View 3033 Cases Against Maruti
shiri popatrow maruti kakade filed a consumer case on 11 Feb 2015 against bhichnd hirachnd rassoni mltistet in the Satara Consumer Court. The case no is CC/14/110 and the judgment uploaded on 05 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 110/2014.
तक्रार दाखल दि.17-07-2014.
तक्रार निकाली दि.11-2-2015.
श्री.पोपटराव मारुती काकडे,
रा.जाधववाडी, पो.फलटण,
ता.फलटण, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट
को.ऑ.क्रे.सोसायटी लि. जळगांव शाखा
फलटण.
2. श्री.प्रमोदजी रायसोनी- संस्थापक.
3. श्री.दिलीप कांतीलाल चोरडिया-चेअरमन.
4. श्री.मोतीलाल ओंकार जिरी- व्हा.चेअरमन.
5. श्री.सूरजमल बभूतमल जैन- संचालक.
6. श्री.दादा रामचंद्र पाटील- संचालक.
7. श्री.भागवत संपत माळी- संचालक.
8. श्री.राजाराम कृष्णनाथ कोळी-संचालक.
9. श्री.भगवान हिरामण वाघ- संचालक.
10. श्री.हितेंद्र यशवंत महाजन.
11. श्री.इंद्रकुमार आत्माराम ललवाणी- संचालक.
12. श्री.यशवंत ओकार जिरी- संचालक.
13. श्री.शेख रमजान शेख अब्दुल नबी-संचालक.
क्र.2 ते 13 रा.पूनम चेंबर्स, बॅक स्ट्रीट,
नवी पेठ, जळगांव. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.पी.जे.फौजदार.
जाबदार 1 ते 13- एकतर्फा आदेश.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्या कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे जाधववाडी, ता.फलटण येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत तर जाबदार क्र.1 ही को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे व जाबदार क्र.2 ते 13 हे प्रस्तुत सोसायटीचे संचालक आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी शेतीमधून मासे उत्पादनामधून रक्कम रु. 3,20,000/- (रु.तीन लाख वीस हजार मात्र) जाबदार संस्थेत ठेवीच्या स्वरुपात गुंतविले होते, तसेच प्रस्तुत जाबदार संस्थेत तक्रारदारांचे बचत खातेही आहे. मात्र बचतखात्याचे पुस्तक वारंवार मागणी करुनही जाबदाराने तक्रारदारास दिलेले नाही. वरील रक्कम रु.3,20,000/- (रु.तीन लाख वीस हजार मात्र) दरमहा 13 टक्के व्याजदराने जाबदार संस्थेत ठेव म्हणून ठेवले होते. जाबदार संस्थेने तक्रारदारास माहे जून 2014 अखेरचे व्याजही दिलेले होते. दरम्यान तक्रारदारास सदर रकमेची अत्यंत आवश्यकता असल्याने तक्रारदाराने जाबदाराकडे सदर रकमेची वारंवार मागणी केली असता प्रस्तुत संस्थेच्या फलटण शाखा व्यवस्थापक यांनी संस्था आर्थिक अडचणीत असून रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले व रक्कम देणेस नकार दिला. त्यानंतर तक्रारदाराने वेळोवेळी तगादा लावलेनंतर जाबदाराचे व्यवस्थापक जाबदार क्र.2 ने सांगितले की, ठेवपावत्या व बचत पुस्तिका संस्थेत जमा करा त्यापोटी आम्ही तुम्हांस त्या रकमेचा पुढील तारखेचा धनादेश देऊ. यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने मूळ ठेवपावत्या व बचत खात्याचे पासबुक जाबदार संस्थेत जमा केले व त्याबदल्यात जाबदार क्र.2 यांनी फलटण शाखेचे व्यवस्थापकांतर्फे दि.10-6-2014 रोजीचा 047263 या क्रमांकाचा अॅक्सीस बँकेचा फलटण शाखेचा एक धनादेश दिला व धनादेश वटण्याची हमी दिली. तक्रारदाराने प्रस्तुतचा धनादेश दि.11-6-2014 रोजी फलटण येथील दि वाई अर्बन को.ऑ.बँकेच्या तो पुरेशी रक्कम खात्यावर शिल्लक नाही या बँकेच्या शे-याने परत आला. ही माहिती जाबदार क्र.2 व जाबदार क्र.1 यांना दिल्यावर त्यांनी धनादेश पुन्हा बँकेत भरणेस सांगून धनादेश वटण्याची हमी दिली. यावर विश्वास ठेवून पुन्हा तक्रारदाराने दि.12-6-2014 रोजी धनादेश बँकेत जमा केला असता पुन्हा पुरेशी रक्कम नाही या शे-याने धनादेश न वटता परत आला प्रस्तत बाब पुन्हा तक्रारदारानी जाबदारांचे लक्षात आणून दिली असता व रक्कम परत मागितली असता जाबदारानी अरेरावीची भाषा वापरली व रक्कम देणेस स्पष्ट नकार दिला त्यामुळे तक्रारदाराना जाबदाराने सदोष सेवा पुरवली असल्याने तक्रारदाराने जाबदारांकडून सदर ठेवपावत्यांची रक्कम रु.3,20,000/- वसूल होऊन मिळणेसाठी तसेच प्रस्तुत रकमेवर दरमहा 13 टक्के व्याज माहे जुलै 2014 ते अर्जाच्या निकाल लागेपर्यंतच्या काळात वसूल होऊन मिळावे व प्रस्तुत व्याजासहित रकमेवर सर्व रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्के व्याज जाबदाराकडून मिळावे, तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी जाबदाराकडून रक्कम रु.2,00,000/- व नुकसानभरपाई मिळावी, तक्रारअर्जाचा खर्च मिळावा म्हणून सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/10 कडे अनुक्रमे जाबदारानी तक्रारदाराला दिलेला धनादेश, तक्रारदारानी सदरचा धनादेश बँकेत जमा केलेचे चलन, चेक रिटर्न मेमो, दि.11-6-2014 व 12-6-2014 चा रिटर्न मेमो, तक्रारदाराने जाबदाराला दिलेली नोटीस, जाबदाराने नोटीस घेणेस नकार दिलेने परत आलेला लखोटा, नि.7 ते 10 कडे जाबदारानी तक्रारअर्जाची मंचातर्फे पाठवलेली नोटीस स्विकारणेस नकार दिलेने परत आलेले नोटीसचे लखोटे, नि.12 कडे जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाची यादी, नि.13 कडे तक्रारअर्जासोबत दाखल प्रतिज्ञापत्र हेच पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद समजणेत यावा अशी पुरसीस दाखल केली आहे, इ.कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत.
3. सदर कामी जाबदार 1 ते 13 यांनी तक्रारअर्जाची नोटीस स्विकारली नाही म्हणून नोटीसा परत आल्या आहेत त्या नि.7 ते 10 कडे दाखल आहेत. सबब प्रस्तुत जाबदार क्र.1 ते 13 विरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारित झालेला आहे. जाबदारानी हजर होऊन तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.
4. वर नमूद तक्रारदारानी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात चालणेस पात्र आहे काय? नाही.
2. अंतिम आदेश? शेवटी नमूद केलेले आदेशाप्रमाणे.
विवेचन-
5. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत कारण प्रस्तुत तक्रारदारानी ठेवपावत्यांच्या रकमेपोटी जाबदार संस्थेकडून मिळालेला चेक बँकेतून न वटता परत आला म्हणून प्रस्तुत चेकची रक्कम मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. प्रस्तुत ठेवपावत्यांमध्ये जाबदार संस्थेमध्ये रक्कम गुंतवलेबाबत तक्रारदारानी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही तसेच प्रस्तुत कामी चेक न वटल्याने चेकच्या रकमेची मागणी केली आहे, परंतु सदरची तक्रार ही न वटलेल्या चेकची असल्याने प्रस्तुत प्रकरण हे मे.जे.एम.एफ.सी. कोर्टात्एन.आय. अँक्ट कलम 138 प्रमाणे दाखल करणे आवश्यक आहे. सदर तक्रारअर्ज या मे.मंचात चालू शकत नाही कारण या मंचास तसे अधिकार नाहीत, सबब तक्रारदाराने योग्य त्या कोर्टात दाद मागावी असे आमचे स्पष्ट मत आहे.
6. सबब सदर कामी तक्रारअर्ज या मे.मंचात चालणेस पात्र नसल्याने इतर कोणत्याही मुद्दयांचे विश्लेषण करणे आवश्यक नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. सबब आम्ही सदर कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येतो.
2. तक्रारदाराने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी.
3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
4. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.11-2-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.