ग्राहक तक्रार क्र. : 91/2015
दाखल तारीख : 04/02/2015
निकाल तारीख : 07/10/2015
कालावधी: 0 वर्षे 08 महिने 04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. हणूमंत लक्ष्मण कदम,
वय – 45 वर्षे, धंदा – शेती,
रा.काजळा, ता. जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. भोलेनाथ कृषी विकास केंद्र,
सुर्यंकांत पेट्रोल पंपाशेजारी, सोलापूर रोड,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
2. व्यवस्थापकीय संचालक,
ग्रीन गोल्ड सिडस प्रा.लि.,
गट नं.65, नारायणनगर शिवार,
वालूज, ता. गंगापुर,
जि. औरंगाबाद -431133. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.एल.पाटील.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री.एम.व्ही. मैंदाड.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधिज्ञ : श्री.ए.व्ही.मैंदरकर.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा:
अ) अर्जदार क्र.1 यांचे वहीवाटीतील मालकीचे गट क्र.105 क्षेत्र 2 हे मध्ये पेरणी केली असता उगवण न होऊन नुकसान झाल्याने ही तक्रार दाखल केली आहे. सदर क्षेत्रात पेरणी करीता पावतीव्दारे 4 पिशव्या बियाणे खरेदी केले आहे.
तक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार विप क्र.2 ने उत्पादीत केलेले सोयाबीन चे बियाणे हे दोषयुक्त असल्याचे व त्यासाठी विप क्र.1 व विप क्र. 2 जबाबदार असल्याचे म्हणणे आहे. विप क्र.2 ही कंपनी असून हया कंपनी दिलेले बियाणे हे विप क्र.1 मार्फत तक्रारदाराने खरेदी केलेले आहे. पेरणीकरीता आवश्यक ती मशागत व इतर गोष्टीचे पुर्व तयारी करुन 2014 च्या जुलै महिन्यात खरीप हंगामा करीता पेरणी झाल्यानंतर योग्य कालावधीत उगवण होत नसल्याची शंका आल्याने विप यांना कळवून पंचनामा तज्ञांमार्फत करुन घेतला. पंचनाम्यात उगवणीची टक्केवारी 14 टक्के आढळून आली. सदरबाबत विप यांनी नुकसान भरपाईची मागणी मान्य केली नाही. म्हणून तक यांना नुकसान भरपाई मानसिक शारीरिक त्रास व तक्रारीचा खर्च असा एकूण रु.3,75,000/- विप कडून अर्जदारास देण्याचा हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
विप क्र.1 यांना सदर तक्रारी संदर्भात नोटीस पाठवली असता त्यांनी दि.11/05/2015 रोजी आपले म्हणणे दाखल केले. ते पुढीलप्रमाणे.
विप क्र.1 हे बियाणे विक्रीचा व्यवसाय करतात व त्यांनी विप क्र. 2 कडून सिलबंद बियाणे अर्जदारास विक्री केलेली आहेत. उगवण शक्तीची संपूर्ण जबाबदारी ही विप क्र. 2 ची आहे म्हणून सदरचा अर्ज विप क्र. 2 विरुध्द करावा असे नमूद केले आहे;
विप क्र.2 यांना सदर तक्रारी संदर्भात नोटीस पाठवली असता त्यांनी दि.09/06/2015 रोजी आपले म्हणणे दाखल केले. ते पुढीलप्रमाणे.
विप चा से वितृतपणे दाखल झालेला असून त्यांनी तक्रारीसोबत दाखल केलेला तपासणी अहवाला संदर्भात आक्षेप दाखल घेतलेला असून त्यामध्ये पाहणी समीतीने पाहणी दिवशी किंवा पाहणीपुर्वी हजर राहण्यास सुचना दिलेली नाही. पेरणी पुर्वी आवश्यक ओलावा जमीनी मध्ये होता का याबाबत तक ने काही पुरावा वा नोंदी दिलेल्या नाहीत. मा. सर्वाच्च न्यायालयाच्या निष्कर्षानुसार शेतकरी हा बियाणांची किंमत मिळण्यास पात्र आहे तक्रारदाराचे बियाणांच्या संदर्भातील आक्षेप विप ने अमान्य केले आहेत. मशागत व त्यासाठी झालेला खर्च व त्याचे उत्पादन निघणे हे अनुकूल नैसर्गीक परीस्थितीवर अवलंबून आहे. मात्र उस्मानाबाद परिक्षेत्रात कमी पाऊस होऊन प्रतीकुल परीस्थितीत निर्माण झालेली असल्यामुळे न झालेल्या उत्पादनाची जबाबदारी विप वर येत नाही. क्षेत्राबाबत केलेली पाहणी ही विप क्र.1 यांच्या अनूपस्थितीत केली असल्यामुळे सदर पाहणी अहवाल विप ने अमान्य केला आहे. तक यांनी उत्पन्नाची दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीस धरुन नाही. शेतक-यांना दिलेल्या सुचनेत कलम 5 मध्ये बियाणे हळूवार हाताळावे, ओल कशी पहावी, कलम 10 मध्ये शक्यतोवर 15 जुलै पर्यंत पेरणी संपवावी अशा प्रकारच्या दिल्या आहेत. सदर माहितीचे परिपत्रक सोबत बियाणांची दिलेली माहिती पुरावा म्हणून वाचावी असे म्हणणे दिलेले आहे. सबब प्रतिकुल हवामान, पेरणी योग्य ओलावा नसतांना पेरणी केल्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले असून त्यामध्ये बियाणांचा दोष नाही असे म्हणणे दिलेले आहे.
तक्रारदाराची तक्रार निष्कर्षासाठी बियाणांचे व त्या अनुषंगाने झालेले आर्थिक नुकसानीचे आहे. या संदर्भात तक्रारदाराची तक्रार यांनी दाखल केलेले म्हणणे विप यांनी दाखल केलेले म्हणणे तसेच उभयतांचा युक्तिवाद यांचा विचार केला असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे निघतात. त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर दिली आहेत.
मुद्दा उत्तरे
1) तक हे विप चे ग्राहक आहेत काय ? होय.
2) विप हे तक्रारदार यांचे सेवा पुरवठादार आहे काय ? होय.
3) तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय होय? नाही.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा.
मुद्दा क्र.1 व 2 :
तक्रारदाराची तक्रार ही मुख्यत: दोषयुक्त बियाणांचा पुरवठा विप यांनी केलेला असल्याने झालेल्या नुकसानीबाबत आहे. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या पावत्यांच्या अनुषंगाने विप क्र. 1 कडून त्याने बियाणे खरेदी केलेले दिसुन येते. तसेच सदरचे बियाणे हे विप क्र. 2 ने उत्पादीत केलेले असून ते त्यांनी ही अमान्य केलेले नाही. त्यामुळे तक्रादाराचे विप क्र.1 व 2 शी ग्राहक व सेवा पुरवठादार हे नाते प्रस्थापित होण्यास काही अडचण नाही. त्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होय असे देतो.
मुद्दा क्र.3 :
विप ने तक ने फक्त चार बँग घेतल्याबाबत उल्लेख केला आहे त्याची तपासणी केली असता पावती क्र.904 अन्वये चार बँगच खरेदी केल्याचे दिसून येते तथापि तपासणी अहवालामध्ये खाडाखोड करुन पाच बँग लिहिल्या बाबत दिसून येते. त्यामुळे पावतीतील चार बँग हया मान्य करता येतील तसेच प्रती एकरी एक बॅग प्रती बँग तीस किलो एवढे बियाणे वापरणे अपेक्षित असता तक ने चारच बॅग खरेदी केल्याचे दिसून येत आहे. मात्र पेरणीसाठी वापरलेले बियाणे या सदरामध्ये 1.50 किलो एवढे बियाणे वापरलेले दाखवलेले आहे. तसेच सदोष बियाणे या सदराखाली खाडाखोड केलेली दिसून येते. अशा रितीने अत्यंत अव्यवस्थित असलेला तपासणी अहवाल सादर करण्यात आला त्यामुळे तक च्या तक्रारीवर निर्णय घेतांना अहवालातील मजकूर जर ग्राहय धरला तर तो सोईचा किंवा गैरसोईचा न बघता, आहे तसाच वाचावा लागेल त्यामुळे सदरची तक्रार ही सिध्द करण्यास तक अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल म्हणून आम्ही खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार अमान्य करण्यात येते.
2) खर्चाबाबात कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद