(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार- सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 09/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 20.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.19.03.2010 रोजी रु. 461.75 पैशांच्या वस्तु एक्सीस बँक क्रेडिट कार्डव्दारे खरेदी केल्या, त्या बिलामध्ये आयटम नं.9 HIM SK NOUR CRM50m या वस्तुची मुळ किंमत रु.75/- असतांना गैरअर्जदार क्र.1 ने 100/- घेतले. त्याबाबत तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे दि.23.03.2010 ला दुपारी 1.30 वाजता तक्रार केली. परंतु त्यांनी तक्रारकर्त्यास शिवीगाळ करुन र्दुव्यवहार केला, तक्रारकर्त्याने याबाबतची तक्रार बिग बाजारचे मालकांना सुध्दा ई-मेल व्दारे केली. तक्रारकर्त्याचा मुळ आक्षेप आहे की, गैरअर्जदारांनी त्याचेकडून मुळ किमतीपेक्षा रु.25/- जास्तीचे घेतले व गैरअर्जदारांकडे केलेल्या तक्रारीबद्दल कोणतीही योग्य ती कारवाई केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने त्याचेसोबत झालेल्या गैरव्यवहारामुळे प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस मंचामार्फत गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपले उत्तरात नमुद केले आहे की, ते दैनंदीन वस्तु विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याने त्यांचेकडून रु.461.75 ची खरेदी केली होती व हिमालय कंपनीची स्कीन क्रीम खरेदी केली त्याचा आयटम नं.9 वर आहे व त्याची मुळ किंमत रु.75/- असुन बिलात रु.100/- कॅशियरच्या हातून चुकीने लिहील्या गेले आहे. त्यांनी पुढे नमुद केले आहे की, आपली चुक कळताच गैरअर्जदार क्र.1 चे कॅशियरने तक्रारकर्त्याची माफी मागितली व रु.25/- परत घेण्याची विनंती केली. परंतु तक्रारकर्त्याने सदर रक्कम घेण्यांस नकार दिला व लेखी माफीनाम्यासह रु.25/- द्यावे असे सांगून निघुन गेला. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व म्हणणे नाकारले असुन ते तक्रारकर्त्यास रु.25/- परत देण्यांस तयार असल्याचे नमुद केले आहे व सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 4. गैरअर्जदार क्र.3 यांनी सदर तक्रारीला उत्तर दाखल केले असुन त्यात नमुद केले आहे की, प्रस्तुत तक्रार ही मुख्यत्वे गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्दची आहे. गैरअर्जदार क्र.3 हे हिमालय ड्रग कंपनी, बंगलोर येथील असुन ते आयुर्वेदीक औषधींचे निर्माते आहेत. त्यांनी त्यांचे विरुध्दचा तक्रारीत कुठलाही आक्षेप नसल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 5. सदर तक्रार मंचासमक्ष दि.19.10.2010 रोजी युक्तिवादाकरीता आली असता तक्रारकर्ता स्वतः हजर, मंचाने तक्रारकर्त्याचा युक्तिवाद ऐकला, गैरअर्जदारांनी यापुर्वीच युक्तिवाद केला असुन मंचापुढे दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून गैरअर्जदार क्र.3 व्दारा निर्मीत स्कीन क्रीम HIM SK NOUR CRM50mखरेदी केली होती ही बाब तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे कथनावरुन तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो. 7. सदर स्कीन क्रीमची किंमत रु.75/- होती व तक्रारकर्त्याकडून सदर स्कीन क्रीमकरीता रु.100/- स्विकारले, ही बाब तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे कथनावरुन स्पष्ट होते. 8. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, सदर चुक त्यांचे कॅशियरच्या लक्षात आल्यानंतर त्याने तक्रारकर्त्यास रु.25/- परत घेऊन जावे असे सांगितले. परंतु तक्रारकर्त्याने ते घेण्यांस नकार दिला. मंचाच्या मते बिग बाजार ही फार मोठी संस्था असुन तेथे बिलींग हे संगणकाव्दारे होते, ही बाब उभय पक्षांनी युक्तिवादाचे वेळी मान्य केली आहे. याचा अर्थ सदर स्कीन क्रीमची किंमत ही रु.100/- संगणकात अंकीत (Feed) करुन ठेवलेली आहे, त्यामुळे बिलामध्ये रु.100/- दर्शविण्यांत आले. याला कॅशियरची चुक समझता येणार नाही. वस्तुंची योग्य किमतीपेक्षा जास्त किंमत संगणकाव्दारे प्रदर्शित करणे, दर्शविणे व त्यामुळे ग्राहकांकडून जास्तीचे पैसे उकळणे ही अनुचित व्यापार पध्दत आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याचे ही बाब लक्षात आली व त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे सदर प्रकरण उघडकीस आले. ही बाब बहुतेक ग्राहकांच्या बाबतीत घडली असेल, असे मंचास वाटते. 9. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, तक्रारकर्त्यास चुक लक्षात आल्यानंतर रु.25/- घेऊन जाण्यांस सांगितले, परंतु त्याने ते स्विकारले नाही. त्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दि.22.04.2010 रोजी पत्राव्दारे सुचित केले व त्यासोबत रु.25/- धनाकर्ष पाठविल्याचे आपल्या उत्तरासोबत दस्तावेज क्र.1 दाखल केले आहे. सदर पत्र तक्रारकर्त्याने नाकारले असुन त्याने आपल्या प्रतिउत्तरात म्हटले आहे की, त्याने गैरअर्जदारांना दि.25.04.2010 रोजी ई-मेल करुन सदर रकमेची मागणी केल्याचे दस्तावेज क्र.2 वरुन स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्त्यास पाठविलेले रु.25/- त्यास मिळाले नाही, जर गैरअर्जदारांनी ते पाठविले होते तर त्यांनी ई-मेलव्दारे तक्रारकर्त्यास उत्तर द्यावयास पाहीजे होते किंवा तशी व्यवस्था करावयास पाहीजे होती. यावरुन हे स्पष्ट होते की, त्यांनी तक्रारकर्त्यास अतिरिक्त स्विकारलेली रक्कम रु.25/- दिलेली नाही. तसेच गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात तक्रारकर्त्याकडून अतिरिक्त स्विकारलेली रक्कम रु.25/- देण्याची तयारी दर्शविलेली आहे. 10. मंचाच्या मते ग्राहकांकडून जर जास्तीची रक्कम स्विकारली असेल तर त्याला परत करावयास पाहिजे व तसे गैरअर्जदारांनी न करणे ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. तक्रारकर्त्याने आर्थीक, शारीरिक व मानसिक नुकसानीकरता रु.15,00,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव आहे, परंतु तक्रारकर्त्याकडून जास्तीची रक्कम स्विकारणे व त्यानंतर मागणी केल्यानंतरही ती न देणे यामुळे तक्रारकर्त्याला साहजिकच शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. त्यामुळे तो न्यायोचितदृष्टया रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे. 11. तक्रारकर्त्याने तक्रारीचा खर्च रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदारांनी दुसरी नोटीस नोटीस न स्विकारल्यामुळे तक्रारकर्त्याने वृत्तपत्रातून नोटीस प्रदर्शीत केली व त्याबाबतचा पुरावा मंचासमक्ष दाखल केला आहे तसेच याकरता तक्रारकर्त्यास रु.4,000/- व रु.1,500/- खर्च आला ही बाब दाखल केली असुन सदर वृत्तपत्राचे देयक पान क्र.77 व 78 वरुन स्पष्ट होते व सदर रक्कम मिळण्यांस तक्रारकर्ता पात्र ठरतो. तसेच तक्रारकर्ता तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो, असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी सेवेत त्रुटी दिलेली असुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्याकडून जास्तीची स्विकारलेली रक्कम रु.25/- आदेश पारित झाल्यापासुन 30 दिवसांचे आंत परत करावी. 4. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना आदेश देण्यांत येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.1,000/-, नोटीस प्रदर्शित करण्यांकरता आलेल्या एकूण खर्चाचे रु.5,500/- आणि तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- अदा करावे. 5. गैरअर्जदार क्र.3 विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत येते. 6. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |