जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 321/2011 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 13/07/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-16/06/2015.
श्री.नितीन देवीदास मराठे,
उ.व.सज्ञान, धंदाः ड्रायव्हर,
रा.कासोदा,ता.एरंडोल,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,बुलढाणा,
तर्फे व्यवस्थापक, मुख्य कार्यालय,सहकार सेतु,हुतात्मा गोरे रोड,
बुलढाणा,ता.जि.जळगांव.
2. बुलढाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,बुलढाणा,तर्फे व्यवस्थापक,
उपशाखा कार्यालय,मेहता चेंबर,नवीपेठ,जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.दौलत प.तांदळे वकील.
सामनेवाला क्र. 1 व 2 श्री.तुषार एस.पटेल वकील.
निकाल-पत्र
आदेश व्दारा- श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः
1. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
2. तक्रारदार यांनी वाहन क्रमांक एम एच 21/3278 हे हमीदबी हिच्याकडुन दि.3/12/2002 रोजी रक्कम रु.1,80,000/- ला विकत घेतले होते. त्या वाहनावर सामनेवाला क्र. 1 यांचा कर्जाचा बोजा बसविलेला होता. सदर वाहन घेतांना सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदार यांचा रु.1,00,000/- कर्ज दिलेले होते. त्यासाठी सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराकडुन त्याचे खाते असलेले जळगांव जिल्हा सेंट्रल बँक लि.शाखा कासोदा चे 3 कोरे चेक घेतलेले होते. सदर कर्जापोटी तक्रारदाराने स्वतःच्या व हमीदबी यांचे नावावर सामनेवाला क्र. 1 यांचे संस्थेत एकुण रक्कम रु.1,08,000/- भरलेली आहे. वरील प्रमाणे तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 संस्थेकडे कर्ज रक्कमेची परतफेड केली असतांनाही सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे वाहन एप्रिल,2008 साली तक्रारदाराचे ताब्यातुन बळजबरीने घेऊन गेलेले आहेत त्या दिवसापासुन सदरचे वाहन सामनेवाला क्र. 1 चे ताब्यात आहे. एप्रिल,2008 पासुन तक्रारदाराचे वरील वाहन सामनेवाला क्र. 1 यांनी बळजबरीने घेऊन गेल्यामुळे तक्रारदाराचा व्यवसाय बंद झालेला असुन तक्रारदाराची उपसमार होत आहे. त्यास सामनेवाला क्र. 1 सर्वस्वी जबाबदार आहेत. तक्रारदार हे वेळोवेळी सामनेवाला क्र. 1 संस्थेत येऊन वरील वाहन परत मिळण्याची विनंती केली असता सामनेवाला क्र. 1 यांनी वरील वाहनाची कोणतीही माहिती तक्रारदारास दिलेली नाही. म्हणुन नुकसान भरपाई देण्यास सामनेवाला क्र. 1 सर्वस्वी जबाबदार आहे असे तक्रारदाराचे म्हणणे आहे व तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तक्रारदार हे सामनेवाला यांचे कायदेशीर ग्राहक असुन सामनेवाला संस्थेने तक्रारदाराचे वाहन न देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन तक्रारदार यांचे सेवेत कसुर केलेला आहे व सामनेवाला यांनी सदोष सेवा दिलेली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्यात यावी, तक्रारदार हा सामनेवाला क्र. 1 संस्थेचे थकीत कर्जाची रक्कम व्याजासह भरण्यास तयार आहे तरी सामनेवाला यांनी तक्रारदाराचे जप्त केलेले वाहन एम.एच.21/3278 तक्रारदाराला परत करण्याचे आदेश व्हावेत, तसेच सदरचे वाहन विकु नये असे आदेश व्हावेत व नुकसानी दाखल जप्त केलेल्या तारखेपासुन दररोज रु.1,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी लेखी म्हणणे सादर केलेले असुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेकडे दि.27/5/2003 रोजी वाहन तारण कर्जासाठी मराठी भाषेत असलेल्या अर्जावर स्वतःच्या सहीने अर्ज केला व त्याप्रमाणे संस्थेने मराठी असलेले अर्ज संपुर्णरित्या तक्रारदार याने वाचुन व समजुन त्याचेवर सहया केलेल्या आहेत व त्याप्रमाणे तक्रारदाराचे कर्ज हे सामनेवाला संस्थेने मंजुर केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी अर्जातील म्हणणे की, कागदपत्रे इंग्रजीत असल्यामुळे तक्रारदाराला वाचता आले नाही हे म्हणणे चुकीचे आहे. सामनेवाला संस्थेने कर्ज मंजुर केल्यानंतर तक्रारदार यांनी मुदतीच्या आंत रक्कमेचा भरणा केलेला नाही. म्हणुन तक्रारदाराला वेळोवेळी कायदेशीर तरतुदींचा अवलंब करुन लेखी नोटीसा पाठविण्यात आल्या. परंतु सदरची नोटीस मिळुनही तक्रारदाराने आजपर्यंत कर्ज रक्कमेचा भरणा केलेला नाही. सामनेवाला व तक्रारदार यांचेत करारात नमुद अटी व शर्तीचे अनुषंगाने कर्ज प्रकरण झालेले असुन करारात नमुद अटी व शर्ती तक्रारदारावर बंधनकारक आहेत. तक्रारदाराने करारात नमुद अटी व शर्ती नुसार कर्ज रक्कमेचा भरणा केलेला नाही त्यामुळे सामनेवाला यांनी करारात नमुद अटी व शर्ती नुसार कर्जाऊ वाहनाचा ताबा घेतलेला आहे. सामनेवाला यांची कोणतीही सेवा त्रृटी झालेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्य करण्यात यावी व तक्रारदाराकडुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- व खर्चादाखल रु.20,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
4. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र, सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेल्या नोटीसीची झेरॉक्स प्रत, तक्रारदाराने सामनेवाला यांना दिलेल्या नोटीसीची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदार व सामनेवाला हे प्रस्तुत तक्रार अर्ज सुनावणीसाठी नेमला असता अनेक तारखांना सतत गैरहजर राहीले म्हणुन उपलब्ध कागदपत्राआधारे प्रस्तुत तक्रार अर्ज गुणवत्तेवर निकालासाठी घेतला. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) प्रस्तुतचा वाद या मंचाचे अधिकार क्षेत्रात
चालण्यास पात्र आहे काय नाही.
2) काय आदेश शेवटी दिलेप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्या क्र. 1 व 2ः
5. तक्रारदार व सामनेवाला तसेच त्यांचे वकील प्रस्तुत अर्ज सुनावणीसाठी नेमलेला असतांना अनेक तारखांना गैरहजर. सबब उपलब्ध कागदपत्राआधारे प्रस्तुत तक्रार निकालासाठी घेतली. तक्रारदाराची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे तसेच तक्रार अर्जासोबत दाखल कागदपत्रे, तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र इत्यादींचे अवलोकन या मंचाने केले. उभयतांमध्ये वाहन तारण कर्ज प्रकरण झालेले असुन त्याअनुषंगाने कर्ज करारनामा झालेला असुन करारात नमुद अटी व शर्ती या तक्रारदार व सामनेवाला या दोघांवर बंधनकारक आहेत. तक्रारदाराने तक्रार अर्जातुन स्वतः त्याने सामनेवाला यांचेकडुन घेतलेल्या कर्जाची थकबाकी असल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले आहे तसेच थकीत कर्ज रक्कम भरण्याची तयारी देखील दर्शविलेली आहे.
6. सामनेवाला यांनी याकामी हजर होऊन लेखी म्हणण्यातुन तक्रारदाराचे कर्ज थकीत झाले असल्याने करारात नमुद अटी व शर्ती नुसार वाहन ताब्यात घेतल्याचे नमुद केलेले आहे. तसेच त्यामुळे सामनेवाला यांचे सेवेत कोणतीही सेवा त्रृटी झालेली नसल्याचे सामनेवाला यांनी नमुद करुन तक्रारदाराची तक्रार फेटाळावी अशी विनंती केली आहे.
7. वर नमुद विवेचन व तक्रार अर्जासोबत उपलब्ध कागदपत्रे इत्यादी पाहता तक्रारदार व सामनेवाला यांचेत वाहन तारण कर्ज करारनामा झालेला असुन करारात नमुद अटी व शर्ती हया उभयतांवर बंधनकारक आहे. करारात नमुद अटी व शर्ती नुसार सामनेवाला यांनी कार्यवाही केल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्जात नमुद वाद हा या मंचाचे अधिकार कक्षेत येत नसल्याचे निष्कर्ष नोंदवुन मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देऊन मुद्या क्र. 2 चे निष्कर्षास्तव खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
ज ळ गा व
दिनांकः- 16/06/2015.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.