मंचाचा निर्णय श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे कथनांन्वये. - आदेश - (पारित दिनांक – 19/11/2013) तक्रारकर्त्याने सदर तक्रार या ग्राहक हक्क संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे – 1. तक्रारकर्ता श्री. किरण पंडेल, वि.प.क्र.1 भेंडे गॅस एजेंसी यांचे गॅस ग्राहक आहेत. त्यांनी विरुध्द पक्षाकडून दि.03.08.2010 रोजी गॅस हंडी खरेदी केली. सदर गॅस हंडी तक्रारकर्त्याच्या पत्नीने शेगडीला जोडली आणि शेगडी सुरु करताच हंडीतील गॅस अती दाबाने बाहेर आल्यामुळे हंडीपासून रेग्युलेटर वेगळे होऊन फेकल्या गेला. त्यामुळे गॅस हंडीने पेट घेतला आणि तक्रारकर्त्याच्या घरास आग लागली. त्यात तक्रारकर्त्याच्या घरातील घरगुती सामान व उपरकरणांचे, तसेच बाजूच्या खोलीत असलेल्या डेकोरेशन साहित्याचे रु.2,25,000/- चे नुकसान झाले. अग्नीशमन दलाने सदर आग विझवीली आणि पोलिसांनी चौकशी करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. तक्रारकर्त्याने सदर आगीची माहिती आणि जळालेल्या सामानाची यादी वि.प.क्र.1 ला 16.08.2010 रोजी दिली आणि नुकसान भरपाईची मागणी केली. वि.प.क्र.1 ने वेळोवेळी नुकसान भरपाई देण्याचे तोंडी आश्वासन दिले. परंतू प्रत्यक्षात नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि.24.09.2010 रोजी वि.प.क्र. 1 यांना कायदेशीर नोटीस दिली. परंतू तरीही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की. गॅस वितरक म्हणून ग्राहकांना गॅस हंडी देण्यापूर्वी वि.प.क्र. 1 ने हंडी बरोबर असल्याची खात्री करुन घ्यावयास पाहिजे होती. परंतू तसे न करता, न्युनतापूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले आहे. म्हणून झालेल्या नुकसानापोटी रु.2,25,000/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- आणि तक्रारीचा खर्च मंजूर करावा अशी मागणी केली आहे. 2. तक्रारीची नोटीस प्राप्त झाल्यावर वि.प.क्र. 1, 2 व 3 ने तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. वि.प.क्र. 1 व 2 ने लेखी बयानामध्ये, तक्रारकर्ता वि.प.क्र. 1 चा गॅस ग्राहक आहे, हे मान्य केले. परंतू त्यांनी दि.03.08.2010 रोजी वि.प.क्र. 1 कडून गॅस हंडी खरेदी केली हे नाकारले आहे. त्यांचे पुढे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याने जळालेल्या सामानाची जी यादी दिलेली आहे, त्यात डेकोरेशन बरोबर स्वयंपाकाच्या सामानांचा देखील समावेश आहे. यावरुन तक्रारकर्ता गॅस सिलेंडरचा वापर आचारी कामासाठी देखील करतो असे दिसून येते. सदरचा वापर हा व्यावसायिक कारणासाठी असल्यामुळे तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण कायद्याचे ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाही, म्हणून सदर तक्रार दाखल करण्याचा त्यास अधिकार नाही. पुढे त्याचे म्हणणे असे आहे की, व्यावसायिक कारणासाठी असलेला रेग्युलेटर घरगुती वापरासाठी असलेल्या रेग्युलेटरपेक्षा मोठा असतो. तक्रारकर्त्याने असा मोठा रेग्युलेटर गॅस हंडीला लावल्यामुळे गॅस गळती होऊन तक्रारकर्त्याचे नुकसान झाले, यास तक्रारकर्त्याचा निष्काळजीपणा आणि बेकायदेशीर वापर कारणीभूत असल्याने सदर नुकसानीस वि.प. जबाबदार नाही. वि.प.चे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याने त्याचे साहित्य जळाल्याने रु.2,25,000/- चे नुकसान झाल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. परंतू पोलिसांच्या पंचनाम्यात नुकसानीचा अंदाज रु.1,00,000/- दर्शविला आहे. तक्रारकर्त्याने वि.प.कडून पैसे उकळण्यासाठी हेतूपूरस्सरपणे जळालेल्या सामानांची किंमत फुगवून सांगितली आहे. वि.प.चे म्हणणे असे आहे की, त्यांनी गॅस सिलेंडरबाबतचा विमा नॅशनल इन्शूरन्स कंपनीकडे काढला आहे. तक्रारकर्त्याने विमा कंपनीला तक्रारीत विरुध्द पक्ष केले नाही, म्हणून सदर तक्रार होण्यास पात्र आहे. 4. वि.प.क्र. 1 व 2 यांचे आक्षेपानंतर तक्रारकर्त्याने ‘नॅशनल इंशूरंस कंपनी लिमिटेड’ यांना वि.प.क्र. 3 म्हणून तक्रारीत समाविष्ट केले. वि.प.क्र. 3 ने आपले लेखी उत्तर नि.क्र.21 प्रमाणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, त्यांचा आणि तक्रारकर्त्याचा कुठलाही विमा करार नसल्यामुळे तक्रारकर्ता वि.प.क्र. 3 चा ग्राहक नाही. याशिवाय, त्याचे असे म्हणणे आहे की, वि.प.क्र. 1 यांनी वि.प.क्र.3 कडून केवळ त्यांचे परिसरातील गॅस सिलेंडर व कार्यालयाच्या मालमत्तेसाठी एल.पी.जी. गँस ट्रेडर्स पॉलिसी क्र. 281800/48/09/2000002214 दि.04.11.2009 ते 03.11.2010 या कालावधीसाठी काढली होती. सदर विमा पॉलिसी अंतर्गत ग्राहकाच्या जागेतील नुकसान, निर्मिती दोष अथवा उत्पादन क्षमतेच्या दोषासाठी कोणतेही विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे वि.प.क्र. 1 व 2 यांचे सेवेतील न्युनतेमुळे किंवा तक्रारकर्त्याच्या चुकीमुळे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची प्रतिपूर्ती देण्याची जबाबदारी वि.प.क्र.3 वर नाही. म्हणून त्यांचेविरुध्द तक्रार खारीज करावी अशी मागणी केली आहे. 5. तक्रारकर्ता व वि.प. यांच्या परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाचे विचारार्थ काढण्यात आले. त्यावरील निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे. मुद्दे निष्कर्ष 1) तक्रारकर्ता वि.प.क्र. 1 व 2 चा ग्राहक आहे काय ? होय. 2) वि.प.क्र. 1 व 2 यांनी न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय. 3) तक्रारकर्ता त्याचे मागणीप्रमाणे नुकसान अंशतः नुकसान भरपाईस भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? पात्र आहे. 4) अंतिम आदेश काय ? अर्ज अंशतः मंजूर. -कारणमिमांसा-
6. मुद्दा क्र. 1 ते 3 बाबत – सदर प्रकरणात तक्रारदार विरुध्द पक्ष क्र. 1 भेंडे गॅस एजन्सी एल.पी.जी. गॅस ग्राहक आहे ही बाब विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी लेखी बयानात कबूल केली आहे. तक्रारदाराचे घरी दि.03.08.2010 रोजी एल.पी.जी. गॅस सिलेंडरमध्ये गळती होऊन आग लागली व त्यात त्यांच्या घरातील घरगुती वापराचे साहित्य, तसेच एका खोलीत असलेले डेकोरेशन व्यवसायाचे साहित्य जळाले हे दर्शविण्यासाठी तक्रारदाराने नि.क्र.3 वरील दस्तऐवजांच्या यादीसोबत दस्तऐवज क्र. 2 वर चिफ फायर ऑफिसर, फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस, नागपूर मनपा यांचे दि.16.08.2010 रोजीचे पत्र व पोलिसांनी आगीच्या चौकशीचा केलेला घटनास्थळ पंचनामा (दस्तऐवज क्र.3) दाखल केलेले आहेत. आगीत घरगुती साहित्य, फर्निचर व डेकोरेशनचे सामान मिळून अंदाजे रु.1,00,000/- चा माल जळाल्याचे घटनास्थळ पंचनाम्यात नमूद केले आहे. 7. सदर आग लागल्यानंतर त्याची माहिती तक्रारदाराने एल.पी.जी.गॅस वितरक असलेल्या वि.प.क्र.1 ला दिली ही बाब विरुध्द पक्षाने कबूल केली आहे व तक्रारदारास नुकसान भरपाई द्यावी, म्हणून दि.05.08.2010 रोजी वि.प.क्र. 3 नॅशनल इंशूरंस कंपनी लिमि. नागपूर यांचेकडे दस्तऐवज यादी नि.क्र. 13 सोबत दाखल केलेले दस्तऐवज क्र. 4 हे पत्र पाठविल्याचे लेखी जवाबात नमूद केले आहे. परंतू वि.प.कडून तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे तक्रारदाराने दि.24.09.2010 रोजी दस्तऐवज क्र. 5 ही नोटीस अॅड. रणदिवे यांचेमार्फत पाठवून रु.2,25,000/- नुकसान भरपाईची मागणी केली. आगीत जळालेल्या सामानाची यादी दस्तऐवज क्र. 4 प्रमाणे दाखल केली आहे. तरीही विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी नुकसान भरपाई दिलेली नाही. 8. तक्रारदाराचे म्हणणे असे की, त्यांचेकडे फक्त एकच गॅस सिलेंडरचे कनेक्शन आहे. त्यांनी विरुध्द पक्ष क्र. 1 कडे दि.20.07.2010 रोजी गॅस बुकींग केली होती. दि.30.07.2010 रोजी डिलीवरी बॉय सिलेंडर घेऊन आला असता सिलेंडर पूर्ण संपले नसल्याने त्यादिवशी प्रत्यक्षात डिलिवरी घेतली नाही. डिलिवरी बॉयने सिलेंडर संपल्यावर नविन सिलेंडर स्वतः येऊन घेऊन जाण्यास सांगितल्यामुळे दि.03.08.2010 रोजी सिलेंडर संपल्यावर रिकामे सिलेंडर देऊन वि.प.क्र.1 कडून भरलेले सिलेंडर आणले. त्याबाबतची नोंद वि.प.क्र. 1 चा कर्मचारी सुशिल मेश्राम याने तक्रारदाराचे उपभोक्ता कार्डवर करुन दिली आहे. सदरचे उपभोक्ता कार्ड दस्तऐवज क्र. 1 वर दाखल केलेले असून, त्यावर गॅस सिलेंडर डिलीवरी तारीख दि.03.08.2010 नमूद असून, डिलिवरी देणा-याची सही आहे. सदर कार्डवर 30.07.2010 रोजी तक्रारदारास सिलेंडर दिल्याची कोणतीही नोंद नाही. 9. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, वि.प.क्र.1 ने सदर सिलेंडर सुरक्षित आहे किंवा नाही याची तपासणी न करताच दिले होते. ते सिलेंडर तक्रारदाराच्या पत्नीने जोडून गॅस सुरु केला तेव्हा सिलेंडरमधील गॅस अती दाबाने बाहेर आला व त्यामुळे रेग्युलेटर सिलेंडरपासून फेकल्या गेले व गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला आणि त्यात तक्रारदाराच्या घराला आग लागून घरगूती वापराचे साहित्य व घराचे जळून नुकसान झाले. तसेच त्याचे घरी असलेले डेकोरेशन व्यवसायाचे साहित्य जळाले आणि एकूण रु.2,25,000/- चे नुकसान झाले. सदर नुकसानीस गॅस वितरक असलेल्या विरुध्द पक्ष क्र. 1 चा निष्काळजीपणा कारणीभूत असून, त्याने गॅस ग्राहक असलेल्या तक्रारदारास न्यूनतापूर्ण सेवा दिल्यामुळे सदर नुकसान भरपाईस वि.प.क्र. 1 व 2 संयुक्त व वैयक्तीकरीत्या जबाबदार आहेत. 10. तक्रारदारातर्फे करण्यांत आलेल्या युक्तीवादाचे पुष्टयर्थ खालील न्यायनिर्णयांचा दाखला दिलेला आहे. 1) Karnataka State Consumer Disputes Redressal Commission, Banglore 2009 (2) CPR 137, Renuka Gas Co. Vs. Siddeshwar and ors. सदर प्रकरणात गॅस गळती होऊन स्फोट झाला व त्यात 2 व्यक्ती जखमी झाल्या आणि एका व्यक्तीचा मृत्यु झाला. विमा कंपनीच्या सर्व्हेयरने गॅस ट्यूब खराब होती व वेगळया रेग्युलेटरच्या वापरामुळे अपघात झाला असा अहवाल दिला होता. राज्य आयोगाने अभिप्राय व्यक्त केला की, ग्राहकांना गॅस वापराबाबत शिक्षित करण्याच्या सुचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. गॅस वितरक व उत्पादक यांनी ग्राहकास सिलेंडर आणि रेग्युलेटर बदलविण्याच्या सुचना दिल्याबाबत कोणताही पुरावा सादर केला नाही, ही सेवेतील न्युनता असल्याने नुकसान भरपाई मंजूर करण्याचा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचा आदेश योग्य आहे. 2) 2012 CPJ 50 (NC) India Oil Corporation Ltd. Vs. Pyare Lal. सदर प्रकरणात सिलेंडरचे सिल उघडल्यावर अतशिय दाबाने गॅस बाहेर येऊन स्फोट झाला व आग लागली. यास गॅस उत्पादक कंपनी व वितरकांची सदोष सेवा कारणीभूत धरुन नुकसान भरपाई मंजूर केली आहे. 3) West Bengal State Consumer Disputes Redressal Commission, Kolkata 2010 (3) CPR 498, Benu Gopal Base and Anr. Vs. Hindustan Petroleum Corporation and Anr. सदर प्रकरणात विमा कंपनी व गॅस उत्पादक किंवा वितरक यांच्यात कोणताही विमा करार असेल तरी गॅस वितरक विरुध्द सेवेतील त्रुटीबाबत नुकसान भरपाईसाठी दाखल केलेल्या दाव्यात विमा कंपनीला पक्ष म्हणून जोडले नाही या कारणांसाठी गॅस वितरक व उत्पादक यांना ग्राहकाचा दावा नाकारता येणार नाही असे म्हटले आहे. 11. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता वि.प.क्र. 1 व 2 गैरहजर होते. त्यांनी दाखल केलेल्या लेखी बयानातील त्यांच्या बचाव असा की, ज्या सिलेंडरच्या वापरामुळे आग लागली तो तक्रारकर्त्याने त्यांच्याकडून दि.03.08.2010 रोजी विकत घेतला नव्हता, तर बाहेरुन अवैध मार्गाने मिळविला होता. तसेच घटनास्थळावर स्वयंपाकाचे साहित्य आढळून आले. यावरुन तक्रारदाराने सदर सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केला होता व त्याला घरगुती वापराचे रेग्युलेटरऐवजी मोठे रेग्युलेटर लावल्याने त्याच्याच चुकीने गॅस गळती झाल्यामुळे आग लागली, यात विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा कोणताही दोष नाही व त्यांनी कोणतीही न्यूनतापूर्ण सेवा दिली नाही. त्यांनी विमा ग्राहकांचा विमा काढला असल्याने नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. 12. वि.प.क्र. 3 विमा कंपनीच्या अधिवक्त्यांनी त्याचे युक्तीवादात सांगितले की, वि.प.क्र. 1 ने त्यांच्याकडे दि.04.11.2009 ते 03.11.2010 या कालावधीसाठी काढलेली L P Gas Traders Combined Policy लेखी बयानासोबत नि.क्र.22 प्रमाणे दाखल केली आहे. सदर पॉलिसीप्रमाणे Clause I प्रमाणे वि.प.क्र.1 च्या वानाडोंगरी, हिंगणा रोड., नागपूर स्थित गोडाऊनमधील एल पी जी गॅस सिलेंडरची आग, चोरी व स्फोट इ. कारणामुळे झालेल्या नुकसानीबाबत जोखीम स्विकारली आहे. तसेच Clause III प्रमाणे गोडाऊनपासून ग्राहकाचे घरापर्यंतच्या वाहतूकीदरम्यान आग अथवा इतर कारणामुळे गॅस सिलेंडरचे नुकसान झाल्यास त्याबाबतची जोखीम विमा कंपनीने स्विकारली आहे. परंतू गॅस वितरकाचे चुकीमुळे किंवा ग्राहकाचे चुकीमुळे ग्राहकाच्या घरी गॅस सिलेंडरला आग लागून नुकसान झाल्यास त्याबाबतची नुकसान भरपाईची जोखीम विमा पॉलिसीत स्विकारली नसल्याने वितरक अगर ग्राहकाच्या चुकीमुळे झालेल्या तक्रारकर्त्याच्या नुकसानीची भरपाई भरण्याची जबाबदारी विमा कंपनीची नाही, म्हणून विमा कंपनीविरुध्द तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 13. सिलेंडर डिलीवरी कार्डवरील नोंदीप्रमाणे गॅस वितरक असलेल्या वि.प.क्र. 1 भेंडे गॅस एजन्सीकडून तक्रारकर्त्याने दि.03.08.2010 रोजी एल पी जी गॅस सिलेंडरची डिलीवरी घेतल्याचे स्पष्ट होते. सदर गॅस सिलेंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे आग लागून तक्रारकर्त्याचे घर, घरातील सामान व लागूल असलेल्या खोलीतील डेकोरेशनचे सामान आगीत जळाल्याचे सिध्द झालेले आहे. अर्जदाराने सिलेंडरचा दुस-यांचा स्वयंपाक करण्यासाठी म्हणजे व्यावसायिक कारणासाठी केला हे सिध्द करणारा कोणताही पुरावा वि.प.क्र. 1 व 2 यांनी दाखल केला नाही, म्हणून तक्रारदाराचे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी केल्याने तो वि.प.क्र. 1 चा ग्राहक नाही हा बचाव निराधार असल्याने स्विकारता येत नाही. तसेच तक्रारदाराचा मंडप डेकोरेशन व स्वयंपाकाची भांडी भाडयाने देण्याचा व्यवसाय आहे व जळालेल्या वस्तूंच्या यादीत स्वयंपाकाची भांडी आहेत, म्हणून तक्रारदाराने घरगुती वापराच्या रेग्युलेटरपेक्ष वेगळा रेग्युलेटर वापरल्यामुळे गॅस गळती झाली या वि.प.क्र. 1 व 2 यांच्या कथनास कोणताही आधार नाही. त्यामुळे गॅस गळतीस तक्रारदाराची चुक कारणीभूत असल्याचा वि.प.चा बचाव स्विकारता येत नाही. 14. वरील सर्व परिस्थितीवरुन तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून विकत घेतलेल्या वि.प.क्र.2 निर्मित गॅस सिलेंडरमधून गॅस गळती होऊन जे नुकसान झाले त्यात वि.प.क्र.1 ने डिलीवरी पूर्वी सिलेंडर न तपासण्याची कृती कारणीभूत आहे. सदरची निष्काळजीपणाची कृती ही गॅस वितरक व उत्पादकाने गॅस ग्राहकास द्यावयाच्या सेवेतील न्यूनता असून, त्यामुळे तक्रारकर्त्याचे झालेले नुकसान भरुन देण्यास तेच जबाबदार आहेत. ग्राहकाच्या घरी गॅस गळतीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची जोखीम विमा पॉलिसीत समाविष्ट नसल्याने, वि.प.क्र. 3 ला नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त करणे योग्य होईल. 15. तक्रारकर्त्याचे दस्तऐवज यादी नि.क्र. 3 सोबत दस्तऐवज क्र. 4 प्रमाणे जळालेल्या वस्तूंची यादी व किंमत दिली असून त्यापोटी रु.2,25,000/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पोलिसांनी जो घटनास्थळ पंचनामा केला आहे, त्यात नुकसानीचा अंदाज रु.1,00,000/- दर्शविला आहे. अशा परिस्थितीत आगीमुळे झालेली तक्रारकर्त्याचे नुकसान रु.1,00,000/- गृहित धरुन तेवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मंजूर करणे योग्य होईल असे मंचास वाटते. याशिवाय, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- मंजूर करणे योग्य होईल, म्हणून मुद्या क्र. 1, 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदवित आहेत. वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2) वि.प.क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी संयुक्तरीत्या व वैयक्तीकरीत्या तक्रारकर्त्यास नुकसान भरपाईची रक्कम रु.1,00,000/- तक्रार दाखल दि.28.01.2011 पासून तक्रारर्त्याला प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह अदा करावी. 3) शारिरीक व मानसिक त्रासाबाबत रु.5,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबाबत रु.2,000/- वि.प.क्र. 1 व 2 यांनी संयुक्तरीत्या व वैयक्तीकरीत्या तक्रारकर्त्यास द्यावे. 4) वि.प.क्र. 3 ला नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येते. 5) उपरोक्त आदेशाची पूर्तता वि.प.क्र. 1 व 2 ने एक महिन्याचे आत करावी. 6) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी. |