आल्या नाहीत. परंतु नंतर तपासल्यावर मोठया बॅगेत दोष होता. किल्ल्या कुलूपे नव्हती, गॅरंटी कार्ड नव्हते तसे लक्षात आल्यावर त्यांनी दि.24/4/2008 रोजी सामनेवालाकडे दुरुस्तीसाठी दिले असे तक्रारदाराचे कथन आहे. त्याप्रमाणे सामनेवालाने सदर बॅग दुरुस्तीसाठी मिळाल्याची पोचही दिली आहे. कोर्ट कमिशनरच्या अहवालातही दुरुस्त करुन दिलेल्या मोठया बॅगेत दोष असल्याचे नमुद आहे. लहान बॅगेविषयी तक्रारदाराची तक्रार नाही. अल्फा या बॅग बनवणा-या कंपनीला तक्रारदाराने पार्टी केले नाही असा मुद्दा सामनेवाला यांनी उपस्थित केला आहे. परंतु सदर अल्फा कंपनी व तक्रारदार यांच्यात privity of contract नसल्यामुळे हे मंच तो मुद्दा विचारात घेत नाही. त्यामुळे सदर मोठी बॅग सदोष विक्री केलेली होती हा तक्रारदाराचा मुद्दा हे मंच ग्राहय धरत आहे. तक्रारदाराने मलेशियन फर्निचरचे दोन नग सामनेवालांकडून दि.31/03/2008 रोजीच विकत घेतले होते. सदर पार्सल सामनेवालाच्या माणसांनी तक्रारदाराच्या घरी पोच केले. पोच करताना सामनेवालाच्या माणसांकडून जिन्यात ते थोडे डॅमेज झाले आहे. तसेच पार्सलवर सामनेवालाचा माणूस चेक करुन असेंबल करुन देईल असे स्पष्ट लिहीले असल्यामुळे तक्रारदाराने ते उघडले नाही. तक्रारदाराने आपल्या कथनात आपण अनेक वेळा सामनेवालांकडे सदर फर्निचर चेक करुन जोडून देण्याबद्दल सामनेवालांकडे जाऊन सांगितल्याचे अॅफिडेव्हीटवर सांगितले आहे. स्वत:च्या उपयोगासाठी महागडे फर्निचर विकत घेतल्यावर ते जोडून मागण्यासाठी तक्रारदाराने सामनेवालाकडे प्रयत्न केले नाहीत हे सामनेवालाचे म्हणणे हे मंच ग्राहय धरु शकत नाही. अनेक वेळा प्रयत्न करुनही सामनेवालाने सदर फर्निचर जोडून दिले नाही ही सामनेवालाच्या सेवेतील निश्चितच गंभीर त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व त्याबद्दल तक्रारदारांना मोठा मानसिक त्रास झाला हे तक्रारदारचे म्हणणे आम्ही ग्राहय धरत आहोत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांनी खरेदी केलेल्या अल्फा कंपनीच्याच बॅगेच्या साईजची व दर्जाची व किंमतीची नवी बॅग दयावी अथवा त्याची किंमत दयावी.
3) तक्रारदाराने विकत घेतलेले फर्निचर विनाविलंब सुस्थितीत असल्याबद्दल खात्री करुन जोडून दयावे.
4) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रास तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |