(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे, अध्यक्ष(प्रभारी))
(पारीत दिनांक : 24 जानेवारी 2012)
अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा नियमित ग्राहक असून, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून कार विकत घेण्याकरीता दि.20.2.2010 रोजी रुपये 3,00,000/- चे कर्ज घेतले होते. त्याचा कर्ज खाता क्र.964260510000001 आहे. अर्जदार कर्ज हप्त्याचा नियमित भरणा करीत होता. अर्जदाराचे मालकीची कार क्र.एमएच 31/डीसी
... 2 ... (ग्रा.त.क्र.16/2011)
2820 या वाहनाचा जुलै 2010 मध्ये अपघात झाल्यामुळे व त्यानंतर अर्जदार आजारी असल्यामुळे अर्जदाराला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे, कर्ज हप्त्याची रक्कम थकीत राहिलेली होती. अर्जदाराला वाहनाच्या अपघात विम्याची रक्कम रुपये 1,72,260/- युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीव्दारे धनादेश क्र.054004 दि.17.3.2011 प्राप्त झाला. सदर धनादेश अर्जदाराने दि.24.3.2011 ला गैरअर्जदार बँकेत कर्ज खात्यात जमा केला होता.
2. अर्जदाराला, गैरअर्जदाराकडील बँकेत असलेले कर्ज खाते बंद करावयाचे असल्याने, कारची विक्री करुन त्या सौद्यापोटी मिळालेली अग्रीम रक्कम रुपये 1,60,000/- कर्ज खात्यात दि.25.3.2011 ला उर्वरीत कर्जफेड करण्याकरीता जमा केले. अर्जदाराने कर्ज खाते बंद करुन कारचे नोंदणी प्रमाणपञावर असलेल्या कर्जाची नोंद रद्द करण्याबाबत विनंती अर्ज केला असता, धनादेशाची रक्कम जमा झाल्यानंतर ना देय/ना हरकत प्रमाणपञ देण्यात येईल असे सांगण्यात आले. अर्जदाराने कर्ज खात्याचे विवरण गैरअर्जदाराकडून घेतले असता, दि.30 मार्च 2011 रोजी रुपये 1,24,876.50 कर्ज खात्यात थकीत असल्याचे निदर्शनास आले. यावरुन, अर्जदाराने दि.24.3.2011 ला जमा केलेल्या धनादेशाची रक्कम रुपये 1,72,260/- ची नोंद घेण्यात आलेली नाही. अर्जदाराने, गैरअर्जदाराचे बँकेत जाऊन धनादेशाच्या रकमेबद्दल चौकशी केली. परंतु, गैरअर्जदाराने उडवा-उडवीची उत्तरे देऊन अर्जदाराला परत पाठवीत होते.
3. अर्जदाराने स्वतःचा व्यवसाय बंद ठेवून स्वखर्चाने गैरअर्जदाराचे नागपूर येथील सेवा शाखेत संपर्क केला असता, सदर शाखेकडून धनादेश प्राप्त झाला नाही व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, नागपूर यांचेकडे चौकशी केली असता, त्यांचे खात्यातून सुध्दा सदर रक्कम काढण्यात आलेली नाही, अशी माहिती प्राप्त झाली. कुरखेडा ते नागपूर येथे वारंवार जाणे-येणे केल्यामुळे अर्जदाराला नाहक शारीरीक, मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. अर्जदाराने, गैरअर्जदाराकडे पुन्हा चौकशी केली असता, सदर धनादेश गैरअर्जदाराकडून गहाळ झाल्याचे कळले. त्यामुळे, धनादेशाची दुय्यम प्रत प्राप्त करण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधण्याचा नागपूर येथील गैरअर्जदाराचे सेवा शाखेने दि.27.5.11 ला पञाव्दारे गैरअर्जदाराल कळविले. त्यानुसार दि.2.6.11 रोजी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला धनादेशाची दुय्यम प्रत देण्याबाबत पञ दिल्याचे कळले. गैरअर्जदाराच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे अर्जदाराचे नावावर असलेल्या कर्ज खात्यात आजही कर्जाच्या रकमेची नोंद आहे. त्यामुळे, अर्जदाराने अधि. श्री एस.व्ही.
... 3 ... (ग्रा.त.क्र.16/2011)
देशमुख यांचे मार्फतीने दि.25.6.11 रोजी गैरअर्जदाराला कायदेशीर नोटीस पाठविला. परंतु, गैरअर्जदाराने नोटीसाचे कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे, अर्जदाराने, गैरअर्जदाराकडे जमा केलेल्या धनादेश रुपये 1,72,260/- ची रक्कम जमा करुन अर्जदाराकडून मार्च 2011 अखेर घेणे असलेली रक्कम रुपये 1,24,876.50 वजा करुन कर्ज खाते माहे मार्च 2011 अखेर बंद करण्यात येऊन, उर्वरीत रक्कम रुपये 47,383.50 माहे एप्रिल 2011 पासून रक्कम प्राप्त होईपर्यंत 18 % व्याजासह देण्याचा आदेश पारीत करण्यांत यावा. अर्जदाराचे वाहनाचे नोंदणी प्रमाणपञावर असलेली कर्जाची नोंद रद्द करण्याबाबत ना देय/ना हरकत प्रमाणपञ देण्याचे निर्देश देण्यात यावेत. अर्जदारास झालेल्या आर्थिक व मानसिक ञासापोटी रुपये 1,00,000/- व न्यायालयीन खर्च रुपये 10,000/- गैरअर्जदारावर बसविण्यात यावा, अशी प्रार्थना केली आहे.
4. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठ्यर्थ नि.क्र.4 नुसार 11 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आला. गैरअर्जदार हजर होऊन नि.क्र.10 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
5. गैरअर्जदार यांनी लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदार अर्जदाराच्या तक्रारीत परिच्छेद क्र.1 ते 4 मधील मजकूर मान्य केला. तसेच, 30 मार्च 2011 रोजी अर्जदाराचे कर्ज खात्यात रुपये 1,24,876/- थकीत होते याबाबत वाद नाही. परंतु, धनादेशाची रक्कम प्राप्त झाल्याशिवाय ती रक्कम सदर व्यक्तीच्या खात्यात जमा दर्शविता येत नाही, त्यामुळे, दि.24.3.2011 रोजी जमा केलेल्या धनादेशाची रक्कम सदर तारखेस बँकेला प्राप्त न झाल्यामुळे धनादेशाची रक्कम अर्जदाराच्या कर्ज खात्यात जमा दाखविण्यात आली नव्हती. गैरअर्जदाराने कधीही उडवाउडवीची किंवा बेजबाबदारपणाची उत्तरे दिली नाही. त्याअनुषंगाने अर्जदाराने केलेले संपूर्ण कथन बनावटी व खोटे आहे, त्यामुळे गैरअर्जदारास नाकबूल. अर्जदारानी दि.24.3.2011 रोजी जमा केलेला चेक गैरअर्जदार बँकेनी विनाविलंब वसूलीकरीता बँकेंच्या नागपूर शाखेकडे पंजीबध्द डाकेव्दारे नागपूर येथील सेवा शाखेस वसूलीकरीता पाठविला. सदरचा चेक केवळ मानवीय चुकीने गैरअर्जदाराचे शाखेतून गहाळ झाला, ही माहिती गैरअर्जदाराला मिळताच गैरअर्जदाराने आपल्या कर्तव्यातून आणि जबाबदारीतून युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनीकडे डुप्लीकेट चेकसाठी अर्ज केला आणि चेकची रक्कम प्राप्त होताच ती रक्कम दि.27 जुलै 2011 रोजी गैरअर्जदाराचे कर्ज खात्यात वळती केली आणि या संबंधीची माहिती अर्जदारास दिली. गैरअर्जदाराने ना देय नाहरकत प्रमाणपञ न दिल्यामुळे अर्जदार आपल्या कार विक्रीचा सौदा पुर्णत्वास नेऊ
... 4 ... (ग्रा.त.क्र.16/2011)
शकला नाही हे संपूर्ण कथन बनावटी व खोटे असल्यामुळे, गैरअर्जदारास नाकबूल. गैरअर्जदारानी आपले कर्तव्यात कधीही कसूर केलेला नाही, त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचे तक्रारीचे निरासरण केलेले नाही, हे कथन तथ्यहीन आहे. कारण, गैरअर्जदाराने धनादेशाची रक्कम प्राप्त होताच ती अर्जदाराच्या कर्ज खात्यात वळती केली आहे आणि शिल्लक रक्कम त्याचा खात्यात जमा केलेली आहे. अर्जदाराची तक्रार दिशाभूल करणारी न्यायविसंगत व तथ्यहीन माहितीवर आधारीत असल्यामुळे सदरची मागणी नामंजूर करण्यांत यावी.
6. गैरअर्जदाराने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, बँकेस अर्जदाराच्या अपघाताविषयी व आजारपणाविषयी माहिती झाल्यानंतर अर्जदाराकडे कर्जाच्या रकमेच्या हप्त्यांच्या वसूलीसाठी तगादा लावलेला नव्हता. सदरचा धनादेश काही अनाकलनीय परिस्थितीत गहाळ झाला, त्यात गैरअर्जदाराचा दूरान्वयेही संबंध नाही किंवा बँकेचा देखील या मागे कुठलाही बदहेतू, बेजबाबदारपणा किंवा निष्काळजीपणा कृती नव्हती, ती केवळ एक अपघात होता. अपघाताने किंवा इतर कोणत्याही कारणाने धनादेश गहाळ झाल्यास त्याची दुय्यम प्रत प्राप्त करण्याची जबाबदारी बँकेनी आपले कर्तव्य व नैतीक जबाबदारी म्हणून सदर मामल्यात पूर्णतः निभावली आहे. कर्ज खात्यात रक्कम जमा केल्याची माहिती देखील गैरअर्जदाराने अर्जदारास दिली होती, त्यास अर्जदाराने आता तुमची केस ग्राहक मंचात टाकली आहे, तिथे निकाल लागल्यावरच बाकीच्या गोष्टी बघू असे उत्तर दिले. परंतु, ही वस्तुस्थिती अर्जदाराने मंचापासून लपवून ठेवलेली आहे. गैरअर्जदाराने किंवा त्यांच्या कोणत्याही अधिका-यांनी अर्जदारास ञास होईल असे कृत्य केलेले नाही. त्यामुळे, अर्जदारानी दाखल केलेली तक्रार संयुक्तीक कारणाशिवाय आहे म्हणून तक्रार खारीज करणे न्यायोचित आहे.
7. अर्जदाराने नि.क्र.12 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. गैरअर्जदाराने नि.क्र.15 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
8. अर्जदार यांनी, गै.अ. याचे शाखेतून कार खरेदीकरीता कर्ज घेतले होते. अर्जदाराने अ-10 वर आर. सी. बुक झेरॉक्स रेकॉर्डवर दाखल केले आहे, त्यात
... 5 ... (ग्रा.त.क्र.16/2011)
हायपोथीकेशनचे रकान्यात बँक ऑफ इंडिया नमूद आहे. अर्जदाराने, कर्ज रकमेची परतफेड करण्याकरीता, रुपये 1,60,000/- दि.25.3.2011 ला जमा केले आणि युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनीकडून मिळालेला धनादेश दि.24.3.2011 ला जमा केला. 30 मार्च 2011 ला देय असलेली कर्जाच्या रकमेत जमा करुन, कर्जाची परतफेड करुन, ना हरकत प्रमाणपञ मिळण्यास गै.अ. बँकेस विनंती केली. परंतु, गै.अ. बँकेनी दि.24.3.2011 रोजी जमा केलेल्या चेकची रक्कम त्याचे कर्ज खात्यात जमा करुन, ना हरकत प्रमाणपञ दिले नाही, असा आक्षेप अर्जदाराने गै.अ. बँकेवर लावून न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे कारणावरुन तक्रार दाखल केली आहे.
9. अर्जदाराने दि.24.3.2011 ला युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी, नागपूर यांनी दिलेला धनादेश बँकेत जमा केला त्याची काउंन्टर स्लीप अर्जदाराने अ-2 वर दाखल केली आहे. अर्जदाराने जमा केलेला चेक लगेच दुस-या दिवशी वसूलीसाठी (Clearing) गै.अ.च्या सेवा शाखा, नागपूर येथे पाठविला व तो चेक त्यांना मिळाला, याबद्दल अर्जदार व गै.अ. यांच्यात वाद नाही. अर्जदाराने, जमा केलेल्या चेकची रक्कम 27 जुलै 2011 रोजी अर्जदाराचे कर्ज खात्यात जमा करुन, उर्वरीत रक्कम त्याचे खात्यात जमा करण्यात आलेली आहे, याबद्दलही वाद नाही.
10. अर्जदार व गै.अ. याच्यांतील वादाचा मुद्दा असा आहे की, दि.24.3.2011 रोजी जमा केलेला चेक त्याचे कर्ज खात्यात जमा करण्यात आला नाही आणि त्यामुळे, अधिकचे व्याज अर्जदारास द्यावे लागले. तसेच, वाहन दुस-याला विक्री केले होते, परंतु वाहनाचे ना हरकत प्रमाणपञ न मिळाल्यामुळे पत/प्रतिष्ठा खराब झाली. वास्तविक, 30 मार्च 2011 रोजी कर्जापोटी रुपये 1,24,876.50 देणे होते, त्यापोटी विमा कंपनीकडून मिळालेला चेक रुपये 1,72,260/- जमा करण्यात आला. परंतु, गै.अ. यांच्या ञुटीयुक्त सेवेमुळे चेकची रक्कम जमा करण्यात आली नाही आणि नेहमी उडवा-उडवीचे उत्तरे देवून चेकची रक्कम जमा करण्यात सहकार्य केले नाही. अर्जदाराच्या तक्रारीनुसार गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली, तसेच गै.अ.यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्यामुळे शारीरीक, मानसिक ञास सहन करावा लागला, तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यामुळे, नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. परंतु, उपलब्ध रेकॉर्डवरुन आणि गै.अ. यांचे वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन सेवा देण्यात कोणी न्युनता केली, हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1)(ओ) नुसार सेवा देण्यात न्युनता केली असल्यास नुकसान भरपाईची मागणी करता येतो. परंतु, प्रस्तुत प्रकरणात गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली, हे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होत नाही. गै.अ.च्या वकीलांनी
... 6 ... (ग्रा.त.क्र.16/2011)
युक्तीवादात सांगितले की, गै.अ. भोजराज वरखडे, शाखाधिकारी हे जेंव्हा अर्जदाराने चेक जमा केला, त्या कालावधीत शाखाधिकारी नव्हते. युक्तीवादात हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, अर्जदाराने लगेच शपथपञ नि.क्र.10 नुसार युक्तीवाद आटोपल्यावर दाखल करुन, तक्रार ही शाखाधिकारी याचेविरुध्द नसून बँकेच्या विरुध्द आहे. वैयक्तीकरित्या गै.अ. भोजराज वरखडे, शाखाधिकारी हे जबाबदार नसून, बँक ञुटीयुक्त सेवेकरीता जबाबदार आहे. अर्जदाराचा हा बचाव ग्राह्य नाही. अर्जदाराच्या तक्रारीनुसार दि.24.3.2011 ला जमा केलेला धनादेश लगेच दुस-या दिवशी रजिष्टर पोष्टाने, सदर धनादेश वटविण्याकरीता गै.अ.च्या नागपूर येथील सेवा शाखेत पाठविण्यात आला. परंतु, तो त्यांना प्राप्त होऊनही क्लिरन्स करुन पाठविले नाही आणि तो धनादेश गहाळ झाला. धनादेश गहाळ झाल्याचे कळल्यानंतर अर्जदाराने टपाल खात्याशी संपर्क केला असता, त्यांचेकडून माहिती मिळाली की, दि.28.3.2011 रोजी टपाल/डाक पोहचती झाल्याचे सांगितले. अर्जदाराने, अ-5 वर पोस्टल विभागाच्या पञाची प्रत दाखल केली आहे. त्यात, दि.28.3.2011 ला रजिष्टर पोष्टाने दि.25.3.2011 पावती क्र.1121 नुसार पाठविलेली डाक देण्यात आली आहे. यावरुन, हे स्पष्ट होते की, बँक ऑफ इंडिया, शाखा कुरखेडाने आपली जबाबदारी पूर्णपणे, योग्य रितीने पार पाडली आहे. परंतु, त्यांना चेक क्लिरन्स होऊन परत न आल्यामुळे रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात आली नाही. अर्जदाराचा चेक, बँक ऑफ इंडियाची सेवा शाखा नागपूर यांनी चेक गहाळ केला, त्याकरीता गै.अ. बँकेला जबाबदार धरता येणार नाही आणि गै.अ. बँकेनी सेवा देण्यात न्युनता केली, असे म्हणता येणार नाही.
11. अर्जदाराने, अ-7 वर बँक ऑफ इंडिया, वरीष्ठ शाखा प्रबंधक नागपूर सेवा शाखा नागपूर यांचे पञ दि.27.5.2011 चे दाखल केला आहे. त्यामध्ये, असे नमूद केले आहे की, “We have to inform you that we have not received you get Clearing No. 4638749/1 Date 24/3/2011 for Rs. 1,72,260/-.
The Captioned Check might Misplace in transit ……….. ”
वरील सेवा शाखा, नागपूरच्या कथनावरुन चेक ट्राझींक्टमध्ये गहाळ झाल्याचे कथन केले आहे. जेंव्हा की, अर्जदारास पोष्टाकडून मिळालेल्या पञानुसार दि.28.3.11 ला सेवा शाखेला रजिष्ट्री पञ तामील केल्याचे दस्त दाखल केला आहे. अशास्थितीत, प्रस्तुत तक्रारीत सेवा शाखा ही आवश्यक पक्ष आहे, त्यांना तक्रारीत पक्ष केल्याशिवाय सेवा देण्यात कोणी न्युनता केली हे निश्चित करता येत नाही. उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ.यांनी प्राप्त झालेला धनादेश तात्काळ वटविण्याकरीता संबंधीत सेवा
... 7 ... (ग्रा.त.क्र.16/2011)
शाखेकडे पाठविला, परंतु तो त्यांनी क्लिरन्स करुन पाठविला नाही. त्यांच्या सेवेकरीता गैरअर्जदारास न्युनतापूर्ण सेवेकरीता जबाबदार धरता येणार नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, योग्य पक्ष केले नसल्याने तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही. मा.राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी, डॉ.एन.सी.सिंघल –वि.- डॉ.एल.एम.पाराशर व अन्य, 2003 (1) CPR 275 (NC) या प्रकरणात नॉन जॉईन्डर ऑफ नेसेसरी पार्टी, याबाबत मत दिले आहे. प्रस्तुत प्रकरणातही अर्जदार यांनी, चेक ज्या शाखेतून गहाळ झाला, त्यांना पक्ष केले नाही, असे उपलब्ध रेकॉर्डवरुन दिसून येत असल्याने, तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही.
12. वरील विवेचनावरुन, अर्जदाराची तक्रार ही योग्य पक्ष न केल्याच्या कारणावरुन प्रथम दर्शनी गुणदोषावर खारीज होण्यास पाञ आहे. तसेच, उपलब्ध रेकॉर्डवरुन गै.अ.बँकेनी आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. परंतु, सेवा शाखेकडून क्लिरन्स न आल्यामुळे चेकची रक्कम कर्ज खात्यात जमा केली नाही, यात त्यांनी सेवा देण्यात न्युनता केली नाही, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. अर्जदाराने योग्य पक्ष करुन स्वतंञरित्या तक्रार दाखल करावी व आपला वाद सोडवून घ्यावा, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, तक्रार निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आप आपला खर्च सहन करावा.
(3) अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 24/01/2012.